सहा सात महिन्यांपुर्वीची गोष्ट असेल. चार विधानसभांच्या निवडणूकांची नांदी झाली होती आणि भाजपाने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. लगेच मोदी यांनी देशव्यापी दौरा सुरू केला होता आणि एकामागून एक मोठमोठ्या विराट सभांचा सपाटा लावला होता. गुजरातबाहेर मोदींना मिळणार्या प्रतिसादामुळे तमाम राजकीय पंडीत हादरून गेले होते आणि त्या सभांच्या थेट प्रक्षपेणासोबत नंतर मोदींच्या प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करण्याचा प्रघात सुरू झाला होता. त्यामुळे कॉग्रेस व अन्य विरोधकात नाराजी पसरली होती. माध्यमेच मोदींना अवास्तव प्रसिद्धी देतात, अशा तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्याच काळात मोदींनी निवडणूका असलेल्या राज्यात आणि इतरत्रही अशा सभांचे रान उठवले होते. साधारण प्रत्येक आठवड्यात एकदोन मोठ्या सभा चालू होत्या. तेव्हा मोदींची लोकप्रियता किंवा त्यांच्यासाठी जमणार्या गर्दीची टवाळी करण्याची शर्यतही राजकीय पंडीत व नेत्यांमध्ये सुरू होती. अशा सभांनी लोकसभा जिंकता येत नाही आणि आपल्या देशात संसदीय लोकशाही आहे, अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय निवडणूका होत नाहीत, असले डोस पाजले जात होते. शिवाय अनेक राज्यात भाजपाचा मागमूस नाही, की मित्रपक्षही सोबत यायला राजी नाहीत; अशी निदाने चालूच होती. त्याचवेळी चाणाक्ष जाणता नेता शरद पवार यांनी केलेले एक भाष्य महत्वाचे होते. त्यांनी इतरांप्रमाणे मोदींची टवाळी केली नाही. पण कुणालाही पटणारे, असे एक विधान केलेले होते. आपण खुप निवडणूका लढवल्या, असा हवाला देत मोदी कुठे फ़सतील; याचे भाकित पवारांनी केले होते. आज पवार किंवा अन्य कोणाला ते भाकित आठवते काय?
मॅराथॉन शर्यतीमध्ये आधीच धावत सुटलेल्यांची पुढे दमछाक होते आणि उशीरा सुरू करणारेच शर्यत जिंकतात, असे विधान पवारांनी केलेले होते. पवारांचे ते विधान अनेकांना अंशत: पटलेले होते. पण पवारांपेक्षा कमी काळात राजकारणाचे डावपेच शिकलेल्या मोदींची गोष्टच वेगळी होती. कारण सलग बारा वर्षे प्रतिकुल परिस्थितीशी झुंजत इथवर आलेला हा माणूस इतकी घाईगर्दी, उतावळेपणा करील असे वाटतही नव्हते. आज सहा सात महिन्यानंतर काय परिस्थिती आहे? लौकर सुरू केलेले मोदी थकून गेलेत काय? उलट त्यावेळेपेक्षा त्यांचा वेग वाढला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करणार्यांची मात्र दमछाक झालेली दिसू लागली आहे. थोडक्यात मोदींनी सुरूवात केली ती घाई नव्हती, तर संथगतीने सुरूवात केली होती. जसजसे दिवस गेले तसतशी त्यांच्या धावण्याची गती वाढतच गेलेली आहे. देशाच्या कानाकोपर्यात पोहोचलेला एकमेव नेता; असे म्हणायची वेळ आलेली आहे. पण इतकी धावपळ करूनही कुठेही थकव्याचे चिन्ह नाही. मग पवारांच्या विधानाचा अर्थ आज कसा लावायचा? कारण पवारांच्या भाषेतल्या या मॅराथॉन शर्यतीमध्ये आज इतर स्पर्धकांना कुठल्या कुठे मागे सोडून मोदी खुप पुढे निघून गेलेत. मग पवार चुकीचे म्हणाले होते काय? की पवारांना मॅराथॉन म्हणजे काय, त्याचाच पत्ता नव्हता? पवार लोकसभा निवडणूकीबद्दल बोलले होते, की राजकारणातील शर्यतीबद्दल त्यांनी मतप्रदर्शन केले होते? राजकारणातली कारकिर्द, ही खरी मॅराथॉन शर्यत असते. त्यामध्ये निवडणूका हे टप्पे असतात. शर्यतीला आरंभ पहिल्या छोट्यामोठ्य़ा निवडणूकीतून होत असतो आणि पुढे पुढे अधिक वेगाने धावायची गरज असते? पवार त्याच राजकीय मॅराथॉनबद्दल बोलले असतील काय? त्यांचा स्वानुभव काय आहे?
पवारांनी पहिली निवडणूक तिशीच्या आधीच लढवली आणि तिशी पार होताना मंत्रीपदही मिळवले. अवघ्या दहा वर्षात मुसंडी मारून मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांच्या राजकीय मॅराथॉन शर्यतीमध्ये आज पवार कुठे येऊन पोहोचले आहेत? पंतप्रधानपद ही त्यांच्या राजकीय शर्यतीचे लक्ष्य नव्हते का? मग त्यात पवार कुठवर येऊन पोहोचले? कितीही शॉर्टकट मारून त्यांना पंतप्रधान पदाच्या रेषेपर्यंत पोहोचताही आलेले नाही. असे कशाला झाले आहे? ही शर्यत मॅराथॉनची आहे, हे तेव्हा पवारांच्या लक्षात आलेले नसावे. मोदींची गोष्ट एकदम वेगळी आहे. तुलनेने मोदी खुपच उशीरा या शर्यतीत उतरले. खरे सांगायचे तर त्यांना पक्षाने जबरदस्तीने सत्तेच्या शर्यतीत उतरवले. पन्नाशी ओलांडल्यावर पक्षाने लादल्याने त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले आणि पुढल्या घडामोडींनी उठलेले टिकेचे मोहोळ आवरताना मोदी कधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊन पोहोचले; त्याचा त्यांनाही पत्ता लागला नाही. राजकीय कारकिर्दीला पद वा सत्ता मिळवण्याच्या हव्यासाने मोदींनी सुरूवात केली नाही. आपली शक्ती व सराव वाढवत नेल्याने आज पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते खुप जवळ जाऊन पोहोचले आहेत. उलट घाईगर्दी करताना पवार यांना कुठल्या कुठे मागे पडावे लागले आहे. त्यांनी आपल्याला लागू होणारे निकष मोदींना लावण्याची अकारण घाई केली. म्हणून सहासात महिन्यांपुर्वी त्यांनीच केलेले विश्लेषण आज खोटे पडू लागले आहे. आपल्याच विश्लेषणात पवार यांची फ़सगत झाली आहे. आज पंतप्रधानपद दूरची गोष्ट झाली. महाराष्ट्रातील आपलेच बालेकिल्ले संभाळताना पवारांची तारांबळ उडालेली आहे. आणि त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसून, खुद्द पवारांनी केलेली घाईगर्दीच त्याचे एकमेव कारण आहे.
प्रत्येक बाबतीत घाईच करतात
ReplyDeleteपवारसाहेब आता सुधारु शकत नाहीत! आता तर ते लहान मुलांप्रमाणे खोडकर झाले आहेत.
ReplyDelete