Friday, May 23, 2014

कॉग्रेसचा जिर्णोद्धार शक्य



 सहासात वर्षापुर्वी पहिल्याच २०-२० विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी या तरूणाकडे भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि त्या संघातून सचिन, द्रविड, गांगूली, लक्ष्मण अशा दिग्गजांना दुर ठेवण्यात आलेले होते. अनपेक्षितरित्या धोनीने त्यात यश मिळवले व भारतीय संघ तो दिग्विजय करून मायदेशी परतला होता. मुंबईत त्यांचे भव्य स्वागत झाले व विमानतळावरून थेट वानखेडे स्टेडीयमपर्यंत त्यांची मिरवणूक निघालेली होती. तिथे त्यांचा जाहिर सत्कार करण्य़ात आला. त्या प्रसंगी सचिन तिथे गैरहजर होता. त्याबद्दल प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला, हा विजय त्या तरूणांचा आहे आणि त्यांचेच कोडकौतुक व्हायला हवे. पण ज्यांनी तो सत्कार समारंभ बघितला असेल त्यांना आठवेल, व्यासपीठावर हजर असलेल्या थोरामोठ्या नेत्यांना मात्र त्याचे भान अजिबात नव्हते. शरद पवार क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून पुढल्या रांगेत बसायला हरकत नव्हती. पण त्यांच्यासह तमाम राज्य मंत्रीमंडळच पुढल्या रांगेत बसलेले होते आणि अजिंक्यवीर क्रिकेटपटू मात्र मागल्या रांगेत ढकलून दिलेले होते. सत्काराला उत्तर देताना मात्र, अशा नेत्यांपेक्षा आपल्यापाशी किती उच्च दर्जाचे नेतृत्वगुण आहेत, त्याची साक्ष धोनीने दिलेली होती. मैदानावर खेळतो म्हणून आम्ही लोकांना दिसतो आणि अजिंक्यवीर वाटतो. पण त्यासाठी आम्हाला कायम सज्ज व तंदुरुस्त ठेवणारी मागली सहाय्यकांची फ़ळी दिसत नाही. त्यांना कोणी श्रेय देत नाही, असे वास्तव त्याने तेव्हाच बोलून दाखवले होते. श्रेय असेल तर आमचे आणि कष्टाची वेळ येते तेव्हा आम्ही पिछे; असे जेव्हा नेते असतात, तेव्हा यशाची खात्री कोणी बाळगू शकत नाही, की हमी देऊ शकत नाही. नुकत्याच संपलेल्या निवडणूकीचे निकाल नेमके तेच सांगणारे आहेत.

   येत्या सोमवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणारे भाजपा नेते नरेंद्र मोदी निकालाच्या दुसर्‍या दिवशी दिल्लीला पक्षाच्या मुख्यालयत पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. ते विनम्रपणे स्विकारताना त्यांनी इतक्या मोठ्या यशाचे श्रेय कुणाला दिले? अवघ्या जगात त्यांच्या विक्रमाचे कौतुक होत असताना, मोदी मात्र आपल्या यशाची माळ पक्षाच्या आजवरच्या तमाम सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात घालत होते. पंतप्रधान पदाची निवड होण्याच्या दिवशी संसदेत प्रथमच पाऊल टाकताना त्यांनी पायरीवर डोके टेकवले. पुढे निवड झाल्यानंतर बोलताना भावनेच्या आहारी जाऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण ते विजयाच्या आनंदाचे नव्हते, तर वरीष्ठ नेते अडवाणी यांच्या एका शब्दाने दुखावल्याने ओघळलेले अश्रू होते. पक्षच आपल्या मातेसमान आहे. त्याच्यावर आपण उपकार करीत नसतो, तर पक्षाची सेवा करायची असते. पक्षात व त्याच्या कार्यात सहभागी झाल्यावर व्यक्तीगत स्वार्थ हेतू संपतात आणि सर्वार्थाने पक्षाशी एकरूप व्हावे लागते. हेच आपले मनोगत आहे व ब्रीद आहे, असे त्यांनी उपस्थितांना ऐकवले. ज्यांच्याकडून धडे गिरवले, त्यांनाच पक्ष व संघटनेची महत्ता समजावण्याची वेळ आल्याने मोदी भारावलेले असावेत. मोदी असो की अडवाणी, हे पक्षावर कृपा करीत नसतात, तर ज्या विचारांनी ती संघटना चालवली जात असते, तिच्या यशासाठी झटण्याची संधी मिळणे हीच कृपा असते. ती व्यक्तीमत्व समर्पित करून स्विकारायची असते, असेच मोदींना सांगायचे असावे. मोदी हा माणूस पक्षापेक्षा मोठा होतोय, अशी टिका गेल्या वर्षभरात सातत्याने झाली, तिला त्या एका प्रसंगातून मोदींनी उत्तर दिले. पण त्यातूनच त्यांनी देशातल्या तमाम पक्ष, संघटना व संस्थांमध्ये कार्यरत असलेल्यांना मनापासून एक संदेश दिला. जिथे असाल व ज्या कार्यात गुंतला असाल, त्यात व्यक्तीगत अहंकार येऊ देऊ नका.

   भाजपाला मागल्या काही वर्षात त्याच व्याधीने ग्रासलेले होते. त्यातून अडवाणी यांच्यासारखा जुनाजाणताही सुटलेला नव्हता. त्यातून पक्षाला बाहेर काढण्याचे श्रेय मात्र मोदींना नक्कीच आहे. पण त्याचे भान सुटलेल्या कॉग्रेसचा म्हणूनच इतका दारूण पराभव झालेला आहे. यश मिळाले तर राहुल वा सोनियांमुळे आणि अपयश आले, तर पक्ष व संघटना जबाबदार, हीच ती व्याधी आहे. त्यातूनच मागल्या चार दशकात कॉग्रेस अधिकाधिक खंगत गेली. मतलबी लोकांची गर्दी तिथे वाढत गेली आणि बांधिलकीने राबवणार्‍यांचा दुष्काळ पडत गेला. जेव्हा कसोटीची वेळ येते, तेव्हा असले दोष संकट होऊन उभे ठाकतात. तिथे मग बांधिलकी वाचवू शकते. भाजपाकडे तसा कार्यकर्ता होता, त्याने पक्षाला कात टाकायला भाग पाडून पुन्हा संघटनात्मक मार्गावर आणायचे धाडस केले. कॉग्रेसला अजून मूळ व्याधीचे निदान करण्याची हिंमत झालेली नाही. तर त्यातून बाहेर पडण्याचा विचार खुप दूरची गोष्ट झाली. मोदींनी हे आव्हान स्विकारताना वर्षभरापुर्वी वडीलधारे अडवाणी व अन्य ज्येष्ठ नेत्यांची नाराजी पत्करली होती. पण स्वत:वर सगळीकडून होणार्‍या मतलबी आरोपांचेही घाव निमूटपणे झेललेले होते. त्यात यशस्वी झाल्यावर त्यांनी यशाचे माप पक्ष व कार्यकर्त्यांच्या झोळीत टाकून कुठे कसर राहिली असल्यास आपण त्याला जबाबदार असल्याचे विनाविलंब सांगुन टाकले, त्याला बांधिलकी म्हणतात. आज भाजपचा जिर्णोद्धार त्यातूनच झालेला आहे. मोदींनी काय केले, कसे केले, कशामुळे त्यांना करता आले, त्याचा सुक्ष्म अभ्यास केला; तरच कॉग्रेसला पराभवाच्या गुंत्यातून बाहेर पडणे शक्य होईल. ज्या कॉग्रेस नेत्याला हे शक्य आहे, त्याच्याकडूनच पक्षाचा जिर्णोद्धार होऊ शकेल.


1 comment:

  1. भाऊ कांग्रेसचा कोणताही नेता पराभवाची जबाबदारी घेईल असे वाटत नाही. असा नेता समोर दिसतही नाही. सद्ध्यातरी मोदींशी बरोबरी करेल असा नेता मला तरी माहित नाही. माझा तरी असा अनुभव आहे की कॉंग्रेस अता अता पर्यंत नेहरू गांधी यांच्या मुळे निवडून येत होती. खेड्यातील अनेक अशिक्षित वयस्कर लोकांचा असा समज आहे की इंदिरा, राजीव, राहुल हे महात्मा गांधी घराण्याचे लोक आहेत. लोक जसजसे शिक्षित होत आहेत तसतसी ही धारणा यापुढे कमी होत जाईल. आपण म्हणता तसा बदल झाला तरच कांग्रेसला काहीतरी भवितव्य असेल.

    ReplyDelete