Wednesday, June 11, 2014

कौरवांचेही पांडव होतात?



   लोकशाही जितकी अजब गोष्ट आहे, तितक्याच भारतीय पुराणकथा चमत्कारिक आहेत. त्यामुळे एका कथेचा आधार घेऊन तुम्ही आपल्या कृतीसाठी स्वत:ला पुण्यवान ठरवू शकता आणि त्याच कृतीसाठी दुसर्‍या कथेचा आधार घेऊन तुमचा विरोधक तुम्हाला पापी घोषित करू शकतो. त्यामुळेच कॉग्रेसच्या लोकसभेतील नव्या गटनेत्याने स्वत:ला पांडव घोषित करून टाकले असेल, तर कोणाला नवल वाटण्याचे कारण नाही. नव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींचे जे अभिभाषण झाले, त्यांचे आभार मानण्याचा प्रस्ताव आता चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आलेला आहे. त्यावर विविध पक्षांच्या नेत्यांची भाषणे व्हायची असतात आणि अखेरीस पंतप्रधान त्याला उत्तर देऊन प्रस्ताव संमत व्हायची प्रथा आहे. सहाजिकच कुठलाही पक्ष राष्ट्रपतींवर टिका करत नाही. जो सत्तारूढ पक्ष सरकार चालवित असतो, त्याच्यावर मात्र सगळे विरोधक तोंडसुख घेत असतात. पर्यायाने राष्ट्रपतींच्या भाषणात आलेले मुद्दे असतात, त्याचाही राजकीय उहापोह त्या चर्चेतून होत असतो. नव्या लोकसभेत कॉग्रेसची पुरती धुळधाण उडालेली आहे. कालपर्यंत संसदेतील सर्वात मोठा व सत्ताधारी असलेल्या या पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्याइतके सदस्य निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळेच राजकारणात कॉग्रेसची पार दुर्दशा झालेली आहे. त्यातच मितभाषी मल्लिकार्जुन खरगे या नेत्याला सोनियांनी सभागृहातील गटनेता बनवल्याने टिका झालेली होती. कारण इतकी संख्या कमी असताना कुणीतरी आक्रमक नेताच पक्षाचा आवाज उठवू शकेल, असे मानले जात होते. कमलनाथ वा विरप्पा मोईली यांच्यासारख्या कुणाला तरी कॉग्रेस पुढे करील, ही अपेक्षा होती. पण खरगे यांच्या नेमणूकीने निराशाच झाली होती. त्या टिकेला जणू नव्या कॉग्रेसनेत्याने उत्तर दिले म्हणायचे.

   खरगे यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना पुन्हा भाजपाच्या निवडणूकीतील यशाला बाजारू यश ठरवण्याची संधी सोडली नाही. मतदाराला नुसती आश्वासने देऊन मोठ्या जाहिराती करून निवडणूका जिंकता येतात. पण ती आश्वासने पुर्ण करणे सोपे नसते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात खरगे यांनी मोदी सरकारच्या नव्या धोरणात नवे काहीच नाही. नव्या सरकारने आधीच्या युपीए सरकारच्याच अनेक यशस्वी योजना व धोरणांना नवी वस्रे चढवून मांडले आहे. मागल्या दहा वर्षात युपीए सरकारने खुप चांगली कामे केली आणि त्यातलेच विषय, धोरणे व योजनांची फ़ेररचना करून मोदी सरकार लोकांची दिशाभूल करू बघत असल्याचा आरोप खरगे यांनी केला. पण अशा या बनवेगिरीचे वाभाडे काढून सरकारची लक्तरे चव्हाट्यावर आणायला दुबळा वाटणारा कॉग्रेस पक्ष कंबर कसून उभा असेल, अशी ग्वाही खरगे यांनी दिली. त्यात गैर काहीच नाही. प्रत्येक विरोधी पक्ष अशीच भाषा बोलत असतो. पण असे शब्द बोलताना व इतका कडक इशारा नव्या सरकारला देताना, खरगे यांनी वापरलेली भाषा त्यांच्या व्यक्तीमत्वाला व परिस्थितीला शोभणारी नव्हती. मोदी सरकारला मोठे बहूमत मिळाले म्हणून त्यांनी उन्मत्तपणे व उद्दाम वागता कामा नये; असा इशारा देणार्‍या खरगे यांना मागल्या पाच वर्षात बहुमत पाठीशी नसताना कॉग्रेसने केलेले वर्तन अजिबात आठवत नसेल काय? दिल्लीत सामुहिक बलात्कार झाल्यानंतर जनता रस्त्यावर उतरली, तरी तिच्या टाहोला साधा प्रतिसादही द्यायची युपीए सरकारला गरज वाटली नव्हती. याला नम्रतेने वागणे म्हणतात काय? अण्णा हजारे व रामदेव बाबा यांनी आंदोलनाचा शांततामय मार्ग चोखाळला, त्यांना पोलिसी अतिरेक करून पिटाळण्याचा कॉग्रेसी पवित्रा उन्मत्तपणाचा नमूना नव्हता काय? इतके घोटाळे झाल्यावरही गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी लोक विसरून जातात आणि पुन्हा कॉग्रेसलाच निवडून सत्ता देतात, अशी मुक्ताफ़ळे उधळली त्याला नम्रता म्हणतात काय? खरगे यांना उन्मत्तता व नम्रता यातला फ़रक कळतो काय?

   स्वातंत्र्योत्तर सात दशकामध्ये सर्वाधिक सत्ता कॉग्रेस पक्षानेच राबवली आहे. त्यापैकी बहुतांश काळात त्यांच्याकडे प्रचंड बहूमत होते आणि त्याच बळावर विरोधी पक्षांना चिरडून पुढे जाण्याच्या राजकारणाला समंजसपणा म्हणतात काय? लोकशाही, संसद गुंडाळून काही काळ लादण्यात आलेली आणिबाणी व त्या कालखंडात विनाखटले विरोधकांना दोन वर्षे तुरूंगात डांबून ठेवण्याचा इतिहास कॉग्रेसचाच नाही काय? ह्या झाल्या कॉग्रेसकडे बहूमत असतानाच्या गोष्टी. पण गेल्या पाच वर्षात स्वत:चे किंवा मित्रपक्षांचे बहुमत पाठीशी नसताना कॉग्रेसने विरोधकांना दिलेली वागणूक कुठल्या प्रकारात मोडणारी होती? त्याच्याही पुढे जाऊन नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात, राहुल गांधी यांची प्रचाराची शैली व भाषा कितीशी नम्रतेची होती? अशा सत्तेच्या उद्दामपणाचा वारसा घेऊन आलेल्या खरगे यांनी, नव्या सरकारला उन्मत्त होऊ नका, म्हणून इशारे देणे हा निव्वळ विनोदच झाला म्हणायचा. बहुमताचे पाठबळ असल्याने कोणी कौरव होत असेल, तर मागल्या कित्येक दशकात कॉग्रेस पक्ष कौरवांचे अनुकरण करीत होता काय? आणि आता आपल्या हातून सत्ता गेल्यावर जुन्या पापाची भुते भेडसावू लागली असल्याचा हा पुरावा म्हणावा काय? कारण अगदी मतदानाची शेवटची फ़ेरी होत असताना स्नुपगेट चौकशी आयोग नेमायची घोषणा त्याच कॉग्रेसने मंत्री कपील सिब्बल करीत होते. तो खरगे यांचा वारसा कुठून आलाय त्याचा सर्वात अलिकडचा पुरावा आहे. अशा माणसाने ४४ असलो म्हणून काय? सत्ताधारी कौरवांना पांडवांसारखे पुरून उरू; असली भाषा बोलावी याचे लोकांना हसू येईल. कारण इतके मोठे अभूतपुर्व बहूमत मिळवल्यानंतरही मोदी यांनी कुठेही उद्दामपणा दाखवलेला नाही. उलट प्रत्येक पावलावर त्यांनी समंजसपणाचीच साक्ष दिली आहे. मात्र इतका दारूण पराभव झाल्यावरही कॉग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांमधला उद्दामपणा संपलेला नाही. त्यामुळे कोण कौरव आहेत आणि कोण पांडव आहेत, ते वेगळे सांगायची गरज नाही. महायुद्धात नेहमी कौरवांचाच पाडाव होतो. खरगे यांना आपल्या पक्षाचा पाडाव नुकताच झालाय, याचेही भान आलेले नाही काय?

No comments:

Post a Comment