Friday, June 13, 2014

हर शाखपे उल्लू बैठा है



   नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षाची इतकी लज्जास्पद हार कशाला झाली; त्याची कुठलीही कारणमिमांसा अजून झालेली नाही. ती होण्याचीही शक्यता दिसत नाही. कारण विनोदाने असे म्हटले जाते, की खरेच सोनियांना मिमांसा करायची असती तर त्यांनी एव्हाना अन्थोनी समिती नेमली असती. यातला विनोद असा, की सोनिया पक्षाच्या अध्यक्षा झाल्यापासून पाचसहा तरी वेळा पक्षाची फ़ेररचना वा पराभवाच्या मिमांसेसाठी अन्थोनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. त्या समितीचे अहवालही आलेले आहेत. पण त्यावर पुढली कोणती कारवाई झाली, हे रहस्यच आहे. सहाजिकच अन्थोनी समिती नेमणे, म्हणजे तो विषय गुलदस्त्यात गुंडाळून ठेवणे, असाच लावला जातो. पण यावेळी तशीही कुठली समिती नेमायची गरज पक्षाध्यक्षांना वाटलेली नाही. सोनिया व राहुल यांनी पराभव स्पष्ट होताच पत्रकार व चॅनेलच्या कॅमेरासमोर येऊन आपला पराभव मान्य केला व त्याची जबाबदारी स्विकारली. पुढे काहीच नाही. मग नेहमीप्रमाणेच पक्षाचा कारभार चालू आहे. जे काही मुठभर खासदार लोकसभा निवडणूकीत निवडून आलेत, त्यांच्यासह राज्यसभेतील खासदारांची संयुक्त बैठक सेंट्रल हॉलमध्ये झाली आणि त्यात सोनियांनी जुन्या प्रथेप्रमाणे जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजिनामा दिला. अर्थात असे त्यांनी केल्यावर तमाम कॉग्रेस खासदारांनी त्याला विरोध दर्शवून राजिनामा फ़ेटाळुन लावला आणि पुन्हा सोनियांचीच संसदीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निवड करून त्यांच्या हाती सर्वाधिकार सोपवले. हा एक सोपस्कार सोडला, तर कधी कॉग्रेसजन गांधी घराण्याच्या वारसाचा शब्द वा निर्णय नाकारण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे सोनियांचा राजिनामा देखील आता एक औपचारिकता झालेली आहे आणि ती पार पाडली, की काहीच गंभीर घडलेले नाही; अशा थाटात कारभार चालू होतो आणि याहीवेळी झाला.

   अर्थात काही तुरळक तक्रारी आलेल्या आहेत आणि काही अन्य कॉग्रेसजनांनी राहुल गांधी यांच्यावर दोषारोप करायची हिंमत दाखवली आहे, केरळचे माजी मंत्री मुस्ताफ़ा व राजस्थानचे एक आमदार खुलेआम राहुलना जोकर म्ह्णाल्याने पक्षातून हाकलले गेले आहेत. पण दुसरीकडे राहुल गांधींची नुसती भाटगिरी करणारे मात्र पक्षात सुरक्षित आहेत. त्यापैकीच एक मणिशंकर अय्यर यांचा समावेश होतो. पाचच महिन्यापुर्वी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी शिबीर चालू असताना, अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांची ‘चायवाला’ अशी संभावना केली होती. त्यांच्या त्याच उद्दाम विधानाने मोदींना रान उठवायची संधी दिली. आपल्याला चायवाला म्हणुन हिणवले जाते, अशी सहानुभूती मिळवण्यात मोदी यशस्वी झालेच. पण त्यांच्या चाणाक्ष सहकार्‍यांनी ‘चायपे चर्चा’ अशा देशव्यापी कार्यक्रमापासून सर्वच मोठ्या शहरामध्ये मोदीचाय नावाचे स्टॉल काढून अय्यर यांच्या विधानाचा खुप लाभ उठवला. मोदींनी चहाविक्रेत्याला आपला उमेदवारी अर्ज भरताना सोबत ठेवूनही छान प्रचार साधला. त्यातून नुकसान होणार हे ओळखून राहुल गांधींनी तेव्हा अशा प्रकारची हेटाळणीची विधाने करी नयेत असा फ़तवाही काढला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही, दिग्विजय सिंग, कपील सिब्बल, अय्यर वा अन्य कॉग्रेस प्रवक्ते आपापल्या कुवतीनुसार मुक्ताफ़ळे उधळतच राहिले आणि त्याचा लाभ मोदींना प्रचाराच्या कालखंडात देतच राहिले. पण आता निवडणूका संपल्या आहेत आणि अशा बोलघेवड्या नेत्यांनी उधळलेल्या मुक्ताफ़ळांची भरपूर किंमत कॉग्रेसने आधीच मोजून झाली आहे. कारण आता अय्यरच्या नाकावर टिच्चून मोदी देशाचे पंतप्रधान झालेही आहेत. पण म्हणून अशा दिवाळखोरांची माथी ठिकाणावर येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. आणि येतील तरी कशाला? खुद्द पक्षाध्यक्षा सोनियांनाच कुठे व काय चुकले, त्याचा शोध घेण्याची गरज वाटत नसेल, तर अय्यरनी तरी तोंडाला आवर घालण्याची गरज काय?

   आता इतके होऊन गेल्यावर पुन्हा अय्यर यांनी मोदींच्या विरोधात गरळ ओकली आहे. कॉग्रेसचे लोकासभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी, स्वत:ला पांडव ठरवित भाजपाच्या कौरवांशी लढण्याची भाषा केली होती. त्याला चिमटा घेत मोदींनी सध्या महाभारताचा काळ नसून एकविसाव्या शतकातला भारत घडवण्यासाठी एकत्रित काम करण्याचा कालखंड असल्याची खरगेंना आठवण करून दिली. त्याचवेळी अजून (पराभवानंतरही) विजयाची झिंग उतरलेली नाही असा टोमणाही मारला. त्यावर भाष्य करताना अय्यर यांनी पंतप्रधान मोदींना ‘कालचा पोरगा’ अशी एकेरी भाषा वापरून हल्ला चढवला. कारण खरगे सत्ताधारी मोदींना अहंकाराची मस्ती चढू देऊ नका असा सल्ल्ला देत होते. पण प्रत्यक्षात मोदी संयमी व विनम्र भाषा बोलत असताना कॉग्रेसचाच पराभूत नेता मात्र उद्दामपणाची भाषा बोलताना दिसतो आहे. यातून लोकांमध्ये कोणता संदेश दिला जातो? इतके आपटले, तरी कॉग्रेसची मस्ती उतरत नाही, असेच लोकांना वाटणार ना? मग ती मस्ती खाली आणण्यासाठी याहीपेक्षा कॉग्रेसचे पंख छाटायला हवेत, असेच त्या मतदाराला वाटणार ना? खरे तर पक्षाच्या पराभवाची कुठलीही मिमांसा करण्याची गरज नाही. या असल्याच तोंडाळ व बोलघेवड्या क्रियेविण वाचाळ नेत्यांनी पक्ष बुडवला आहे. त्यांच्याच अशा विधानांनी कॉग्रेसविषयी जनतेचा भ्रमनिरास होत गेला. पण त्यांना बाजूला करण्यापेक्षा राहुल यांच्या बेताल बोलण्याने व विधानांनी पक्षाचा पराभव झाला म्हणणार्‍यांचीच उचलबांगडी झालेली आहे. त्यातून मग अय्यरसारख्यांना प्रोत्साहनच मिळत असते. त्यामुळेच ते आणखी बेताल बोलत सुटतात. यातून कॉग्रेसला कोणी कसे वाचवावे? उद्यानाची नासाडी करायला एकच वटवाघुळ पुरेसे असते. ज्या उद्यानात प्रत्येक फ़ांदीवरच असे प्राणी बसलेले असतात, त्याचे काय होईल, असा एक प्रसिद्ध शेर आहे. कॉग्रेसची अवस्था आज त्याच उद्यानासारखी झाली आहे

बरबादे गुलिस्तां करने को, बस एकही उल्लू काफ़ी था
हर शाखपे उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्तां क्या होगा?



No comments:

Post a Comment