Friday, June 6, 2014

पुण्याच्या अमानुष हत्याकांडाचे पोस्टमार्टेम



   लोकसभा निवडणूकीत तब्बल तीस पाव शतकानंतर एका पक्षाला जनतेने बहूमत बहाल केलेले आहे, असे बहूमत एका पक्षाला मिळू शकते, असे कुठल्याही राजकीय अभ्यासक वा विश्लेषकाला वाटत नव्हते. उलट मोदींसारखा दंगलीमुळे बदनाम झालेला नेता पुढे केल्याने, भाजपाचा पुरता बोजवारा उडणार; याचीच छातीठोक ग्वाही बहुतांश विश्लेषक देत होते. शिवाय मुस्लिम मतदार भाजपाला मोदींमुळेच मते देणार नसल्याने मोदींचे अपयश सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र त्या सर्वांना चुक ठरवून मतदाराने भाजपाला अभूतपूर्व यश बहाल केलेले आहे. त्याचे श्रेय अनेकजण मोदींच्या लोकप्रियतेला देतात, तर काहीजण त्याचे श्रेय अपयशी नाकर्त्या युपीए व कॉग्रेस पक्षाला देतात. पण वास्तविक बघता त्याचे खरे मानकरी सेक्युलर बोलघेवडे आहेत. त्यांच्याच सेक्युलर म्हणजे हिंदूद्वेष अशा अतिरेकी प्रचारातून हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात धृवीकरण होत गेले आणि त्याचाच लाभ मोदींना मिळाला आहे. भाजपाने मोदींसारख्या कडव्या हिंदू चेहर्‍याकडे आपले नेतृत्व सोपवले नसते, तर विश्लेषक व अभ्यासकांचे आघाडी युगाचे भाकित खरे ठरले असते. सेक्युलर बोलघेवड्यांच्या अतिरेकी हिंदुद्वेषाने जे धृवीकरण झाले, त्याचा लाभ उठवायला मोदींसारखा नेता नसता, तर इतके धृवीकरण होऊही शकले नसते. म्हणूनच मोदींच्या अभूतपूर्व यशाचे खरे मानकरी सेक्युलर तोंडपाटिलकी करणारेच आहेत. मात्र त्यांना अजूनही आपल्या पापाचे भान आलेले नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या चुकांचे आत्मपरिक्षण करण्यापेक्षा फ़सलेल्या डावपेचांचीच पुनरुक्ती चालविली आहे. पुण्यात घडलेल्या मुस्लिम तरूणाच्या एका निर्घृण हत्याकांडानंतरच्या प्रतिक्रिया त्याचीच ग्वाही देणार्‍या आहेत. जी घटना घडली, ती अमानुष व पाशवी आहे यात शंकाच नाही. पण त्यामागची पार्श्वभूमी लपवून चाललेला अतिरेक, विनाशकाले विपरीत बुद्धीसारखा आहे.

   हे लोक एका गोष्टीचा कार्यकारणभाव विसरून गेले आहेत. मोदींना कोणी इतके मोठे केले व कुठल्या घटनेने मोदींना राष्ट्रव्यापी प्रतिमा प्राप्त झाली? गोध्रा येथील साबरमती एक्सप्रेस गाडीचा डबा मुस्लिम जमावाने पेटवून दिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत गेली आणि ती आवरण्याच्याही पलिकडली होती. अशाप्रकारच्या दंगली देशात अनेक राज्यात पुर्वीही सतत घडलेल्या आहेत. अगदी गुजरातमध्ये तर एकदोन वर्षाच्या अंतराने सातत्याने अशा दंगली उसळत होत्या. पण गोध्रानंतरच्या दंगलीचे गेली बारा वर्षे इतके काहूर माजवण्यात आले, की त्यातून मोदींची प्रतिमा डागाळण्याच्या प्रयत्नाचा अतिरेक होऊन त्यांच्या मागे हिंदू मतांचे धृवीकरण होत गेले. कारण त्या एका दंगलीनंतर पुन्हा गुजरातमध्ये गेल्या बारा वर्षात पुन्हा कुठलीही मोठी दंगल वा हिंसाचार झाला नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सतत गुजरात दंगलीचा बागुलबुवा करणार्‍यांनी गोध्राच्या जळीतकांडाचा मात्र उल्लेख कटाक्षाने टाळला होता. जणू त्यात हिंदूंवरचा अन्याय वा अत्याचार रास्तच असावा असा एक सूर असायचा. जणू हिंदूंनी अपमानित व्हावे, निमूट अन्याय अत्याचार सोसावेत; असेच त्यातून सुचवले जात होते. त्याची सुप्त प्रतिक्रिया हिंदू समाजात होत राहिली. पण दिसत नव्हती, कारण तिचे नेतृत्व करायला कोणी खंबीर नेता लोकांसमोर नव्हता. मोदी त्यात पुढाकार घेताना दिसले, तेव्हा तो देशभरचा दुखावलेला हिंदू त्यांच्यामागे एकवटत गेला. त्याला हिंदूत्वाचे कौतुक नाही किंवा धर्मांधता नको आहे. पण जणू हिंदू असणे हाच आपल्या मायदेशी गुन्हा झाल्याचे भासवले जात आहे, त्याला हा बहुसंख्य वर्ग कंटाळलेला होता. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात मोदींच्या विरोधात जितके विषारी बोलले गेले व व्यक्तीगत हल्ले त्यांच्यावर झाले; त्यातून हिंदू मत त्यांच्याकडे ओढले गेले. लोकसभा निवडणूकीत त्याचेच प्रतिबिंब पडलेले आहे.

   त्यामुळे अचंबित झालेले सेक्युलर बोलघेवडे काही काळ गप्प होते. त्यांना आता पुण्यातल्या घटनेने पुन्हा वाचा फ़ुटली आहे. पुण्यातली घटना माणूसकीला काळीमा फ़ासणारी आहे. पण तिच्या मागचे कारण मोदी वा त्यांचा विजय अजिबात नाही. जशी दोन वर्षापुर्वी मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चानंतर घटना घडली होती, तसलाच हा प्रकार आहे. म्यानमार व आसाममध्ये मुस्लिमांवर अत्याचार झाल्याच्या विकृत बातम्या व चिथावणीखोर छायचित्रांनी माथे फ़िरलेल्या मुस्लिमांचा मोर्चा काढण्यात आला. त्या जमावाने भर दिवसा महिला पोलिसांची अब्रु लुटली. पोलिसांच्या गाड्या, वृत्तवाहिन्यांच्या गाड्या पेटवून दिल्या. महापालिकेच्या जवळचे अमर जवान स्मारक तोडून टाकले. त्यातला आवेश व अमानुषता काय स्वरूपाची होती? पुण्यात एका निष्पाप निर्दोष मुस्लिम तरूणावर जमावाने हल्ला करून त्याला ठार मारण्यापेक्षा ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदान परिसरात घडलेला घटनाक्रम किंचित वेगळा होता काय? दोन्हीकडला उन्माद व अमानुषता तसूभर वेगळी नव्हती. आणि तेव्हाच्या त्या घटनाक्रमाला खुद्द पोलिस आयुक्तांसह मोठे पोलिस अधिकारीच साक्षीदार होते. त्यानंतरही संशयितांना रमझान संपेपर्यंत पकडू नयेत, असेच आदेश देण्यात आले होते. आपण हे सर्व विसरून गेलोत काय? किती सेक्युलर बोलघेवड्यांनी तेव्हा टाहो फ़ोडून आक्रोश केला होता? आज पुण्याच्या घटनेनंतर ऊर बडवणार्‍यांनी त्यावेळी मौन कशाला धारण केले होते? तेव्हा गप्प बसून आज टाहो फ़ोडणारेच हिंदूत्वाची व्होटबॅन्क निर्माण करीत असतात. त्याच व्होटबॅन्केने मोदींना लोकसभेत अभूतपुर्व बहूमत मिळवून दिले आहे. आणि आज पुन्हा त्यांनी जो टाहो फ़ोडला आहे, त्यातून त्याच हिंदू व्होटबॅन्केतील ठेवी वाढत जाणार आहेत. कारण एका दुर्दैवी घटनेचे असे राजकारण सहानुभूती निर्माण करण्यापेक्षा, राजकीय धृवीकरण मात्र वेगाने घडवून आणत असतात.

   निवडणूकांपुर्वी बहुतेक सेक्युलर शहाण्यांचे मत होते, की मोदी म्ह्णजे उघड धर्मांध हिंदूत्वाचे प्रतिक त्यापेक्षा अडवाणी सुद्धा परवडले. आणि आता सगळे तावातावाने म्हणत आहेत, की भाजपाला नव्हेतर मोदींना मते मिळाली. त्याचा अर्थच मोदींच्या हिंदूत्ववादी कडव्या प्रतिमेला इतकी अधिक मते मिळाली. तितकी कडवी हिंदूत्ववादी प्रतिमा समोर ठेवली नसती, तर भाजपा इतके यश मिळाले नसते ना? पण मोदी तर कधी हिंदूत्वाबद्दल बोललेच नाहीत. त्यांच्या हिंदूत्वाची ग्वाही तमाम सेक्युलरच देत होते आणि सामान्य जनतेने त्याच्यावरच विश्वास ठेवून मोदींना इतके अधिक मतदान केले. याचा अर्थ असा होतो, की यापुढे हिंदूत्वाचे धृवीकरण थांबवायचे असेल, तर असली सेक्युलर तोंडपाटिलकी तातडीने थांबली पाहिजे. कारण ती धर्मांधता किंवा तथाकथित हिंदूत्वाला रोखण्यापेक्षा गतिमान बनवते आहे. अधिकाधिक हिंदूंना धर्मनिरपेक्षतेपासून दूर घेऊन जाते आहे. अशा अनुभवातून मिळणारा धडा कोणता? गोध्रासारख्या घटनेचे पडसाद उमटतात, तेव्हा पक्षपाती वाटू नये, अशा प्रतिक्रिया यायला हव्यात. पुण्याच्या घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत? जे रझा अकादमीच्या घटनेनंतर मूग गिळून गप्प होते, त्यांनाच आता कंठ फ़ुटला आहे आणि तशाच प्रतिक्रिया नव्या हिंदू धृवीकरणाला अधिक चालना देणार्‍या आहेत. त्या देणार्‍यांना त्याचे चटके बसत नाहीत. बसतात बिचार्‍या निर्दोष मोहसिन शेख नावाच्या कुणा भलत्याला. पैगंबराच्या व्यंगचित्राचे प्रकाशन दूर कुठे युरोपात झाल्यावर जगातच नव्हेतर भारतातही असेच हिंसक पडसाद उमटले होते. शिवरायांच्या त्या तथाकथित विटंबनेनंतर झालेला हिंसाचार कितीसा वेगळा होता? पण यावेळचे सेक्युलर बोलघेवडे त्यावेळी मूग गिळून गप्प कशाला बसले होते? हाच पक्षपात हिंदूंना आता नकोसा झाला आहे. त्यातून मग पुण्याच्या हिंसक अमानुष घटनांचे अबोल समर्थन होताना दिसते आहे. ती घातक धृवीकरणाची चाहूल आहे. पुण्यासारख्या शहरात वा महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकल्या, याची पुर्वी लोकांशा कमालीची शरम वाटायची. आता तसे वाटेनासे झाले आहे, ही सर्वात भयकारी बाब आहे. पण बोलघेवड्या सेक्युलरांना त्याची कुठे पर्वा आहे? त्यांनी हिंदू धृवीकरणाचा चंगच बांधला असेल, तर वास्तविक निखळ धर्मनिरपेक्षतेला शेवटचे श्वास मोजावेच लागणर ना? नशीब हे दिवाळखोर समजतात इतके मोदी धर्मांध नाहीत. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकली असती.


2 comments:

  1. हा मोहसीन शेख निव्वळ अवतारामुळे रस्त्याने चालताना मारला गेला हे गळी उतरत नाहि. बातम्यादेखील बऱ्यापैकी एकतर्फी आणि सेक्युलर वाटतात . नक्की काय घडले हे कधी बाहेर येईल का?

    ReplyDelete
  2. सेक्युलर या शब्दाची नक्की व्याख्या काय आहे ? … मला वाटते आपण सर्वांनी हि व्याख्या बदली आहे

    ReplyDelete