चार दशकांपुर्वीची गोष्ट आहे. सावरकरवादी ग. वा. बेहरे यांचे ‘सोबत नावाचे साप्ताहिक तेव्हा मध्यमवर्गात खुप लोकप्रिय होते. तितकेच गांधीवादी श्री. ग. माजगावकर यांचे ‘माणूस’ नावाचे साप्ताहिकही लोकप्रिय होते. यातून पुढल्या पिढीचे अनेक नामवंत लेखक तयार झाले. मात्र या दोघांनी आपल्या वृत्तपत्रात वैचारिक अस्पृष्यतेला थारा दिलेला नव्हता. म्हणूनच ‘माणूस’मध्ये संघाशी संबंधित विनय हर्डीकर वा विनय सहस्त्रबुद्धे असे तरूण लिहिते झाले आणि ‘सोबत’मध्ये कॉम्रेड प्रभाकर वैद्य वा माओवादी समजला गेलेला अनिल बर्वे लिहू शकला. परिणाम असा होता, की वाचकाला सर्वच विचारधारांची जाण येत होती. एकतर्फ़ी वा एकांगी वाचायची लोकाना संधी नव्हती. त्यामुळे जनमानसात सहिष्णूता अधिक होती. महाराष्ट्र टाईम्स वा लोकसत्ता अशा मान्यवर दैनिकातही तेव्हा पत्रकार सेक्युलर नसायचे किंवा कुणाला सेक्युलर असले बिल्ले लावून मिरवावे लागत नसे. समतोल लेखन व वाचनाचा जमाना होता. अजेंड्याचा छुपा सेक्युलर झेंडा घेऊन पत्रकारिता काबीज करण्याचे सेक्युलर डावे डावपेच यशस्वी झाल्यावर माध्यमे एकांगी व सेक्युलर बनत गेली. त्यांची जनमानसाशी नाळ तुटत गेली, त्यातच बाजारूपणाची भर पडल्यावर कोणाचा पायपोस कोणाच्या पायात उरला नाही. माध्यमे सेक्युलर नव्हती अशा काळात भाऊ पाध्ये ‘सोबत’मध्ये पिचकारी नावाचे सदर लिहीत होता. सध्याच्या आम आदमी पक्षाच्या अवस्थेमुळे भाऊचे तेव्हाचे शब्द आठवले. त्याने समाजवाद्यांचे तेव्हा केलेले वर्णन आजच्या आम आदमी पक्षाला तंतोतंत लागू पडते.
१९६० नंतरच्या काळात केव्हातरी मॅट्रिक परिक्षेची आक्टोबर वारी सुरू झाली. त्याचा संदर्भ राजकारणात भाऊ पाध्येने सुंदर दिला होता. समाजवादी मंडळी निवडणूका आल्या, मग उत्साहात कामाला लागतात आणि मोठमोठ्या वल्गना करतात. त्यांना निवडणूकीचा सिझन असल्याने तेव्हा प्रसिद्धीही खुप मिळते. पण दोन निवडणूकांच्या मध्ये त्यांचा कुठेही थांगपत्ता नसतो. त्यावर लिहीलेल्या लेखात भाऊ म्हणतो, समाजवाद्यांची अवस्था मॅट्रिकला नापास झालेल्या विद्यार्थ्यासारखी असते. मॅट्रिकच्या नापास विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्गात बसवत नाहीत, म्हणून शाळा नसते आणि अभ्यास तर सगळा झालेला असतो. मग पुढली बोर्डाची परिक्षा येईपर्यंत करायला काहीच नसते. पुस्तके उघडली तरी उपयोग नसतो. कारण आपण सगळे अभ्यासलेले आहे, असेच मनाला वाटत रहाते म्हणून वाचन वा लेखन होऊ शकत नाही. त्यात मन रमत नाही. दुसरीकडे आपण कुठे चुकलो वा कोणत्या कारणासाठी मार्क्स कमी पडून नापास झालो, त्याचा विचारही डोक्यात येत नाही. मग सुधारणा व्हायची कशी व कोणती? त्यामुळे असे विद्यार्थी नुसतेच उनाडपणा करीत बसतात आणि पुढली परिक्षा येते तोवर झालेला अभ्यासही विस्मृतीत गेलेला असतो. एकूण काय तर मार्च आक्टोबर करीत नॉनमॅट्रिक रहाणे; असा त्याचा एकमेव उद्योग बनून जातो. समाजवाद्यांची त्या काळात नेमकी अशीच स्थिती होती. प्रत्येक निवडणूकीत पडायला उभे रहायचे आणि तेव्हा मोठमोठ्या गर्जना करायच्या. दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाने जिंकल्यावर महाराष्ट्रातील जुने अनुभवी वा त्यांचे वारस वंशज अनेक समाजवादी या नव्या पक्षात दाखल झाले आणि त्यांची भाषा नेमकी त्या जुन्या समाजवाद्यांसारखीच होती. आता निकाल लागल्यावर अनामत रकमा जप्त होण्याचा विक्रम साजरा केल्यावर ही मंडळी कुठे आहेत, त्याचा शोध घ्यावा लागतो आहे.
असो, त्यांचे राष्ट्रीय नेता अरविंद केजरीवाल सध्या चहुकडून कोंडीत सापडले आहेत. दिल्ली जिंकल्यानंतरची व सतत प्रसिद्धीच्या झोतात रहाण्याची नशा उतरल्यावर, त्यांना आपल्या अंगावर येणार्यांना शांत करण्याचे उपाय शोधावे लागत आहेत. त्यासाठी झालेल्या कार्यकर्ता संमेलनात केजरीवाल यांनी पक्षाची नव्याने बांधणी व नवी उभारणी करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तेवढेच नाही तर दिल्ली व महाराष्ट्र, हरयाणाच्या विधानसभा निवडणूका लढवण्य़ाची सज्जता करायचा मनसुबा जाहिर केला आहे. गंमत याची वाटते, की याचसाठी ही मंडळी राजकारणात आली होती काय? जनलोकपाल व भ्रष्टाचार विरोधाची लढाई हे उद्देश आता कुठल्या कुठे लुप्त झाले आहेत आणि एकामागून एक निवडणूका लढवणे हाच एककलमी कार्यक्रम त्यांच्या हाती उरला आहे. दिल्लीची सत्ता हाती आल्यावर जनलोकपाल विधेयक सोडून इतर अनेक कामे करून लोकांना आपल्याशी जोडण्याची अपुर्व संधी या नव्या पक्षाला मिळाली होती. पण ती उधळण्यातच धन्यता मानली गेली. लोकांचा अपेक्षाभंग करण्यातच मोठेपणा शोधणार्यांची स्थिती यापेक्षा वेगळी कधीच नसते. थोडक्यात सांगायचे तर आम आदमी पक्ष हे जुन्या समाजवादी मानसिकतेचा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. त्यामुळेच केजरीवाल यांनी तीन दिवसाचे संमेलन घेऊन जे काही सार माध्यमांना कथन केले, तेव्हा मला भाऊ पाध्येने केलेली समाजवादी पक्षाच्या व्याख्येची आठवण झाली. केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्षही काही वर्षे असाच एका निवडणूकीकडून दुसर्या निवडणूकीकडे झोके घेत रहाणार आहे, मग त्यात आयुष्य खर्ची घातलेले काहीजण २०४०-५०च्या सुमारास यावेळचे आपले अनुभव कथन करणारी आत्मचरित्रे अगत्याने लिहीतील. बहूधा शेकडो वर्षे युगानुयुगे अशी प्रवृत्ती सगळ्या समाजात, देशात कार्यरत असावी. त्यांच्या अनुभवातून इतरांनी शिकून शहाणे व्हावे, म्हणूनच हा निरपेक्षवृत्तीचे साधलेला कर्मयोग असावा.
वाचून मजा वाटली. उत्तम लेख. धन्यवाद !
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteकेजरीवालचे फोर्ड फाउंडेशनशी असलेले संबंध पाहता हा इसम भारतीय राजकारणात रचनात्मक कार्य करणार नाहीये. हा नेहमीच विघ्नसंतोषी राहून काड्याघालूगिरी करणार. याला भारतात अराजक माजवायचं आहे. याला खड्यासारखा वेचून दूर फेकला पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
छान लेख
ReplyDelete