पत्रकार नित्यनेमाने अनेक बड्या लोकांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणायला उतावळे झालेले दिसतात. पण प्रत्यक्षात जी एकूण राजकीय सामाजिक वा प्रशासकीय व्यवस्था आपल्या देशात मागल्या दोन दशकात विकसित झाली आहे, त्यात भ्रष्टाचार प्रतिष्ठीत होण्याचे मुख्य कारण माध्यमे व पत्रकारांचा भ्रष्टाचारातला सहभाग हेच आहे. कुंपणच शेत खाऊ लागले तर, असे आपले बापजादे म्हणत आले. पत्रकार हे समाजाच्या हितसंबंधाचे खरे कुंपण असते. पण आर्थिक सुधारणा वा मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर माध्यमांचा जो झपाट्याने विस्तार झाला, त्यात पत्रकारांची गळचेपी होऊन माध्यमांची सुत्रे अधिकाधिक भांडवलाच्या हाती गेली. भांडवलदार भरपूर गुंतवणूक करून प्रस्थापित माध्यमे काबीज करत गेले. जिथे ते शक्य नसेल तिथे बुडवायला भांडवल ओतून जनतेशी बांधिकली मानणार्या प्रस्थापित माध्यमांचा काटा काढला गेला. त्यासाठी प्रस्थापित संपादक-पत्रकारांना आमिषे दाखवून भांडवली जनानखान्यात डांबले गेले आणि ज्यांनी त्याला जुमानले नाही, त्यांची माध्यमे दिवाळखोरीत जातील इतकी बुडवेगिरी या व्यवसायात आणली गेली. कागद, छपाईयंत्रे व साधने, इतर साहित्य यांच्या किंमती आभाळाला जाऊन भिडत असताना, वृत्तपत्रांच्या किंमती गेल्या दोन दशकात वाढू शकल्या नाहीत. इतर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या किंमती सतत वाढत असताना आणि त्याच्याच रसभरीत बातम्या माध्यमातून दिल्या जात असताना, वृत्तपत्राच्या किंमतीची महागाई का होऊ शकली नाही? याचा खुलासा कुठल्याही पत्रकाराला कशाला करावासा वाटले नाही? उलट किंमती कायम राखून अधिक पाने व रंगीत सुबक छपाईची रेलचेल करून तत्वाधिष्ठीत वैचारिक बांधीलकीच्या वृत्तपत्रांना कर्ज व तोट्याच्या खाईत लोटण्याचा खेळ राजरोस झाला. त्यात बहुतेक मान्यवर संपादक पत्रकार बिनतक्रार सहभागी झाले. एका बाजूला हीच मंडळी कुणा भुरट्या गल्लीतल्या नेत्याने वा त्याच्या समर्थकांनी दोन थपडा मारल्या तरी अकांडतांडव करीत अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचे झकास यशस्वी नाटक रंगवत होती. पण त्यापैकी कोणीही त्यांच्याच कार्यालयात वा कामात नित्यनेमाने होत चाललेल्या लेखन-विचार स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल अवाक्षर उच्चारले नाही. उलट क्रमाक्रमाने ही ढोंगी मंडळी जनहित व विचार स्वातंत्र्याची गारदी होऊन गेली. त्यांनी निमूटपणे भांडवली गुंतवणूकदाराचे मांडलीक व्हायला मान्यता दिली आणि त्यांच्या चरणी आपले वैचारिक स्वातंत्र्य वाहिले. त्यातूनच मग पुढल्या किंवा आणखी खालच्या पायरीचे पारतंत्र्य अशा बुद्धीमंत संपादक पत्रकारांच्या नशीबी येत गेले.
मग अशाच थोड्या चतूर वा व्यवहारी संपादक पत्रकारांनाच माध्यम कंपनीचा चेहरा म्हणून क्षुल्लक शेअर देऊन माध्यमांचे म्होरके म्हणून उभे करण्यात आले. त्यांनीही अल्पावधीत श्रीमंती व मोठेपणा मिळतो म्हणून ती मांडलिकी-गुलामी राजीखुशीने ‘नशापाणी’ करून स्विकारली. अनेक चॅनेल वा अन्य माध्यमे आज तशीच उभी राहिलेली आहेत. मग एकदा अशारितीने गुलामी पत्करली, की मालकाच्या तालावर माकडाप्रमाणे नाचावेच लागत असते. तिथे तक्रार करून चालत नाही. व्यक्तीगत आर्थिक लाभासाठी हे पट्टे गळ्यात बांधून घेतले, मग मालकाच्या दारात येईल त्याच्यावर किंवा मालक इशारा करील त्याच्यावर भूंकणे भाग होते. पण अधूनमधून आपल्या इच्छेनुसार इतर कुणावर भूंकायची संधी साधता येते, अशा तडजोडीवर माध्यमे फ़ोफ़ावत गेली. त्यातला तोटा भरून काढणार्याच्या इच्छेवर त्यांना चालणेच भाग होते. कारण हा सगळा व्यवसाय किरकोळ अपवाद सोडल्यास तोट्यातला नव्हे; तर दिवाळखोरीचा बनवला गेला. थोडक्यात आज ज्याला क्रोनी कॅपिटॅलिझम म्हणून नाक मुरडले जाते, त्याचा आरंभ मुळात क्रोनी जर्नालीझमच्या बीजातून झालेला आहे. भांडवलदार, त्यांचे दलाल व त्यातले भागिदार; यांच्या संगनमताने आधी माध्यमांची गठडी वळली गेली आणि त्यातला बुद्धीवाद क्रोनी कॅपिटॅलिझमच्या दावणीला बांधला गेला. म्हणजे असे, की जो कोणी पैसेवाला भांडवलदार गुंतवणूक करील त्याच्या हितसंबंधांना जपणारी व्यवस्था उभी करायला हातभार लावणे आणि त्यात काट्यासारख्या खुपणार्यांची लांडगेतोड करणे, इतके माध्यमांचे काम शिल्लक उरले. त्यात एनजीओ म्हणून काम करणार्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. भांडवलदारांनी खेळवलेल्या जातीवंत प्राण्यांचे खेळ, असे मग एकूणच प्रतिष्ठीतांचे जग बनून गेले. बहुतांश नावाजलेल्या पत्रकार संपादकांची अवस्था कमीअधिक आज तशीच आहे. त्यांना पिंजर्यातल्या पाळीव पोपट वा प्राण्यासारखे परावलंबी बौद्धिक जीवन जगायची चटक लागली आहे. एकदा ही वास्तविकता लक्षात घेतली, मग आशुतोष-केजरीवाल यांच्यापासून राजदीपपर्यंतचे विविध क्षेत्रात दिसणारे लोक क्रोनी कॅपिटॅलिझमच्या नावाने बोटे कशाला मोडतात, त्याचे चित्र स्पष्ट होईल. देशात सत्तांतर झाल्यावर अनेक वाहिन्या व माध्यमातील पत्रकार संपादकांची कोंडी झाली, त्याचे हेच नेमके रोगनिदान आहे. त्याचाच परिणाम म्हणून मग एनडीटीव्हीची बरखा दत्त पंतप्रधानाकडे त्यांच्या लव्याजम्यात सहभागी करून घेण्य़ासाठी गयावया करते आहे. राज्यकर्ते, प्रशासक, अधिकारी आणि त्यांच्या गोतावळ्यात असणे व तिथे धन्याचे हितसंबंध जपणे, हे अशा मान्यवर पत्रकारांचे मुख्य काम होऊन बसले आहे. पण मोदींनी सत्तेवर येताच अशा सर्व हस्तक-दलाल व मध्यस्थीला पुरता विराम दिला आहे. तसल्या छुप्या संबंधाला, हातमिळवणीला मोडीत काढले आहे. त्यामुळे बरखाचा तो ट्वीट काळजीपुर्वक बारकाईने वाचून समजून घेण्याची गरज आहे.
राजकीय नेते. सत्तेतले नेते, अधिकारी व त्यांच्यात उठबस असणारे, आपल्या देशातल्या कारभाराची धोरणे ठरवतात किंवा त्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. त्यातला महत्वाचा दुवा अशी आजच्या बहुतांश नावाजलेल्या पत्रकारांची खरी पात्रता आहे. त्यांची बुद्धीमत्ता वा पत्रकारी कौशल्य दुय्यम आहे. त्यासाठीच मग राजकीय नेते व सत्तेतले बडे लोक यांच्यात उठबस असावीच लागते. म्हणून बरखा म्हणते, स्वखर्चाने आम्ही पंतप्रधानांसोबत येऊ, त्यासाठी भाडेखर्च घ्या. पण आम्हाला सोबत घेऊन जा. कारण पंतप्रधान मंत्र्यांच्या अशा दौर्यात सोबत अनेक बडे प्रशासकीय अधिकारी, धोरणकर्ते यांचा समावेश असतो. त्यांच्याशी जवळीक व निकटता असली तरच त्यांच्यावर प्रभाव पाडता येतो. त्यांच्या गळ्य़ात आपल्या मालकाचे हितसंबंध बांधता येतात. सत्तेच्या हुकूमानुसार बरखा, राजदीप वा अन्य कित्येकांनी मागल्या दहा वर्षात मोदींना गुजरात दंगलीसाठी सतत आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. ते दंगलग्रस्तांना मुस्लिमांना न्याय मिळावा म्हणून नव्हे; तर आपल्या मालकाचे राजकीय मालक असलेल्या सत्ताधीशांच्या इशार्यावर खेळलेला खेळ होता. जेव्हा मोदीच सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा या नावाजलेल्या पत्रकारांची पुरती तारांबळ उडाली. मग मतदान संपत आले आत तरी ‘नावाजलेल्या पत्रकारांना मुलाखती द्या’ अशा गयावया सागरिका घोष करू लागली. इतकी कसली लाचारी होती? बरखाला आता स्वखर्चाने पदरमोड करून मोदींचे कौतुक करायची अगतिकता कशाला जाहिरपणे सांगावी लागत आहे? नावाजलेल्या पत्रकार संपादकांची अशी दुर्दशा कशामुळे झाली आहे? क्रोनी जर्नालिझम करताना क्रोनी कॅपिटॅलिझमचे गुलाम झालेल्यांची यापेक्षा वेगळी अवस्था होणे शक्य नव्हते. मात्र आपल्या स्वार्थ व मतलबासाठी अशा लोकांनी माध्यमांची व पत्रकारितेची विश्वासार्हता व प्रतिष्ठा पुर्णपणे धुळीस मिळवली. गेल्या वीस वर्षात कुणीही सत्तेवर आला वा राजकारणात यशस्वी झाला तरी त्याला गुंडाळण्याची किमया त्यांना साधलेली आहे. पण मोदी हा माणुसच वेगळ्या रसायनाचा बनलेला आहे. त्याला जाळ्यात ओढायचे मार्गच यांच्यापाशी नाहीत. उलट मोदींना यांच्या पोकळ, दिखावू, पाखंडी पत्रकारितेचे दुबळेपण नेमके उमगलेले आहे. मोदींनी नेमक्या त्याच दुखण्यावर बोट ठेवून राजकीय, सार्वजनिक व माध्यम क्षेत्रातील भ्रष्ट साखळीच तोडायची पावले पहिल्या दिवसापासून उचलली आहेत. त्यामुळे अशा ‘नामांकित’ पण भोंदू पत्रकार माध्यमांची रया जायची वेळ आलेली आहे. हे दुष्टचक्र भेदले नाही, तर देशातल्या मोकाट शिरजोर भ्रष्टाचारी अराजकाला वेसण घालता येणार नाही, हे ओळखून मोदी कामाला लागले आहेत. मग त्यात पहिल्यांदा बळी पडणार्यांनी शिव्याशाप देण्याला आरंभ केल्यास नवल कुठले? मोदींनी ही साखळी कुठून तोडायला सुरूवात केलीय? (अपुर्ण)
भाऊ, धन्य आहे आपली पत्रकारीता ! माध्यमांत राहूनही आपण एवढे परखड लिहता याचे नेहमीच आश्चर्य वाटते. कधी कधी आपल्याविषयी काळजी वाटते.
ReplyDeleteफार उत्तम लेख भाऊ. हे भाड्याचे पत्रकार आणि गेल्या दहा वर्ष सत्ताधारी असलेले मग्रुर राज्यकर्त्यांमधे काहीतरी गुळपीट आहे एवढे जरी स्पष्ट असले तरी संबंध किती खोल आहेत हे नेमके आम्हा सामान्यांना आकलनी पडत नव्हते. बरखा दत्त च्या एका ट्वीट चा ऊहपोह करुन तुम्ही नेमके मर्मावर बोट ठेवलेत त्यासाठी आभारी आहोत.
ReplyDeletebarakha ne satyscha aav anun kitihi burkha pangarla tari ekada geleli patrakaranchi pat lavkar purvapadavar yayla thoda vel lagnarch
ReplyDelete