सतरा अठरा वर्षापुर्वीची गोष्ट आठवते. तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार होते आणि भाजपाचे गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. मग एकूणच माध्यमातून युती विरोधात आरोपांच्या आघाड्या उघडल्या गेल्या होत्या. त्यातली अनेक प्रकरणे आता विस्मृतीत गेली आहेत. शोभाताई फ़डणवीस यांच्यावरचा डाळ घोटाळा आरोप, राज ठाकरे यांच्यावरला रमेश किणी हत्येचा संशय. तसेच एक प्रकरण मुंडे यांच्या बाबतीतले होते. लोकपालमुळे देशव्यापी प्रसिद्धी मिळालेले अण्णा हजारे तेव्हा युतीच्या विरोधात उभे ठाकले होते आणि सहाजिकच माध्यमातील सेक्युलर लोकांनी अण्णांना ‘डोक्यावर’ घेतले होते. आजच्या केजरीवाल यांच्याप्रमाणेच तेव्हा अण्णांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती लावली होती. त्यापैकी एक चौफ़ुलाचे बरखा प्रकरण होते. तमाशासाठी प्रसिद्ध असलेल्या चौफ़ुला येथील बरखा नावाच्या नर्तकीचे उपमुख्यमंत्री मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा संदिग्ध आरोप तेव्हा अण्णांनी एक पत्रकार परिषद घेऊन केला होता. मग तात्कालीन भाजपा नेत्यांचे चेहरे गोरेमोरे झालेले होते. निदान महिनाभर तरी त्यातून शिमगा झालेला होता. अशावेळी मुंडे बचावात्मक पवित्र्यात गेले होते. पण त्यांच्या बाजूने उभे रहाताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले जाहिर विधान गाजले होते. आज त्याची कुणालाच आठवण नसावी. अर्थात आपल्या मिश्कील शैलीत ठाकरे बोलले होते. बाळासाहेब यांनी एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातील गीताचा मुखडाच प्रतिक्रीया म्हणून सांगून टाकला होता. ते बोल होते, मुगले आझम चित्रपटातले, ‘जब प्यार किया तो डरना क्या’. थोडक्यात त्यांना म्हणायचे होते, असे काही मुंडे यांचे प्रेमप्रकरण असेल, तर त्यांनी बिनधास्त खुलेआम त्याचा स्विकार करावा. उगाच लपवाछपवी करू नये. आज अकस्मात बाळासाहेबांच्या त्या विधानाचे स्मरण कशाला झाले असेल?
रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक मोदी सरकारमध्ये सहभागी व्हायला दिल्लीत गेलेल्या अनील देसाई या आपल्या सहकार्याला माघारी बोलावले आणि राज्यातील राजकारणाविषयी स्पष्ट भूमिका घेतली. तेव्हा साहेबांच्या त्या अठरा वर्षे जुन्या विधानाचे स्मरण झाले. तेव्हा बाळासाहेब गंमतीने व्यंगात्मक बोलले होते. पण त्यांचाच पुत्र उद्धव याने त्याच विधानाला आपला आजचा राजकीय डावपेच बनवला आहे. रविवारी आपल्या पित्याच्या त्या विधानाचा उल्लेखही उद्धव यांनी केला नाही. पण त्याची कृती नेमके तेच शब्द बोलत होती. राज्याच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार किंवा नाही, याबद्दल सेनेची भूमिका जाहिर व्हायची होती. पण नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतल्यावर उद्धवनी सत्तासहभागाबद्दल मौन धारण केले आणि नवाच मुद्दा उपस्थित केला. राज्यात अजून भाजपाला साफ़ बहूमत मिळालेले नाही. सेनेने बिनशर्त आपल्याला पाठींबा द्यावा, अशी भाजपाची अपेक्षा आहे. बदल्यात जितका सत्तेचा वाटा आपण देऊ, तो सेनेने स्विकारावा, ही सुद्धा भाजपाची अपेक्षा आहे. पण तसेही स्पष्टपणे मांडले जात नाही. उलट राष्ट्रवादी कॉग्रेसने बिनमांगा पाठींबा दिला, त्याचा लाभ उठवत भाजपा सेनेला खेळवत आहे. तुमची गरज नाही, आमच्यासाठी बहूमताचा आकडा राष्ट्रवादीच्या आतून वा बाहेरून पाठींब्यावर पुर्ण होऊन सत्ता चालवली जाऊ शकते, असे भाजपा न बोलून सुचवत आहे. तसे उघड बोलायचे नाही, पण तशी कृती करायची, हाच गेले तीन आठवडे खेळला गेलेला डावपेच आहे. थोडक्यात भाजपा राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सगळा डावपेच खेळते आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी व भाजपा यांची छुपी मैत्रीच त्यातून उघड होते आणि भाजपा त्यावर विश्वास ठेवते, हेही लपून रहात नाही. मात्र त्याची खुली कबुल द्यायची भाजपाला लाज वाटते आहे. तिथे सर्व घोडे अडले आहे.
रविवारी उद्धव यांनी नेमकी तीच मागणी भाजपाकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर आपली भूमिका साफ़ करावी, मग सेनेला सत्तेत जावे किंवा विरोधात बसावे हे ठरवता येईल. आपण राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही, असे ठामपणे उद्धव यांनी घोषित करून टाकले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की भाजपाने राष्ट्रवादी कॉग्रेसशी असलेले आपले ‘लफ़डे’ नेमके काय आहे, त्याचा खुलासा करून टाकावा. म्हणजे राष्ट्रवादीशी प्रेम असेल तर तसे सांगावे, किंवा कुठलाही संबंध नाही, असे तरी जाहिर करावे. याचा अर्थच राष्ट्रवादीशी भाजपाचे प्यार असेल, तर त्यासाठी डरायचे कशाला? खुलेआम प्रेम करा आणि त्यांच्याशीच सत्तावाटप करा. संसार थाटा असाच उद्धव ठाकरे यांनी टाकलेला डाव आहे. एकीकडे शिवसेनेला झुलवत ठेवायचे आणि तिकडे राष्ट्रवादीची चुंबाचुंबी सुद्धा करायची, हाच प्रकार गेले काही दिवस छुपेपणाने चालला आहे. रविवारी आपल्या सत्तासहभागाला त्याच्याशी जोडून उद्धव यांनी आपणही मुत्सद्देगिरीत कमी नाही, याची साक्ष दिली. त्यांनी विरोधात बसायचा ठाम निर्णय घेतलेला नाही, की पाठींबा जाहिर केला नाही. भाजपा जसा सत्तासहभागाचा घोळ गेले दोन आठवडे घालतो आहे, तसाच घोळ आता उद्धव यांनी आपल्या परीने घातला आहे. भाजपाचा नैसर्गिक मित्र कोण व ‘अनैसर्गिक’ मित्र कोण, त्याचाच बोभाटा करायचा हा पवित्रा म्हणूनच राजकीय तितकाच पेचात पकडणारा आहे. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपा आरामात सत्ता राबवू शकेल आणि संख्याबळाची कुठलीही समस्या त्याला भेडसावणार नाही. मात्र आपणच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आणि तोच भ्रष्टाचार आपल्याला संपवायचा आहे, हा भाजपाचा दावा त्यामुळे उघडानागडा होऊन जातो. तेच तर उद्धव यांना साधायचे आहे. तसे नको असेल, तर सेनेला नुसते सत्तेत घेऊन भागणार नाही, भाजपाला खुलेआम राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा लागेल.
राष्ट्रवादीचा पाठींबा दिसायला पवारांनी उत्स्फ़ुर्त दिलेला आहे, असे नाटक निकालापासून गेले तीन आठवडे चालू आहे. पण जसजसे दिवस जात आहेत, तसतसे भाजपाचे नाटक आता उघडे पडत चालले आहे. रविवारी उद्धव यांनी त्याविषयी ठाम भूमिका घेतल्याने आता तोच मौज वाटणारा राष्ट्रवादीचा पाहींबा भाजपासाठी राजकीय पेच बनून गेला आहे. कारण सेनेचा पाठींबा झुगारायचा, तर पवारांवर सर्वस्वी अवलंबून रहायचे आणि नाकारला तर सेनेवरच अवलंबून रहावे लागणार. मग सेनेला इतके खेळवून काय मिळवले? शिवाय सेना विरोधात बसली आणि रोजच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर कारवाईची मागणी करू लागली, तर फ़डणविसांचा केजरीवाल होऊन जाणार. तिथे शीला दिक्षित याच्यावर आरोप करून जिंकलेल्या केजरीवालनी सत्तेसाठी कॉग्रेसचा पाठींबा घेतल्यावर भाजपाचेच डॉ. हर्षवर्धन रोज शीलाबाईंच्या विरोधात एफ़ आय आर दाखल करायची मागणी करत होते ना? इथे सेनेची मागणी काय वेगळी असेल? पाठींब्यासाठी दोघांना झुलवण्याची मुत्सद्देगिरी अशी आता भाजपावर उलटली आहे. कारण आपल्या पित्याच्या व्यंगात्मक टिप्पणीलाच राजकीय डावपेच बनवून उद्धवनी भाजपाला खुले मैदान मोकळे केले आहे. राष्ट्रवादीसे प्यार किया है तो डरना क्या. जे काही प्यार असेल ते जाहिरपणे कबुल करा आणि सत्तेची मौज करा, असेच उद्धव यांनी रविवारी सांगितले आहे. नसेल, तर खुलेआम राष्ट्रवादीचा पाठींबा झिडकारा. पण त्या आवाहनाला कित्येक तास उलटून गेल्यावरही कुणी भाजपा नेता राष्ट्रवादीचा पाठींबा फ़ेटाळू शकलेला नाही. कसा फ़ेटाळणार? निवडणूकपुर्व युती व आघाडी मोडण्यापासूनचे हे प्रेमप्रकरण ऐन रंगात आलेले असताना नाकारायचे तरी कसे? असो सत्तेसाठी लाचार दिसणार्या सेनेने विरोधात बसायची व भाजपाला त्याचे नैसर्गिक नाते दाखवायची सक्ती करण्याचे शहाणपण केले असेल, तर सेनेची पाठ थोपटावीच लागेल.
Ek navin view..
ReplyDeleteajun pan sagal dhuk aahe... dhuk utaral ki chitra thoda spashta hoel... toparyant navin navin views yet rahtil...
पवारांनी भाजप आणि शिवसेना दोघानाही उघडे पाडले आहे एकाला पाठींबा देऊन आणि एकाला बाहेर ठेऊन या लोकांनी पवारांना पातली सोडून बदनाम केले आता दिली आहे सत्ता तुम्हाला काय वाकडे करू शकतात शकतात तुम्ही त्याचे करून दाखवा शेवटी भाजप लबाड आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे.
ReplyDelete