Monday, November 17, 2014

त्यांना सत्कार करून पाठवा



जसजसे दिवस जात आहेत, तसतसे नव्या सरकारचे खरे स्वरूप लोकांच्या लक्षात येत चालले आहे. म्हणून मग एका बाजूला आपण राष्ट्रवादीचा पाठींबा घेतलेला नाही असे सांगण्याची कसरत भाजपा नेत्यांना करावी लागत आहे. अधिक शिवसेनेसोबत सत्तेत येण्याची चर्चा चालू असल्याचेही दावे करावे लागत आहेत. वास्तवात शिवसेना विरोधी पक्षात बसली आहे आणि याच भाजपाने निवडलेल्या सभापतींनी सेनेला विरोधी पक्षाचा नेताही बहाल केला आहे. तिसरीकडे राष्ट्रवादीच्याच पाठींब्यावर इतक्या उड्या मारणार्‍या भाजपावाल्यांना त्याच राष्ट्रवादीचे एक प्रमुख नेता अजितदादा इशारेही देत आहेत. सहाजिकच सरकार चालवण्यापेक्षा सरकारचा तोल सावरत बसणे इतकेच नव्या उदयोन्मुख मुख्यमंत्र्याचे काम होऊन बसले आहे. खुद्द भाजपातूनही नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या काही भाजपा कार्यकर्त्यांनी तर रस्त्यावर येऊन राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर चाललेल्या सरकारविषयी साफ़ नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजेच आपले सरकार राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर बेतलेले नाही, अशा ज्या थापा मारल्या जात आहेत, त्या त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासार्ह वाटलेल्या नाहीत. मग सामान्य जनतेने त्यावर कितीसा विश्वास ठेवावा? त्यातून सुटका करून घेण्यासाठी मग शिवसेनेशी सत्तेत सहभागाच्या वावड्या व अफ़वा सोडण्याचाही उद्योग मस्तपैकी चालू आहे. कालपरवाच पक्षाश्यक्ष अमित शहा यांनी सेनेशी बोलणी करूनच निर्णय होईल असे पत्रकारांना सांगून अंग काढून घेतले. थोडक्यात विश्वासमताचा प्रस्ताव संमत करण्याच्या अजब नाटकाने अधिकच अविश्वास या सरकारविषयी निर्माण होण्यापलिकडे काहीच साध्य झालेले नाही. परिणामी आपणच केलेल्या चाणक्यगिरीतून निसटण्याची केविलवाणी धडपड भाजपाच्या नेत्यांना करावी लागते आहे. त्यासाठी आधीपासून एक आवई सोडून देण्यात आलेलीच होती. कुठली ती आवई?

शिवसेनेतील एक गट, काही आमदार विरोधात बसायला राजी नाही. दिर्घकाळ विरोधात बसल्याने कंटाळलेल्या शिवसेनेतील या गटाला कुठल्याही परिस्थितीत सत्तेमध्ये सहभागी व्हायची घाई झालेली आहे. सत्तेत सेना सहभागी झाली नाही, तर सेनेत फ़ुट पडणार, असल्या अनेक अफ़वा मागल्या चार आठवड्यात पद्धतशीरपणे पसरवल्या गेल्या. त्याचा सेनेवर फ़ारसा परिणाम झालेला नसला, तरी खुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मात्र होऊ लागलेला आहे. कारण अजून तरी सेना फ़ुटण्याची किंवा सेना सत्तेत सहभागी होण्याची चिन्हे दिसलेली नाही. त्यामुळे गावोगावी गल्लीबोळात राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला निपटून काढण्याचा प्रचार करणार्‍या भाजपा प्रचारकाला लोकांना तोंड दाखवणे मात्र अवघड होत चालले आहे. सत्तेच्या उबेत बसलेल्या नेत्यांची गोष्ट वेगळी असते आणि लोकांमध्ये वावरणार्‍या कार्यकर्त्यांची कोंडी वेगळी असते. त्या कार्यकर्त्याला लोकांना तोंड द्यावे लागत असते. सहाजिकच राष्ट्रवादी वा कॉग्रेसच्या नेत्यांना पक्षात आणणे किंवा त्यांच्याशी चुंबाचुंबी करणे नेत्यांच्या स्वार्थासाठी सोपे व शक्य असले, तरी कार्यकर्त्याचे मरण असते. त्यासाठीच मग सेनेचे लोक फ़ुटणार आणि किंवा सेनाच सत्तेत सहभागी होण्याच्या अफ़वांचा बाजार भरवण्यात आला आहे. पण कुठेही राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारण्याची भाषा भाजपा वा मुख्यमंत्री करू शकलेले नाहीत. तो नाकारण्यापेक्षा अफ़वा पसरवणे मात्र जोरात चालू आहे. त्यात अर्थातच सेनेच्या नेतृत्वाचीही चुक आहे. अशावेळी अपप्रचाराला चोख उत्तरही सेनेला देता आले पाहिजे. तिथे अनुभवाचा तोकडेपणा स्वच्छ दिसतो. बाळासाहेब आज असते, तर त्यांनी काय केले असते? नेमके तेच उद्धव ठाकरे यांनी केले, तर भाजपाच्या नाकी दम येऊ शकेल. असल्या अफ़वांना तिथल्या तिथे ठोकून काढायची किमयाच बाळासाहेबांचा दरारा निर्माण करू शकली होती.

१९९१ सालात दुसर्‍यांदा मिळालेले महापौरपद सोडल्यावर छगन भुजबळांना विधानसभेत विरोधी नेता व्हायचे डोहाळे लागले होते. त्यासाठी त्यांनी एक आवई उठवली होती. महापौर जसा एका वर्षासाठी असतो, तसाच विरोधी नेता दरवर्षी बदलला पाहिजे. त्याचा माध्यमातून मोठा गवगवा झाला. भुजबळ गटाची तशी मागणी असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच अंधेरी येथे एका समारंभातच सर्व प्रमुख नेते व्यासपीठावर असताना, बाळासाहेबांनीच जाहिरपणे सवाल केला होता, ‘काहो छगनराव, तुमचा सेनेत कुठला गट आहे?’ तेवढा इशारा पुरे होता. भुजबळांनी तिथेच आपण विरोधीनेता बदलण्याची भाषा केली हा गाढवपणा केल्याची कबुली देऊन टाकली होती. पण ते अस्वस्थ होते आणि काही आमदारांना घेऊन सहा महिन्यातच फ़ुटले होते. पण म्हणून बाळासाहेब विचलीत झाले नव्हते. उद्या भुजबळ फ़ुटतील म्हणूनही त्यांनी कुठली फ़िल्डींग लावली नव्हती. भुजबळ पुढल्या निवडणूकीत पडले आणि एक साधा शिवसैनिक बाळा नांदगावकर याच्याकडून पराभूत झाले. नंतर मुंबईत निवडणूक लढवायचेही विसरून गेले. त्यांच्यासोबत सत्तेसाठी सेना सोडून गेलेल्यांचे आज नमोनिशाण शिल्लक आहे काय? सेनेच्या नेतृत्वाने याची आठवण ठेवावी. अगदी १९६८ च्या पहिल्या पालिका निवडणूकीत जिंकलेल्या अनेक शिवसेना नेत्यांनी पुढे पक्षांतर केले, त्यांचेही आज नमोनिशाण शिल्लक नाही. फ़ुटणार्‍यांमुळे कधी शिवसेना थकली नाही की संपली नाही. मात्र सेनेला फ़ोडणारे व संपवू बघणारे कुठल्या कुठे फ़ेकले गेलेत. कालपर्यंत मैत्री केलेल्यांना त्याचे भान नसेल तर त्यांनाही सेनेचा असा अनुभव घ्यायला, उलट सेनेने मदत करायला हवी. सेनेतले आमदार फ़ुटून भाजपाचे सरकार स्थीर होणार असेल, तर त्यात सेनेने मदत करायला काय हरकत आहे? जाऊ द्यावे, ज्यांना सत्तेची इतकीच भुरळ पडली आहे त्यांना.

ज्या बातम्या किंवा अफ़वा येत आहेत, त्यानुसार काही सेना आमदारांना सत्तेची अतीव भुक लागल्याचे म्हटले जाते. ते खरे असेल तर सेनेने त्यांना कैद्यासारखे कोंडून ठेवण्यात अर्थ नाही. अशा लोकांना पक्षापेक्षा व्यक्तीगत स्वार्थ अगत्याचे असतात आणि म्हणूनच मोक्याच्या क्षणी असे सत्तालंपट पक्षाला मोठा दगाफ़टका करू शकतात. त्यांच्यापासून सुटका करून घेणे, म्हणजेच त्यांची रवानगी करणे योग्य. ती कशी व कुठे करावी? भाजपा नेते सांगतात त्यानुसार अनेक सेना आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. अशा लोकांची यादी मागून घ्यावी आणि त्यांना भाजपात जाण्याची मुभा देऊन टाकावी. आमदारकी गमावण्याच्या भयाने थांबले असतील त्यांनाही अभय द्यावे. भाजपाच्या कुणा विधीज्ञाच्या सल्ल्याने पक्षांतर कायद्याच्या कचाट्यातून त्या सेना आमदारांना सुखरूप भाजपात कसे जाता येईल, त्याचा मार्गही विचारून घ्यावा आणि त्यांना पाठवून द्यावे. भाजपाला सत्तेसाठी असे दगाबाज चालणार असतील, तर भविष्यात त्या पक्षाचे कल्याण होईलच. आपल्या जुन्या मित्रासाठी सेनेने इतके औदार्य दाखवायला काय हरकत आहे? त्यातून भाजपाचे सरकार बहूमताचा पल्ला गाठू शकेल. सुरक्षित होईल आणि बदल्यात त्याच्याकडून विविध घोटाळ्यांवर कारवाईच्या मागण्या सेनेला करता येतील. त्या कारवाया भाजपा सरकार करू शकणार नाही, ही त्यांची खरी अडचण आहे आणि केल्या तरी थातूरमातूर चौकश्या लावून गुन्हेगारांना सोडण्याचेच नाटक रंगवले जाणार आहे. त्याचा बोभाटा करणार्‍या पक्षाला उद्याच्या राजकारणात खरे भवितव्य अहे. ती संधी आपण घ्यायची की कॉग्रेसला द्यायची, याचा निर्णय सेनेने करायचा आहे. सत्तेत जाणे किंवा विरोधात बसणे दुय्यम असून, विविध घोटाळ्यांवर या सरकारला कारवाई करायला आग्रह धरील, तोच पुढल्या काळात भाजपावर मात करणारा पक्ष असेल. कारण त्यातूनच भाजपा-राष्ट्रवादी यांचे संगनमत उघडकीस आणले जाणार आहे.

7 comments:

  1. भाऊ तुम्ही उद्धव साहेबाशी बोला. महाराष्ट्राला शिवसेना पाहिजेच आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मी कुणा पुढार्‍यांच्या संपर्कात नसतो की त्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याचे कारण साफ़ आहे. ज्याला परिणाम भोगायचे असतात, त्याने सर्व बाजू ऐकाव्यात आणि आपले निर्णय घ्यावेत. इथे माझे काम सामान्य माणसाला राजकारण उलगडण्यास मदत करणे इतकेच आहे. फ़ायदेतोटे ज्यांच्या वाट्याला येण्याशी शक्यता आहे. त्यांनी वाचावे आणि आपला विचार करावा.

      Delete
  2. Anonymous, भाऊराव स्वत:हून उद्धावांशी बोलणार नाहीत. तसे केल्यास भाऊरावांची किंमत कमी होईल. वाटल्यास उद्धावांनी भाऊरावांशी संपर्क साधावा.
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. मी कुणा पुढार्‍यांच्या संपर्कात नसतो की त्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याचे कारण साफ़ आहे. ज्याला परिणाम भोगायचे असतात, त्याने सर्व बाजू ऐकाव्यात आणि आपले निर्णय घ्यावेत. इथे माझे काम सामान्य माणसाला राजकारण उलगडण्यास मदत करणे इतकेच आहे. फ़ायदेतोटे ज्यांच्या वाट्याला येण्याशी शक्यता आहे. त्यांनी वाचावे आणि आपला विचार करावा.

      Delete
    2. भाऊराव,

      >> इथे माझे काम सामान्य माणसाला राजकारण उलगडण्यास मदत करणे
      >> इतकेच आहे.

      अगदी बरोबर. मात्र कधीकधी नेत्यांना सामान्य माणसाचं मन कसं काम करतं ते मुळातून जाणून घ्यावंसं वाटतं. बाळासाहेबांना तुमच्यामार्फत जनमताची चाचपणी करायचे. (संदर्भ : http://panchanaama.blogspot.co.uk/2012/11/blog-post_6825.html)

      तुमचं हे वैशिष्ट्य अबाधित राहो.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  3. भाऊसाहेब पत्रकार आहेत.

    ReplyDelete
  4. "भाजपाला सत्तेसाठी असे दगाबाज चालणार असतील, तर भविष्यात त्या पक्षाचे कल्याण होईलच."
    भाऊ, एकही मारा लेकीन 'सॉलिड मारा!'

    ReplyDelete