Wednesday, November 19, 2014

राज-उद्धव यांना मतदाराचा आदेश



शिवसेनाप्रमुखांच्या दुसर्‍या स्मृतीदिनी राज ठाकरे यांनी हजेरी लावली आणि ती एक मोठी बतमी होऊन गेली. त्याला अनेक राजकीय कारणे आहेत. दोन्ही भाऊ विभक्त झाले आणि मागल्या सहा सात वर्षात सेनेची ताकद क्षीण झाली होती. त्याचा फ़टका सेनेला पाच वर्षापुर्वीच्या लोकसभा विधानाभा निवडणूकीत जाणवला होता. पण दोनच वर्षांनी झालेल्या विविध पलिका निवडणूकीत त्यातून सेना सावरली आणि राज ठाकरे यांची मनसेही स्थीरस्थावर झाली होती. त्यानंतर खरे तर अनेक प्रसंग असे आले, की या दोन भावांना एकत्र येण्याच्या संधी मिळाल्या होत्या. अनेकजण त्यासाठी प्रयत्नशीलही होते. पण दोन भावांच्या महत्वाकांक्षा जितक्या एकमेकांना छेद देणार्‍या आहेत, तितकेच त्यांचे अहंकारही आडवे येणारे आहेत. लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचा सफ़ाया झाला आणि सहा महिन्यात आलेल्या विधानसभेच्या निवडणूकीपर्यंत त्यांना सावरायला संधीच मिळाली नाही. किंबहूना मध्यंतरी राजकारण असे वळण घेत गेले, की सगळ्या घडामोडीत राज ठाकरे व त्यांचा पक्ष संदर्भहीन होऊन गेला. त्याला काही प्रमाणात खुद्द राज ठाकरेही जबाबदार आहेत. लोकसभा निवडणूकीत मोदी वा भाजपाविषयी त्यांना आरंभापासून एक ठाम भूमिका घेता आली नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात मनसे एका बाजूला फ़ेकली गेली. मग विधानसभेत युतीच तुटल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा वेगाने पुढे आला. अधिक त्याचा केंद्रबिंदूच शिवसेना बनून गेली. सहाजिकच त्यात मनसेची मतेही सेनेकडे झुकली आणि मनसेला दुसरा फ़टका बसला. त्यामुळे नव्याने कौटुंबिक व राजकीय नात्याचा फ़ेरविचार त्यांनी करायला अजिबात हरकत नाही. पण असा विचार एकतर्फ़ी होऊन भागत नाही. एकत्र येण्यासाठी दोन्हीकडून प्रयास आवश्यक असतात. ते होऊ शकले तरच मग राज-उद्धव यांच्या मनोमिलनाचे पाऊल पुढे पडू शकेल.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाचे निमीत्त करून य दोन भावांनी एकत्र दिसण्याचा जो प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली तर नवल नव्हते. त्यांनी एकत्र यावे आणि शिवसेना अधिक बलवान व्हावी, अशी सेनेच्या कार्यकर्ते व मराठी अस्मितेच्य पूजकांची इच्छा आहेच. बुद्धीमंतांना त्याचे वावडे असले तरी जगात कितीही पुढारलेल्या देशात व समाजात अस्मिता हा घटक मोठा प्रभावी असतो. तसे नसते तर युक्रेन रशिया असा संघर्ष कशाला पेटला असता? मराठी अस्मिता हा म्हणूनच भावनिक विषय आहे आणि जोपर्यंत तोच केंद्रबिंदू मानणारा दुसरा समर्थ पक्ष समोर नसेल, तोपर्यंत शिवसेनेला मराठी राजकारणात मरण नाही. त्यातलाच एक हिस्सा असलेला वर्ग राज ठाकरे यांच्या रुपाने वेगळा झाला, याला मनसे म्हणून ओळखले जाते. त्यांना नुकत्याच विधानसभा निवडणूकीत एकत्रितपणे मिळालेली मते २३ टक्क्याच्या आसपास आणि एक कोटी १९ लाख इतकी आहेत. म्हणजे निदान इतका मतदार तरी मराठी अस्मिता म्हणून त्यांच्यामागे ठामपणे उभा राहिलेला आहे. शिवाय असा मतदार भाजपाची हवा आणि मोदींची देशव्यापी लोकप्रियता झुगारून या दोन भावांच्या मागे उभा राहिलेला आहे. उलट भाजपाच्या पारड्यात मते टाकणार्‍या मतदाराची संख्या एक कोटी ४७ लाख इतकी आहे आणि आपली सर्व शक्ती पणाला लावून लाटेवर स्वार होऊन भाजपाने मिळवलेली ती मते आहेत. त्यातली लाट काढून घेतली तर भाजपाला त्यातली एक कोटी मते तरी टिकवता येतील काय? पण सेना-मनसे यांना मिळालेल्या ११९ लाख मतांमध्ये पुढल्या काळात प्रयत्नपूर्वक भर घालणे या दोन भावांना शक्य आहे. मोठा पक्ष झाल्यावर आणि सत्तेच्या जवळ पोहोचल्यावर भाजपाच्या नेतृत्वाने दाखवलेली मुजोरी मतदाराला अस्वस्थ करून गेलेली आणि त्यातून मतांचे धृवीकरण सुरू झाले आहे.

या धृवीकरणाचा प्रभावच दोन भाऊ एक दिसल्यावर खळबळ माजण्यात झाला अहे. विधानसभा प्रचाराच्या दरम्यान भाजपाच्या राजकारणात गुजराती भाषिकांचा प्रभाव लपून राहिला नाही. अधिक परदेशात जाऊन मोदी जे भपकेदार कार्यक्रम योजत आहेत, त्यावरचा गुजराती प्रभाव लपेनासा झाला अहे. त्यामुळे देशभर मोदींची प्रतिमा गुजरातचा पंतप्रधान अशी होत चालली आहे. महाराष्ट्र वा मराठी मन त्यापासून अलिप्त राहिल, असे कोणी मानायचे कारण नाही. पुढे निकालानंतर सेनेला सत्तेत सोबत घेण्याचा पोरखेळ करून जे ‘सकारात्मक’ चर्चेचे गुर्‍हाळ भाजपाने चालविले, त्यातून भले उद्धव आणि शिवसेनेला अपमानित केले. पण अकारण मराठी मने दुखावली गेली आहेत. भले भाजपाने सेनेच्या अभद्र भाषेचा सूड त्यातून घेतला असेल. पण दुखावला गेला तो मराठी माणूस आहे. परिणामी मराठी अस्मितेची हेटाळणी करण्याने त्या धृवीकरणाला अधिक वेग आला आहे. मात्र त्याचे प्रकटीकरण करण्याचे योग्य प्रयास झालेले नाहीत. पण म्हणूनच मग त्याच भावनेचे सुसुत्रीकरण करायची अपेक्षा, दोन भाऊ एकत्र दिसताच उफ़ाळून आली. तिचा अर्थ राजकीय पुस्तकपंडीतांना उमगणार नाही. पण जनमनाचा कानोसा घेतला, तर थोडा अंदाज येऊ शकतो. मतदाराला भले उद्धव-राज या ठाकरे कुटुंबियांविषयी आत्मियता नसेल. पण आज तरी मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेतलेले तेच दोघे दिसत असल्याने लोकभावनेला उकळी फ़ुटणे स्वाभाविक आहे. तिच्या जोडीला दोघांच्या पारड्यात पडलेली एक कोटी १९ लाख मते हिशोबात घेतली, तर या दोघांना आपल्या हाती किती अमोघ अस्त्र आलेले आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. मोदीलाट व भाजपाची हवा यांच्या विरोधातली इतकी मते, म्हणजे लाट व हवा ओसरल्यावरची महालाट ठरू शकते. त्यावर स्वार होऊन थेट स्वबळाने सत्तेपर्यंत झेप घेण्याची क्षमता अशा आकड्यांमध्ये असते.

दोन भाऊ स्मृतीदिनी भेटले किंवा दिलखुलास गप्पा मारताना दिसले, त्याचा जनमानसावर पडलेला प्रभाव, जनतेत मिसळले तर उमगू शकतो. आपापल्या वातानुकुलीत केबीन वा स्टूडीओत बसून त्याची प्रचिती येऊ शकत नाही. मागल्या महिनाभरात भाजपाच्या राजकीय खेळी व कोलांट्या उड्या मारण्याने सामान्य जनतेच्या सदिच्छा किती पायदळी तुडवल्या गेल्या आहेत, त्याचे प्रत्यंतर यायला थोडा वेळ लागणार आहे. कारण मतदार प्रत्येक दिवशी चॅनेलच्या चर्चेत सहभागी होऊन आपले पांडित्य सांगत नाही. दिर्घकाळ गेला तरी असा मतदार मतदानाचा दिवस उजाडण्याची प्रतिक्षा करत असतो. पण त्याच्या मनात कसली खळबळ माजली आहे, त्याचे संकेत आसपास घडणार्‍या घटनांमधून बघायला मिळत असतात. ते इशारे नेत्यांना व पक्षांना समजून घेता आले, तरच त्यांना जनमानसाचा राजकीय लाभ उठवता येत असतो. उद्धव व राज यांना तो कितपत उठवता येईल, हे काळच दाखवू शकेल. याचे कारण राज-उद्धव यांना उमगले असेल तरच ते दोघे पुढल्या काळात त्याचा अधिक राजकीय लाभ उठवू शकतील. आपण इतर पक्षांध्या मागे गरजवंत म्हणून फ़रफ़टायचे, की एकमेकांच्या मदतीने स्वाभिमानाने ठामपणे उभे रहायचे, याचा दोघांना संयुक्तपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. एकमेकांना वाकुल्या दाखवण्यासाठी इतरांकडे हात पसरण्यापेक्षा आपापसातले मतभेद व आक्षेप घरातच ठेवून, जगापुढे एकदिलाने उभे रहाण्यात त्यांचा लाभ असेल. त्यांच्या समर्थक सव्वा कोटी मतदाराचे समाधान असेल. त्या राजकीय लाभाला व्यक्तीगत अहंकारापोटी लाथ मारणे कपाळकरंटेपणा आहे. तिथे शिवाजीपार्कात दोघांना एकत्र बघून घोषणा देणारे मुठभर किंवा काही हजार कार्यकर्ते महत्वाचे नाहीत. त्यापेक्षा हे सव्वा कोटी मतदार निर्णायक आहेत, अस्मितेची लढाई एकत्र येऊन लढा, असा त्यांनी मतातून दिलेला आदेश ओळखता आला, तर दोघांचे राजकीय भवितव्य उज्वल असेल.

3 comments:

  1. भाऊ अचूक निरीक्षण...

    ReplyDelete
  2. भाऊ, ज्या दिवशी हे दोघे भाऊ एकत्र येतील तो क्षण मराठी माणसाच्या 'दिवाळी-दसऱ्या'चा असेल! परंतु भाऊ हे दोघे एकत्र येऊ नयेत म्हणून काही लोक पाण्यात देव बुडवून बसले आहेत.

    ReplyDelete