Friday, November 28, 2014

मतदाराच्या सदिच्छा कोणी गमावल्या?

कुठल्याही आनंदोत्सवात किंवा समारंभात आपण लोकांना, परिचितांना आमंत्रित करीत असतो. त्यामागची भूमिका आनंद वाटून घेणे व द्विगुणित करणे अशीच असते. तुमचे हितेच्छु असतात, त्यांना तुमच्या भल्याचा आनंद असतो आणि म्हणूनच त्यांना बोलावण्याचे अगत्य आपण दाखवत असतो. पण अशा प्रसंगी जे आप्तस्वकीय मित्र परिचित जमतात, त्यांच्यातच भांडणे लागली वा वादंग झाले, मग त्या समारंभाचा पुरता विचका होऊन जातो. तिथे जमलेल्यांना आनंदात सहभागी व्हायचे असते. त्याऐवजी त्यांना वितंडवाद किंवा हमरातुमरी बघायला मिळाली, मग त्यांचा विरस होतो आणि काही वेळाने त्यात समेट झाल्यावर पुन्हा समारंभ सुरू होतो. परंतु त्यातली मजा संपलेली असते. ज्याला सामान्य भाषेत लोक अपशकून म्हणतात. नाट लागणे म्हणतात. मग समारंभ उरतो केवळ उपचारापुरता. अर्थात त्यातही तितके अगत्य दाखवले जात असते. आग्रह करून भोजन सुद्धा उरकले जाते. पण त्यातल्या पदार्थांना ती चव उरलेली नसते आणि त्यातली लज्जत संपलेली असते. समारंभ योजणार्‍यांनी वा आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याची इच्छा असलेल्यांनी, याचे भान कधीही सोडून चालत नाही. समारंभात किंवा आनंदाच्या सोहळ्यात सहभागी व्हायला येणार्‍यांना जितके महत्व असते, तितके त्याचे आयोजन करणार्‍यांच्या रागलोभाला नसते. जेव्हा ते भान सुटते, तेव्हा समारंभ उरकले जाताता आणि होतात ते उपचार असतात. महाराष्ट्रातील सत्तांतर म्हणूनच मग एक उपचार बनून गेला आहे आणि त्याला ज्या करोडो लोकांनी हातभार लावला, त्यांचा संपुर्णपणे भ्रमनिरास होऊन गेला आहे. या समारंभाचे आनंदमुर्ती असलेल्यांनीच आपल्यावर असा अपशकून ओढवून आणला. एखाद्या विवाहसोहळ्यात हुंडा वा मागण्यांसाठी जसा बिब्बा घातला जातो, तसाच काहीसा विरस त्यामुळे मराठी जनतेचा होऊन गेला आहे.

महाराष्ट्रात यावेळच्या मतदानाने एक ऐतिहासिक सत्तांतर घडून आले आहे आणि ते घडवण्यात सिंहाचा वाटा सामान्य जनता किंवा मतदाराचा आहे. त्यात अमूक एका पक्षाला नावडता म्हणून लोकांनी पाडलेले नाही. किंवा दुसर्‍या कुठल्या पक्षाला लाडका म्हणून लोकांनी सिंहासनावर आणून बसवलेले नाही. ज्या कारभाराला सामान्य जनता कंटाळलेली होती, त्यांना सत्ताभ्रष्ट करण्याचे कर्तृत्व त्याच जनतेने गाजवलेले आहे. जेव्हा एका प्रस्थापित व्यवस्थेला लोक उलथून पाडतात, तेव्हा त्यातला विजयी सोहळा त्याच जनतेसाठी साजरा होत असतो. सिंहासनाधिष्ठीत होणारा त्यात केवळ प्रतिकात्मक व्यक्ती असतो. म्हणूनच नव्या सरकारची स्थापना होताना व त्याचा कारभार सुरू होण्याविषयी सामान्य मराठी जनता कमालीची उत्सुक होती, उत्साहात होती. पण जसा कौल देऊन त्या जनतेने कॉग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर फ़ेकून दिले होते, त्याचा आनंद त्याच मतदाराला अनुभवता आला काय? ज्याप्रकारे निकाल लागल्यावर सत्तेसाठी कालच्या मित्रांमध्ये भांडणे जुंपली आणि मित्र सोडून शत्रूशी हातमिळवणी करण्याचे चित्र त्या मतदारापुढे निर्माण झाले, त्यामुळे जनता सुखावली असेल काय? भाजपा व शिवसेना यांच्यातल्या जाहिर जुगलबंदीने त्या मतदाराचा पुरता विरस झाला नाही काय? कारण जे काही सत्तांतर झाले आहे, त्यात कुणा एका पक्षाने दुसर्‍याचा पराभव केलेला नव्हता, तर मतदाराने चमत्कार घडवलेला असतो. त्याची किंमत वा हिस्सा त्याला नको असतो. तर त्यातला आनंद त्याला लुटायचा असतो. पण तितकी क्षुल्लक गोष्टही त्या मतदाराकडून हिरावली गेली आहे. जणू आपणच असा चमत्कार घडवला आहे आणि त्यातला मनस्वी असो किंवा आसूरी असो, आनंद केवळ आम्ही आम्हाला हवा तसा लुटणार आहोत, असे चित्र तयार झाले. त्याने मतदाराचा विरस झाला, हे कोणी नाकारू शकणार आहे काय?

कुठल्याही निवडणूकीत जेव्हा एखादा पक्ष जिंकतो, तेव्हा त्याचा मतदार वाढलेला असतो. आधीपासून त्याचा जो मतदार असतो, त्याच्यात ही भर पडलेला मतदार कायम त्या पक्षाचा समर्थक असतोच असे नाही. अशी वाढ ही सदिच्छा म्हणून त्या पक्षाकडे आलेली असते. ती वाढ हंगामी असते. असा मतदार काही अपेक्षा घेऊन आलेला असतो, तसाच तो आपले काही हेतू मनात बाळगून त्या नव्या पक्षाकडे आलेला असतो. सहाजिकच आपल्या बांधिलकी मानणार्‍या व हुकूमी मतदारापेक्षा या नव्या मतदाराच्या भावना जपणे, विजयी पक्षासाठी अगत्याचे काम असते. महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, जे सत्तांतर झाले, त्याला पक्षाच्या मेहनती इतकाच हा बदलाला उत्सुक मतदार कारणीभूत आहे. तो सदिच्छा व अपेक्षा घेऊन भाजपाकडे आलेला आहे. जसा तो पाच वर्षापुर्वी कॉग्रेस युपीएकडे झुकला होता, किंवा राज ठाकरे यांच्या मनसेकडे वळला होता. पण त्या सदिच्छा व अपेक्षांकडे काणाडोळा करून त्या दोघांनी आपले अहंकार व सूडभावनेसाठी मिळालेल्या शक्तीचा वापर केला. त्यातून पाच वर्षानंतर त्याच पक्षांना तो मतदार गमवावा लागला होता. मतदार तुमचे सूड वा हिशोब चुकते करण्यासाठी तुम्हाला शक्ती प्रदान करत नसतो. तर समाजासाठी तुम्ही चांगले काही करण्याच्या आशा त्याने बाळगलेल्या असतात. त्यालाच सदिच्छा म्हणतात. राज्यात वा केंद्रात भाजपाला मिळालेले यश, त्याच आशेचे प्रतिक आहे. पण मिळालेल्या मतांना आपली वाढलेली ताकद म्हणून भाजपा मागल्या सहा महिन्यात जसा वागतो आहे, त्यातून असा मतदार सुखावतो असे कोणाला म्हणायचे असेल. तर त्याचे कल्याण होवो. पण वास्तवात त्या सदिच्छा आहेत आणि त्याच कृतीतून लाथाडल्या गेल्या, तर पुढली पहिली संधी आली, मग तोच मतदार विजयोन्मादात बेफ़ाम झालेल्यांना जमिनीवर आणतो. अजितदादा, सोनिया, राहुल त्याची साक्ष आहेत.

महाराष्ट्रात ऐन निवडणूकीच्या तोंडावर युती फ़ुटली आणि दोन्ही मित्रांनी एकमेकांवर दोषारोप केले. त्यातला खरा दोषी कोण, या भानगडीत मतदार पडला नाही. त्याने असे काही मतदान केले, की कुठल्याही मार्गाने दोन्ही कॉग्रेसमधला कोणी सत्तेच्या जवळपास फ़िरकता कामा नये. म्हणजेच सेना-भाजपा यांना एकत्र येण्याचा संदेशच मतदाराने दिला होता. त्यात मग मोठा पक्ष झालेल्या भाजपाने पुढाकार घ्यायला हवा होता. कारण संख्येतूनच मतदाराने तसा आदेश त्याला दिलेला होता. पण लोकांच्या सदिच्छांची दखलही न घेता, आपल्या ‘वाढलेल्या बळाचा’ अहंकार दाखवत भाजपाने सेनेला बाहेर ठेवून सूडाचे राजकारण केल्यासारखे वर्तन आरंभले. त्यातून त्यांनी स्थापन केलेले सरकार इतके दिवस झाले तरी अस्थीर आहे आणि त्याच्या पाठींब्याविषयी सामान्य माणसाच्या मनात शंका आहेत. हा सामान्य माणूस म्हणजे तोच सदिच्छा म्हणून भाजपाला मत दिलेला मतदार आहे. त्याचा या चार आठवड्यात पुरता भ्रमनिरास होऊन गेला आहे. ज्या राष्ट्रवादीला संपावायला आपण भाजपला कौल दिला, तोच पक्ष थेट राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सेनेवर सूड उगवतो, अशी प्रतिमा एका महिन्यात तयार झाली. त्यातून भाजपाने काय मिळवले व काय गमाअले त्याचा शांतपणे विचार करण्याची गरज आहे. त्याचा भ्रमनिरास म्हणजे सदिच्छा गमावणे. म्हणजेच पर्यायाने वाढलेल्या मतांना लाथाडण्याचा मुर्खपणा झाला आहे. आज त्याची किंमत कळणार नाही. कारण निवडून आलेले आपल्या पक्षाचे आमदार भ्रमनिरासाने घटत नाहीत. पण मतदानाची पहिली संधी आली, मग तोच मतदार पक्षाला त्याची औकात दाखवत असतो. हा शब्द मुद्दाम मनसेसाठी वापरला. कारण लोकसभा निवडणूकीपुर्वी राज ठाकरे यांनी तोच शब्द वापरला होता आणि मतदाराने त्यांना त्याचा खरा अर्थ समजावण्यासाठीच मतदान केले. भाजपाने मागल्या चार आठवड्यात त्याच सदिच्छांचा सन्मान केला असे कोणी म्हणू शकतो काय?

1 comment:

  1. Excellent.
    भाऊ तीन दिवसापासून तुमच्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो.

    ReplyDelete