Sunday, April 12, 2015

वांद्रे मतदान चाचणी कोणता इशारा देतेय?



काल रविवारी एबीपी माझा वाहिनीने वांद्रे-पुर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीच्या मतदानाचा एक्झीट पोल सादर केला. खरे म्हणजे विधानसभेच्या पोटनिवडणूकीचा असा पोल वा चाचणी सहसा कोणी कधी घेतलेली नसेल. अधिक अन्य कुठल्या पोटनिवडणूकीचा इतका गाजावाजा झालेला नसेल. १९७० सालात लालबाग परळ येथे कम्युनिस्ट आमदाराच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा असा गाजावाजा झालेला होता. पण त्याचे कारण आमदाराची हत्या असे होते. त्यात शिवसेना वगळता तमाम पक्षांनी कृष्णा देसाई यांच्या विधवा पत्नी सरोजिनी देसाई यांना पाठींबा दिलेला होता. अधिक त्यांच्या प्रचाराला आलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यात तेव्हाचे हंगामी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण सहभागी झालेले होते. पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही. सरळ लढत असूनही सेनेच्या वामनराव महाडिक यांनी त्यात यश मिळवले. तो शिवसेनेचा विधीमंडळात पोहोचलेला पहिलावहिला आमदार होता. तशी दुसरी पोटनिवडणूक गाजलेली म्हणायची, तर १९८७ सालातली पार्ला येथील होती. तिथल्या कॉग्रेस आमदाराच्या मृत्यूमुळे पुन्हा मतदान घ्यावे लागले होते आणि त्यातही शंकरराव चव्हाण व शिवसेनाच आमनेसामने असावी, याला योगायोग म्हणावा लागेल. परळच्या वेळी वसंतराव नाईक परदेशी दौर्‍यावर गेल्याने शंकरराव हंगामी मुख्यमंत्री होते आणि पार्ल्याच्या वेळी ते दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. वास्तविक पार्ल्याची जागा शिवसेनेने पुर्वी कधी जोशात लढवलेली नव्हती. कारण तिथे अमराठी मतदारसंख्या लक्षणिय होती. पण १९८५ नंतर सेनेने हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि पार्ल्याची पोटनिवडणूक आलेली होती. त्याकडे पाठ फ़िरवणे शक्य नसल्याने सेनेला तो प्रयोग करावाच लागला होता. डॉ. रमेश प्रभू या महापौराला स्थानिक असल्याने उमेदवार बनवले गेले होते.

इथे खरे तर शंकररावांनी लक्ष घालण्याची गरज नव्हती. पण दिल्लीश्वरांना आपले प्राबल्य दाखवण्याच्या नादात शंकररावांनी तिथे ठरलेला उमेदवार बदलून प्रभाकर कुंटे यांना तिकीट द्यायला लावले. तोपर्यंत सेनेने त्यात लक्ष घातले नव्हते. आधी तिथे जनता पक्षाचे माजी आमदार असलेले प्राणलाल व्होरा उभे होतेच. तर भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन व्होरांना पाठींबा दिलेला होता. कारण भाजपा तेव्हा गांधीवादी समाजवादाचे भजन गात होता. सेनेने हिंदूत्वाचे धनुष्य हाती घेतलेले होते. अखेरच्या दिवशी सेनेने डॉ. प्रभू यांना मैदानात आणले आणि कुंटे यांना सोपी असलेली जागा लढतीची होऊन गेली. शिवसेनाप्रमुखांनी आपली सर्व शक्ती तिथे पणाला लावली व आजचे मंत्री सुभाष देसाई यांच्यासह गजानन किर्तीकर यांनी सुसज्ज यंत्रणा उभी करून ती जागा जिंकली. ही मुंबईत खुप गाजलेली दुसरी पोटनिवडणूक होय. बहूधा त्यानंतर इतकी गाजलेली वांद्रे-पुर्व ही आताची तिसरी पोटनिवडणुक असावी. अन्यथा सूर्यकांत महाडिक यांची निवड रद्द झाल्याने वा हंशू अडवाणी यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुका फ़ारश्या गाजल्या नव्हत्या. मात्र इथेही योगायोग असा, की वांद्रे येथे नारायण राणे यांना उमेदवार करणारे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे शंकररावांचेच सुपुत्र आहेत. हे एकमेव तीन पोटनिवडणूकातले साम्य सांगता येईल. पण वाहिन्यांवर गाजावाजा होऊन एक्झीट पोलपर्यंत गेलेली ही पहिलीच असावी. मात्र जी चाचणी वा पोल दाखवला गेला, त्याच्या आकड्यांचे विश्लेषण योग्यप्रकारे होऊ शकले नाही असे वाटले. त्याचे कारण अर्थातच त्यात सहभागी झालेल्यांपैकी कोणालाच निवडणुकीचे आकडेशास्त्र ठाऊक नाही किंवा त्याच्या अभ्यासाची गरज भासलेली नसावी. एखाद्या राजकीय सनसनाटीवर उथळ गप्पा रंगवाव्यात, तशीच माझावरची चर्चा भरकटत गेली आणि काडीचेही विश्लेषण होऊ शकले नाही.

अर्थात त्यात नवे काहीच नाही. मागल्या विधानसभेच्या निमीत्ताने पहिली मतचाचणी एबीपी माझाने केलेली होती, त्यावरही गदारोळ झालेला होता. त्यात सहभागी झालेले कॉग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर भलतेच खवळले आणि चर्चा सोडून निघून गेले होते. त्यानंतर त्याविषयी वाहिनीच्या संपादक संयोजकांना कितीतरी सफ़ाई देत बसावे लागले होते. आपल्या चाचणी व त्याच्या पद्धतीचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. तेव्हाही मी लेख लिहून चाचणी योग्य, पण मांडणी चुकीची असा शेरा मारलेला होता. किंबहूना ती वाहिनी आपल्याच चाचणीचे अंदाज योग्य निघतील अशी खात्री देत नव्हती, त्याची हमी देण्यापर्यंत मी त्यांची पाठराखण केलेली होती. मात्र त्यातून ही मंडळी काही शिकलेली दिसत नाहीत. रोजच्या उथळ राजकीय चर्चा आरोप प्रत्यारोप आणि मतचाचणीवरील विश्लेषण यातला फ़रकच वाहिनीच्या पत्रकारांच्या लक्षात आलेला दिसत नाही. त्यामुळे भरकटलेली विस्कटलेली चर्चा, असेच रविवारच्या कार्यक्रमाचे स्वरूप राहिले. जे आकडे हाती आले ते थेट प्रेक्षकांपुढे मांडून टाकल्यावर त्याच्या आधारे विविध पक्षात भांडण लावून देण्याला चर्चा म्हणत माहीत, की विश्लेषण म्हणत नाहीत. इथे हाती आलेल्या आकड्यांचे विश्लेषण होणे अगत्याचे असते. बघणार्‍या व ऐकणार्‍यांना विषय व अभ्यास समजावून देण्याची कामगिरी पार पाडायची असते, त्याचे कुठे भानच दिसत नव्हते. उलट सेना व कॉग्रेस यांच्यात चार टक्के इतकाच फ़रक असल्याने राणे अजून जिंकण्याची शक्यता आहे काय, यावर शिळोप्याच्या गप्पा मात्र चालल्या होत्या. मागचे मतदान आणि आताचे आकडे, यांचा तुलनात्मक अभ्यास वा त्यातून निघणारे निष्कर्ष याचा लवलेश चर्चेत कुठे नव्हता. सेना, कॉग्रेस आणि एम आय एम यांच्यातले आरोप प्रत्यारोप यापलिकडे चर्चा सरकूच शकली नाही. त्यामुळे चाचणीच्या आकड्यांनी दिलेला गंभीर इशारा साफ़ दुर्लक्षितच राहिला.

एबीपी माझाच्या एक्झीट पोलनुसार शिवसेनेला ३८ टक्के तर कॉग्रेसला ३४ टक्के आणि एम आय एम या पक्षाला २२ टक्के मते मिळताना दिसतात. पण मागल्या सहा महिन्यापुर्वी झालेल्या मतदानात तिथे एवढेच तीन पक्ष नव्हते. आणखी तीन पक्ष मैदानात होते आणि आज नाहीत. मग त्यांनी तेव्हा मिळवलेली लक्षणिय मते कुठे वा कोणाकडे गेली, हा अशा विश्लेषणाचा विषय असायला हवा. राजकीय चर्चा गंभीर असायला हवी. ती कपील शर्माच्या कॉमिडी नाईटप्रमाणे मनोरंजक नसायला हवी. याचे भान कुणी ठेवायचे? कारण ज्या तीन पक्षांनी यावेळी उमेदवार टाकला नाही, त्यांची मते थोडीथोडकी नाहीत. राष्ट्रवादी, भाजपा व मनसे अशा तिघांचे उमेदवार नव्हते आणि मागल्या खेपेस त्यांच्या पारड्यात एकूण ३८ टक्के मते होती. ती मते यावेळी मैदानात असलेल्या कोणत्या पक्षाला कशा प्रमाणात गेली असतील, त्याला राजकीय विश्लेषण म्हणतात. त्याचा कुठे थांगपत्ता चर्चेत रमलेल्यांना होता? सेनेला ३३ टक्केवरून ३८ टक्के म्हणजे ५ टक्के कुठून वाढले? कॉग्रेसचे नारायण राणे यांनी १० टक्केवरून ३४ टक्के अशी मजल मारताना कुणाची २४ टक्के मते कशी खेचून आणली, याचा उहापोह अशा चाचणीतून व्हायला हवा. त्याला एक्झीटपोल म्हणतात. इथे नुसते मध्यंतरी टक्केवारीचे आकडे फ़ेकून नेहमीची वादावादी रंगवण्यात धन्यता मानली गेली. मग बोलणार्‍यांना काही उमगलेले नव्हते की सांगणार्‍यांना काही उमजलेले नव्हते. नुसत्या कागाळ्या काढण्याचा उद्योग मात्र झकास रंगला. पण गैरहजर असलेल्या तीन पक्षांच्या ३८ टक्के मतांचा कुठलाच हिशोब दिला गेला नाही. त्यात २० टक्के मागल्या वेळेस मिळवणार्‍या भाजपाचाही समावेश आहे. आणि म्हणूनच नारायण राणे पडणार की जिंकणार; यापेक्षा भाजपाची २० टक्के मते कुठे गायब झाली, ही बाब एक्झीटपोल मधली सर्वात गंभीर बाब आहे. त्याचा सविस्तर उहापोह पुढल्या भागात करूया. (अपुर्ण)

1 comment:

  1. भाऊराव,

    लेख पटला. पुढील विवेचनाची उत्सुकतेने वाट पाहतोय. फक्त एक दुरुस्ती सुचवतोय. भाजप + राष्ट्रवादी + मनसे यांची मतांची टक्केवारी अनुक्रमे २०.७१ + ७.८१ + ४.३४ अशी आहे. त्यांची बेरीज ३२.८६ % होते. लेखात म्हंटल्याप्रमाणे ३८ % होत नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete