Sunday, April 26, 2015

इनकी बेशरमीपर अभी तो भरोसा करो



काही माणसे कमालीची निर्लज्ज असतात आणि काही निर्ढावलेली असतात. अशा लोकांना सतत शिव्याशाप मिळत असतात. दोष दाखवले जात असतात. पण त्यांच्यात कधी सुधारणा होत नाही. उलट ते अधिकच कोडगे बनत जातात. सहसा राजकारणात अशा लोकांचा भरणा असतो असा एक समज आहे. म्हणून तर मागल्या तीनचार वर्षात लोकांचा प्रक्षोभ अनेक घटनांनी सतत शिगेला जाऊन पोहोचत होता. त्याच प्रक्षोभावर स्वार झालेल्या दुसर्‍या राजकारण्यांनी देशात सत्तांतर घडवले. मात्र त्यांना देखील संधीसाधू व भ्रष्ट, बेशरम ठरवणारी एक नवी कार्यकर्ता वा समाजसेवी जमात याच दरम्यान उदयास आली. त्याला लोकपालचे समर्थक वा आम आदमी पक्ष म्हणून ओळखले जाते. या लोकांनी चळवळीचा पोरखेळ केलाच होता. पण पुढे राजकारणात येऊन राजकारणालाच कोडगेपणा करून टाकले आहे. तीन वर्षापुर्वी दिल्लीत एक सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यामुळे प्रक्षुब्ध समाज रस्त्यावर उतरला होता आणि अशा तरूणांचे तांडे सोनिया गांधी वा मनमोहन सिंग यांच्या घरापाशी जाऊ लागल्यावर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला होता. तेव्हा त्यांच्याविषयी संवेदनाशीलतेचे प्रदर्शन मांडायला पुढे सरसावलेल्या काही नाटक्यांनी राजधानी दिल्लीच्या जंतरमंतर या ठिकाणी मेणबत्त्या पेटवण्याचा तमाशा केलेला होता. आज त्यांच्याच म्होरक्यांना आम आदमी पक्ष अशा नावाने ओळखले जाते. आणि योगायोगाने स्थळ तेच आहे, जंतरमंतर. याच स्थानी पुन्हा केजरीवाल व त्यांची नौटंकी कंपनी नवा नाट्यप्रयोग घेऊन आलेली होती. भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करायला एक मेळावा योजलेला होता आणि तिथेच एका इसमाने झाडावर चढून गळफ़ास लावून घेतला. व्यासपीठावरच्यांना घटना दिसत होती आणि हे संवेदनाशील नेते, तरीही भाषणे करत राहिले. मात्र ती व्यक्ती हकनाक प्राणाला मुकली.

इतके झाल्यावर दोन दिवस मुग गिळून गप्प बसलेल्या केजरीवाल यांनी त्याबद्दल क्षमायाचना केलेली आहे. अशा घटनेचे राजकारण करू नये, असेही आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे आणि माध्यमांनी टिआरपी मिळवण्यासाठी भावनांचा खेळ करू नये, असाही सल्ला दिला आहे. म्हणूनच यातून आपल्यासमोर नवी कोडगी जमात आली, असे म्हणावे लागते. सामुहिक बलात्कारासाठी मेणबत्त्या लावताना केजरीवाल व त्यांची टोळी काय करत होती? तेव्हा ते राजकारणात नसल्याने त्यांनी केले, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. पण ही टोळी त्या बलात्काराचे व त्यातून झालेल्या मृत्यूचे काय करत होती? आपल्या भावी राजकारणाचा पाया घालणे चालू नव्हते काय? कारण त्यानंतर अवघ्या दोन वर्षात केजरीवाल टोळीने राजकीय पक्ष स्थापन केला आणि थेट दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा त्यांच्या पक्षाला व राजकारणाला बळ कुठून मिळाले होते? त्यांनी चालविलेला तमाशा थेट प्रक्षेपणातून, देशाच्या कानाकोपर्‍यात पोचवण्यातून वृत्तवाहिन्यांनी टिआरपी मिळवली नव्हती; असे केजरीवाल यांना म्हणायचे आहे काय? तेव्हा बलात्कार व त्यातून झालेली हत्या, किंवा लोकपाल आंदोलनाचे अहोरात्र प्रक्षेपण करण्यातून वाहिन्या व माध्यमांनी काय कमावले होते? त्यांनी टिआरपीसाठी असले उद्योग करू नयेत, असा सल्ला मुजोर सत्ताधीश कॉग्रेसवाले देत होते आणि त्यांना सत्तेचा माज आल्याचे केजरीवालच म्हणत होते. आज त्याच मुजोर कॉग्रेसवाल्यांची भाषा कोण बोलत आहेत? समाजात व राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवायला आलेल्या त्यांच्या टोळीने अन्य कुठले परिवर्तन घडवलेले नसले, तरी स्वत:मध्ये मोठे आमुलाग्र परिवर्तन घडवण्यात त्यांना कमालीचे यश मिळाले, असे म्हणता येईल. कारण डोळ्यादेखत त्यांनी एका व्यक्तीला मरू दिले आणि उलट माध्यमांना उपदेश करण्याचा निर्लज्जपणा दाखवला आहे.

पावित्र्याचे व चारित्र्याचे एकमेव पुतळे आपणच आहोत, अशा थाटात मागली तीनचार वर्षे ही टोळी अखंड वागत आलेली आहेत. मग दोनदा दिल्ली विधानसभा जिंकण्याचा विषय असो, किंवा लोकसभेच्या लढाईत उतरून देशातच मोठे परिवर्तन घडवण्याचा आणलेला आव असो. नाट्यमय घटनाक्रमाशिवाय त्यांनी आजपर्यंत काय केले असा सवाल आहे. आणि त्याचे उत्तर नकारार्थी आहे. पहिल्याच विधानसभा निवडणूकीत मोठे यश मिळवल्यानंतर आयबीएन वाहिनीतर्फ़े राजदीप सरदेसाई यांनी केजरीवाल यांची सत्ता संभाळण्याबद्दल मुलाखत घेतली होती. पण बहुमत नसल्याने आपण सत्ता घेणार नाही, की कोणाच्या पाठींब्यावर सरकार बनवणार नाही, असा हवाला या इसमाने दिलेला होता. तेवढ्यावर न थांबता सत्तालंपट भाजपा व कॉग्रेस एकत्र येऊन सरकार बनवतील, याची ग्वाही देताना केजरीवाल म्हणाले होते. ‘इनकी (कॉग्रेस व भाजपा) बेशरमीपर थोडा तो भरोसा करो.’ म्हणजे सत्तेसाठी ते दोन्ही पक्ष एकत्र येऊन वाटेल त्या थराला जातील, अशी हमी हा इसम देत होता. पण आज दोन वर्षातला आपला अनुभव काय आहे? केजरीवाल आणि त्यांची टोळी सत्ता व स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही हीन व गुन्हेगारी थराला जाऊ शकतात, हेच सातत्याने अनुभवास येत आहे. तो अनुभव जितका इतरांच्या वाट्याला आलेले आहे, तितकाच त्यांच्याच सहकार्‍यांनाही अनुभवावा लागत आहे. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझिया इल्मी असे डझनावारी सहकारी केजरीवाल नावाच्या बेशरमपणाचे बळी आहेत. पण तेवढ्यावर या टोळीचे समाधान झालेले दिसत नाही. त्यांनी भारतीय दंडविधानात बसतील, अशा गुन्ह्यांचाही अवलंब करण्यापर्यंत मजल मारलेली दिसते. जंतरमतरच्या मेळाव्यात गळफ़ासाने मरण पावलेला गजेंद्र सिंग, हा आपने पक्षीय कार्यक्रमाचा भाग म्हणून घेतला बळी आहे, म्हणायची आता वेळ आलेली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही सभास्थानी अशी घटना घडली, तर वक्ते व नेते धावाधाव करून मृत्यूच्या दाढेतून त्या व्यक्तीला सोडवायचा प्रयत्न करतात. ते सभेचे काम चालवित भाषणे देत बसत नाहीत. अगदी भ्रष्टाचारात बुडालेल्या सत्तालंपट राजकीय पक्षांचा उद्धार करीत केजरीवाल इथपर्यंत आले, त्यांच्याही कुठल्या सभेमध्ये असा प्रकार कधी झाला नाही आणि घडला असेल, तर त्यांनी भाषणे चालू ठेवून, त्या व्यक्तीला मरू दिलेले नाही. पण दोन दिवसांनी माफ़ी मागताना केजरीवाल यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. आपण आत्महत्या दिसत असतानाही भाषण चालू ठेवायला नको होते. ती चुक होती, असेही केजरीवाल म्हणतात. यालाच ते चुक म्हणत असतील, तर गुन्ह्याची त्यांची व आम आदमी पक्षाची व्याख्याही देशाला समजून घ्यावी लागेल. कारण जे घडले तेच मूळात संशयास्पद असून नेहमीप्रमाणेच घडवून आणलेले, पण फ़सलेले नाट्य आहे काय, अशी शंका घेण्याला त्यात खुप वाव आहे. तशी शंका मृत गजेंद्रच्या कुटुंबियांनीही घेतलेली आहे. यासंबंधी अनेक शंका व अफ़वांचे पीक सध्या आलेले आहे. घटनास्थळाचे व घटनेचे थेट चित्रण झालेले आहे. सहाजिकच गळफ़ास लावलेल्या व्यक्तीला वाचवण्यापेक्षा त्याचाच जयजयकार करण्यात गुंतलेल्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या कलमाखाली गुन्हेगार ठरवले जाऊ शकते. आणि ते केवळ गळफ़ासाच्या झाडाजवळचेच लोक असतील असे नाही. तर अशा जमावाला रोखून आत्महत्या थांबवण्याचा प्रयास केला नाही, हा व्यासपीठावरील नेत्यांनाही गुंतवणारा गुन्हा ठरू शकेल. कदाचित वकीलांनी त्याच संकटाचा इशारा दिल्यावर केजरीवालना जाग आलेली असावी आणि टिआरपी, राजकारण नको; असले उपदेश सुरू झालेले आहेत. मृताच्या कुटुंबियांना शांत करण्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे. आता तरी आपण या कोडग्यांच्या निर्ढावलेल्या बेशरमपणावर थोडा विश्वास ठेवणार की नाही?

3 comments:

  1. १) आप कार्यकर्ता आणि राजकीय आकांक्षा असलेला शेतकरी निवडणे आणि त्याला शेतकरी मेळाव्याला बोलावणे
    २) त्याने झाडावर जाऊन काहीतरी ड्रामा करणे (म्हणजे नुसते आत्महत्या केल्यासारखे किव्वा काहीतरी खळबळजनक)
    ३) मग लोकामध्ये खळबळ उडून ते त्याला खाली उतरवणे आणि भाषणाला बोलावणे
    ४) त्याने मग त्या चिट्ठी मध्ये लिहून दिलेले आणि आधीच तयार केलेले भाषण म्हणून सगळीकडे आप विषयी सहानुभूती आणि मोदी विरुद्ध वातावरण तयार करणे (वाहत्या गंगेत हात धुवून घेणे)

    पण यामधील दुसरी स्टेप नेमकी चुकली आणि अपघात होऊन दुर्दैवी शेतकरी मेला. त्याची तशी इच्छा नव्हती कारण तो एक साधन शेतकरी होता आणि आत्महत्या करण्याचे त्याला कुठलेही मोठे कारण नव्हते.

    पण आता या तमाशा मध्ये आप चे लोक स्वत फसले आणि आता हा सगळा तमाशा करून पण आता असा कांगावा करत आहे की "तुम्ही असा म्हणताय का की आम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला सांगत होतो?" ... आता यांना कुणी सांगावे की त्यांच्या सापळ्यात ते स्वताच फसलेत पण हे ते कोडगे कबूल करणार नाहीत.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    या प्रसंगावरून नामांतर आंदोलनात आत्मदहन केलेल्या गौतम वाघमारेची आठवण झाली. नागपुरात (बहुतेक कामटीला) निदर्शनं होती. त्याला सांगितलेलं की तुला फक्त पेट्रोलने आंघोळ करायची आहे. त्याला तो तयार झाला. ठरल्याप्रमाणे नाटक सुरू झालं आणि कोणीतरी विघ्नसंतोषी माणसाने की दलालाने जळती काडी फेकली. झालं, भडका उडाला. गौतम जिवाच्या आकांताने आग विझवा म्हणून ओरडू लागला. पण लक्ष द्यायला वेळ होता कोणाकडे. सगळे आंदोलनाच्या नशेत होते ना! एक जीव हकनाक प्राणांस मुकला. गजेंद्रसिंहाचा गौतम वाघमारे तर केला गेला नसेल?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. आता काही दिवसांनी जाहीर होईल, शिंदे पाय घसरून पडला किंवा त्याला ढकलून दिले.

    ReplyDelete