महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी मराठी चित्रपटाविषयी जो निर्णय घेतला आहे, त्यातून वादळ उठण्याचे काहीही कारण नव्हते. पण महाराष्ट्र व मुंबईत राहुन मराठीचा द्वेष करणार्यांना त्यातून पोटशूळ उठला आहे. त्यांच्या पोटदुखीला शिवसेना व अन्य मराठीप्रेमी योग्य ते उत्तर रस्त्यावर येऊन देत आहेत व देतीलच. पण या निमीत्ताने तावडे व भाजपाच्या नेत्यांचीही जबाबदारी वाढते. कारण हा निर्णय भाजपाचे मंत्री म्हणून तावडे यांनी घेतला आहे आणि त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फ़डणविस यांच्यावरही चिखलफ़ेक करण्यापर्यत मजल गेलेली आहे. ज्यांनी अशी चिखलफ़ेक केली किंवा त्या चिखलफ़ेकीचे समर्थन केलेले आहे, त्याना कायद्याने रोखता येणार नाही, हे खरेच आहे. कारण ही सर्व घातपाती कृत्ये नेहमी कायद्याचा आडोसा घेऊनच केली जात असतात. पण अशी घातपाती भूमिका करणार्यांना कायद्याच्या कक्षेत राहूनही शह देता येऊ शकतो. महात्मा गांधी यांची तीच तर खासियत होती. त्यांनी कायद्याच्या मर्यादेत राहून कायद्याला सुद्धा आव्हान देवून दाखवलेले होते. फ़डणवीस वा तावडे यांच्यासह त्यांचे तमाम सहकारी तितकी हिंमत दाखवू शकतील काय? कोणीतरी शोभा डे यांच्या विरोधात विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव आणायचीही भाषा केलेली आहे. पण त्याची काहीही गरज नाही. ज्या बळावर अशी मंडळी मराठीद्वेषाची मस्ती दाखवू शकतात, त्यांची ती शक्तीच नामोहरम करणे तावडे-फ़डणवीसांना अशक्य नाही. त्यासाठी कुठल्या कायद्यातल्या तरतुदी शोधायची गरज नाही की कुठल्या सरकारी यंत्रणेलाही कामाला जुंपण्याचे कारण नाही. अगदी व्यक्तीगत पातळीवर असे सत्ताधीश शोभा डे व त्यांच्या समर्थकांना पुरते नामोहरम करून टाकू शकतील. मात्र त्यासाठी तुमच्यापाशी आत्मविश्वास व स्वाभिमान असायला हवा.
गांधीजी यांनी असहकार नावाचे एक हत्यार भारतीयांनाच नव्हेतर अवघ्या मानव जातीलाच बहाल केलेले होते. ते हत्यार उपसण्यासाठी मनोबल आणि इच्छाशक्ती खुप लागते. जे कोणी असे मराठी द्वेष्टे आहेत, त्यांच्याशी असहकार करून त्यांच्यावर बहिष्कार घालायला कुठला कायदा आवश्यक नाही ना? तावडे-फ़डणवीसच नव्हेत, तर फ़ेसबुक सोशल मीडियात मराठीप्रेम उफ़ाळून आलेले कितीजण तितके मनोबल दाखवू शकतील? चौदा वर्षापुर्वी जेव्हा जॉर्ज बुश यांनी इराकवर हल्ला करायचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला इस्लामवरचा हल्ला ठरवून मुंबईतल्या मुस्लिमांनी एक ठाम निर्णय घेतला होता. त्यांनी अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांची विकी आपल्या दुकानात करणार नाही आणि त्यांची खरेदी करायची नाही, अशी भूमिका घेतली होती. काही वर्षापुर्वी प्रेषिताची व्यंगचित्रे युरोपियन देशात छापली गेली तेव्हाही याचप्रकारे मध्यपुर्व भागातील अनेक देशांनी युरोपियन कंपन्यांच्या उत्पादनांना प्रतिबंध लागू केला होता. तेव्हा किती युरोपियन देश आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करायला टिकले होते? बहुतेक देशांनी त्या व्यंगचित्रावर प्रतिबंध घालून आपली उत्पादने बाजारात टिकावीत म्हणून माध्यमांची गळचेपी केलेली होती. मुस्लिमांच्या त्या नुसत्या बहिष्कार व असहकाराने माध्यमांसह सरकारांना माघार घ्यावी लागली होती. महाराष्ट्रात ते शक्य नाही काय? अर्थात त्यासाठी मुस्लिम देश व मुस्लिमांप्रमाणे आपली अस्मिता व धर्मश्रद्धा याविषयी पक्की धारणा असायला हवी. मग अशा कितीही शोभा डे किंवा तिच्या समर्थकांना पाणी पाजायला वेळ लागणार नाही किंवा हत्यारही उपसावे लागणार नाही. मराठीचे प्रेम केवळ मोर्चे वा फ़ेसबुकवर दाखवून भागणार नाही. त्यासाठी कटीबद्धता असायला व दिसायला हवी. तावडे यांच्यापासून फ़ेसबुक लढवय्यांपाशी तितका निर्धार आहे काय?
शोभा डे असोत किंवा त्यांच्या समर्थनासाठी पुढे आलेले लोक असोत, त्यांना इथेच जगायचे आणि मिरवायचे आहे. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठीत वर्तूळात वावरावे लागते. त्या वर्तुळाची प्रतिष्ठा पैसेवाल्यांच्या गोतावळ्यात सामावलेली आहे आणि त्याच पैसेवाले उद्योगपती व्यापार्यांचा जीव सत्तेत गुंतलेला असतो. हाच असल्या राक्षसांचा पिंजर्यातला पोपट आहे. त्या पोपटाचा जीव सत्तेत गुंतलेला असतो आणि सत्तेपासून त्याला वंचित ठेवले, तर त्याची घुसमट सुरू होते. मग इकडे धुमशान घालणार्या राक्षसाचा जीव कासावीस होऊ लागतो. त्यापेक्षा अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या राक्षसाची अवस्था वेगळी नाही. शोभा डे किंवा तत्सम जे लोक वाहिन्यांवर वा माध्यमातून झळकत असतात, त्यांना बुजगावण्याप्रमाणे उभे केलेले असते. त्यांना तथाकथित उच्चभ्रू पार्ट्यामध्ये प्रवेश आहे, म्हणून त्यांची महत्ता असते. तिथून त्यांची उचलबांगडी झाली, म्हणजे त्यांची झगमग संपुष्टात येऊ शकते. अशा पार्ट्या किंवा त्यांच्या माध्यमांवर बहिष्कार घालणे शक्य आहे काय? अमूकतमूक शोभाच्या समर्थनाला उभा राहिला, म्हणून त्याचे लिखाण वा बडबड यावर आपण बहिष्कार घालू शकतो काय? वाहिन्यांची टिआरपी घटली, की अशा लोकांना जाग येते आणि पळापळ होत असते. शोभा डे किंवा तिचा समर्थक ज्या मेजवानी वा समारंभाला आमंत्रित असेल, तिथे मंत्र्यांनी जायचेच नाकारले, तर काय होऊ शकेल? पार्ट्या देणारे वा आयोजित करणार्यांना तिथे सत्ताधीश राजकारणी हवेच असतात. किंबहूना त्याशिवाय पार्ट्या होऊच शकत नाहीत. मराठीप्रेमी म्हणून फ़डणवीस तावडे यांनी याप्रकारे पार्ट्यांना जायचे सोडून दिले, तर शोभा डे यांना कोण विचारणार? मंत्री हवा म्हणून तिला पार्ट्यांच्या बाहेर काढावे लागेल वा आमंत्रणच नाकारावे लागेल. त्याचा काय परिणाम संभवतो? मोदी हे त्याचे जीतेजागते उदाहरण आहे.
ज्या माध्यमांनी मोदींच्या विरोधात सलग अपप्रचार केला त्यांच्यावरच मोदींनी बहिष्कार टाकल्यावर माध्यमांची २०१४ च्या पुर्वार्धात किती नाचक्की झाली होती? इतर वाहिन्यात वा वृत्तपत्रात आलेल्या मोदींच्या मुलाखती दाखवून छापून माध्यमातल्या मुखंडांना शेपटी घालावी लागली होती ना? मग महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी मान्यवर प्रतिष्ठीतांच्या पार्ट्या मेजवान्या समारंभात शोभा किंवा तिचे तथाकथित समर्थक येणार असतील म्हणून बहिष्काराचा पवित्रा घेतला तर काय होईल याची कल्पना करा. ज्या वाहिनीवर शोभा डे यांचे कौतुक करीत मराठीची निंदानालस्ती झाली, त्यावर बहिष्कार घालण्याची आपली तयारी आहे काय? नसेल तर उगाच तोंडाची वाफ़ दवडण्यात काय अर्थ आहे? सरकारने शिवसेनेने वा इतर कोणी काय करावे ते सांगण्याची गरज नाही. जे कोणी शोभा विरोधात चवताळून उठले आहेत, त्यांना करता येऊ शकणारा कठोर पर्याय समोर आहे. नुसती चुणूक दाखवली तरी पुरेशी आहे. तिच्या दारात मोर्चा घेऊन जायला नको किंवा कुठले पांडित्यपुर्ण स्पष्टीकरण द्यायला नको. नुसते आपल्यापुरते बहिष्काराचे हत्यार उपसायचे. अभिमान, अस्मिता या चैनीच्या वा हौशेच्या गोष्टी नाहीत. यासाठी कष्ट त्रासही सोसायची तयारी असायला हवी. नुसत्या शिव्या देवून वा ओरडा करून काहीही साध्य होत नाही, होणारही नाही. कोण कुठला हैद्राबादचा ओवायसी इथे बेहरामपाड्यात येऊन शिवसेनेला आव्हान देतो, तेव्हा तिथला मुस्लिम धर्माचे आवाहन केले म्हणजे इस्लामच्या इज्जतीसाठी मंचासमोर येऊन बसणार याची ओवायसीला हमी असते. हिंदूत्वाला शिव्या घातल्या मग मुस्लिम हमखास मते देणार याची खात्री असते. कितीही सामान्य मुस्लिम असो, त्याच्यात ती धार्मिक अस्मिता असते म्हणून मुठभर असून त्यांना लोक वचकतात. त्याचे प्रत्यंतर शिवसैनिक कधी दाखवतात, तेव्हाच त्यांना दाद मिळते. आहे तयारी इवलीशी गोष्ट करायची?
No comments:
Post a Comment