Tuesday, April 7, 2015

रजनीकांतच्या सावत्र भगिनीचे कथाकथन ( लेखांक ५ )



अक्षर-शब्दांवरून आपली नजर फ़िरत असते म्हणून आपण खरेच वाचत व समजून घेत असतो काय? किती सहजगत्या आपण काहीही वाचून पुढे जात असतो आणि त्यात नावडते दिसले, मग तुटून पडत असतो. पण वाचतोय त्याची सत्यता अजिबात समजून घेत नसतो. उदारहणार्थ पुढली दोन वाक्ये सलग वाचा. ‘फटकी इली तुझ्या तोंडावर..मायझया.. निम्बार चडला तरी अजून उतानो पडलास’, या शब्दांनी परब काकूंच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा.’ ‘पण, मला मन्या आठवतो तो दर रविवारी लाल मैदानात सकाळच्या संघाच्या प्रार्थनेला जाणार्‍या वेशात.. त्यावेळी आमच्या लाल मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागायची.’

निंबार म्हणजे ऊन. मन्या सकाळी ऊन चढेपर्यत उशिरा झोपून रहायचा म्हणून परबकाकू त्याचा शिव्या घालूनच उद्धार करत असत. यात ऊन चढणे कशाला म्हणतात? साधारण दहाअकरा वाजले की ऊकाडा होण्याइतके ऊन कडक होते. इतका उशीरा झोपणारा मन्या, रविवारी संघाच्या सकाळच्या शाखेत जातो असे साक्षीताई सांगत आहेत. याचा अर्थ संघाची सकाळची शाखा ऊन चढल्यानंतरच भरत असली पाहिजे. किंवा लाल मैदान आणि (साक्षीताईसह) मन्याचे वास्तव्य असलेल्या बावला कंपाऊंड व शाखा भरणार्‍या लाल मैदानाचे रेखांश भिन्न असायला हवेत. माझ्या माहितीनुसार संघाची सकाळची शाखा सातच्या सुमारास भरते. मग दहाला उशीरा उठलेला मन्या तीन तास आधी सातच्या शाखेत गणवेश चढवून कसा जात असेल? हा किती पुरोगामी चमत्कार आहे ना? बावला कंपाऊंड व लालबाग मुंबईतच असतील, तर दोघांच्या वेळेत साम्य असायला हवे. निदान संघाची शाखा दहानंतर भरायला हवी किंवा मन्याने वक्तशीर भल्या सकाळी सातपुर्वी सूर्योदयाच्या वेळी उठले पाहिजे. किंवा आणखी एक शक्यता आहे. मुंबईत जेव्हा सकाळचे दहा वाजून ऊन चढते, तेव्हा जिथे सकाळच्या सात वाजतात तिथे मन्या गणवेश चढवून जात असला पाहिजे. अशी जागा पृथ्वीच्या भ्रमणाची गती लक्षात घेतल्यास सौदी अरेबिया किंवा कुवेतच्या आसपास असू शकते. म्हणजे लाल मैदान लालबाग मुंबईत असेल तर बावला कंपाऊंड मलेशिया सिंगापूरमध्ये असायला हवे, किंवा बावला कंपाऊंड मुंबईत असेल, तर शाखा भरणारे लाल मैदान कुवेत-सौदीत असायला हवे. अवघ्या हजार पावलांच्या अंतरावर प्रमाण वेळेत अडीच तीन तासाचा फ़रक पडू शकत नाही. पण साक्षीताई तो पाडू शकतात आणि त्यांच्यावर डूख धरलेले कोणी याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. नसत्या गोष्टीवर त्यांना चार शब्द ऐकवतात. तशीच आणखी एक गंमत पुढल्या वाक्यातून बघा,

‘तिन्हीसांज झाली कि आम्हा दहा-बारा लहान मुलांना बिल्डींगच्या जिन्यांवर जमवून (मन्या) काही-बाही बौद्धिक देत असे. लोकमान्य टिळक, साने गुरुजी, छत्रपती शिवराय, बाजीराव पेशवे आदी इतिहासपुरुषांवर भरभरून बोलत बसे...’ काही खटकते का? साक्षीताई संघाच्या शाखेबद्दल बोलत आहेत. संघातल्या बौद्धिकाबद्दल काही सांगत आहेत, की राष्ट्रसेवादलाच्या गोष्टी सांगत आहेत? गेल्या काही वर्षात तुम्ही कुठल्याही बातम्या-चर्चेत संघाचे नाव निघाले, तर कधी सानेगुरूजी हे नाव ऐकले आहे काय? गोळवलकर गुरूजी हे नाव मात्र कानीकपाळी ओरडून सांगितले जाते. पण साक्षीताई संघाच्या शाखेत बौद्धिक घेऊन आलेल्या मन्याच्या तोंडी थेट सानेगुरूजींच्या ‘धडपडणार्‍या मुलांच्या’ गोष्टी घालू शकतात. मग त्यांना रजनीकांताई म्हणावे की साक्षीताई म्हणावे, असा प्रश्न पडतो ना? साक्षीताई संघाच्या शाखेची सानेगुरूजी कथामालाच करून टाकतात. मग त्यातली मुले कधी मोठी होतच नाहीत ना? पुढला किस्सा वाचा, ‘मन्या तसा चुणचुणीत तरुण ..साधारण २५-२६ वर्षे वय असेल त्याचे त्या वेळी.. अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींत पारंगत. ..भोवरे..गोट्या..पतंग..हुतुतू..काही-काही म्हणू नका..मन्याचा हात कोणीच धरूच शकणार नाही.’
पंचविशी पार केलेला, संघातली बौद्धिके अभ्यासवर्ग शाखा इत्यादी करणारा मन्या कशाकशात पारंगत आहे ना? पंचविशीतही तो गोट्या खेळतो, पतंग उडवतो. भोवरेही खेळतो. जिन्यात बसून अभ्यासवर्गही घेतो. खरे तर संघवाल्यांनी असा अजब नमूना शोधून आपल्या नागपूरच्या मुख्यालयात काचेच्या कपाटातच दुर्मिळ वस्तू म्हणून ठेवायला हवा. कारण संघवाला सोडाच पण कुठल्याही गल्लीतला पंचविशीतला तरूण गोट्या-भोवरे खेळत नाही. मग मन्या ही दुर्मिळ पुरातत्व विभागाने जपून ठेवायची वस्तू होत नाही काय? निदान लालबागच्या कुणा नगरसेवकाने तरी त्याला राणिबागेतल्या भाऊ दाजी म्युझियममध्ये ठेवायचा प्रस्ताव आणायला नको का? भाजपाचे विधान परिषदेतले आमदार मधू चव्हाण पलिकडल्या डॉक्टर कंपाऊंडचे जुने रहिवासी आणि संघ स्वयंसेवक. त्यांना त्यासाठी मी मुद्दाम पत्र पाठवायचा विचार करतो आहे. सानेगुरूजी सांगणारा संघवाला जपा म्हणून.

साक्षीताईंनी कथन केलेले इतके पराक्रम दक्षिण भारतीय चित्रपटात रजनीकांतही करू शकणार नाही. कदाचित त्यालाच नवी सनसनाटी कथा हवी म्हणून साक्षीताई पटकथा लिहीत असाव्यात, अशी एक शंका मनाला चाटून गेली. पण प्रत्येक वाक्याची अशीच चिरफ़ाड करण्यापेक्षा ‘दी एन्ड’ला येऊ. साक्षीताई काय लिहीतात वाचा, ‘क्षणभरासाठीच वर मस्जिदिच्या घुमटाकडे पाहिले.. चांदतारा अधिकच डौलाने फडकत होता.’ चांदतारा मशिदीच्या घुमटावर असतो यात वादच नाही. पण चांदतारा म्हणजे कापड वा झेंडा असतो काय? देऊळ वा गुरूद्वारा यांच्या घुमट-शिखरावर झेंडे फ़डकवले जातात. ती हिंदू वा शीख-जैन धर्मीय स्थानांची पद्धत आहे. पण जगाच्या पाठीवर कुठेही मशिदीवर झेंडा नसतो. दर्गेपीर असतात, तिथे काही झेंडे दिसतात. पण घुमटावर मिनारावर झेंडा कधी़च नसतो. मग हा चांदतारा म्हणजे काय? तर घुमटाच्या ऊंच टोकाला धातूच्या चांदतार्‍याची प्रतिमा असते, चर्चवर क्रॉस असतो तसा चांदतारा हा धातूचा बनलेला असतो. धातूची आकृती फ़डकते का? पण साक्षीताई त्याला नुसते फ़डकवत नाहीत, तर ‘डौलाने’ फ़डकवतात, हे रजनीकांतच्या थेट नात्यात असल्याखेरीज शक्य आहे काय बोला? अर्थात अशा शंका घ्यायच्या नसतात. हे सर्व घडले तेव्हा म्हणजे साक्षीताई उर्फ़ आपाकडे मन्या भिक मागत होता, तेव्हा चंद्र होता ना साक्षीला. यार अशा गोष्टी रोजरोजच्या असतात थोड्याच? म्हणतात ना इदका चांद, त्यातल्या गोष्टी ह्या.

सवाल एका साक्षीताईचा नसतो. आपल्यासह सर्वच वाचकांना थापा व कपोलकल्पित ऐकायची इतकी सवय अंगवळणी पडते, की त्यातले सत्यासत्य तपासायची आपली शक्तीच निकामी होऊन जाते. तुमचीआमची सोडा ज्यांच्या मदतीसाठी असे लोक थापेबाजी करतात, त्या डाव्या पुरोगाम्यांचीही नको इतकी फ़सगत होऊन जाते. अशाच थापेबाजीने डाव्या पुरोगामी चळवळीचा हकनाक बळी घेतला आहे. आज जी पुरोगामी चळवळ आंदोलन व संघटनांची दुर्दशा झालेली आहे, तिला हीच थापेबाजी कारणीभूत आहे. इतरांना थापा मारता मारता त्याच लोकांना व त्यातल्या कार्यकर्त्यांना इतका भ्रम झालेला आहे, की आपल्या थापा इतरांची दिशाभूल करायला आहेत, याचा विसर पडून डाव्या चळवळीतले बहुतांश लोक त्याच भ्रामक जगात वावरू लागले आहेत. त्याची त्यांना व्यवहारी जगात किंमत मोजावी लागत आहे. कधीकाळी गिरणगाव मध्यमुंबईत मोठी शक्ती असलेली पुरोगामी चळवळ आता पुरती नामशेष होऊन गेली आहे. कारण त्यांना वास्तवाचे भान उरलेले नाही. साक्षीताई वा तत्सम पुरोगामी पत्रकार, संपादक, विचारवंतांनी खोट्यानाट्या कंड्या पिकवायच्या आणि त्याला लोक फ़सत नाहीत. पण त्यालाच सत्य समजून वागणारे पुरोगामी लोक भरकटत गेले आणि आपला लोकसंपर्क तुटतोय, त्याचे भान त्यांना उरलेले नाही. नित्यनेमाने वाहिन्या व वृत्तपत्रातील सेक्युलर पोपटपंची वाचलीत तर लक्षात येईल, की त्यातल्या थापेबाजीने लोक अजिबात बधत नाहीत. मात्र त्यामुळे खड्ड्यात पडल्यावरच पुरोगाम्यांना जाग येत असते. मग त्यांना भ्रमात ठेवून खड्ड्यात पाडणारेच त्यांची पुन्हा खिल्ली उडवत असतात. त्याची काही उदाहरणे द्यायची आहेत, म्हणून साक्षीताईंच्या फ़ेसबुक पोस्टने कथारंभ केला. अशी थापेबाजी ही पुरोगामी बुद्धीवाद व पत्रकारितेसाठी अफ़ूची गोळी झाली आहे. त्या नशेत किती भरकटलेपणा आलेला आहे, त्याचे नमूने पुढल्या काही लेखांकात वा़चूया.

2 comments:

  1. भाऊराव,

    मस्त चिरफाड केलीये! तुम्ही म्हणताय ते लखलखीत सत्य आहे. सदैव खोट्यानाट्या कंड्या पिकवल्याने हे तथाकथित बुद्धिवादी स्वत:च्याच भ्रामक जगात वावरू लागले आहेत. हे नवं नसून फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. नेहरू असेच भ्रामक जगात वावरणारे होते. १९६२ च्या चिनी युद्धात दणका खाल्ल्यावर त्यांनी एका मुलाखतीत हे कबूल केलंय.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete