Thursday, April 9, 2015

साक्षीताईंच्या पंक्तीतल्या छायाताई (लेखांक ६)



साक्षी सप्तसागर यांच्या एका साध्या कथावजा पोस्टला मी इतके महत्व देऊन इथे लिखाण कशाला केले, असे अनेकांना पडलेले कोडे आहे. कारण अनेकांच्या मते ही फ़ेक आयडी असून तिची इतक्या गंभीरपणे दखल घेण्य़ाचे काही कारण नाही. पण साक्षीताई भ्रामक असल्या तरी छायाताई दातार वास्तवातील महिला लेखिका आहेत. १९७२ पासून त्यांना मी व्यक्तीगतरित्या ओळखतो. त्यांचाही असाच एक लेख रविवार ५ एप्रिल २००१५ च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनाही वास्तव इतिहासाचे विकृतीकरण किंवा सत्य म्हणून खोटेच दडपून देण्याच्या वृत्तीने अस्वस्थ करून सोडले आहे. ‘गांधीद्वेषामागील सत्याचा शोध’ या शिर्षकाचा त्यांचा चांगला पानभर लेख मटाने प्रकाशित केला आहे. त्यात वर्तमान काळात गांधीद्वेषाचा गलबला खुप वाढल्याने छायाताई कमालीच्या विचलीत झाल्या आहेत. तो गलबला असत्यावर आधारीत असल्याने त्यांची झोप उडाली आहे. मग सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी तीस्ता सेटलवाड यांची साक्ष काढली आहे. तीस्ताने प्रकाशित केलेल्या ‘बियॉन्ड डाऊट’ नामक इंग्रजी पुस्तकाचे हवाले देऊन छायाताई सत्य प्रस्थापित करू इच्छित आहेत. किती चमत्कारीक बाब आहे ना? जी तीस्ता आपलाच खरेपणा सिद्ध करण्याची कोर्टात संधी मिळत असताना जामिनासाठी खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यत तोंड लपवून धावते आहे, ती ‘बियॉन्ड डाऊट’ सत्य बोलते सांगते, हे छायाताईंचे गृहीत आहे. यापेक्षा त्यांचे कथन असत्य असल्याचा आणखी कुठला पुरावा असायला हवा?
http://jagatapahara.blogspot.in/2015/04/blog-post_82.html

२००२ च्या दंगलीत अहमदाबाद येथील गुलमर्ग सोसायटीमध्ये मुस्लिमांची घरे जाळली गेली. त्यात एका माजी मुस्लिम खासदाराचा मृत्यू झाला होता. त्याच्या विधवा पत्नीने त्यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचाच हात असल्याचा आरोप केलेला होता. त्यासाठी आजवर तीन एस आय टी नेमल्या गेल्या आणि प्रत्येक चौकशीनंतर मोदींवर एकही किरकोळ संशय घ्यायला जागा मिळाली नाही. त्यामुळे मोदींना सुप्रिम कोर्टानेच क्लीन चीट दिलेली आहे. त्यावर यापैकी कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि तेच बिनबुडाचे आरोप करून मागली इतकी वर्षे निव्वळ खोटे आरोप करण्यातच नाव कमावलेल्या तीस्ताला छायाताई आपल्यापुढे साक्षीदार म्हणून पेश करीत आहेत. असो, मोदींचा विषय बाजूला ठेवूया. ज्या गुलमर्ग सोसायटीत जाळपोळ झाली, तिच्या पुनर्वसनासाठी जगभर झोळी फ़िरवून करोडो रुपये तीस्ताने आणले आणि त्याचा आपल्या व्यक्तीगत चैनीसाठी अपहार केला, असा त्याच सोसायटीतल्या रहिवाश्यांचा आरोप आहे. त्यांनी तशी तक्रारच पोलिसात केलेली आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे समोर आणलेले आहेत. दंगलपिडीतांच्या नावाने जमवलेल्या निधीतून परदेशी जाऊन महागड्या वस्तूंची खरेदी केल्याचे आणि त्यासाठी संस्थेच्या खात्यातले लाखो रुपये परस्पर व्यक्तीगत खात्यात फ़िरवल्याचे पुरावे आहेत. त्याला सामोरे जाऊन आपल्यावरचा आरोप तीस्ता खोटा कशाला पाडत नाही? मागली दोन वर्षे एका कोर्टातून दुसर्‍या कोर्टात व खंडपीठाकडे जामीन मागत तीस्ता आपल्यावरच्या आरोपांना बगल कशाला देत बसली आहे? मुंबई व गुजरात हायकोर्टाने अटकपुर्व जामिन नाकारला तेव्हा सुप्रिम कोर्टात जाणार्‍या तीस्ताने जामीनासाठी आपल्याविरुद्ध पुरावेच खोटे व बनावट असल्याचे दाखलेच दाखवले असते, तर जामीनासाठी अशी वणवण कशाला करावी लागली असती? पण जी महिला मागल्या बारा वर्षात गुजरातच्या दंगलपीडितांसाठी एकमेव तारणहार म्हणून माध्यमांनी पेश केली, तिच्यावर दंगलपीडितांनीच निधीच्या अपहाराचा आरोप केल्यावर किती माध्यमांनी त्याचा पाठपुरावा केला आहे? खुद्द तीस्ताही आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचे पुरावे देत नाही आणि उलट गांधींवर किंवा गांधीहत्येसंबंधीचे पुरावे घेऊन पुस्तक काढते? हा काय तमाशा आहे?

तर अशा तीस्ताच्या पुस्तकाचे नाव ‘बियॉन्ड डाऊट’ म्हणजे संशयाच्या पलिकडे. असे असल्याने छायाताई त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि आपल्याला हव्या त्या नव्या अफ़वा पसरवण्याचा उद्योग सुरू करतात. त्यांनी लिहीलेली तीन वाक्ये तपासून बघा. १) भाजपने सत्तेवर येताच पहिल्या काही दिवसातच गृहखात्याच्या ११,१०० फाइल्स फाडून टाकल्या, असे वृत्त जुलैमध्ये प्रसिद्ध झाले होते. २) व्यंकटेश नायक व पुरुषोत्तम अगरवाल या दोघांनी अनेक विचारवंतांच्या सहीने माहिती अधिकाराखाली ही माहिती मागविली होती. त्यांना अजूनपर्यंत ही माहिती आलेली नाही. काम चालू आहे एवढेच मोघम उत्तर आहे. ३) ज्याअर्थी ही यादी अजून मिळत नाहीत त्या अर्थी काही महत्त्वाच्या फाइल्स, विशेषतः गांधी हत्येसंबंधी, किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याबद्दल, व्यक्तींसंबंधित काही गुप्त माहिती असल्यास त्या फाइल्स घाईघाईने नष्ट केल्या गेल्या का अशा संशयाला जागा आहे.

 ‘काम अजून चालू आहे’ म्हणजेच फ़ायली नष्ट झाल्याच, असा निष्कर्ष छायाताई काढतात. पुढे जाऊन मग त्या फ़ायली गांधीहत्या व संघाच्याच पापाविषयी अस्णार असाही निष्कर्ष काढून मोकळ्या होतात. हे निष्कर्ष कशाच्या आधारे त्यांनी काढले आहेत? त्याचा कुठलाही पुरावा छायाताई देत नाहीत. पण त्याची गरजच कुठे असते? संघाच्या, मोदींच्या वा हिंदुत्व विरोधी कुठलेही आरोप हेच पुरावे असतात आणि ते पुरावे मानले; मग गुन्हा आपोआप सिद्ध होत असतो ना? मागली दहाबारा वर्षे हाच निकष लावून गुजरात दंगलीला मोदी जबाबदार आणि त्यांनीच दंगल व मुस्लिमांची कत्तल घडवून आणल्याचे निष्कर्ष निघालेले आहेत. प्रदीप दळवी नथूरामचे नाटक लिहीत असेल, तर त्यासाठी सज्जड पुरावे हवेत. पण त्याला खोटा पाडताना छायाताईंना कुठलाही पुरावा सादर करायची गरज वाटत नाही. त्यात पुन्हा गोपाळ गोडसे यांच्या पुस्तकातले दाखले खोटे असतात आणि य. दि. फ़डके किंवा जगन फ़डणिस यांच्या पुस्तकातले उतारे भक्कम पुरावे असतात. असे का? तर ते दोघे संघ व सावरकर विरोधी लेखक म्हणून ओळखले जातात आणि गोपाळ गोडसे तर नथूरामचे बंधू. मग त्यांनी माध्यान्हीचा सूर्य दाखवला तरी तो खरा कसा असेल? मुद्दा इतकाच की साक्षीताई जितक्या बेफ़िकीरपणे काल्पनिक कथा लिहीतात, तितक्याच बिनधास्त छायाताई मोदी सरकारवर गांधीहत्या व खटल्याच्या फ़ाईल्स फ़ाडल्याचा आरोप करून मोकळ्या होतात. आणि अगदी संशयाच्या पलिकडचे सत्य म्हणून कथन करतात.

संघाच्या प्रेरणेने खोटा व विकृत इतिहास लिहीण्याचे डाव खेळले जात असल्याचा आरोपही करायला छायाताई विसरत नाहीत. पण आज तसे होत असेल, तर सत्तेच्या बळावर आधीच्या नेहरूव्हियन सत्तेने तरी खरा इतिहासच लिहून घेतला असेल, याची कोण हमी देऊ शकतो? मुळात वर्तमानच विकृत विस्कटून लिहायचे आणि मग त्यावर आधारीत इतिहास लिहायचा, हे जुनेच तंत्र आहे. ताजे उदाहरण म्हणजे १९९१ पासून १९९८ या कालखंडात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस अस्तीत्वात होती काय? असेल तर तिचा अध्यक्ष कोण होता आणि देशाचा पंतप्रधान म्हणून त्याने कोणती कर्तबगारी गाजवली? त्याचा इतिहास अलिकडल्या कॉग्रेसी नेत्यांच्या तोंडातून ऐकू येतो काय? जणू नरसिंहराव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधानही झाला नव्हता, की कॉग्रेस अध्यक्षही नव्हता; असेच वर्तमान नाही काय? त्यातून पुढला इतिहास कसा लिहीला जाईल? मागल्या बारा वर्षातल्या वृत्तपत्रे व माध्यमातल्या बातम्यांचा गोषवारा काढला तर गुजरातच्या दंगलीचा वास्तविक इतिहास कधी लिहीला जाऊ शकणार आहे काय? एका गर्भार महिलेचे पोट फ़ाडून अर्भकालाही ठार मारण्यात आल्याच्या कथा रंगवून जावेद अख्तर व तीस्ताने सांगितलेल्या होत्या. आजवर त्याचा एकतरी पुरावा कोणी सादर केला आहे काय? जेव्हा त्यासाठी सूरत पोलिसांनी समन्स पाठवले, तेव्हा अरुंधती रॉय नामक सेक्युलर ताईंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते म्हणून माहिती देण्यास नकार दिलेला होता. ही सेक्युलर इतिहासाच्या कथाकथनाची व अस्सल पुराव्यांची शैली आहे. त्याचीच पुनरावृत्ती छायाताईंनी उपरोक्त लेखात केलेली आहे. जी तीस्ता आपलाच प्रामाणिकपणा कोर्टात सिद्ध करायला घाबरते आहे, तीच याची साक्षीदार. मग इतिहासाचा व सत्याचा बोर्‍या वाजला तर नवल कुठले? असो मुद्दा त्याच्याही पुढचा आहे. ज्या पुस्तकाचे व त्यातील जुन्या लेखांचे हवाले छायाताईंनी दिले आहेत, ते कसे बिनबोभाट खोटे असू शकतात, त्याचीही झाडाझडती खुद्द महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखातून घेऊ.

गुजरात पोलिसांनी मोदी, अमित शहांच्या इशार्‍यावर इशरत जहानला खोट्या चकमकीत ठार मारले, ही कथा नवी नाही. कुठल्याही वाचक, टिव्ही प्रेक्षकाला आता ती तोंडपाठ झालेली असेल. पण तिच्या हत्येचा कट कधी शिजला असेल? इशरत अवघी पाचसहा वर्षाची बालिका असताना तब्बल पंधरा वर्षे आधीपासून इशरतला मारायचे कारस्थान मोदी शिजवत होते. मटाच्या अग्रलेखातला हा दिव्य शोध आहे. त्याचा खरेखोटेपणा छायाताईंना कधी शोधावासा कसा वाटला नाही? की त्याही मटा घरात आल्याआल्या फ़ाडून फ़ेकून देतात आणि अशी कारस्थाने नष्ट करून टाकतात? मटाच्या त्या अग्रलेखाचे पोस्टमार्टेम पुढल्या भागात करूया.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/46809640.cms


No comments:

Post a Comment