कुठचे वर्ष होते ग? कुठल्या शतकातली गोष्ट आहे ती? बेचाळीस वर्षे उलटली त्याला. सोमवारी तुझे निधन झाल्याची बातमी वाचली आणि कालगणनेविषयी शिसारी आली आयुष्यात पहिल्यांदाच. कशासाठी मोजायची ही अशी वर्षे? तुला तशा कृत्रिम श्वासोच्छवासाने जिवंत ठेवली त्याचा विक्रम म्हणून? की आमच्या मानवी भुतदयावादी नाटकाचा कालखंड म्हणून त्यांची गणना करायची? ज्याने पाप केले, तो तर आमच्या कायद्यानुसार शिक्षा भोगून सहज निसटला. अजून तो जीवंत आहे किंवा मेला ठाऊक नाही. नामानिराळा झाला काही वर्षे गजाआड राहून आणि आम्हीही तसेच नामानिराळे राहिलो, तुझ्यासाठी नाटकी अश्रू ढाळून. काय करू शकलो आम्ही तुझ्यासाठी? तुझ्यासाठी काहीही करणेच आमच्या हाती नव्हते, अशी एक वैफ़ल्याची सार्वत्रिक धारणा आहे. पण खरेच काहीच करता येणार नव्हते आम्हाला? आमच्या लाडक्या कायदे व त्याच्या व्याख्यांच्या जंजाळातून बाहेर पडणे आम्हाला कधीच शक्य झाले नाही. म्हणून तुझी इतकी विटंबना बघत रहाणे, नाहीतर सराईतपणे तिकडे काणाडोळा करणे आम्हाला शक्य झाले. कारण आम्ही त्या बलात्कार्यापेक्षा आता निर्ढावलो आहोत. त्या अमानुष अनुभवातून गेलीस, तिथेच तुझी मुक्ती झाली होती. कारण पुढले काही आठवायला तू हयात नव्हतीस आणि तुझ्या जाणिवाच संपून गेल्या होत्या. पण श्वास चालू होता आणि इतके दिवस तो कृत्रिम श्वास घेत कशाला जगलीस ग? डॉक्टरनी मृत घोषित करण्यापर्यंत प्रतिक्षा करत होतीस? सगळ्या जाणिवा बोथटलेल्या बधीर झालेल्या घेऊन कशाला श्वास चालू ठेवलास? कशासाठी हा प्रश्न खुप सतावतो ग, अरूणा. जितका हा प्रश्न सतावतो, तितका आसपासचा समाज तुझ्यासारखा त्या़च रुग्णशय्येवर अखेरच्या घटका मोजत जगतोय असे वाटू लागते. तुझ्यात आणि आम्हा संवेदनशील जिवंत लोकांमध्ये नेमका किती फ़रक आहे?
आसपासच्या सर्व घटना घडत असताना तू किती बेफ़िकीर अलिप्त होतीस ना? आम्ही तरी कुठे आसपासच्या घटनांबद्दल संवीदनशील आहोत? कालपरवाच तर मुंबईतल्या गोरेगावच्या महामार्गावर एका मुलीला संध्याकाळी मावळत्या सूर्याचे किरण अस्तंगत होताना कोणी धडक दिली आणि तुझ्यासारखी ती वर्दळीच्या हमरस्त्यावर मृत्यूशी झुंज देत होती. बाजूने आपापली वाट शोधत जाणारे पादचारी वा वाहनधारकांनी ढुंकून बघितले नाही तिच्याकडे. तिचे नाव काय होते? तुझ्यावर अत्याचार करणार्याने तरी आसपास कोणी नाही म्हणून संधी साधली. तुझी शिकार केली. या मुलीची शिकार तर गजबजलेल्या महामार्गावर झाली. तुला वाचवायला आसपास कोणी नव्हता. हिला मरताना बघूनही लोक तसेच निघून जात राहिले. तिथे मृत्यूशय्येवर पडून तू जितकी बधीर होतीस, त्यापेक्षा गोरेगावच्या महामार्गावरचे लोक जिवंत जागते होते का? जितकी तू संवेदनाशून्य श्वास घेत होतीस, तसेच आता मुंबईकर आणि तमाम भारतीय श्वास घेत जगतात. आसपासच्या जगातल्या घडामोडी व घटनांच्या जाणिवाच कुणाला होत नाहीत. बेचाळीस वर्षात आपला समाज कुठून कुठे पोहोचला? सोमवारी शेवटचा स्वास घेताना तू जितकी बधीर होतीस, तितकाच आपला आजचा समाज पुरता संवेदनाहीन होऊन गेलाय ना? कुणातरी डॉक्टरने मृत्त घोषित करायच्या प्रतिक्षेतले आम्ही सगळे अरूणा शानभागच झालोत. बेचाळीस वर्षातली हीच प्रगती म्हणायची की अधोगती म्हणायची? तुला परिस्थितीने एका जागी जखडून ठेवली होती आणि आम्हाला हिंडताफ़िरता येते. पण बाकी तुझी आणि आमची अवस्था जशीच्या तशी आहे ग, अरूणा. आमचेही श्वास चालू आहेत म्हणून जगतोय. तुझ्यासारखा कृत्रिम श्वास द्यावा लागत नाही. नजर हरवलेल्या डोळ्यांनी सर्व काही बघतो आणि काहीही करू शकत नाही. काही करू इच्छित नाही.
खरं सांगू अरूणा, तशी तू नशिबवान. तुला हालचाल शक्य नव्हती. नैसर्गिक परिस्थितीने तुला जखडलेली होती. हस्तक्षेप करायची कुवतच तुझ्यात नव्हती. जेव्हा होती तेव्हा तू प्राणपणाने झुंजलीस. ती बहुधा भारतीय समाजातली शेवटची झुंज होती. आपला सन्मान, आपली अब्रु, आपली प्रतिष्ठा इत्यादीसाठी लढायची ती अखेरची झुंज असावी. त्यानंतर आपला समाज कायद्याच्या आश्रयाला गेला आणि कायद्याचा गुलाम होऊन बसला. आपण आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी काही करायला हवे आणि करू शकतो, याचा आम्हाला जणू विसर पडला. तू तिथे धारातिर्थी पडलीस आणि सेनापतीच मारला गारद झाल्यावर मैदान सोडून पळायचा आमचा वारसा पुन्हा सुरू झाला. किती मुली-महिलांवर राजरोस बलात्कार होत राहिले, कितीजणी शारिरीक हल्ल्याच्या शिकार झाल्या. कोणी हस्तक्षेप करायचा विचारही करीनासा झाला. तू हल्लेखोराशी झुंजलीस ती शेवटची लढत. कोणी तुला मदतीला येईल म्हणून आडोसा बघण्याइतका समाजाचा धाक त्याच हल्लेखोराला वाटला तो शेवटचा. आता कुणाला तशी भिती नाही, की वचक नाही. दिल्लीतल्या त्या निर्भयाला अशीच हमरस्त्यावर वर्दळीत तुडवली ना? आम्ही आशाळभूतपणे कायदा आणि पोलिसांच्या तोंडाकडे बघत बसतो. फ़ारच झाले तर मेणबत्त्या पेटवतो आणि गळ्यात फ़लक घेऊन एक देखणा समारंभ साजर करतो. तो उरकला मग कोण अरूणा आणि कोण निर्भया? झगमगत्या रोषणाईत मॉल वा कशामध्ये आम्ही आमचे माणुसपण भिरकावून देतो. कोणीतरी कळसुत्री बाहुली खेळवावीत तसे आम्ही आपले अस्तित्व आता विसरून गेलोय. आपला नंबर लागून शिकार होईपर्यंत मौज करायचे तत्वज्ञान आता आम्ही स्विकारले आहे. तमाम वाहिन्यांनी तुझ्या मृत्यूच्या घोषणेचा सोहळा कसा साजरा करतील बघ आता. यालाच हल्ली इव्हेन्ट म्हणतात, अरूणा.
तुझ्यावरच्या बलात्काराने हादरलेला समाज आठवतो आज. रिंकू पाटिलला जाळल्यानंतरचा संताप कुठल्या कुठे गायब झालाय आता. कशाचेच काही वाटत नाही. आम्ही खुप बेशरम होऊन गेलोत आता. सुखदु:ख अशा शब्दांना काहीही अर्थ राहिलेला नाही. आनंद-यातना याही शब्दांचे अर्थ भरकटले आहेत. त्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या असतात ना, तशी आमची अवस्था आहे. खाणार्याच्या प्रतिक्षेत दिवस साजरे करणार्या कोंबड्या. की बेचाळीस वर्षे त्याचीच अनुभूती देण्यासाठी ती कुडीत जीव धरून आम्हाला जागवायला अशी निपचित पडून होतीस? तीच शंका येते. तो बलात्कार अल्पावधीच्या यातना होत्या. त्याच्याशी झुंज देताना तू आपले हौतात्म्य पत्करून केव्हाच मोकळी झाली होतीस. लौकिकार्थाने तू तेव्हाच मेली होतीस. पण समाजाला अमानुषतेच्या विरोधात जागवण्यासाठी अशी निपचित पडून बेचाळीस वर्षे किती अनन्वीत यातना भोगल्यास तू? तेच खरे शौर्य होते. आमच्या बोथटलेल्या बधीर जाणिवा जागवण्यासाठी यांत्रिक कृत्रिम श्वासावर जीव कुडीत धरून जगणे, हा साक्षात नरकवास होता. कोणासाठी इतक्या यातना सहन केल्यास ग? या मुर्दाड समाजासाठी, ज्याला कत्तलखान्यातल्या बकर्यासारखे जगण्यात पुरूषार्थ वाटतो. त्या निपचित जाणिवांना जागवण्यासाठी बेचाळीस वर्षाची झुंज दिलीस? काय आले हाती? तितक्याच कोरड्या श्रद्धांजल्या ना? तो बलात्कारी परवडला ग अशा मुर्दाड निष्क्रीय समाजापेक्षा. त्याने तुझी काही मिनीटात मुक्ती केली. आपला समाज त्यापेक्षा भयंकर क्रुर आहे. तो सन्मान, प्रतिष्ठा, अब्रु असल्या खोट्या कल्पना मनात भरवतो आणि मग त्याचेच हालहाल करून विकृत सभ्यतेच्या नरकवासात लोटून देतो. आमचा मुर्दाडपणाच अशा बलात्कारी व अत्याचारी राक्षसांची खरी ताकद असते. मग अरूणा तुला, त्या निर्भयाला किंवा अन्य कुठल्या मुली महिलेला कोण कुठले संरक्षण सुरक्षा देऊ शकणार आहे? संवेदनांच्या दुष्काळात माणुसकी जागवण्याचे बेचाळीस वर्षाचे प्रयास अपेशी ठरले, त्यासाठी तुझे सांत्वन अरूणा. माफ़ी अजिबात मागणार नाही, कारण ज्या समाजाची माफ़ी मागण्याचीही लायकीच नाही, त्याचेच आम्ही घटक आहोत.
Bhau अगदी हीच तड़फड होतेय आत.. कोणी ते RIP नावाचे नाटक लिहिले की श्रीमुखात भड़कवून द्याविशि वाटतेय.. कशी मिळेल तिला मुक्ति आणि सद्गति ? मेलेल्या तरुण बाईच्या प्रेताशी (जिचे शरीर postmortem साठी आलेले आहे) चाळे करणार्यांचा देश आपला.. प्रत्येक बाई ने फ़क्त शस्त्र घ्यावे हातात.. कायद्याची वाट पाहून आपली अरुणा करुन घेऊ नये
ReplyDelete