Thursday, June 11, 2015

सूडबुद्धी क्रांतीला नासवते



थोर समाजवादी विचारवंत दादा धर्माधिकारी यांचे नाव आजकाल कुठे फ़ारसे ऐकू येत नाही. समाजवादी चळवळीचे स्वातंत्र्योत्तर काळातील लहानमोठे नेते दादांनी घडवले म्हटल्यास वावगे ठरू नये. दादांच्या व्याख्याने व प्रवचनातून १९६० च्या दशकात नावारूपास आलेल्या अनेक समाजवादी नेत्यांना घडवले होते. मात्र पुढल्या काळात सक्रीय राजकारणापासून अलिप्त झालेल्या धर्माधिकार्‍यांनी उर्वरीत आयुष्य विनोबा भावेप्रणित सर्वोदय आंदोलनाला वाहून टाकले. त्याच सर्वोदय संघातर्फ़े दादांचे एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. ‘दादांच्या बोधकथा’ असे त्याचे नाव. कुठलीशी आख्ययिका, दंतकथा किंवा व्यक्तीगत अनुभव थोडक्यात सांगून, त्याचे तात्पर्य वा बोध त्यातून दादांनी कथन केलेला असल्याने थोडक्यात महत्वाचे असे हे पुस्तक आहे. ४०-५० पानांचे हे छोटेखानी पुस्तक आज कुठे मिळते किंवा नाही, ठाऊक नाही. पण ज्याला कुणाला पुरोगामी वा सेक्युलर विवेकवादी कार्य करायचे असेल, त्याच्यासाठी ती गीताच म्हणायला हरकत नाही. त्यातच दादांनी कानपूरच्या एका अनुभवाचे कथन केलेले आहे. कालपरवा प्राध्यापक रावसाहेब कसबे या पुरोगामी विचारवंताने सत्कारप्रसंगी जे मनोगत व्यक्त केले, ते ऐकून दादांची अशीच बोधकथा आठवली. किंबहूना रावसाहेब म्हणाले, तेच तर त्या बोधकथेचे सार आहे. सूडबुद्धी क्रांती नासवते, असे तात्पर्य दादांनी त्यात सांगितले आहे. पण त्यांनी घडवलेल्या नेते व त्याही पुढल्या पुरोगामी कार्यकर्त्यांना दादांकडून बोध घेण्याची गरज वाटली नाही आणि आता क्रांती पुरती नासून गेली आहे. असे होऊ शकते याचा इशाराच दादांनी आपल्या बोधकथेतून दिलेला होता आणि आता तीच पुरोगामी चळवळ नासून गेल्यावर वेगळ्या शब्दात कसबे यांनी त्याचाच पुनरूच्चर केला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीच्या अस्ताचे त्यांचे विश्लेषण सूडाची कथा सांगणारेच आहे.

एका रात्री उशीरा दादा धर्माधिकारी कानपूरला रेल्वेने पोहोचले होते आणि अपरात्री त्यांना रिक्षा घेऊन मुक्कामाला जाण्याचा प्रसंग आला. त्या नीरव शांततेत रस्त्यावरून रिक्षा दौडत होता आणि भोवतालची शांतता दादांना अस्वस्थ करून गेली. म्हणून त्यांनी रिक्षाचालकाला बोलते करण्याचा प्रयास केला. त्याच्या मनात काय विचार घोळत आहेत, त्याची विचारणा केल्यावर त्याने बराच वेळ टाळाटाळ केली. पण खुपच आग्रह झाल्यावर तो मनमोकळा बोलून गेला. आमच्या पिढ्यानुपिढ्या अशाच कोणाला तरी वाहून नेण्यात खर्ची पडल्या. आम्हाला कधीच साहेबासारखे जगता आले नाही. तीच इच्छा मनात कायम आहे. त्याला नेमके काय म्हणायचे आहे म्हणून अधिक विचारणा केल्यावर तो स्पष्टच उत्तरला, तुम्ही रिक्षा हाकाल आणि मी मागे बसलेला असेन, असा दिवस कधी उजाडेल, असा विचार मनात घोळतो आहे. त्याची अपेक्षा वा इच्छा सुखवस्तू होण्याची असल्यास गैर नाही. पण त्यासाठी मागे बसलेल्या प्रवाश्याने कष्टाचे काम उपसावे आणि आपण चैन करावी, ही सूडबुद्धी झाली. जणू तो मागे बसलेला प्रवासीच आपल्यावरचा अन्यायकर्ता आहे आणि त्याच्या कष्ट वा कमीपणात आपले सुख वा यश बघण्यात सूड असतो. आपल्या वेदना दुसर्‍याला व्हाव्यात, ही अपेक्षाच सूडाची असते. मग ती भावना वा अपेक्षा आपला विकास वा प्रगती घडवून आणत नाही. की आपल्याला प्रगल्भ बनवत नाही. उलट सुखवस्तू असेल त्यालाही दीनवाणा बनवू बघते. कुणाला तरी हीन लेखण्याचा अधिकार वा शक्ती असावी, ही अन्यायमूलक भुमिका त्यातून पुढे येते आणि पर्यायाने समतेच्या लढ्यालाच किड लागते. आपल्या प्रगतीपेक्षा दुसर्‍याच्या अधोगतीम़ध्ये आनंद शोधण्याची वा गुलामीतून मुक्त होण्यापेक्षा दुस‍र्‍याला गुलाम करण्याची मानसिकता. नेहमी समतेचा लढा नासवून टाकते. थोडक्यात अन्यायाचे निर्मूलन मागे पडते आणि अन्याय करण्याचा अधिकार हे साध्य बनून जाते.

त्या रिक्षावाल्याच्या मनात असे विचार कुठून आले? त्यात सूडबुद्धी सामावलेली आहे, याचे त्याला भानही नसावे. पण आपल्यावर कोणीतरी अन्याय केला आहे आणि आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे, अशी त्याची धारणा कशामुळे झाली? पुरोगामी चळवळ विस्तारताना समाजातला उच्चभ्रू वर्ग आपला शत्रू आहे, कारण तोच आपला शोषक आहे; अशी जी सोपी मांडणी होत गेली, त्यातून मग अशा धारणा सामान्य माणसाच्या मनात आकार घेत गेल्या, घर करत गेल्या. त्यातूनच मग त्या रिक्षावाल्याने अशी इच्छा अत्यंत निरागसपणे बोलून दाखवली. पण तोच पुरोगामी व समतेच्या लढ्याला संभाव्य धोका असल्याचे दादा धर्माशिकारी यांना जाणवले होते. त्यांनी आपल्य बोधकथेतून त्याचे आटोपशीर विवेचनही केलेले होते. सर्वोदय संघाने त्याचे पुस्तकही छापलेले होते. पण किती समाजवाद्यांनी त्या कथा वाचल्या आणि त्यापासून कोणता बोध घेतला? बोध घेतला असता, तर आज कसबे म्हणतात तसा पुरोगामी चळवळीचा र्‍हास कशाला झाला असता? कसबे काय म्हणालेत? ‘'मराठ्यांनी कायमच दलितांच्या खांद्यावर बंदुका ठेवून ब्राह्मणांवर गोळ्या झाडल्या.’ मागल्या अर्धशतकात महाराष्ट्रामध्ये पुरोगामी राजकारण झाले, असे आग्रहपुर्वक सांगितले जाते. पण ते राजकारण फ़क्त सत्तेभोवती घुमत राहिले आणि त्यासाठी ब्राह्मणद्वेष ही प्रेरणा बनवण्यात आली. मग त्यात महारांच्या म्हणजे दलितांपैकी जागृत मागास जातीला मराठ्यांनी हत्याराप्रमाणे वापररून घेतले. आपला ब्राह्मणद्वेष लपवून दलितांच्या आडोशाने जातीय सूडाचे राजकारण खेळले गेले असेच कसबे यांना म्हणायचे नाही काय? पण त्यालाच पुरोगामीत्व ठरवताना अनेक पुरोगामी ब्राह्मणही हिरीरीने पुढे आलेले होते. थोडक्यात ब्राह्मणवादाच्या थोतांडाला संपवण्याचा पवित्रा घेऊन प्रत्यक्षात ब्राह्मण्य मराठ्यांनी अवगत केले. तेच नवे ब्राह्मण बनत गेले.

म्हणजे जी विषमतेची खाई होती, ती भरण्याचा प्रयत्न बाजूला पडला आणि ब्राह्मण विरोधात पुरोगामी चळवळ नेवून नवे वर्चस्ववादी प्रस्थापित होत गेले. बाकीचे सर्व तसेच्या तसेच राहिले. पिछडे-मागास व गरीब आहेत तिथेच राहिले आणि जातीच्या व्याख्येत बसणार नाही, असा नवा वर्चस्ववाद उभा राहिला. त्याचे नेतृत्व माळी व मराठ्यांकडे आणि आघाडीवर झुंजायला महार ही जागृत दलित जात पुढे करण्यात आली. म्हणजे त्या बोलक्या दलित जातीच्या लढवय्यांनी ब्राह्मणांना पुर्वाश्रमीच्या अन्यायासाठी सतत झोडून खच्ची व नामोहरम करायचे आणि दुसरीकडे शहरापासून खेड्यापर्यंत नव्या उच्चवर्णिय मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करायचे. एखाद्या प्रसंगी वेळच आली, तर खर्‍या पुरोगामी पण जन्माने ब्राह्मण असलेल्याचाही बळी दिला जाऊ लागला. स्वातंत्र्योत्तर काळात घटना समितीमध्ये काकासाहेब गाडगिळांनी हिंदू कोड बिलाच्या चर्चेत खंबीरपणे बाबासाहेबांचे समर्थन केलेले होते. पण पुढल्या काळात गाडगिळ वा त्यांच्या वारसांनाही मराठ्यांकडून ‘राज्यात; ब्राह्मण म्हणून पक्षपाती वागणूक मिळत गेली. टिपून व वेचून ब्राह्मण बाजूला करण्याचे डावपेच योजले गेले. त्यासाठी धुर्तपणे सत्तेच्या वर्तुळात आणलेल्या जुन्या रिपब्लिकन नेत्यांचा वापर करण्यात आला. जणू पेशवाईचा सूड घेतल्यासारखे मागल्या अर्धशतकातील मराठी राजकारण झालेले आहे. मात्र त्याबद्दल खुलेपणाने बोलायचेही धाडस या कालखंडात ब्राह्मणांना उरले नाही. त्याचा शेवट संभाजी ब्रिगेडसारख्या उघड ब्राह्मणद्वेष करणार्‍या झुंडशाहीपर्यंत येऊन पोहोचला. मात्र सामान्य जनतेनेच त्याला अखेर मतदानाने लगाम लावला. पुरोगामी मुखवट्यातले हे सूडाचे राजकारण स्वत:ला समाजवादी म्हणवणारे ब्राह्मण बुद्धीमंतही थोपवू शकले नाहीत. ते जनतेनेच उधळून लावले. पण त्यात अवघी पुरोगामी चळवळ पुरती उध्वस्त होऊन गेली.

11 comments:

  1. खरे आहे. I totally agree.

    ReplyDelete
  2. समतेच्या नावाखाली कायद्याने मिळालेल्या सवलती हा वरील उल्लेख केलेल्या सुडाचाच भाग आहे का ? नियोजनबद्ध खच्चीकरण तेही ओफ़िशिअलि..आणि पुन्हा उलटा शब्द उच्चारायचा नाही..कारण तेथेही कायद्याचे संरक्षण ...

    ReplyDelete
  3. विचारप्रवर्तक आणि अनुकरणीय

    ReplyDelete
  4. भाऊ ब्राम्हणांचा द्वेष करून, पुरणातील मढी
    उकरून दलितांचा आता काहीच फायदा होणार नाही.
    रावरावसाहेब कसबे म्हणतात की मराठ्यांनी दलितांना ब्राम्हणांविरुद्ध वापरले. आपले ही हेच मत आहे. ते कसे काय? कोणत्या मराठ्याने वापरले आणि कसे याबद्दल एखादा लेख लिहला तर बरे होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब आणि दादा आणि आबा , दुसरे कोण ?????

      Delete
  5. Jateepatichya ya vadat Maharashtra che paryayane Bharatache khup nuksan zale aahe ya lekhat kelele vishleshan khup khare aahe janatene rajkarnyache aikun dusarya jati dharmacha dvesh Karane sodle pahije Bahujanvadi mhanavnarya lok fakt soft target mhanun Bramhanacha vapar karat ahe

    ReplyDelete
  6. This write up also getting the smell of caste system and full of hatred against one community.
    we all are Indians and we should take out caste from our mind totally then only we will develop and grow otherwise once again we will be slave.

    I am totally disagree with this author and protest against such statement which may create differences against each other..

    JayHind.

    ReplyDelete