Monday, July 27, 2015

डॉ अब्दुल कलाम: सिर्फ़ नाम काफ़ी है



काही माणसे आपल्याला कधी भेटलेली नसतात आणि तरीही आयुष्याचा एक महत्वाचा कोपरा व्यापून ठामपणे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेलेली असतात. डॉ. अब्दुल कलाम हा असाच एक भारतीय होता. करोडो भारतीयांच्या जीवनाचा एक घटक बनून राहिला होता. आणि ही करोडो माणसे अशी आहेत की त्यांनी कधी कलाम यांना भेटणे सोडा, त्यांचे भाषणही ऐकलेले नसेल. वृत्तपत्रातून किंवा कोणाच्या गप्पातून या माणसाविषयी ऐकलेले असेल. देव-संत यांच्याविषयी असेच असते. ज्यांची भेटगाठ झालेली नसताना करोडो लोक त्यांची भक्ती करतात वा त्यांच्याविषयी मनात कमालीची आस्था बाळगून असतात. त्यामागे त्यांची तपस्या पुण्याई वगैरे असते. एका परीने अशी माणसे संसारी जगापासून दुर व अलिप्त असतात. पण त्यांच्या अस्तित्वाचा प्रभाव सर्वसामान्य जनजीवनावर पडलेला असतो. मात्र त्यासाठी त्यांनी मुद्दाम प्रयत्नपुर्वक काहीही केलेले नसते. असे लोक आपल्याच मस्तीत आपली उद्दीष्टे गाठत चाललेले असतात आणि त्यातल्या यशापयशाची त्यांना फ़िकीरही नसते. आधुनिक युगात अशी माणसे लॉटरी लागावी तशी सहज कुठल्याही समाजाला मिळून जातात. डॉ. अब्दुल कलाम हे भारतीयांना मिळालेले असेच एक वरदान होते. म्हणूनच त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ सुरू झाली. आणि त्याविषयी जी हळहळ, वेदना, खंत व्यक्त होते आहे, त्यात कुठेही ह्या माणसाने काय कर्तृत्व गाजवले, तेही सांगायची गरज वाटू नये, यापेक्षा कुठला थोरपणा असू शकतो? यांनीच रॉकेट, मिसाईल वा अणुस्फ़ोटात मोलाचे संशोधन केल्यापासून राष्ट्रपती होण्यापर्यंत मारलेली मजल, अशी त्यांची ओळख करून मग श्रद्धांजली द्यावी असे कोणालाच वाटू नये? वाटलेही नाही, कारण ते स्वत:च नव्या युगातील भारताची ओळख बनलेले होते. जाती-धर्म प्रांत-वंश यापलिकडे पोहोचलेला अस्सल भारतीय.

कर्तबगार लोकांची कुठल्याही समाजात ददात नसते. पण स्वत:वर विश्वास असलेले कर्तबगार मात्र भिंग घेऊन शोधावे लागतात. वंचित म्हणून रडणारे आपण नेहमीच बघतो, पण जे समोर आहे त्यातून जीवनाचा मार्ग शोधणारे क्वचितच दिसतात. त्यातून मग अशी अनमोल व्यक्तीमत्वे साकार होतात. रॉकेट तंत्रज्ञान भारताला अवगत करून देणारा संशोधक ही कलामांची प्राथमिक ओळख आहे. म्हणून त्यासाठी घेतलेले कष्ट व दिलेली झुंज कितीशी ठाऊक असते? अपुरा पैसा व साधनांसाठी रडत न बसता अवकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघितलेला हा माणूस विरळाच. ज्या देशात धरणे, रस्ते, शाळा व इस्पितळे उभारायला निधीची कमतरता आहे अशी तक्रार आपण शक्तीमान सताधार्‍यांकडून कायम ऐकत असतो; त्याच देशात मिळाली ती साधने व असेल तो निधी घेऊन अमेरिका वा रशियाच्या तुलनेत झेप घ्यायची स्वप्ने बघणेही किती मोठे धाडस असेल? कोरडवाहू जमिनीत भरघोस पीक घ्यायची आकांक्षा बाळगावी किवा दुष्काळातही मशागत करायची जिद्द दाखवावी, असा माणूस भवतालातील मानव जमातीमध्ये दडलेली सुप्त इच्छा व तिच्यातली उर्जा जागवत असतो. पिकवलेले कोणाच्या तोंडी जाईल याचा विचारही ज्याच्या मनाला शिवत नाही, तर निर्माणाच्या आकांक्षेने जो भारावलेला असतो. तो ज्ञानेश्वर तुकाराम असो किंवा अब्दुल कलाम असो, ते कृतीतून अजरामर होत असतात. त्यांच्या जगण्यातून व कृतीतून ते समाजाचे अघोषित आप्तस्वकीय बनून जातात. तीच त्यांची ओळख असते. कारण त्यांच्या समर्पित जीवनातून ते भुतभविष्याला जोडणारा पुल होऊन जातात. विसाव्या व एकविसाव्या शतकातील भारतीय समाजातल्या दुभंगलेपणाला, विवशतेला पार करणारा एक पुल उभा राहिला, त्याला आपण डॉ. अब्दुल कलाम या नावाने ओळखतो. ज्याची ओळख एका भारतीयाने दुसर्‍या भारतीयाला करून देण्याची गरज नसते.

तुमच्या आमच्या आयुष्याला स्पर्श करील असे कोणते काम डॉ. कलामांनी केले? या प्रश्नाचे नेमके उत्तर आपण देवू शकणार नाही अणूस्फ़ोट, अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, रॉकेट अशी अनेक उत्तरे आहेत. पण आमच्या गावच्या शाळेचे काय? दहा गावाच्या परिसरात इस्पितळ नाही. शेतकरी आत्महत्या करूत आहेत. देशात अमूक टक्के बालकांचे कुपोषण अजून होतेच आहे. अर्धपोटी जगणारे अमुक कोटी भारतीय आहेत. त्यांच्यासाठी काय झाले, काय केले? असाही सवाल विचारला जाऊ शकतो आणि त्यासाठी या माणसाने काय केले? अणूबॉम्बने गरीबी व भीक संपणार आहे काय? असेही सवाल विचारले जाऊ शकतात. किंबहूना विचारलेही गेले. पोखरणचा दुसरा अणूस्फ़ोट यशस्वी झाल्यावर एका ख्यातनाम शिक्षणसंस्थेतल्या सर्वाधिक बुद्धीमान समजल्या जाणार्‍या विद्यार्थ्यांसमोर कलामांचे भाषण झाले. तिथेही हाच सवाल विचारला गेला होता. त्यावर मिळालेले उत्तर या माणसाची भुत-भविष्याला जोडणारी दृष्टी सिद्ध करते. हा देश कधीकाळी इतका श्रीमंत व संपन्न होता, की इथून सोन्याचा धूर निघतो अशा दंतकथा सांगितल्या जातात. मग त्याला लुटणार्‍यांच्या टोळ्यांनी त्याची संपन्नता लुटून नेल्याचाही इतिहास आपण ऐकतो. ती संपन्नता कष्टातून उत्पन्न होणार्‍या संपत्तीचीच होती. पण निर्माण झालेल्या संपतीच्या रक्षणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने लुट होत राहिली आणि गरीबी आपल्या नशीबी आली. ती लुट करणार्‍यांना रोखणारी सुरक्षा असती, तर या देशात गरीबी आली नसती की कोणाला अर्धपोटी झोपावे लागले नसते. कुपोषण होऊ शकले नसते. आपण अडीच हजार वर्षे त्यात दिरंगाई केली, त्याचे परिणाम भोगतोय, असे उत्तर कलामांनी तेव्हा दिलेले होते. त्यात अण्वस्त्रांची मस्ती व मुजोरी नव्हती. भेदक शस्त्रास्त्रांचा वापर कशासाठी असतो, त्याची मानवी जाणिव व्यक्त झाली होती.

अणूबॉम्ब, क्षेपणास्त्र अशा भेदक व विध्वंसक शक्तीचा अविष्कार करणारा माणूस त्यातली विधायकता कशी नेमकी ओळखून होता, त्याचाही दाखला त्याच व्याख्यानात मिळतो. अणूबॉम्ब बनवणारा भारत विध्वंसाच्या वाटेवर निघाला आहे की युद्धखोर झाला आहे? यावर कलाम म्हणाले होते, भारताने अडीच हजार वर्षे सगळीकडून आक्रमण सोसले आणि बचावापलिकडे अन्य देश समाजावर आक्रमण केल्याचा एकही दाखला नाही. त्याचा अणूबॉम्ब जगाला कशाला घाबरवतो आहे? ज्यांचा इतिहासच आक्रमक व हिंसक युद्धांनी भरलेला आहे, त्यांना भारतीय अणूबॉम्बची भिती वाटणे स्वाभाविक आहे. कारण विध्वंसाचे ते पूजक आहेत. भारताने बचावाच्या पलिकडे हत्याचा वापर कधी केलाच नाही. विध्वंसक हत्यार बनवणार्‍याला त्यातले विधायक लक्ष्य किती नेमके ठाऊक होते ना? हिंसा करण्यासाठी नव्हेतर हिंसेला धाक घालायला भेदक हत्यार, ही भारतीय मानसिकता आहे आणि त्याचे नेमके प्रतिबिंब कलामांच्या त्या उत्तरात पडलेले दिसते. ते केवळ त्यांच्या बुद्धीने दिलेले उत्तर नाही. प्रत्येक भारतीयाची मनोवृत्ती त्यात सामावलेली होती. म्हणून कलामांच्या विचारात व वागण्यात भारतीय समाज स्वत:ला शोधत राहिला. अभिमान व विनम्रतेचे विलोभनीय रुप घेऊन हा चालताबोलता भारत आपल्यासमोर वावरत होता आणि आपल्या स्वाभिमानाचे प्रतिक होऊन राहिला होता. आज जी वेदना त्यांच्या निधनाने टोचते आहे, ती त्याच जाणिवेतून आलेली आहे. आपल्या स्वाभिमानाला यापुढे चालताबोलता बघता येणार नाही, ह्याच वेदनेने आपल्याला अस्वस्थ केलेले आहे. प्रत्येकाने आपल्याच मनाशी चाचपून बघावे, स्वत:ला विचारावे! कोणासाठी आपण दु:ख व्यक्त करतोय? डॉ. कलाम गेले याची वेदना आहे, की आपल्याच जीवनाचे काही महत्वपुर्ण अविभाज्य अंग गमावल्याची यातना आपल्याला सतावते आहे? आपण त्या व्यक्तीमत्वाशी इतके समरस होऊन गेलोय, की यापुढे कलाम आपल्यात नाहीत ही धारणाच रडवतेय ना? पोकळी कशाला म्हणतात, त्याची जाणिव अस्वस्थ करून सोडतेय ना?

5 comments:

  1. शब्द न शब्द एकदम मनातला. भावपूर्ण श्रद्धांजली….

    ReplyDelete
  2. भाऊ... तुम्ही लिहिलेला शब्दन् शब्द अंतर्मुख करायला लावणारा आहे.

    ReplyDelete
  3. होय खरं आहे .... आपले एपीजे म्हणजे सामान्न्यातला असा एक असामान्य माणूस.... की ज्यांच्या नावाचा उल्लेख जेव्हा जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या जाती धर्माचा विचार कधीच डोक्यात आला नाही.... केवळ त्याचं कतृत्व आठवलं... पुन्हा पुन्हा राष्ट्रपती होण्याच्या योग्यतेचे एकमेव व्यक्तीमत्व

    ReplyDelete
  4. अगदी मनातलं बोललात भाऊराव! वेदांत कुठेतरी वचन आहे. आमचा मन्यु (=क्रोध) बघूनच आमचे शत्रू गर्भगळीत होवोत. प्रत्यक्ष युद्ध न करताच केवळ तयारीच्या जोरावरच निकाल लागो. भारतरत्न कलाम महाशय उपरोक्त वचन कोळून प्यायले होते. हे तत्त्व जनतेने आत्मसात करणं हीच खरी श्रद्धांजली.

    आला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete