दोन दिवसांपुर्वी राज्याचे ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांना आम्ही अनावृत्त पत्र लिहीले. त्यावरून बर्याच उलटसुलट प्रतिक्रीया आल्या. अनेकांना ते पत्र आवडले तर अनेकजण त्यामुळे विचलीत झाले. मात्र साहेबांच्या अशा पत्राने पुत्रवत जितेंद्र आव्हाड इतके फ़ुशारून जातील अशी कोणाचीच अपेक्षा नसावी. पण फ़ुशारलेल्याला हुशार म्हटले, की तो अधिकच फ़ुशारतो व शेफ़ारतो. झालेही तसेच. जितेंद्र भय्या इतके फ़ुशारले, की दुसर्या दिवशी थेट विधीमंडळात पहिल्या रांगेत येऊन बसले. वर्गातला वात्रट मुलगा पहिल्या रांगेत बसला, म्हणून मस्ती करायचा थांबत नाही. किंबहूना तो वर्गात अधिकच बेशिस्त निर्माण करतो. आव्हाडांनी फ़ुशारल्या अवस्थेत नको त्या वारूळात हात घातला आणि जे काही मुंग्यांचे वारूळ उठले; त्याने त्यांच्याच पक्षाची तारांबळ उडाली. पक्षाचे विधानसभेतील नेते अजितदादांवर आव्हाडांना कानपिचक्या देण्याची वेळ आली. कुरापत काढून वात्रट मुले निदान फ़रारी होतात. इथे अनिल गोटे नावाचे भाजपाचे आमदार काही बोलले, तर आव्हाडांनी थेट तेलगीला हात घातला. नेहमीच्या उपरोधिक खोचक भाषेत त्यांनी गोटे यांना इतिहास शिकवायला सुरूवात केली. सांगलीचे सभागृह आणि विधानसभा यातला फ़रक आव्हाडांच्या लक्षात आलेला नसावा. किंवा थोरले साहेब म्हणतात, तशा ‘पुरोगामी’ पोरखेळाचा आखाडा विधानसभेत नसतो, याचे आव्हाडांना भान राहिलेले नसावे. बाकी काही नाही तरी ज्या भाजपा आमदाराची कुरापत काढायचा प्रयत्न केला, त्याचे नाव तरी समजून घ्यायचे होते ना? गोटे अण्णांची कळ काढल्यावर आपल्याच कपाळी गोटा हाणला जाण्याची शक्यता लक्षात आली असती ना? पण ‘साहेबांचे धोरण’च असे की आपणच हाणलेला गोटा आपल्याच टाळक्यात येऊन बसला पाहिजे. झालेही तसेच आव्हाडांनी भाजपाला हाणला तो गोटा उलटा फ़िरून छगन भुजवळांवर येऊन आदळला.
आधीच भुजबळ विविध घोटाळ्यांच्या जंजाळात फ़सलेले आहेत. काहीशी अशीच स्थिती दहा वर्षापुर्वी त्यांच्या बाबतीत उदभवली होती आणि त्यांना मंत्रीपद सोडायची वेळ आलेली होती. त्या घोटाळ्याचे नाव होते तेलगी प्रकरण. सहाजिकच पुढल्या अनेक वर्षात भुजबळांसह कोणी राष्ट्रवादीचा नेता चुकून तेलगी हा शब्द तोंडी येऊ देत नव्हता. तेलगी सोडाच, हलगी, सलगी असेही शब्द पवारांच्या पक्षात वर्ज्य होते. कारण उच्चारात गफ़लत होऊन तेलगी म्हटले गेले तर? पण आव्हाड तितके शुद्धीत कुठे होते? आपल्या पोरकटपणाला खुद्द साहेबांनी दाद देत मुख्यमंत्र्याला पत्र लिहील्यावर त्यांनी चेकाळल्यासारखा विधानसभेतही उंच दहीहंडी वांधण्याचा जणू निर्धार केला आणि त्यातून तेलगी शब्द त्यांच्या तोंडी आला असावा. सहाजिकच अनिल अण्णा गोटे संधी सापडल्यासारखे उठून उभे राहिले आणि तात्काळ तेलगीच्या प्रकरणाचा तपशील धडाधडा वाचून दाखवू लागले. त्यासाठी त्यांनी हाताशी कागदपत्रेही सज्ज ठेवली होती. इथे मग शंकेला जागा निर्माण होते. आव्हाड तेलगी प्रकरणाचा उल्लेख आकस्मिक केला असेल, तर गोटेंकडे ती़च कागदपत्रे इतकी सज्ज कशी होती? की तसे प्रकरण उदभवणार याची गोटे यांना पुर्वकल्पना होती वा देण्यात आली होती? म्हणून ते अगदी सज्ज होऊन भुजबळांना तोंडघशी पाडायला दस्तावेज घेऊन सभागृहात आलेले होते? तसा कुठला विषय विधानसभेत नव्हता. म्हणजेच आव्हाड यांनी तेलगीचे नाव घेऊन गोटेंना चिथावले नसते, तर पुढला विषय आला नसता. याचा एकच अर्थ निघतो, की हा उल्लेख ठरवून करण्यात आला आणि त्यासाठी गोटे अण्णांना आधीपासून सज्ज असण्याच्या पुर्वसुचना मिळालेल्या होत्या. मग जाणिवपुर्वक भुजबळांना विधानसभेत तोंडघशी पाडण्याचे संगनमत झालेले होते काय? झाला तो आव्हाडांचा उतावळेपणा होता, की गोटे आव्हाडांची मिलीभगत होती?
वरवर बघता सर्वकाही आकस्मिक असल्याचे दिसते व भासवले जाते आहे. पण घटनाक्रमाचा तपशील बारकाईने तपासला तर त्यातली पुर्वयोजना लपून रहात नाही. थोरल्या साहेबांनी आव्हाड यांचा उल्लेख ओबीसी नेता म्हणून करायचा आणि त्यानेच आजवर पक्षाचा ओबीसी चेहरा असलेल्या ज्येष्ठ नेत्याला तोंडघशी पाडायचे खेळ करायचे, यात काहीतरी शंकास्पद नक्की असावे. अन्यथा आव्हाडांनी तेलगीचे नाव घेत गोटेंना चिथावणे व त्यांनी कागदपत्रांसह भुजबळांची नचक्की करणे तर्कसंगत नाही. यात पुरोगामी राजकारणापेक्षा ‘उरोगामी’ राजकारण अधिक दिसते. म्हणजे उरात शिरून, पोटात जाऊन पोट फ़ाडून बाहेर येत बळी घेणे. अकस्मात आव्हाडांचे पहिल्या रांगेत येऊन बसणे, तेलगीचा उल्लेख करणे व त्यातून भुजबळांना खच्ची करण्याचा डाव खेळणे, याला थोरल्या साहेबांचा आशीर्वाद नक्कीच असला पाहिजे. अन्यथा हा बनाव इतका बेमालूम सादर झाला नसता. अर्थात झाल्या प्रकाराने भुजबळ व्यथीत झाले आणि त्याबद्दल गटनेते अजितदादांनी आव्हाडांना कानपिचक्या दिल्या, असेही वृत्त आहे. तेही नाट्य आहे की खरे आहे याची शंका येते. पुतण्याने मारल्यासारखे करायचे आणि काकांनी चुचाकारल्यासारखे करायचे, असा एकूण बनाव आहे काय? अन्यथा आदल्या दिवशी थोर पुरोगामी कार्य आव्हाड करीत असल्याचे प्रशस्तिपत्र साहेब मुख्यंमंत्र्यांच्या हस्ते आव्हाडांना देतात आणि दुसर्याच दिवशी पुतण्या अजितदादा आव्हाडांना समज देतात, यातली सुसंगती कशी लावायची? की आता भुजबळ थोरल्या साहेबांना नकोसे झालेले आहेत? त्यांच्याजागी नवा ओबीसी चेहरा म्हणून अन्य कुणाला पुढे आणायचे आहे? आव्हाड तितके समर्थ नसल्याने भुजबळ यांच्या प्रतिष्ठेला सुरूंग लावण्याचा हेतू आहे काय? अनेक प्रश्न साहेब व आव्हाड यांनी एक (जमाल)गोटा फ़ेकून उपस्थित केले आहेत.
शरद पवार यांचे आजवरचे राजकारण पाहिले, तर ते कायम अस्थीर राहिले आहेत आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्यांना त्यांनी कायम अस्थीर ठेवले आहे. आव्हाडांना आज मोठी मौज वाटेल. साहेब आपल्या पाठीशी असल्याने भुजबळांना गोत्यात घालताना आव्हाड शेफ़ारलेले असावेत. पण असेच पंधरा वर्षापुर्वी भुजबळही मोकाट झाले होते आणि एका भल्या संध्याकाळी त्यांनी गृहमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा फ़तवा काढला होता. ती अटक कोर्टात टिकली नाही आणि फ़ुशारलेल्या त्याच भुजबळांना तीन वर्षांनी तेलगी प्रकरणात मंत्रीपद सोडावे लागले होते. अगदी सीआयडी समोर हजर होण्याची लांच्छनास्पद स्थिती आलेली होती. ज्या जखमेवर आव्हाड आज मीठ चोळत आहेत, ती तेव्हाची जखम आहे. त्यानंतर भुजबळांना संयम शब्दाचा अर्थ कळला होता, काही काळाने आव्हाडांनाही त्याचे भान येईल. हिमालयावर चढवणारे साहेब कधी गर्तेत नेवून टाकतात, त्याचा आकंठ बुडालेल्यांनाही पत्ता लागत नाही, असा इतिहास आहे. तेव्हा राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधून उंडारलेल्या आव्हाड यांनी संभाळून असावे. ती जहिरात आहे ना, तीच साहेबांची कार्यसुत्री आहे. ‘घडीऽऽऽऽऽऽऽऽऽ! पहले इस्तेमाल करे, फ़िर विश्वास करे’. अजून आव्हाडांना राजकारण शिकायचे आहे. त्यांच्यासारखे कितीजण वजीर व्हायला निघाले आणि प्यादे मोहरे होऊन पटावरून दूर फ़ेकले गेलेत, त्याचा अभ्यास करावा. आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांना बळी घेऊन गेल्यावर कारण नसताना भुजबळांचे उपमुख्यमंत्रीपद कसे अलगद काढून घेतले गेले? ते त्यांच्याही लक्षात आले नाही आणि अजितदादांना राजिनामा देवून काही महिने बाहेर कशाला बसावे लागले, त्याचेही आव्हाडांनी परिशीलन करावे. साहेब ‘पाठ थोपटतात’, तेव्हा धोका समोरून नसतो तर पाठीमागच्या धोक्याची चिंता करायची असते. नाहीतर खोट्याच्या कपाळी गोटा असा अकस्मात येऊन बसतो.
भाऊ खुप छान लेख..एवढ मुद्देसुद विश्लेषण आपल्या ब्लॉग शिवाय कुठेही वाचायला मिळत नाही.
ReplyDeleteMast
ReplyDeleteतेलगी प्रकरणी अनिल गोटे यांच्याकडे पॉवर पासून बाहुबली पर्यंतचे अगदी छायाचित्रांसह पुरावे आहेत. धुळे येथे त्यांनी यासंबंधीचे तेलगी सोबतचे बॅनर देखील लावले होते जे अगदी तासभरत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी फाडून टाकले.. याच कारणास्तव "बाहुबलींची" "पॉवर" अनिल गोटे समोर निकामी होते. याची कल्पना थोरल्या पॉवर ला असल्याने आव्हाड ला तातडीने समज देण्यात आली.
ReplyDeleteलाजवाब
ReplyDeleteYes
ReplyDeletesir I like your artikal
https://www.facebook.com/187298561414810/photos/a.189738921170774.57417.187298561414810/645912298886765/?type=1
ReplyDeleteChan sir
ReplyDelete