(उत्तरार्ध)
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आला असताना अकस्मात शरद पवार यांनी चमत्कारिक भूमिका घेतली. आपला त्याला पाठींबा नाही की विरोध नाही, असे सांगून त्यांनी पळवाट शोधली. पाठींबा किंवा विरोध नसेल तर त्याविषयी जाहिरपणे बोलण्याची तरी काय गरज होती? पण कुठल्याही गोष्टीत वा घडामोडीत अकारण नाक खुपसण्याला शरद पवार कायम मुरब्बी धुर्त राजकारण समजत आले आणि त्यातच त्यांची अवघी राजकीय कारकिर्द मातीमोल होऊन गेली. आता पंच्याहत्तरी जवळ आली असताना निदान आपण नव्या पिढीच्या टवाळीचा विषय होऊ नये, असेही माणसाला कसे वाटत नाही, याचेच नवल वाटते. वास्तविक संभाजी ब्रिगेडच्या उचापतींना मागल्या निवडणूकात मतदाराने स्पष्ट झटका दिलेला असताना, त्यापासून स्वत:चे राजकारण अलिप्त करून घेणे, हा शहाणपणा ठरला असता. पण तिथे आपला विश्वासू चेला पाठवून पवारांनी पुन्हा मराठा जातीय राजकारणाची कास धरली आहे. म्हणूनच पुन्हा सांगलीत आव्हाडांना दणका बसल्यावर त्यांचे कान उपटण्यापेक्षा पवारांनी त्यांचीच वकिली करीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले होते. आव्हाडांच्या पुरोगामी प्रबोधन कार्यामध्ये आणल्या जाणार्या अडथळ्यांचा बंदोबस्त करायची विनंती केली होती. तेव्हा हा सगळा मजेशीर प्रकार वाटला होता. पण दोन आठवड्यांनी जी पवार सेना आपापल्या बौद्धिक बिळातून बाहेर पडून पुरस्कार विरोधात लढायला अवतरली, त्याकडे बघता त्यांच्यापेक्षा खरा तल्लख बुद्धीचा विचारवंत संशोधक जितेंद्र आव्हाड हेच असावेत याची खात्री पटली. कारण या वादाला पहिले तोंड आव्हाडांनी फ़ोडले. त्त्यानंतर दोनतीन आठवडे यातल्या एकाही विचारवंत बुद्धीमंताला त्या पुरस्कारात काहीही वावगे दिसल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. उशिरा त्यांना त्याचा साक्षात्कार घडला असेल, तर त्यांचे महागुरू आव्हाडच म्हणायला हवेत.
आता पवार साहेबांनी आजवरच्या या आश्रित बुद्धीमंतांना भंगारात काढावेत आणि त्यांच्या जागी आव्हाडांना बुद्धीमंत म्हणून घोषित करावे. कारण यापैकी कोणालाही बाबासाहेबांना पुरस्कार देण्यात काही गैर घडतेय, याचा सुगावा शेवटपर्यंत लागलेला नव्हता. आधीच लागला असता तर त्यांनी आव्हाडांच्या आधी विरोधासाठी मैदानात उड्या घेतल्या असत्या. पण बाबासाहेबांची निवड चुकीची असल्याचे प्रथम आव्हाडांच्या लक्षात आले आणि आता इतक्या दिवसानंतर अन्य बुद्धीमंतांना त्याची जाणिव झाली. म्हणून तर त्यांनी यापुढे बुद्धीवाद व संशोधनाचे धडे आव्हाडांकडून गिरवण्याची गरज आहे. त्यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम आव्हाडांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जावा. त्यात विद्या बाळ यांच्यापासून भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत सर्वांना शिष्यवृत्ती देवून पवारांनीच सक्तीने भरती करावे. शक्य झाल्यास साहेबांनी एक अख्खे नवे विद्यापीठच काढून तिथे आव्हाडांना कुलगुरू नेमावे. तिथे अशा बुद्धी मंदावलेल्या जुन्यापान्या बुद्धीमंतांना नवी झिलई देण्यासाठी खास पाठ्यक्रम योजावेत. म्हणजे मग पुढल्या काळात कुठला पुरस्कार देण्यात चुका झाल्या, तर त्यावर पत्रक काढून काहुर माजवायला इतका विलंब लागणार नाही. आव्हाडांसारखा आघाडीचा पुरोगामी बुद्धीमंत शेवटच्या हातघाईच्या लढाईसाठी मैदानात आणणे सोयीचे होऊन जाईल. किंवा मग अशा कालबाह्य झालेल्या खेळाडूंना ठाणे वा इतरत्रच्या दहिहंड्या बांधायच्या कामाला जुंपून आव्हाडांना पुर्णवेळ ‘सामाजिक प्रबोधनाचे’ काम करायला मोकळे करून घेता येईल. ज्या गतीने मागल्या चारपाच वर्षात ब्राह्मण द्वेषाचे राजकारण खेळले गेले आहे, त्याला भलतीच गती येऊन पुढल्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे उरलेसुरले नामोनिशाणही शिल्लक उरणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य इतके पुरोगामी झालेले असेल, की त्याला पवारांच्या पक्षाची गरजही उरलेली नसेल.
दुसरी सुचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दोन दशकांपुर्वी युती शासनाने सुरू केला होता. तेव्हाही अशाच बुद्धीमंतांनी गदारोळ केला होता. तो वाद व्यक्तीविरोधी नव्हता. पु. ल. देशपांडे यांना तो देण्याचा निर्णय झाला होता. तर त्यांनी तो घेऊ नये, म्हणून बौद्धिक दबाव आणला गेला होता. शिवसेना हा गुंडांचा पक्ष आहे म्हणून पुलंनी तो पुरस्कार नाकारावा, अशी मागणी तथाकथित पुरोगाम्यांनी चालविली होती. यावेळी ज्याला पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे, त्याच्याच विरोधात काहुर माजवले गेले आहे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की भाजपा किंवा शिवसेना यांच्या कुठल्याही निर्णयाचे वावडे असलेली काही मंडळी आहेत. माध्यमांच्या पलिकडे त्यांना समाजात कुठले स्थान नाही. अशा मंडळींचा एककलमी कार्यक्रम असा, की युती पक्षांच्या कुठल्याही निर्णय कार्यक्रमाला अपशकून करणे. म्हणूनच बाबासाहेबांच्या जागी कोणी अन्य व्यक्ती निवडली असती, तरी ह्याच लोकांनी असाच अपशकून केला असता. कारण त्यांना कुठलेही तत्व नाही की कुठलाही विचार नाही. तुम्ही जे काही कराल त्याला विरोध, हाच त्यांचा अजेंडा आहे. सहाजिकच त्यांनी आपला अजेंडा पुढे केलेला आहे. वास्तविक तो संभाजी ब्रिगेडचा अजेंडा आहे. पण भाजपा वा सेनेच्या विरोधात असल्यावर पुरोगाम्यांना तो आपलाच अजेंडा वाटला तर नवल नव्हते. पण लोकशाहीत सरकार सर्वांचे असते. म्हणूनच भाजपा जिंकला असला तरी त्याला पुरोगाम्यांना झटकून टाकता येणार नाही. त्यावरचा एक कायमचा उपाय फ़डणवीस सरकारने योजून ठेवावा. म्हणजे असे की जेव्हा केव्हा युती वा हिंदूत्ववादी पक्षांचे सरकार सत्तेत येईल, तेव्हा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या सोबतच आणखी शंभर ‘महाराष्ट्र दूषण’ पुरस्कारांचे वितरण केले जावे. मात्र त्याची निवड राज्य सरकार करणार नाही. ती पुरोगाम्यांनीच करावी.
योजना अतिशय सुलभ व सोपी ठेवावी. म्हणजे असे की हिंदूत्ववादी सत्तेत असतील, तेव्हाच असे दूषण पुरस्कार असतील आणि पुरोगामी पक्ष सत्तेत असेपर्यंत ते पुरस्कार स्थगित केले जातील. जेव्हा हिंदूत्ववादी वा प्रतिगामी सत्तेत असतील तेव्हा त्यांनी महाराष्ट्र भूषण असा सन्मान देण्याचा निर्णय नेहमीप्रमाणेच घ्यावा. पण ‘दूषण’ पुरस्कार ही पुरोगामी स्पर्धा असेल. जो कोणी सर्वात आधी भूषण पुरस्काराला विरोध करील, त्याला आपोआपच ‘दूषण’ पुरस्कार लागू होईल. उदाहरणार्थ बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणार्यातल्या पहिल्या शंभर लोकांना असा ‘महाराष्ट्र दूषण’ पुरस्कार मिळू शकेल. थोडक्यात भूषण पुरस्कार जाहिर झाल्यानंतर यावेळेप्रमाणे विलंबाने विरोधाचा तमाशा चालणार नाही. पहिल्या दिवशीच विरोध करणार्यांची झुंबड उडेल आणि अपशकुनी मामांचे विरोधाचे कार्य वायाही जाणार नाही. अर्थात इतक्या वेगाने विरोधाचे आवाज उठू लागतील, की पहिले शंभर कोण हे ठरवण्यात सरकारची दमछाक होईल. त्यात गफ़लत होऊ नये, म्हणून मग दूषण पुरस्काराचे नियम अत्यंत काटेकोर ठरवले जावेत. म्हणजे असे, की माध्यमांकडे धाव घेण्याच्या आधी नोटरीकडे जाऊन अपशकून करणार्याने त्याचे प्रतिज्ञापत्र नोंदवायचे आणि त्यावर वेळ घातलेली असायला हवी. म्हणजे नेमके कोणते शंभर विरोधात पहिले सहभागी होते त्यांची निवड करण्यात अडचणी होणार नाहीत. माध्यमातले अपशकून विचारात घेतले जाऊ नयेत, तर प्रतिज्ञापत्रातून अपशकून सरकारी दफ़्तरी सादर केलेल्यांचाच पुरस्कारासाठी विचार व्हावा. तसे झाले तर आव्हाड कुठल्या कुठे फ़ेकले जातील आणि खर्या भूषण पुरस्कारार्थीच्या विरोधापेक्षा दूषण पुरस्कारात भ्रष्टाचार व वशिलेबाजी झाल्याचा गदारोळ होऊन जाईल. थोडक्यात महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वादंग होण्यापेक्षा अपशकुनीमामा दूषण पुरस्काराच्या मारामारीत गर्क होऊन, मूळचा पुरस्कार सोहळा सहीसलामत पार पडू शकेल. (संपुर्ण)
अतिउत्तम, गेल्या काही दिवसापासून माझ्यासारख्या असंख्य लोकांना जे वाटत होते ते आज आपण बोलून दाखविले.
ReplyDeleteभाऊ कावेबाज लोकांना उघडे करण्याच्या कार्यामुळे आजच्या लेखास बालीश सल्याचा प्रादृभाव झाला आहे असे वाटते , सांभाळा
ReplyDeleteभाउ...याचा शेवट काय होइल असे तुम्हाला वाटते....कारण हे म्हणजे मी खड्ड्यात पडणार आणी बाकिच्यानाही घेउन पडणार अस आहे....
ReplyDeleteविद्वान आव्हाड? यांच्या नंतर खर्या विद्वानांना जाग आली मग ते पुरस्काराच्या विरोधात बोलले हा हास्यास्पद प्रकार पहिल्यांदा पहायला मिळाला.
ReplyDeleteIt seems wrong
ReplyDelete