कुठल्याही विवेकवादी वा बुद्धीजिवी चळवळीला संपवायचे असेल तर तिच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यात सहभागी होऊन चळवळीचेच एक पाखंड उभे करायचे असते. मागल्या दोन वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलनाचे सोहळे किंवा इव्हेन्ट बघितल्या, मग त्याची खातरजमा करून घेता येते. आम्ही सारे दाभोळकर किंवा शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है असल्या घोषणा त्याच पाखंडाचे दाखले आहेत. यांना कसली शरम वाटते? ज्यांना खरा खुनी वा हल्लेखोर पकडण्याची इच्छाही नाही, की प्रयत्नही नाहीत, त्यांना शरम कशाला वाटते? म्हणून आधीच्या लेखात आम्ही चेंबुरच्या दुकानात जीव धोक्यात घालणार्या नासिरुद्दीन मन्सुरीचा दाखला दिलेला होता. त्याने कधी दाभोळकर वा पानसरे यांचे नावही ऐकलेले नसेल, की त्यांचे कार्य-तत्वज्ञानही मन्सुरीला ठाऊक नसेल. त्याने कधी हातात ‘आम्ही सारे’ असा फ़लकही धरलेला नाही. पण ज्या क्षणी या दोघांवर प्राणघातक हल्ले झाले, तेव्हा तिथे मन्सुरी असता, तर नक्कीच त्याने त्यांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला असता. पण आज जे कोणी ‘आम्ही सारे’ असे फ़लक घेऊन मिरवत असतात, त्यापैकी कोणी त्या प्रसंगी हजर असते, तर दाभोळकर पानसरेंच्या हल्लेखोराला रोखणे दुरची गोष्ट झाली, हेच ‘आम्ही सारे’ हल्ला निमूट बघत राहिले असते किंवा शेपूट घालून फ़रारी झाले असते. हा निव्वळ आरोप नाही की शंका नाही, ज्या मध्यमवर्गिय मानसिकतेतून असे लोक आलेले असतात, त्यांच्यात मुरलेला ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ त्यांना तसे करायला भाग पाडत असतो. तेरा वर्षापुर्वी त्याची साक्ष अंबरीश मिश्र या पत्रकाराने कबुलीजबाब असल्यासारखी एका बातमीतून दिलेली आहे. समोर एका असहाय मुलीवर बलात्कार होताना त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आपल्याला कशी झाली नाही, त्याची बातमी लिहीताना अंबरीश म्हणतो,
"आम्ही जे बघितले त्याने आम्ही बधीर होऊन गेलो. सलीमने त्या मुलीला खाली खेचले होते आणि तो तिच्यावर बलात्कार करीत होता. आपल्या मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाच्या बोजाखाली दबलेले आम्ही शांत राहिलो, काहीही करू शकलो नाही." (टाईम्स ऑफ़ इंडीया)
हा मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा किंवा शहाणपणा काय असतो? तर आपण दुसर्याच्या भानगडीत पडायचे कारण नाही. आपले जग आपल्यापुरते, बाकी कुठे कुणाचे काय होते, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. अगदी कत्तलखान्यातल्या बोकडासारखे आपले मध्यमवर्गिय शहाणपण असते. तिथे एका बोकडाच्या मानेवरून सुरी फ़िरवली जात असते आणि बाजूचा दुसरा बोकड शांतपणे चरत असतो. मरणार्याचे पाय झाडणे, रक्ताने माखणे चरणार्याला अजिबात विचलीत करत नसते. आजकाल समाज व त्यातले सुखवस्तू व मध्यमवर्गिय इतके आत्मकेंद्रित झाले आहेत, की त्यांना शेजारच्या घरातल्या नवविवाहितेच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत नाहीत. आणि ऐकू आल्या, तरी त्यात पडायची इच्छा व हिंमत ते गमावून बसले आहेत. अंबरीश त्यालाच मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाचा बोजा म्हणतो. त्या बोजाखाली दबलेले लोक कुठले आव्हान पेलणार आहेत? ते बघत बसतात. कधी ते रिंकू पाटिल या शाळकरी मुलीला जाळू देतात. कधी ते सांगलीच्या रस्त्यावर अमृता देशपांडेवरचा सुरीहल्ला होताना निमूटपणे बघतात. कधी बॉम्बे सेंट्रलला विद्या पटवर्धनवर रॉकेल ओतून तिला पेटवले जात असताना, स्तब्ध होऊन बघत रहातात. त्याला मध्यमवर्गिय जाणतेपणा किंवा व्यवहारी शहाणपणा म्हणतात. मात्र हेच लोक मोठ्या तावातावाने देशातला भ्रष्टाचार, वाढती असुरक्षितता, गुंडगिरी, काहीतरी करायला हवे; अशी चर्चा छान रंगवत असतात. पण हे सर्व शहाणपण, जाणतेपण प्रत्यक्ष संकटापासून मैलोगणती दुर असतानाचे असते. नेट प्रॅक्टीस म्हणतात तसे हे शहाणपण असते. ते कधीच खर्या कसोटी सामन्यात उतरत नाही. लोक टीव्हीसमोर बसून किंवा स्टेडीयमच्या गॅलरीत बसून, सचिन कुठे चुकला त्यावर बोलत असतात. त्यालाच अंबरीश मध्यमवर्गिय व्यवहारी शहाणपणा म्हणतो.
इथे मन्सुरी व अंबरीश यातला फ़रक लक्षात घेण्याची गरज आहे. कारण अंबरीश हा तुमच्याआमच्या सारखा एक मध्यमवर्गिय बुद्धीजिवी आहे. पोलिसाचे काम असल्याचे सांगत तोही ‘आम्ही सारे’ यांच्याप्रमाणे बलात्कार होऊ देतो आणि मग पोलिसात तक्रार नोंदवतो. मागल्या दोन वर्षात ‘आम्ही सारे’ काय करू शकलो? काहीच कशाला नाही करू शकलो? त्याचेही उत्तर अंबरीशने प्रामाणिकपणे दिलेले आहे. आपण वाचाळ बुद्धीवादी असतो आणि व्यवहारी जाणतेपणाचे गुलाम असतो. संकटाची घडी येते आणि परिक्षा घेऊ पहाते, तेव्हा आपले पोपटपंची करणारे तत्वज्ञान लुळेपांगळे होऊन जाते. ढुंगणाला पाय लावून ‘आम्ही सारे’ पळ काढतो, धोका संपला मग बिळातून बाहेर पडून पोलिस व सरकारला त्याच्या कर्तव्याविषयी शहाणपणाचे व्याख्यान देऊ लागतो. पण प्रत्यक्ष घटना घडत असताना मात्र त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आम्ही गमावून बसलेलो असतो. ती अगतिकता व नाकर्तेपणा झाकण्यासाठी मग सोहळे व इव्हेन्ट साजर्या करतो. कसाबची टोळी मारली गेली, मग आम्ही गेटवे ऑफ़ इंडीयापाशी जमून मेणबत्त्या पेटवतो आणि त्यातच मोठा पुरूषार्थ असल्याचे पाखंड मिरवू लागतो. पण कसाब समोर असताना किंवा हल्लेखोर बलात्कारी समोर खडा उभा असताना आम्ही गर्भगळित होऊन जातो. कारण आम्ही सामान्य बुद्धीचे नासिरुद्दीन मन्सुरी नसतो की कसाबच्या अंगावर मरायला धावून जाणारे तुकाराम ओंबळेही नसतो. ‘आम्ही सारे’ बुद्धीजिवी असतो. आपल्या नाकर्त्या नपुंसकत्वाला पुरूषार्थ ठरवण्याचे पाखंड रंगवणारे पथनाट्य कलावंत असतो. आपल्यात मन्सुरी वा ओंबळेप्रमाणे पुढे सरसावण्याचे नसलेले बळ झाकण्याची केलेली केविलवाणी धडपड, मग एक सोहळा बनून जातो आणि बाहेर असे शेकडो खुनी, बलात्कारी, हल्लेखोर, मारेकरी आपल्या त्या तमाशाला फ़िदीफ़िदी हसत मोकाट फ़िरत असतात. कारण आपल्या पोकळ घोषणांच्या शब्दापेक्षा त्याच्या नुसत्या धमकीच्या शब्दातली ताकद त्याला पक्की ठाऊक असते.
तेरा वर्षापुर्वी चर्चगेट बोरीवली लोकलमध्ये दरवाजाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक गुंड एका मतिमंद एकाकी मुलीवर बलात्कार करताना अलिकडल्या भागात बसलेल्या प्रवाश्यांना दिसला. तिचा टाहो ऐकून हे पाचजण तिथे धावले आणि तरीही तो गुंड क्षणभर विचलीत झाला नाही. त्याने या प्रवाश्यांना धावत्या गाडीतून बाहेर फ़ेकून देण्याची धमकी दिली आणि ते निमूट बाजूला झाले. त्याला बलात्कार करू दिला. मग तो पळून गेल्यावर याच प्रवाश्यांनी रेल्वे पोलिसांना खबर दिली आणि त्याला अटकही झाली. पण सवाल बलात्कार रोखण्याचा होता. पाचजण मिळून त्या नि:शस्त्र गुंडाला कशामुळे रोखू शकले नाहीत? ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा!’ जो ‘आम्ही सारे’ असतात त्यांच्यात ठासून भरलेला असतो. म्हणूनच मग त्याच दुखण्यावर किंवा अगतिकतेवर बोट ठेवले तर त्यांच्यातला तोच बुद्दीजिवी न्युनगंड जणू नागाने फ़ुत्कार टाकावा तसा उफ़ाळून बाहेर येतो. पोलिस नाकर्ते असतील. पण पानसरे दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी समर्थकांनी काय केले, असे विचारताच तो न्युनगंडाचा नाग फ़णा काढून पुढे आला आणि म्हणतो काय? ते पोलिसांचे काम आहे. पोलिस कशाला असतात? नासिरुद्दीन असे म्हणत नाही. कुठलाही जीव धोक्यात घालून मदतीला धावणारा असे ‘बुद्धीवादी विवेकी’ प्रतिसवाल करत नाही. कारण संकटात असलेल्याला मदत करायला धावणे किंवा सत्य प्रस्थापित करायला पुढाकार घेणे विवेकी नसेल कदाचित. पण माणूसकीचे कर्तव्य नक्कीच असते. उलट ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ दाखवून त्यापासून पळ काढणे मात्र विवेकवाद असत्तो. जो नासिरुद्दीन वा ओंबळे यांना ठाऊकच नसतो. पानसरे असोत किंवा दाभोळकर असोत, त्यांच्या चळवळी कार्यालाच पाखंड करून टाकण्याची यापेक्षा भीषण खेळी दुसरी कुठली असेल. अंबरीश मिश्र निदान प्रामाणिकपणे आपल्या अगतिकतेची कबुली देतो. पण ‘आम्ही सारे’ इतके बनेल असतो, की त्याच अगतिकतेला पुरूषार्थ ठरवण्याचे पथनाट्य मांडत असतो.
"आम्हा सार्यांना" अतंरमुख करायला लावनारी चपराक.
ReplyDeleteVICHAR KARNYAS BHAG PADLE TUMHI...
ReplyDelete>>>अंबरीश मिश्र निदान प्रामाणिकपणे आपल्या अगतिकतेची कबुली देतो. पण ‘आम्ही सारे’ इतके बनेल असतो, की त्याच अगतिकतेला पुरूषार्थ ठरवण्याचे पथनाट्य मांडत असतो.<<
ReplyDeleteनाही हो भाउ! अगतिकता,चीड,असहायता,दु:ख अशा अनेक भावनांचे मिश्रण आहे. बर ते जाउ द्या अंनिस ने आता काय करायला हवं ते सांगा!
प्रकाश घाटपांडे,
Delete>> बर ते जाउ द्या अंनिस ने आता काय करायला हवं ते सांगा!
अनिसने काय करायला हवं ते भाऊरावांनी सांगायला कशाला पाहिजे? त्यांना स्वत:ला आत्मपरीक्षण करता येत नाहीका?
आणि भाऊराव जर सांगत बसले तर त्यांच्यात आणि भाडोत्री कार्यकर्त्यांत फरक तो काय उरला?
आपला नम्र,
-गामा पैलवान
हे असेच चालायचे का।
ReplyDelete