Friday, September 18, 2015

एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

तीन वर्षापुर्वी लोकपाल आंदोलनात पावित्र्याचे पुतळे व प्रामाणिकपणाचे निकष म्हणून तमाशा मांडणार्‍या केजरीवाल व अण्णा टीमने राजकीय पर्याय देण्याची भाषा केली होती. मग लोकपालसाठी व भ्रष्टाचार संपवण्यासाठी केजरीवाल आपल्या धुतल्या तांदळांना घेऊन राजकीय आखाड्यात उतरले. त्यापैकी एकजण सध्या खोट्या प्रमाणपत्रासाठी गजाआड पडला आहे तर दुसरा सध्या अटकेच्या भयाने फ़रारी झाला आहे. अजून त्यापासून दूर असणार्‍यांना मात्र आपल्या शुचिर्भूत असण्य़ाची खात्री आहे. असणारच. केजरीवाल व त्यांच्यासारख्या आंदोलनकर्त्याच्या राजकीय प्रवेशाच्या वेळीच वर्तवलेले भविष्य आज कितपत खरे ठरले?
(रविवार, ५ ऑगस्ट, २०१२ चा लेख)




एका संन्याशाच्या लंगोटीची गोष्ट

    एक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्‍यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत होता. जवळच्या एका तळ्यात अंघोळ करायची व तिथेच जाऊन पाणी प्यायचे. बाकी त्याला कशाची गरज नव्हती. जीवनावश्यक वस्तूही नव्हत्या त्याच्यापाशी. संसार म्हणायचा तर अवघ्या दोन लंगोट्य़ा. त्यातली एक अंगावर असे तर दुसरी अंघोळीनंतर धुवून वाळत घातलेली असे. तळ्यावर जाई तेव्हा त्याला संसारात गांजलेले लोक दिसत व त्यांची त्याला खुप दया येत असे. पण तेवढाच त्याला जनसंपर्क होता. जनसंपर्क म्हणजे संसारी जगाशी तेवढाच संबंध. त्या गावातल्या भोळ्याभाबड्या लोकांना इतके कष्टप्रद जीवन जगणार्‍या संन्याशाविषयी भितीयुक्त आदर होता. तो सिद्धपुरूष आहे की नुसताच गोसावडा आहे, अशी चर्चा दबल्या आवाजात चालत असे. पण कोणी त्याला तो कुठून त्या रानात आला किंवा कधीपासून संन्यास घेतला; असे पश्न विचारण्याचे धाडस केले नाही. कधी एखादी देवभोळी महिला किंवा पुरूष आडरानात जाऊन सणासुदीला घरच्या पक्वान्नाचे जेवणाचे ताट त्या संन्याशाला भक्तीभावाने देत असत. तेवढाच त्याचा संसारी जगाशी संबंध येत असे. संन्यास किती सोयीचा असतो ना? कसल्या म्हणून कटकटी नाहीत. असे गावातल्या संसारी लोकांना वाटत असे. पण म्हणून खरेच त्या संन्यासाला कुठलीच समस्या नव्हती का?

   त्याचे जीवन असे विनासायास चालु असताना एक बारीकशी समस्या त्याला भेडसावू लागली. गावातून कधीतरी येणारे पक्वान्नाचे जेवण खाऊन जे खरकटे तो संन्याशी जवळच फ़ेकून देत होता, त्याचा एक उकिरडा तिथे तयार होत गेला आणि त्यातल्या नासल्या कुजल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचे काम निसर्गाला करायची वेळ आली. अर्थात निसर्गाचे काम कुठला कायदा वा घटनेनुसार चालत नसते. त्याने सर्वच शक्यता व शंकांचे उपाय खुप आधीपासून काढून ठेवलेले असल्याने संन्याशाच्या समस्येचा उपाय आपोआप कार्यरत झाला. त्याने आपल्या पर्णकुटीच्या जवळपास जो उकिरडा निर्माण केला होता त्याची विल्हेवाट लावायला तिथे एका उंदराची नेमणूक झाली. म्हणजे तिथे वास काढत एक उंदिर येऊन थडकला. तिथेच एक बिळ जमीनीत पोखरून वास्तव्य करू लागला. आता  पोटपाण्याची सोय लागली आणि बिळाच्या रुपाने वास्तव्याला घर मिळाल्यावर त्या उंदराच्या जीवनात स्थैर्य आले होते. मग त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली तर नवल कुठले? कारण त्याने संन्यास वगैरे घेतला नव्हता. संसार, संन्यास अशा मानवी संकल्पनांची बाधा त्याला झालेली नव्हती. त्यानेही एक सहचरी शोधून आणली आणि संन्याश्याच्या पर्णकुटीजवळच्या बिळात आपला संसार थाटला. लौकरच त्याच्या संसारात बहार आली आणि त्याचा त्रास बिचार्‍या संन्याशाला सुरू झाला.

   उंदराची पिल्ले बिळाच्या बाहेर पडून खेळूबागडू लागली. एकेदिवशी त्यांना एका नव्याच खेळण्याचा शोध लागला. त्यांना आसपासच्या रानातल्या नैसर्गिक वातावरणात न शोभणारी कापडी वस्तु दिसली आणि ती एका झुडूपावर लटकत होती, वार्‍याने उडत फ़डफ़डत होती. उंदराच्या पोरांसाठी ती नवीच वस्तू म्हणजे खेळणेच होते ना? त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि मग खेळून दमल्यावर असेल तिथेच ते कापड सोडुन बिळात विश्रांतीसा्ठी निघून गेली. हा ने्हमीचा प्रकार झाला. पण त्याचा त्या बिचार्‍या संन्याशाला मनस्ताप होऊ लागला. कारण रोज सकाळी आंघोळ केल्यावर वाळत घातलेली लंगोटी त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी जागच्या जागी सापडेना. त्याने शेवटी दबा धरून शोध घेतला, तेव्हा त्याला जवळच उंदराने बिळ केल्याची व उंदिरच ही उचापत करीत असल्याचा शोध लागला. त्याचा बंदोबस्त कसा करावा ही त्याच्यासाठी समस्या तयार झाली. दिवसेदिवस त्या उंदरांच्या टोळीने उच्छादच मांडला आणि त्यांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे संन्याशाला जाणवले. त्याने गावातल्या जा्णकारांशी प्रथमच संपर्क साधून सल्ला घेतला तर त्याला खुप आश्चर्य वाटले. उपाय खुपच सोपा होता आणि आपल्यासारख्या तपस्व्याला तो का सुचला नाही, याचे त्या संन्याशाला वैषम्य वाटले.

   गावातल्या जाणत्यांनी त्याला एक मांजर पाळण्याचा सल्ला दिला. तेवढेच नाही तर त्याला एक मांजराचे पिल्लूसुद्धा भेट दिले. पण एकदोन दिवसापेक्षा अधिक काळ तिथे पर्णकुटीच्या परिसरात ते मांजर टिकेच ना. एकदोन दिवस झाले की मांजर गावात पळून जायचे. मग त्याला शोधत फ़िरायची वेळ संन्याशावर यायची. त्याचा तपोभंग होऊ लागला. पण जेवढा वेळ मांजर तिथे असायचे, तेवढा काळ उंदरांचा बंदोबस्त चांगला होत असे. पण हे मांजर टिकवायचे कसे? तेव्हा गावकर्‍यांनी सल्ला दिला, की मांजराच्या दूधाची व्यवस्था करायला हवी. त्यासाठी संन्याशाने म्हैस पाळणे आवश्यक होते. जागच्या जागी दूध मिळू लागले तर मांजर कशाला पर्णकुटी सोडून जाईल? संन्याशाला ती आयडीया पटली आणि गावकर्‍यांनीच त्याला एक चांगली दुभती म्हैस भेट देऊन टाकली. पण मांजराच्या दूधाची समस्या सुटली तरी म्हैस बांधायची कुठे आणि तिला चारायचे कधी; ही समस्या दोनच दिवसात समोर आली. तेव्हा पुन्हा संन्याशाला बुजूर्ग गावकर्‍यांचा सल्ला घ्यायची वेळ आली. त्यांनी त्यासाठी छान उपाय सुचवला आणि त्यातून सर्वच समस्या सुटून गेल्या. म्हशीचा संभाळ व दूध काढण्याचे काम करायला एक परित्यक्ता संन्याशाच्या वस्तीवर येऊन राहिल आणि त्या दोघांसाठी छोटीशी झोपडी गावकरी बांधून देतील असा तो उपाय होता. आठवड्याभरात तेही काम मार्गी लागले आणि उंदरांचा कायमचा बंदोबस्त होऊन गेला. आता संन्याशाची लंगोटी जागच्या जागी राहू लागली. उंदराची वर्दळ संपली. फ़ार कशाला संन्याशाला पाण्यासाठी तळ्याकडेही फ़िरकण्याची गरज उरली नाही. ती म्हशीचा संभा्ळ करण्यासाठी आलेली महिला पाणी भरत होती, स्वत:सा्ठी स्वयंपाक करताना संन्याशालाही दोन घास घालत होती. त्याच्या अंघोळीचे पाणी गरम करून देत होती. संन्याशाचे जीवन सुखात व्यतीत होऊ लागले होते. इतक्या आपुलकीने आपली सेवा करणार्‍या त्या महिलेबद्दल त्याच्या मनात स्नेहभाव निर्माण झाला नसता तरच नवल. आणि त्या स्नेहभावानेच तो संन्याशी कधी संसारी पुरूष होऊन गेला त्याचा त्याला किंवा गावकर्‍यांना पत्ता लागला नाही.

   एका पर्णकुटिच्या जागी चांगले शाकारलेले संसारी घर तिथे तयार झाले आणि तिथल्या अंगणातही मुले बागडू लागली. गावातल्या कुठल्याही घरात जशी भांडणे होतात व धिंगाणा होतो, तसाच तिथेही सुरू झाला आणि त्यात नवराबायकोच्या विसंवादाचाही भाग होताच. तपश्चर्या आणि संन्यास बाजूला पडला आणि कुठल्याही संसारी पुरूषाप्रमाणे तो संन्याशी गृहस्थ होऊन गेला होता. रोजच्या जीवनातील कटकटींना विटून गेला होता. ज्या महिलेविषयी स्नेहभावातून हे सर्व घडून आले, तिचा त्याला तिटकारा येऊ लागला. मग एकेदिवशी मोठेच भांडण जुंपले आणि ते ऐका्यला अवघा गाव गोळा झाला. तेव्हा संताप अनावर झालेला तो गृहस्थ आपल्या पत्नीला धमकी देत म्हणाला, "हे सर्व सोडून निघून जाईन, संन्यास घेईन." तेव्हा मात्र तिचा उसळलेला राग कुठल्या कुठे गायब झाला आणि मनसोक्त हसत ती उत्तरली, "मग हा संसार कशातून उभा राहिला? त्या तुमच्या संन्यासातूनच तयार झाला ना? साधी लंगोटी संभाळता येत नाही आणि संन्यासाच्या गप्पा कुणाला सांगता?" आपल्या सहचारिणीचे हे बोल ऐकल्यावर त्या गृहस्थाचे सर्व अवसान गळाले. हे वेगळे सांगायची गरज आहे काय? सुरूवात कुठून झाली होती? एका लंगोटीपासून ना? एका लंगोटीला उंदरांच्या तावडीतून वाचवताना तो संन्यासी कधी संसारी पुरूष होऊन गेला, त्यालाच काय पण गावकर्‍यांनाही कळले नव्हते. आणि एवढे झाल्यावर त्याने त्यातून सुटण्याचा उपाय कोणता काढला, तर पुन्हा लंगोटी नेसून संन्यास घेण्याचा. एक इवली लंगोटी सुद्धा कशी मोहाच्या जाळ्यात ओढत जाते, त्याचा हा किस्सा कुठल्या गावात घडला असेल?

9 comments:

  1. भाऊ.... दिल्ली अर्थात इंद्रप्रस्थ नगरीत घडल्याचे जाणवते.

    ReplyDelete
  2. भविष्य अचूक आहे !
    बिहारबद्दल काय वाटतं , भाऊ ?
    त्याच्यावर आर्टिकल लिहिलंत तर वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  3. भाऊ अगदी बरोबर आहे संधीसाधू संन्यासी भरपूर आहे

    ReplyDelete
  4. केजरीवाल टोळीने काही निर्णय घेतले आहेत. शाळा आकारत असलेले शुल्क, शालेय सुविधा, वीज वितरण व्यवस्था, पाणी पुरवठा इत्यादी व दिल्लीतील राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यात काय व कशाप्रकारे कुरघोडी चालू आहे ह्या विषयावर काही लेख लिहून अजून माहिती प्रकाशात आणावी.

    ReplyDelete
  5. Bhau,
    yetya kalat Mr. kejriwal ase pakke politician hotil ki laloo, mulayam, mamta saglyanna kejriwal class lavava lagel...

    ReplyDelete
  6. म्हणजे प्रयत्न करु नये असे वाटतै का तुम्हाला .विवेकानंद म्हणतात " जेवढे नुकसान वाईट माणसांनी काही करुन झाले त्यापेक्षा कितीतरी नुकसान चांगल्या माणसांनी काही न करून झाले आहे.

    ReplyDelete
  7. "केजरीवाल" हा लोकशाहीतला प्रयोग आहे. सध्याच्या व्यवस्थेला कंटाळून लोकांनी स्वीकारलेला तो एक पर्याय आहे . त्यात केजरीवालांचे व्यक्तिमत्व, बदलणारी धोरणे, तडजोडी वगैरे त्या प्रयोगाचे भाग आहेत. कसेही असले तरी आपल्याला असे प्रयोग करण्याची मुभा आपली लोकशाही देते. नाहीतर सौदी राष्ट्रातील शासन काही जणांना आकर्षक वाटतेच कि ?

    ReplyDelete
    Replies
    1. Ho mag niddan ase tare mhanu naye ki mich ek sanyasi ani baki sagale chor... Kay???

      Delete
  8. प्रमोद गानूSeptember 19, 2016 at 11:27 AM

    सुपरब

    ReplyDelete