Monday, November 30, 2015

देशद्रोही, दहशतवादी आणि परकीय हस्तक //// महायुद्धाची छाया (४)

  

कुठलाही देश वा समाज एक व्यवस्था असते. तिथे काही नियम, कायदे व त्यांच्या पायावर उभ्या केलेल्या काही संस्था असतात. त्यातून तो समाज नियंत्रित होत असतो आणि एकजीव घटक म्हणून जगत असतो. उदाहरणार्थ अकस्मात डोळ्यात काही कुसळ वा कचरा जाण्याची शक्यता असेल तर विनाविलंब आधी पापणी डोळा झाकते आणि डोळा वाचवायचा प्रयत्न करते. तरीही गफ़लत झाली तर डोळ्यात गेलेला कचरा काढायला हात पुढे सरसावतो. कुठला हल्ला शरीरावर होणार असेल तर हात आधी डोके वाचवायचा प्रयत्न करतात आणि पाय धोक्याच्या स्थळापासून देहाला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी आपोआपा कार्यरत होतात. त्याला एकजीव व्यवस्था म्हणतात. जिथे आपोआप कार्यरत होणारी व्यवस्था असते. त्यातल्या एकाही घटकाने अवयवाने ठरल्या कामात दिरंगाई वा हलगर्जीपण केला, तरी शरीराला इजा होऊ शकते, हानी होऊ शकते. पण सहसा असे होत नाही. म्हणूनच त्याला एकजीव व्यवस्था म्हणतात. समाज म्हणजे शेकडो हजारो वा कोट्यवधी लोक असतात आणि त्यांनी एकत्र जगताना काही अशाच व्यवस्था उभ्या केलेल्या असतात. त्यात प्रत्येकाच्या जबाबदार्‍या ठरलेल्या असतात. ते उत्तरदायित्व प्रत्येकाने पार पाडण्याचे कर्तव्य ही त्याची सामाजिक तितकीच कायदेशीर बांधिलकी असते. उलट त्याच्याशी विपरीत वागू लागेल, तो अशा समाजासाठी विघातक असतो, धोका असतो. असा धोका उत्पन्न केला, मग ते शरीर वा तो समाज संपायला वेळ लागत नाही. तसा काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून जी सावधानता बाळगली जाते, तिला सुरक्षा म्हणतात. जी गोष्ट माणसाच्या देहासाठी असते तीच समाज व देशाच्या बाबतीत लागू असते. जेव्हा तुमच्याच शरीरातील कुठला अवयव हानीला पुरक वागू लागतो, तेव्हा तो शरीराला म्हणजे पर्यायाने तुमच्या जीवाला धोका बनलेला असतो.

असा धोका जेव्हा समाजजीवनात निर्माण होतो, त्याला गद्दार वा देशद्रोही म्हणतात. हेरगिरी म्हणूनच दोन प्रकारची असते. एका बाजूला समाजाला घातक असे शत्रूचे हस्तक गद्दार असतात, तेही हेर असतात, पण शत्रूला फ़ितूर झालेले असतात. उलट अशा गद्दारांना रोखणारे व त्यांच्याशी दोन हात करणारेही काही असतात, त्यांना सुद्धा हेरच म्हटले जाते. जे समाजाचे हित जपण्यासाठी सतत कार्यरत असतात. शत्रूचा हल्ला हा सैनिकी आक्रमणाने होत असतो, तसाच हस्तकांच्या मदतीने एखादा देश पोखरून नष्ट करण्याच्या मार्गानेही हल्ला होऊ शकत असतो. त्यातला दुसरा मार्ग खुप स्वस्त व कमी हानिकारक असतो. शत्रू देशाची सुरक्षा व्यवस्था पोखरून निकामी केली, तर लढाईशिवाय त्याच्यावर विजय मिळवता येतो. त्यासाठीच सुरक्षेचा उत्तम मार्ग म्हणून सतत शत्रूला आतून पोखरण्याचे उद्योग केले जातात. अवघे दहा हल्लेखोर मुंबईत पाठवून पाकिस्तानने दोनशे माणसे मारली आणि भारताचे कित्येक पटीने नुकसान केले. शिवाय भारतीयांच्या मनात शंका संशयाचे रान उठवले. दहशतीने कोट्यवधी भारतीयांना असुरक्षित मानसिकतेमध्ये ढकलून दिले. जे दोनतीन युद्धातून पाकिस्तानला साधता आलेले नाही, त्याच्या अनेपटी्ने युद्धाशिवाय जिहादी मार्गाने पाक साधू शकला. हे त्यांच्या सैन्याचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी भारतात जे हेर हस्तक उभे केलेत, त्यांच्यामुळे शक्य झाले आहे. असे हस्तक हे नेहमीच घातपाती वा गुंड गुन्हेगार नसतात. जे असे हिंसक कृत्य करतात, त्यांच्यापेक्षा घातक व भेदक असे अस्त्र असते, उजळमाथ्याने वावरणारे शत्रूचे हस्तक! मुंबई हल्ल्याची तयारी करण्यासाठी हेडली हा अमेरिकन पाकिस्तानी वापरला गेला. तो इथे येऊन अनेक मान्यवरांमध्ये उठबस करून गेला, महेश भट यांच्या पुत्राशी त्याने जवळीक साधली होती. हेडली दिसायला वागायला भयंकर व्यक्ती नव्हता ना?

कालपरवा ज्यांना पाक हेरखात्याचे हस्तक म्हणून पकडण्यात आले आहे, ते अटकेपर्यंत इथे उजळमाथ्याने जगत वावरत होते. आपण त्यांच्यावर कुठली शंका देखील घेऊ शकलो नव्हतो. कारण आपण सामान्य माणसे असतो आणि दिसते त्यावर विश्वास ठेवत असतो. पण विश्वास असेल तरच विश्वासघात करता येत असतो ना? म्हणून मग शत्रू देशाला वा प्रतिस्पर्ध्याला आधी विश्वास संपादन करावा लागतो. हेरगिरीचे काम असेच चालते. आधी अशी माणसे तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सर्व मदत करतात आणि जवळीक साधतात. अगदी उपकार वाटावे इतकी मदत करतात. कधीकधी तुमच्या इच्छाआकांक्षा, हव्यास, स्वार्थ, रागलोभ हुडकून त्याला खतपाणी घालतात आणि तुमच्या मानसिकतेवर कब्जा मिळवतात. एकदा तुम्ही त्या जाळ्यात फ़सलात, मग तुम्ही त्याच्या हातची कठपुतळी बनून जाता. मगच तुमचा वापर त्याचे हेतू साध्य करण्यासाठी होत असतो. थोडक्यात कायद्याच्या वा नियमाच्या कुठल्याही निकषावर टिकणार नाही, असेच काम तो तुमच्याकडून प्रेमाने किंवा सक्तीने करून घेऊ शकत असतो. त्याचा तपशील उघड झाल्यावर आपण जागे होतो. ही कामे विभिन्न प्रकारची असतात. फ़क्त तुमच्या देशात घातपात, बॉम्ब फ़ोडणे इतकेच परकीय हस्तकाचे काम नसते. त्याखेरीज अनेक मार्गाने तुमच्या ज्या व्यवस्था, संस्था, जीवनशैली नियंत्रित करणार्‍या यंत्रणा आहेत, त्यात बिघाड करणेही शत्रूला लाभदायक असते. कारण त्यातून तुमचा समाज विस्कळीत होऊ लागतो. त्याला आपलीच सुरक्षा यंत्रणा धोकादायक वाटू लागते आणि देश, समाज किंवा राष्ट्र यातली एकजीवता धोक्यात येते. खिळखिळी होऊ लागते. जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हा तुम्ही आपला बचाव करायला नालायक होता आणि म्हणूनच समाज देशालाही वाचवण्याची इच्छा आकांक्षा गमावून बसता. परकीय हस्तक मायभूमीची  तीच अवस्था करून टाकतात, की तो लढायची इच्छा गमावून बसतो.

तुमच्या देशात तुमचे व्यक्तीगत संरक्षण कोणी करीत नाही. तुमच्या कुटुंब भावनांची कदर होत नाही. तुम्ही इथे सुरक्षित नाही, अशी धारणा जनमानसात रुजली, की देश खिळखिळा व्हायला सुरूवात होत असते. घरदार, गावेवस्त्या सोडून शेकड्यांनी लोक स्थलांतर करू लागतात व सुरक्षित जागा शोधू लागतात. काश्मिरमधुन लाखो हिंदू पडीत पळुन परागंदा झाले आहेत. मागल्या दोन वर्षात सिरीया, इराकमधून लक्षावधी नागरिक निर्वासित म्हणून सुरक्षित आडोसा शोधायला सहकुटुंब पळत सुटले आहेत. पण असे कुठे गुजरात दंगलीनंतर झाले होते काय? असे दादरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश वा अन्य कुठे भारतात घडले आहे काय? अगदी ज्या मुस्लिमांवर दंगलीतून अन्याय अत्याचार झाला असे म्हटले जाते, त्यांनी सहकुटुंब घरदार सोडून पळ काढलेला आहे काय? त्याचा अर्थ आजही अशा पिडीतांना भारतीय कायदे व सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास आहे. पण त्याचवेळी माध्यमापासून बुद्धीमंत यांच्यातला एक वर्ग तसा भयगंड निर्माण करण्यासाठी झटत आहेत. तेव्हा त्यामागचे उद्दिष्ट लक्षात घ्यावे लागते. असंहिष्णुता माजली असे म्हटले जाते आणि ती दिसत नाही, त्याची कारणमिमांसा म्हणून अगत्याची होऊन जाते. ज्यांच्यासाठी ही असंहिष्णुता असुरक्षितता आहे असे म्हटले जाते, ते सुखरूप विश्वासाने इथे जगत आहेत. पण त्यांना जो धोका नाही, तोच धोका असल्याचे त्यांच्या मनात भरवण्याच्या जोरदार मोहिमा मात्र राबवल्या जात आहेत. मग अशा मोहिमा चालवणार्‍यांच्या हेतूचा शोध घेणे अगत्याचे नाही काय? हा भयगंड उभा करून या संहिष्णुता पूजकांना साधायचे तरी काय, असा प्रश्न विचारणे भाग नाही काय? त्याचे उत्तर इथल्या नियम, संस्था व व्यवस्था खिळखिळ्या करणे इतकेच नाही काय? जनतेचा कायद्याच्या राज्यावरला विश्वास उडवून देण्यात लाभ समाजाचा असतो, की देशाच्या शत्रूचा असतो? त्यासाठी झटणारे समाजसेवक असतात की समाजाच्या शत्रूसाठी राबणारे लोक असतात? दहशतवादी हिंसेने भयगंड निर्माण करतात. त्यांच्यापेक्षा हिंसेविना भयगंड निर्माण करणारे अधिक दहशतवादी नसतात का? त्यांना देशहितवादी म्हणावे की दहशतवादी? दाऊद़चे घातपात आणि असंहिष्णूतेची मोहिम यातले परस्पर पुरक संबंध म्हणून ओळखता आले पहिजेत. (अपुर्ण)

4 comments:

  1. http://indianexpress.com/article/cities/pune/arundhati-gets-an-award-from-bhujbal-as-his-supporters-thrash-abvp-protesters/

    भाऊ,
    अरुंधती रॉय सारख्या 'हस्तकांना' ज्यांनी वेळोवेळी देशविरोधी वक्तव्ये केली, ज्या सैन्याबद्दल संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे त्या सैन्याला उद्देशून घाणेरडी वक्तव्ये केली, लोकशाही वर हल्ला करणाऱ्या देशविघातक शक्तींना पाठींबा दिला, उपेक्षित आणि दुर्लक्षित लोकांसाठी काम करताना ज्या 'समाज सुधारकांनी' फक्त स्वतःचेच खिसे भरले, अशा 'हस्तकांना' महात्मा फुले समता पुरस्कार मिळावा का?

    अशा व्यक्तींना असा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा अपमान नाही का?

    या विषयीचे तुमचे विचार ऐकु इच्छितो...

    ReplyDelete
    Replies
    1. Agree ..n not just that there Arundhati Roy says that Brahmins and Baniyas are the power centers and all divisions in this country are coz of them ....her anti Brahmin and pretended pro dalit agenda is evident ...

      Delete
  2. अचूक विश्र्लेषण! उगाच विचारवंत म्हणून कशाचेही भाष्य करत सुटणार्यांच्या हेतूकडे डोळसपणे पाहणे आवश्यक बनले आहे.

    ReplyDelete