Wednesday, November 18, 2015

खरे घातपाती आपल्याच आसपास



काही गोष्टी आपल्याला दिसत असतात, पण त्याचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नसतो. म्हणून आपण त्याविषयी गोंधळलेले असतो. अशा अनेक गोष्टी जाणिवपुर्वक घडवलेल्या असतात आणि त्यातली गुंतागुंत आपल्याला उलगडत नसल्याने, त्याचे अर्थ आपल्याला लागत नाहीत. धोकादायक असूनही आपण त्याविषयी गाफ़ील रहातो. अनेकदा तर आपल्यालाही आत्मनाशासाठी प्रवृत्त केले जात असते. आपण चांगुलपणाच्या आहारी जाऊन डोळसपणे आपल्याच हानीसाठी हातभार लावत असतो. काही महिन्यांपुर्वी याकुब मेमन या घातपात्याच्या फ़ाशीवरून देशात मोठा तमाशा झाला, तेव्हा अहोरात्र लढणारे बुद्धीमान वकील फ़ाशी या अमानुष शिक्षेच्या विरोधात लढत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. इतके मोठे नावाजलेले वकील कधी कुठल्या सामान्य नागरिकाच्या अन्यायाला वाचा फ़ोडण्यासाठी एकत्र आलेले वा लढलेले आपण बघितलेले नाहीत. मग गुन्हा सिद्ध झालेल्या एका खतरनाक आरोपीसाठी त्यांनी आपली सर्व शक्ती कशाला पणाला लावलेली असते? हा प्रश्न आपल्याही मनात उदभवतो आणि आपल्याला बुचकळ्यात टाकतो. मात्र त्याचा खुलासा वा उत्तर कुठूनही मिळत नसल्याने आपण त्या प्रश्नाकडेच पाठ फ़िरवतो. म्हणून प्रश्न संपत नाही, की त्यातून येऊ घातलेला धोका संपत नाही. पॅरीस वा मुंबई हल्ल्याने तेच आपल्याला सांगितले व समजावले आहे. पण आपण त्यातले काही समजून घ्यायला कितीसे तयार असतो? पॅरीसच्या हल्ल्यानंतर जी२० राष्ट्रांच्या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडेच जगाच्या नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पैसा, आडोसा आणि शस्त्रास्त्रे यापासून जिहादींना वंचित करायला जग एकत्र आले, तरच ह्या हिंसाचाराचा बंदोबस्त होऊ शकेल असेच मोदी कशाला म्हणाले? त्याचा माध्यमातून कितीसा उहापोह झाला आहे?

पॅरिस असो किंवा मुंबई असो, त्या हल्ल्याचे, त्यातल्या भीषणतेचे भयंकर वर्णन आपल्याला माध्यमातून ऐकू येते, बघायला मिळते. त्यातल्या आरोपी वा संशयितांची खुप माहिती दिली जाते. पण त्यांचे धागेदोरे कधी उलगडून सांगितले जात नाहीत. कारण तोच खरा रोग आहे. आपल्याला रोगाचा बळी दाखवला जातो, पण त्याची लक्षणे जाणिवपुर्वक लपवली जातात. माहिती देण्याच्या आवेशात बोलणारे, लिहीणारी माध्यमेच आपल्यापासून महत्वाची माहिती लपवित असतात. किंबहूना आता माध्यमांचा वापर माहिती लपवायला वा दिशाभूल करायला होत असतो. म्हणून माध्यमांनी याकुबला फ़ाशीतून वाचवायला निघालेल्यांचे बाकीचे तपशील आपल्यासमोर कधी उघड करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा महागड्या वकीलांना कोणी किती पैसे दिले आणि त्यांनी कशासाठी याकुबचा बचाव मांडला होता? अन्य कित्येक लोक फ़ासावर लटकले आहेत, तेव्हा यापैकी कोणी इतक्य़ा टोकाला जाऊन बचावाचा आटापिटा केलेला नव्हता. मग याकुबची वकीली करणे हा गुन्हा आहे काय? अजिबात नाही. पण त्यातला तत्वाचा आव निव्वळ ढोंग आहे. याकुब असो किंवा कसाब त्यांचे बोलविते धनी भलतेच असतात. घातपाती व देशद्रोही विविध रुपात भिन्न स्तरात काम करीत असतात. त्यात जसा गुंड गुन्हेगारांचा समावेश असतो, तसाच अतिशय प्रतिष्ठीत म्हणून समाजात वावरणार्‍यांचाही समावेश असतो. असे नावाजलेले लोक हाताशी धरून गुन्हेगारी व घातपाती कृत्ये करणार्‍यांना सुरक्षा कवच बहाल केलेले असते. थोडक्यात अशा प्रतिष्ठीतांना घातपाती गुन्हेगारांचे सहप्रवासी म्हणता येईल. एक गट भूमीगत अनोळखी वा अप्रतिष्ठीत राहुन काम करीत असतो, तर दुसरा गट प्रतिष्ठीत राहुन त्याला विविध प्रकारची रसद पुरवणे, बचाव मांडणे असे काम करत असतो. हे दुसरे काम अतिशय समाजविघातक असते.

घातपाती तुमच्याआमच्या जीवावर हल्ला करीत असतो. पण त्याच्या विरोधात समाजाने संयुक्त वा सामुहिक प्रतिकाराला सज्ज होऊ नये, याची काळजी त्याचे मान्यवर साथीदार घेत असतात. उदाहरणार्थ मुंबईत कसाब टोळीने हल्ला केल्यावर सामुहिक प्रतिक्रीया उमटण्याचा धोका असतो, तेव्हा हे लोक शांततेचे आवाहन करण्यात आघाडीवर दिसतील. हिंसेला हिंसा हे उत्तर नाही, तर मेणबत्त्या लावून वा ठराविक जागी प्रतिकात्मक फ़ुलांचे गुच्छ ठेवून आपण ‘शौर्य’ सिद्ध करतो, असा भ्रम फ़ैलावण्याचे काम हे मान्यवर करीत असतात. थोडक्यात माणसातील उपजत सुरक्षेची व सावधानतेची असलेली जाणिव निष्क्रीय व निकामी करण्याची कामगिरी घातपात्याचे समाजातील मान्यवर साथीदार पार पाडत असतात. म्हणूनच मुंबईत रझा अकादमीने दंगल माजवल्यानंतर संयम शांततेचे आवाहन करणारे दादरीच्या तुलनेने किरकोळ घटनेचे मोठे अवडंबर माजवताना दिसतील. नक्षलवाद्यांनी हिंसा केल्यावर ते कुणा मृताच्या सांत्वनाला जाणार नाहीत. पण त्यातला कोणी मारेकरी पकडला गेल्यास त्याच्यावरच अन्याय झाल्याचा ओरडा करताना दिसतील. समाजाच्या विविध घटकात व क्षेत्रात प्रतिष्ठीत म्हणून मिरवणार्‍या अशा लोकाचे परस्पर संबंध सामान्य माणसांना ठाऊक नसतात. ते उघड करण्याची जबाबदारी असलेली माध्यमे त्यावरचा पडदा कधी उठवत नाहीत. कोणी उठवायचा प्रयत्न केला, तरी त्याला प्रसिद्धी दिली जात नाही वा त्याच्याच विरोधात काहूर माजवले जात असते. कारण ही मोठी गुंतागुंतीचे साखळी असून त्यांनी देशाची सुरक्षा व समाजाची मानसिकता यांनाच सुरूंग लावला आहे. त्याचे धागेदोरे अशा विविध मान्यवरांच्या संस्था, त्यांना मिळणारा निधी, त्या निधीचे देणगीदार इत्यादींचे साटेलोटे असते. ते परस्पर पुरक भूमिका पार पाडत असतात. आपल्याला दिसतो केवळ घातपाती वा जिहादी!

मोदींनी जी२० परिषदेत जिहादच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा व जगभर दहशतवादाची एकमेव व्याख्या असण्याचा आग्रह धरला. खेरीज प्रगत देशांनी व जगाने एकत्र येऊन अशा हिंसाचाराचा एकजुटीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्याचे कारण खुद्द मोदीच मागल्या बारा चौदा वर्षातले अशा दहशतवादाचे मोठे बळी आहेत. गुजरात दंगलीचे जे काहुर माजवण्यात आले. त्याची गुंतागुंत उलगडायला गेल्यास जगभरच्या दहशतवादी हिंसाचाराचे मोठे षडयंत्र उघडकीस येऊ शकते. माध्यमातले हस्तक पत्रकार, शत्रू देशाचे हेरखाते, विविध देशातील फ़ौंडेशन व त्यांचा निधी, त्यांच्याच आश्रयाखाली पोसलेल्या शेकडो एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्था आणि त्यांनी जोपासलेले जागतिक हिंसाचाराचे कारस्थान, गुजरात दंगलीनंतर अधिक सुसंघटित होऊन कामाला लागलेले होते. तसे नसते तर महिनाभर आधी पुरस्कार वापसी नावाचे चाललेले नाटक बिहारच्या निकालानंतर बंद कशाला पडले असते? फ़ोर्ड फ़ौंडेशनकडून अशा हजारो संस्थांना येणारा निधी मोदी सरकारने बंद केल्यावरच देशात असंहिष्णूता पसरल्याचा गवगवा कशाला सुरू झाला असता? छोटा राजनला हिंदू म्हणून संरक्षण आणि मुस्लिम गुन्हेगारांना पक्षपाती वागणुक, असे विधान कॉग्रेसनेते शकील अहमद यांनी कशाला केले असते? मोदी इंग्लंडमध्ये गेले असताना अम्नेष्टी इंटरनॅशनलने त्यांच्या विरोधातली निदर्शने कशाला योजली असती? आपल्याजवळ आसपास प्रतिष्ठीत म्हणुन वावरणारे हे घातपाती खर्‍या जिहादी वा हल्लेखोरांपेक्षा अधिक घातक असतात. कारण येऊ घातलेल्या धोक्यापासून आपल्याला गाफ़ील ठेवण्याची दगाबाजी हेच लोक करत असतात. आपण जोवर अशा उजळमाथ्याने वावरणार्‍यांना ओळखून बहिष्कृत करणार नाही, तोवर कितीही पोलिस, सैन्य वा शस्त्रे आपल्याला सुरक्षित करू शकणार नाहीत.

2 comments:

  1. डाव्या ढोंगी दहशतवादाचे प्रताप मोदींनी सहन केले आहेत हे निरीक्षण अचूक आहे ! गुजरात दंगलीनंतर जणू काय मोदी म्हणजे मुस्लिमांना मारणारे हत्यारे अशाप्रकारच्या प्रतिमा रंगवल्या गेल्या. या प्रकारच्या दहशतवादाची अजून काही उदाहरणे म्हणजे :
    १. चीनने भारतावर आक्रमण केले ते लोकयुद्ध होते असे म्हणणे ...
    २. नक्षलवादी भूमिका बरोबर आहे असा सूर लावणारी पुस्तके लिहून पुरस्कार मिळवणे...
    ३. अणु प्रकल्प अमेरिकन कंपनीचा असेल तर विरोध , रशियन असेल तर समर्थन...
    ४. भारताने म्यानमार मध्ये लष्करी कारवाई केली की भारत युद्धखोर होत असल्याची अवी उठवणे...
    ५. हल्लीचं उदाहरण म्हणजे - अखलाखला बघायला झुंडीने जाने, कर्नल महाडिकांना साधी मानवंदना द्यायचे कष्ट ण घेणे !!

    ReplyDelete
  2. नक्षलवादी आणि कम्युनिष्ट विचारवंत असाच खेळ खेळत असतात.मेधा पाटकर जेव्हा नक्षलविरोधी कारवाईविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा या विष्लेषणाची प्रचिती येते.

    ReplyDelete