सध्या कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे एका खटल्यात फ़सले आहेत. खटला राजकीय असता तर गोष्ट वेगळी! पण हे प्रकरण व्यक्तीगत व मालमत्ताविषयक आहे. त्या मालमत्तेसाठी पक्षाचा पैसा वापरला गेला आणि गैरलागू व्यवहार झाल्याचा आरोप करीत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तो खटला भरलेला आहे. त्याचे समन्स आल्यावर तमाम कॉग्रेसजन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राने कसे देशकार्य केले, त्याचाही हवाला देत असतात. पण हे देशकार्य करणारे तेच एकमेव वर्तमानपत्र नव्हते आणि ते चालवणार्याचा फ़क्त मालमत्तेतलाच वारसा मागण्याला देशहित म्हणता येत नाही. कारण जरी राहुल सोनियांच्या पुर्वजांनी हे वर्तमानपत्र सुरू केले व चालवलेले असले, तरी त्या पुर्वजांनी त्यांना अन्यवेळी कधी आठवण झाल्याचे दिसत नाही. सरसकट असे सांगितले जाते, की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले होते. पण त्याचा पहिला व्यवस्थापकीय संचालक कोण होता, त्याबद्दल धुर्तपणे मौन पाळले जाते. वास्तविक तोच खरा या मायलेकरांचा मूळचा पुर्वज होता. त्याचे नाव फ़िरोज जहांगीर गांधी. ज्याचे नाव घेऊन आज ही मंडळी नेहरूंचा वारसा चालवित आहेत. फ़िरोज गांधी हे नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधी यांचे पति. अधिक राजीव गांधी यांचे पिता होत. कधी आपण आजच्या वारसांकडून फ़िरोज गांधींचे नाव तरी ऐकतो काय? त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव ऐकतो काय? कसे ऐकणार? तो वारसा देशातून भ्रष्टाचार निपटून काढण्याचा व त्यासाठी साक्षात सासर्याच्या सत्तेला आव्हान देण्याचा होता. मालमत्ता व सत्तेवर हक्क सांगण्याचा वारसा नव्हता. मग राहुलना आपला आजोबा किंवा सोनियांना सासरा कशाला आठवणार? त्याचा वारसा सांगायचा तर रॉबर्ट वाड्राचे काय करायचे असा प्रश्न उभा राहिल ना?
नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र फ़िरोज गांधी व चलपती राव यांनी सुरू केले आणि तिथून त्याची मालकी गांधी घराण्याकडे आली. फ़िरोज गांधी यांनी अविष्कार स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा लढा दिलेला होता. तेव्हा १९५५ सालात रायबरेली येथील खासदार असलेल्या फ़िरोज गांधी यांनी डालमिया-जैन कंपनीने विमा निधीमध्ये जी भयंकर अफ़रातफ़र केली, त्याच्या विरोधात जबरदस्त आवाज उठवला होता. त्यामुळे शेवटी त्यांचेच सासरे असलेल्या नेहरूंचे सरकार कमालीचे गोत्यात आले होते. त्याला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात चौकशी करून खटले भरावे लागले होते. त्यातून मग आयुर्विमा कंपन्यांना लगाम लावून सरकारी मालकीची भारतीय आयुर्विमा म्हणजे लाईफ़ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. त्याखेरीज मुंदडा हे त्यावेळचे गाजलेले भ्रष्टाचार प्रकरणही फ़िरोज गांधी यांनीच चव्हाट्यावर आणले आणि त्यात नेहरूंचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या टी टी कृष्णम्माचारी यांना राजिनामा द्यावा लागला होता. हा गांधी घराण्याचा खरा वारसा होता. सत्ताधारी पक्षाचे असूनही सोनियांच्या या सासर्याने भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली होती. संसद दणाणून सोडली होती. आजही त्यांचेच वारस संसद दणाणून सोडत आहेत. पण नेमक्या उलट्या कारणासाठी! फ़िरोज गांधींचेच वारस आपल्याच भ्रष्टाचार व पापांवर पांघरूण घालण्यासाठी संसदेला ओलिस ठेवत आहेत. किती भयंकर विरोधाभास आहे ना? म्हणून त्यांना आपला हा पुर्वज आठवत नाही, की त्यांच्या आश्रयाखालच्या नव्या कॉग्रेसला आपल्याच पक्षाचा हा गांधी घराण्याचा पुर्वज आठवणेही भयावह वाटत असावे. नॅशनल हेराल्डपासून संसदेपर्यंत कुठेही फ़िरोज गांधी हे नाव घ्यायला कोणी धजावत नाही. इंदिरा, राजीव आठवतात. पण खरा पूर्वज आठवत नाही, ज्याच्यामुळे नेहरूंच्या या वारसांना गांधी हे आडनाव प्राप्त झाले. किंबहूना इतिहासात त्याला खोल गाडून टाकलेले आहे.
२०१२ सालात देशात युपीएची सत्ता होती आणि सोनिया गांधींच्या इशार्यावर संपुर्ण भारत सरकार कठपुतळीप्रमाणे नाचत होते. तेव्हाच फ़िरोज गांधी यांची जन्मशताब्दी झाली. पण त्याचे स्मरण या सुनेला झाले नाही, की नातवाला झाले नाही. मग त्यांच्या आश्रितांना फ़िरोज गांधी कशाला आठवणार? आठवण दूरची गोष्ट झाली. त्या नावाने वा त्याच्या इतिहासाच्या नुसत्या स्मरणानेही या वारसांना घाम फ़ुटू शकतो. कारण फ़िरोज गांधी म्हणजे भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ होता आणि आपल्याच पक्षाच्या भ्रष्ट गैरलागू धोरणावर तुटून पडणारा झुंजार नेता होता. आपल्याच लोकप्रिय सासर्याला कोंडीत पकडण्याइतका प्रामाणिक नेता असलेला फ़िरोज गांधी, या वारसांना कसा रुचावा किंवा पचावा? म्हणून राजीव, इंदिरा वा जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने करोडो रुपये उधळणार्या सोनियाप्रणित युपीए सरकारने फ़िरोज गांधी नामक कर्तबगार सासर्याची जन्मशताब्दी असतानाही त्याचे कुठले स्मरण केले नाही. त्याच्या नावाने कुठली योजना वा स्मारक उभे केले नाही. पण त्याच दरम्यान त्या सासर्यामुळे मिळू शकणार्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याच्या हालचाली अगत्याने केल्या. याला कॉग्रेसनिती वा पुरोगामी वारसा म्हणतात. त्याहीपेक्षा मोठी शरमेची गोष्ट म्हणजे त्या जन्मशताब्दी वर्षात देशामध्ये अण्णा हजारे वा जनलोकपाल आंदोलन ऐन भरात होते. तो खरेतर फ़िरोज गांधी यांचा वारसा होता, जो अण्णा हजारे चालवित होते आणि त्यांची गळचेपी करण्याचा उद्योग फ़िरोज गांधींचे व्यक्तीगत कौटुंबिक वारस करीत होते. यासारखी गांधी नावाची वा वारश्याची सर्वात भीषण विटंबना नसेल. कारण स्वतंत्र भारतात ज्याने सर्वात पहिली भ्रष्टाचार विरोधी मोहिम छेडली, त्याच्याच आजच्या वारसांवर भ्रष्टाचाराचे भयंकर आरोप होऊन सत्ता डळमळीय झालेली होती. मग वारसा कशाला म्हणायचे? भ्रष्टाचारमुक्तीला की भ्रष्टाचाराला?
आज राहुल गांधींचे वय आहे त्याच वयात फ़िरोज गांधी यांचे अकाली निधन झाले आणि पुढे सहसा कोणी कॉग्रेसजनाने त्यांचे नाव कधी घेतले नाही. त्यापेक्षा इंदिरा गांधी आपल्या पित्याचा वारसा सांगत जगल्या किंवा फ़िरोज गांधी हे नावापुरते त्या कुटुंबात उरले. नाही म्हणायला संजय गांधी यांच्या अकाली अपघाती निधनानंतर त्यांना पुत्ररत्न लाभले. तेव्हा घाकट्या सुनेने म्हणजे मनेका गांधी यांनी पित्याचे छत्र हरपलेल्या आपल्या नवजात पुत्राला आजोबाचे नाव ठेवले. आज सुलतानपूर येथून लोकसभेत निवडून आलेले भाजपाचे आमदार वरूण गांधी, यांचे वास्तविक नाव वरूणफ़िरोज असे आहे. तितकीच आता फ़िरोज गांधी यांची ओळख या घराण्यात राहिली आहे. पण त्यांच्या मालमत्ता व संपत्तीविषयक वारशात मात्र राहुल व सोनिया हिरीरीने पुढे आहेत. नॅशनल हेराल्ड हे त्याचे उदाहरण! कारण ते वर्तमानपत्र ही कौटुंबिक मालमत्ता होती. ती कौटुंबिक मालमत्ता ज्याच्यामुळे होती, त्याचे मात्र नावही यांना नको आहे. त्याचे स्मरणही नको आहे. कारण त्याचा वारसा निर्विवाद स्वच्छ चारित्र्याचा व भ्रष्टाचार विरोधी होता व आहे. मग राहुल-सोनियांना तो पुर्वज कशाला हवा असेल? आजच्या कॉग्रेसला गांधी घराण्यापासून वेगळे काढता येणार नाही असे कालपरवाच आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीतून शरद पवार यांनी सांगितले. पण त्यांना तरी कुठे फ़िरोज गांधी यांचे नाव घ्यायची बुद्धी झाली? फ़िरोज गांधी हे स्वच्छ चारित्र्याचे नाव आहे. त्याचा वारसा म्हणून त्याचेच नाव वापरणार्यांच्या कारकिर्दीत लाखो कोटीचे घोटाळे झाले आणि सामान्य जनतेची लूट झाली. तर तो वारसा मुंदडा, कृष्णम्माचारी, डालमियांचा असतो, ज्यांना फ़िररोज गांधी यांनी उघडे पाडले वा गजाआड जायची वेळ आणली. आजच्या पिढीला हे सर्व सांगायची जबाबदारी ज्या माध्यमांची आहे, त्यांनाही अविष्कार स्वातंत्र्याची लढाई लढलेला आपला हा पुर्वज कुठे आठवतोय? सर्वांना मालमत्तेचा वारसा हवाय, गुणवत्ता चारित्र्याचा वारसा हक्क हल्ली बेवारस मरून पडलाय. त्याला कोणी वारस उरलेला नाही.
उत्कृष्ठ विवेचन आजच्या पिढीला ह्या नावा बद्दल कदाचीत माहिती नसेल कारण यांचेच वारस यांना सोईस्कर विसरलेले असल्याने सर्वसामान्यांना याबद्दल काही सोईरसुत्तक नाही राहीला विषय गांधी या नावाचा तर आपल्या लेखनातुन या व्यक्तिमत्वानेच या शब्दाला न्याय दिल्याचे जानवते बाकी सर्वांनी फक्त राजकीय फायद्यासाठीच गांधी नावाचा उपयोग करून घेतलेला दिसतो सोनिया अँड राहूल इज ए कॉंग्रेस अशी विद्यमान कॉंग्रेसजनांची कल्पना असल्यामुळे ते सांगतील ती पुर्वदिशा या पध्दतीने त्यांची संसद व बाहेर वर्तवणूक दिसत आहे.मुळातच राजकुमारांसाठी प्रणव मुखर्जी सारखे अभ्यासु आणि अनुभवी मानसाला पध्दतशीरपणे दुर केले गेले बिहार मधील निवडणूकीतील विजयामुळे राजकुमार सध्या संसदेत आणि बाहेर भलतेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे व तस त्यांनी राहव असा त्यांचे अवतीभवती असलेल्या कंपुचा आग्रह आणि सल्ला पण असेल कदाचीत पंरतु बिहारमधील विजयात यांचा किती वाटा आहे हे यांना कोण सांगणार यांचे वर्तवणूकीवरून राजकारणातली प्री मॅच्युर डिलेव्हरी म्हणने अतिशयोक्ती पणाचे नाही ठरणार असो सासु आणि सासरे यांची सोइस्कर आठवण आणि विसर या बद्दल आपल्या विश्लेषणाला अभिवादन
ReplyDeleteनवरा मेला(सत्ता) त्याच दुःख नाही पण सवत(भाजप) रंडकी झाली त्याचा आनंद आहे......काँग्रेस(पप्पू)
Deleteभाऊ, सुलतानपुर मधून खासदार म्हणुन निवडून आलेत. वरुण गांधी...चुभुदेघे
ReplyDeleteउत्तम लेख...!!!
ReplyDeletehttp://goo.gl/hTkfGy
अप्रतिम व उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद.
ReplyDeleteAny idea what happened to Varun Firoz Gandhi? Can any Newspaper has guts to expose that?
ReplyDeleteBhau, why your articles in these blogs are not available in Hindi and English so as to reach readers outside Maharashtra and naturally its impact would be far wider.
ReplyDeleteभाऊ, मलाही असेच वाटते. तुम्ही केलेले भाष्य, त्यात दिलेले संदर्भ, ऐतिहासिक दाखले हे केवळ महाराष्ट्रापुरते किंवा मराठी जनांपुरते मर्यादित नसते. तुमच्या विवेचनाचा आवाका खूप मोठा आहे. अनेकदा आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही अचूक भाष्य करीत असता. त्यामुळे तुमचे लिखाण हिंदी तसेच इंग्रजी भाषेतही यावे, असे मला वाटते.
ReplyDelete‘अवघे शहाणे करून सोडावे सकळ जन…’, असाच तुमचा हेतू असेल तर इतर भाषकांनी या विवेक आणि विचाराला चालना देणाऱ्या लेखनापासून वंचित का रहावे?
आपल्याकडे अससेल्या कामाचा व्याप माहित असतानाही मी तुम्हाला अशी सूचना करीत आहे, याचे भान मला आहे. पण तरीही आपण जमल्यास यासाठी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.