Wednesday, December 23, 2015

बुडत्याला ‘हवाला’चा आधार



काही शब्द मेंदू वा बुद्धीला गुंगी आणणारे असतात. म्हणजे असे, की ते उच्चारले मग तुमचा मेंदू त्याचा नेमका अर्थ ओळखू शकत नाही. किंबहूना त्याचा योग्य संदर्भातला अर्थ तुमच्या लक्षात येऊ नये, अशाच हेतूने अशा शब्दांचा वापर झालेला असतो. उदाहरणार्थ फ़ुले, शाहू आंबेडकर ही शब्दावली सहजगत्या वापरली जाते. पण त्याचा अर्थ ती उच्चारणार्‍यालाही कितीसा ठाऊक असतो? पण महाराष्ट्रात असे म्हणायच्या ऐवजी ‘फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात’ अशी शब्दावली उठसुट बोलली जाते. उंच दहीहंड्या बांधून नटनट्या नाचवण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या ठाण्याच्या जीतेंद्र आव्हाड यांचा पुरोगामी चळवळीशी संबंधच काय? पण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरद पवार यांनी आव्हाड ‘फ़ुले शाहू आंबेडकरांचे’ कार्य पुढे नेत असल्याचे प्रतिपादन केले होतेच ना? तर त्यामागे लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू असतो. असेच अनेक शब्द वा शब्दावली निर्माण केल्या जातात वा त्यांचा सरसकट वापर होत असतो. कधी त्यातून उदात्त भाव तुमच्या मनात निर्माण होतात, तर कधी अत्यंत तिरस्कृत भावना उत्पन्न होते. मात्र खरेच तसे काही आहे काय, याचाही विचार करायचे तुम्ही विसरून जाता. वाळूमाफ़ीया, पाणीमाफ़ीया असे शब्द योजले जातात, तेव्हा माफ़ीया शब्दाची जाणिवपुर्वक योजना केलेली असते. कधी वासनाकांड किंवा समता-बंधूता हे शब्द येतात. पण ज्या कारणस्तव त्याचा उपयोग केलेला असतो, तिथे त्यांचा अजिबात संबंध नसतो. पण तो असल्याचा समज निर्माण करायचा असतो आणि तो तपासण्याची शुद्ध तुमच्या मेंदुला राहू नये, यासाठीच अशी शब्दावली योजलेली असते. हवाला किंवा प्रतिगामी हेही असेच निरर्थक झालेले गुळगुळीत शब्द आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर बोलताना लालकृष्ण अडवाणींच्या हवाला प्रकरणाचा संदर्भ दिला, तो लक्षात घेण्याची गरज आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर दिल्ली क्रिकेट संघटनेच्या कारभारात घोटाळा केल्याचा आरोप करून राजिनाम्याची मागणी केलेली आहे. बाकी काही हाताशी नसल्याने अन्य विरोधकही त्याच काडीचा आधार घेऊन बुडताना तरंगण्याची केविलवाणी धडपड करू लागले आहेत. त्याच संदर्भात भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात जेटली सुद्धा अडवाणींप्रमाणे या बालंटातून बाहेर पडतील असे मत पंतप्रधानांनी मांडले. त्याचा अर्थ दोन दशकापुर्वीच्या हवाला कांडातून अडवाणी जसे निर्दोष ठरले, तसेच जेटलीही निरपराध ठरतील, हे मोदींना सांगायचे आहे. पण त्यांनी हवालाचा उल्लेख केला म्हटल्यावर विरोधकांनी तोच शब्द पकडला आहे. कारण अडवाणींच्या हवाला प्रकरणाचा तपशील आजच्या पिढीला नेमका ठाऊक नाही, पण लोकांची दिशाभूल होऊ शकते इतकाच त्यामागचा हेतू आहे. अडवाणी हवाला प्रकरणातून सुटले म्हणजे काय? त्यात एकटे अडवाणी फ़सलेले नव्हते. अल्पमतातले सरकार चालवताना कॉग्रेसचे पंतप्रधान नरसिंहराव यांनीच आपल्या पक्षांतर्गत व विरोधातील नामवंत नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी रचलेला तो सापळा होता. काश्मिरात जिहादी घातपाती पकडले गेले, त्यांच्या जबानीतून जैन बंधूंचे हवाला प्रकरण समोर आले. त्यात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यातील एका पानावर अनेक बड्या नेत्यांची नावे सांकेतिक पद्धतीने लिहीली होती. तर त्या विविध पक्षातील नेत्यांना जैनबंधूंनी दिलेली ती लाच असल्याचा गुन्हा सीबीआयने नोंदवला. त्यात मग त्या नेत्यांना आरोपी बनवले गेले आणि राजकारणातून त्या नेत्यांना बदनाम करण्यात आले. मात्र पुढे खटला चालवण्याचे कष्ट सीबीआयने घेतले नाहीत. पण त्यात फ़सलेल्यांना आधीच आपल्या पदाचे राजिनामे देण्याचा आग्रह धरून बदनाम करण्यात आलेले होते.

अडवाणी तेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते आणि लोकसभेतील नेताही होते. त्यांनी लोकसभेचा व अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आणि निर्दोष ठरण्यापर्यंत निवडणूक लढवणार नाही, असा निर्धार केला. माधवराव शिंदे, विद्याचरण शुक्ला, नारायण दत्त तिवारी या कॉग्रेस नेत्यांसह दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री मदनलाल खुराणा इत्यादींनी आपल्या पदाचे राजिनामे दिले. बस्स! पुढे सीबीआय थंडावली. म्हणून अडवाणींनी आपला खटला लौकरात लौकर चालवावा यासाठी हायकोर्टात धाव घेतली. आपल्यावर असलेल्या आरोपाची सुनावणी अडवाणींमुळे वेगाने होऊ शकली आणि निष्पन्न काय झाले होते? त्या सगळ्या हवाला प्रकरणातली हवाच निघून गेली होती. न्यायमुर्ती महंमद शमीम यांनी तो खटलाच उचलून कचर्‍याच्या टोपलीते फ़ेकून दिला होता. कारण ज्या ‘भक्कम’ पुराव्याच्या आधारावर इतके मोठे प्रकरण समोर आले होते, त्याला पुरावा म्हणून स्विकारणेही अशक्य असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला होता. जैनबंधू वा त्यांच्या डायरीसह कुठल्याही कागदावर सांकेतिक भाषेत वा शब्दात कोणाची नावे लिहीलेली असली, म्हणून तो भ्रष्टाचाराचा पुरावा होऊ शकत नाही. पैशाची देवाणघेवाण झालेली असायला हवी. त्याखेरीज संबंधित व्यक्तींचे काही व्यवहारी संबंध फ़िर्यादीला सिद्ध करता आले पाहिजेत. अन्यथा कोणीही कुठल्याही कागदावर काही खरडले, म्हणून भ्रष्टाचाराचा पुरावा ठरवता येत नाही, असा निर्वाळा त्याच निकालाने दिला होता. केजरीवाल कुठल्याही डायरी वा कागदावर मोदींचे नाव आणि त्याच्या पुढे आकडे लिहीतील, म्हणून तो भ्रष्टाचाराचा लाचखोरीचा पुरावा होत नाही. तशीच ती कहाणी होती. जशी नितीन गडकरी यांच्यावरील फ़ुसक्या आरोपात केजरीवाल यांची कहाणी बिनबुडाची होती. म्हणूनच मूळ खटलाच नाकारून न्या. शमीम यांनी अडवाणी यांची निर्दोष मुक्तता केलेली होती. हवाला प्रकरण म्हणजे खोट्या आरोप व खटल्यांचा बोजवारा असा त्याचा वास्तविक अर्थ आहे.

इथे हवालाचा उल्लेख मोदींनी केला म्हणजे अडवाणींप्रमाणे जेटलींनीही राजिनामा द्यावा, असे सुचवण्यात आल्याचा दावा कॉग्रेस व मार्क्सवादी सीताराम येच्युरी करतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. अडवाणी यांचा राजिनामा कोणी मागितलेला नव्हता. त्यांनी आपले निरपराधीत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:च राजिनामा दिलेला होता. तोही कुणी आरोप केले म्हणून नाही, तर त्यांच्या विरोधात स्पेशल कोर्टात आरोपपत्र दाखल झाले म्हणून राजिनामा दिलेला होता. जेटली यांच्यावर कुठल्या कोर्टात आरोपपत्र दाखल झालेले नाही, की तशी सुरूवातही झालेली नाही. उलट आपल्यावर खोटे आरोप झाल्याबद्दल त्यांनीच केजरीवाल यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. तेव्हा राजिनाम्याचीच गोष्ट असेल, तर अडवाणींचे अनुकरण केजरीवाल यांनी करायला हवे. कारण गडकरी प्रकरणात केजरीवाल यांचे आरोप निव्वळ बिनबुडाचे व खोटारडे असतात, हे सिद्ध झालेले आहे. म्हणूनच हवाला प्रकरणाचा पुरस्कार करणार्‍यांनी केजरीवाल यांचा राजिनामा मागितला पाहिजे. दुसरी गोष्ट मोदींनी अडवाणी यांचा संदर्भ दिला आहे, तो खोट्या आरोपाशी संबंधित आहे. तेव्हा अडवाणी यांना राजकीय हेतूने खोट्या आरोपात गुंतवण्यात आलेले होते आणि तोच खोटेपणा सिद्ध करून अडवाणी राजकारणात परत आलेले होते. इथे सीबीआयने केजरीवाल यांच्या विश्वासू अधिकार्‍याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई आरंभली आहे. म्हणूनच केजरीवाल तितकेच दोषी ठरतात. इतक्या भ्रष्ट अधिकार्‍याला मोक्याच्या जागी आणून बसवण्याचे प्रायश्चीत्त म्हणून त्यांनीच राजिनामा देवून गंगास्नान करण्याची गरज आहे. पण स्वभावत:च कांगावखोरी अंगी भिनलेली असल्याने, त्यांच्या अनुयायांनी राजिनामा मागत जेटलीच्या घरासमोर तमाशा चालविला आहे. बाकीच्या विरोधकांना बुडताना ‘हवालाची काडी’ आधार म्हणून मिळाल्यासारखे वाटत असेल तर नवल नाही.

5 comments:

  1. आम आदमी पार्टीचे भ्रष्टाचार विरोधतली पार्टी म्हणून घेण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात मीच तो प्रामाणिक बाकी सर्व चोर मुळातच कोणावर खोटे आरोप करतांना कुठलेही आधारहीन कागदपत्र मिडीया समोर दाखवून काल्पनीक आरोप करून हा माणून याचे अनुयायी मोकळे होऊन जातात ब-याचदा हे लोक तोंडघशी पडलेले आहेत या लोंकाचे नौटंकी राजकारणाचा आणि यांना मिळालेल्या मिडीया कव्हरेजचा आता कंटाळा आलेला आहे आणि विश्वासहर्ता तर राहीलेलीच नाही एकदम हेकेखोर मानूल कायदा व्यवस्था याचा दावनीला बांधलेली असल्यागत वागतो आणि नेहमीच स्रीयां सारखे बोट मोडीत असतो यांचा सर्वच प्रकार नौटंकी आहे मग यांचे राजकारण असो किंवा खोकलणे हा माणूस पुरषार्थहीन वाटतो उठसुठ आरोप करण्या पलीकडे याचा केड कुठलाच प्रोग्राम नाही एकीकडे विरोधंकावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतांना दुसरीकडे आपल्याच भ्रष्ठ अधिका-यांचा पाठीशी उभा राहतो हा दुटप्पीपणा यांनाच शोभतो हे आणि यांचा पक्ष हे अपरिपक्व लोकांचा समुह वाटतो यांचे आरोप फक्त बिकाऊ मिडीयासाठी ब्रोकींग न्यूज ठरतात दुसर कोणी यांना आता गांभीर्याने घेत नाही.

    ReplyDelete
  2. पुरोगामी म्हणजे बद्दलत्या काळानुसार सामाजीक ऐकतेसाठी झटणारा किंबहुना लढणारा.पण आज हा शब्द मेंदू वा बुद्धीला गुंगी आणणाराच आहे.कारण
    ब्राह्मण विरूध्द मराठा,मराठा विरूध्द दलित, दलित विरूध्द ब्राह्नण असे बिंज पेरणारे स्वतःला पुरोगामी म्हणतात. जाती,जातीतील लोकाना विभक्त करणे म्हणजे काय?
    भाऊ आपले लेख वाचुणच लिखानाची प्रेरणा मिळते,व
    खरी सामाजीक स्थितीही लक्ष्यात येते.
    जय श्रीराम

    ReplyDelete
  3. निरपेक्ष प्रेम, देश प्रेम, पाप, पुण्य,धर्म, ह्यासारखे शब्द सामान्य जनते साठी आहेत नेते, धर्म गुरू, व व्यावसायिक यांना हे शब्द स्वर्थि राजकारणा साठी सामान्या च्या माथी मारून स्वस्वार्थ साधावयाचा हाच ह्याचा धर्म।

    ReplyDelete
  4. भाऊ छानच 2g व कोळसा घोटाळा याबाबत केजरीवाल काहिच बोलत नाही केजरीवाल यात सहभागी आहे असा वास येतोय

    ReplyDelete
  5. केजरीवाल हे भ्रष्टाचार विरोधी नाही BJP विरोधी जास्त वाटतात...
    नाहीतर शीला दीक्षित यांच्यावर करवाई केलि असती अत्तापर्यन्त..

    ReplyDelete