Thursday, December 24, 2015

विनाशकाले विपरीत बुद्धी



महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने जेव्हा युती मोडण्याचा पवित्रा भाजपाने घेतला, तेव्हाच आम्ही इथे धोक्याची घंटा वाजवलेली होती. भाजपा मित्रांमध्येच शत्रू शोधायला लागला आहे, तेव्हा त्याला हरवण्यासाठी बाहेरच्या कोणा शत्रूने येण्याची गरज उरलेली नाही. कारण लोकसभेच्या अपुर्व यशानंतर भाजपातील नेतेच आता आत्मघाताला सिद्ध होत आहेत, असे मत आम्ही प्रदर्शित केले होते. तेव्हा अनेक भाजपानेते व समर्थकांना त्याचा राग आलेला होता आणि आमच्यावर शिवसेना समर्थनाचाही आक्षेप घेतला गेला होता. पण वर्षभरात त्याचीच प्रचिती येत चालली आहे. कारण युती मोडणे ही सांकेतिक कृती होती आणि तो विषय एका राज्यापुरता वा इथल्या एका निवडणूकीपुरताही नव्हता. तर भाजपाची वाटचाल कुठल्या आत्मविनाशी दिशेने होऊ लागली आहे, त्याचा इशारा होता. मात्र झिंग चढलेल्यांना खाईमध्ये कोसळतानाही उंच उड्डाणे करीत असल्याचा भ्रम आवडत असतो. म्हणूनच राज्यातील जुना मित्र शिवसेनेची कोंडी करतानाची मौज भाजपाच्या नेत्यांना गुदगुल्या करीत होती. वास्तवात त्यातूनच दिला जाणारा संदेश भाजपाच्या भविष्यातील वाटचालीत नवनवी संकटे मात्र उभी करत होता. युती मोडून भाजपाच्या नेतृत्वाने असा कोणता संदेश राजकारणात पसरवला होता? आम्ही सर्वात आधी विश्वासातल्या मित्रांचा गळा कापतो. मित्रांना आधी दगा देतो. किंबहूना दगा देण्यासाठीच मैत्री करतो आणि मित्रांना संपवण्यासाठी शत्रूचीही मदत घेतो, असाच तो संदेश होता. त्याचे दोन परिणाम होत असतात. तुमच्याकडे कोणी नवा मित्र येत नाही आणि आला तरी विश्वास हा त्या मैत्रीचा पाया नसतो. दुसरा संदेश असा, की पक्षाचे नेतृत्व मित्रांना व सहकार्‍यांनाही शत्रू बनवू लागले आहे. युती तुटण्याच्या प्रक्रियेतून हे संदेश गेल्याने शत्रूंना एकत्र येणे भाग पडत गेले आणि दुसरीकडे मित्रही संपत गेले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी वा अन्य पक्षातून उमेदवार आणून व शरद पवार यांच्याशी संगनमत करून सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत भाजपाने डाव यशस्वी केला. पण बहुमत मात्र संपादन करणे शक्य झाले नाही. तो तात्पुरता लाभ होता. पण त्यामुळेच दिल्ली वा बिहारमध्ये काय होऊ शकते, याचा प्रतिस्पर्धी व विरोधकांना अंदाज आलेला होता. कारण शिवसेनेने मोदींवर थेट शरसंधान करूनही आपली मते टिकवली होती आणि मोदींनी सर्वस्व पणाला लावून व उसने उमेदवार आणूनही भाजपाला बहुमत मिळवता आलेले नव्हते. थोडक्यात मोदी लाट ओसरली असल्याची ग्वाही महाराष्ट्राच्या निकालांनी दिलेली होती. किंबहूना त्याचीच प्रचिती दोन महिने अगोदर विविध पोटनिवडणूकात आलेली होती. पण ती समजून घेऊन सुधारण्याच्या मनस्थितीत भाजपा नव्हता. म्हणून मग दिल्लीत वर्षाच्या आरंभी व बिहारमध्ये वर्षाच्या अखेरीस नाक कापून घेतले गेले. कारण त्या दोन्ही राज्यात दारूण पराभवाला सामोरे जाताना मोदीलाट अस्तंगत झाल्याचे भाजपानेच आपल्या डावपेचातून जगासमोर सिद्ध केले. युती वा मित्रांशी आघाडी ही झाकलेली मूठ असते. ती उघडण्याची घाई भाजपाने केली आणि किंमतही त्यालाच मोजावी लागली. चाणक्य असल्याच्या आवेशात डावपेच खेळून चालत नाही. तसेच शत्रूला दुबळे समजून मस्तवालपणा करून जिंकता येत नाही. उलट त्यातून आपण शत्रूंची संख्या वाढवत असतो आणि प्रतिस्पर्ध्यांना एकजुट व्हायची प्रेरणा देत असतो. दिल्ली व बिहारमध्ये नेमके तेच झाले. नंतरच्या संसदीय राजकारणात त्याचेच पडसाद उमटून पाठीशी बहूमत असतानाही भाजपा कोंडीत सापडला आहे. संसद चालू शकत नाही आणि अवघ्या ४५ सदस्याची कॉग्रेस दुबळ्या राहुलसह समर्थ भाजपाची कोंडी करू शकते आहे. त्याचे श्रेय सोनिया-राहुल यांच्यापेक्षा अमित शहा व नव्या पक्ष नेतृत्वाला देता येईल.

अर्थात युती मोडणे ही सुरूवात होती. लबाडीची चटक लागली, मग आरंभी अन्य लोकांशी लबाडी होत असते आणि जेव्हा ती चालेनाशी होते, तेव्हा बहकलेला माणून तेच डाव आपल्याच आप्तस्वकीयांशी खेळू लागतो. शत्रूशी सतत भांडायची वा लढायची चटक लागली, मग शत्रू नसेल तर मित्रांमध्येच शत्रू शोधून त्यांच्याशी लढाई सुरू होते. भाजपाचे मागल्या वर्षभरात तेच झाले आहे. आधी मित्रांशी दगा झाला आणि आता पक्षातील सहकारी व सदस्यांशीच हेवेदावे सुरू झाले आहेत. किर्ती आझाद हा त्याचाच परिणाम आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे. त्यांच्या निमीत्ताने जी गोळाबेरीज भाजपाच्या विरोधात जुळत चालली आहे, तो मागल्या वर्षभरातील शहा-नितीचा एकत्रित परिणाम आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेच्या भानगडी हा भाजपाचा वा पक्षशिस्तीचा मामला नाही. म्हणूनच नऊ वर्षे त्यात झुंजणार्‍या आझादला कोणी रोखलेले नव्हते, की जाब विचारला नव्हता. पण त्याचीच तक्रार केजरीवाल यांना राजकीय भांडवल म्हणून वापरता आली आणि आपलाच खासदार भाजपाच्या गळ्यातले लोढणे बनलेला आहे. मग त्याने अर्थमंत्र्यासाठी आपला पक्षबाह्य लढा सोडून देण्याची अपेक्षा बाळगणे किती इष्ट आहे? वास्तविक आधीच तोच विषय जेटली-आझाद यांना एकत्रित बसवून मिटवता आला असता. केजरीवाल यांना त्याचे भांडवल करता आले नसते. पण आझाद वा तत्सम सहकार्‍यांनाही दुर्लक्षित करण्याची मस्ती हे युती मोडण्याच्या पुढले पाऊल असते. अपरिहार्य असते. आता केजरीवालनी त्याचे राजकीय भांडवल केले आहे आणि त्यातून राईचा पर्वत होत चालला आहे. तो करण्याची साधनसामुग्री मात्र भाजपाच्या शहा-नितीतून आलेली आहे. क्रिकेट संघटनेवरील आरोपाच्या निमीत्ताने एकवटत चाललेली लढाईची जमवाजमव त्याचा पुरावा आहे. भाजपाने दुखावलेलेच लोक त्यात एकत्र होताना दिसतील.

जेठमलानी हे भाजपा खासदार केजरीवाल यांचे जेटली विरोधातील वकील आहेत. किर्ती आझाद हे पक्षाचे खासदारच मूळ तक्रारदार आहेत. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारतर्फ़े ज्या चौकशी आयोगाची नेमणूक केलेली आहे, त्याचे अध्यक्ष गोपाल बालसुब्रमण्य़म कोण आहेत? अलिकडेच ज्या सुप्रिम कोर्टाच्या नेमणूका झाल्या, त्यात त्यांचे नाव होते. पण मोदी सरकारने काही प्रतिकुल मतप्रदर्शन केल्याने ती नेमणूक बारगळली होती. तेच आता जेटली विरोधी चौकशीचे अध्यक्ष आहेत. थोडक्यात मोदी सरकारची कोंडी ज्यांना करायची होती, त्यांच्या गोटात वा तंबूत आपल्याच घरातली माणसे धाडण्याचा उद्योग पक्षाच्याच नेतृत्वाने केलेला नाही काय? यातला आणखी एक महत्वाच दुवा आहेत डॉ. सुब्रमण्यम स्वामी! किर्ती आझाद यांच्या हाकालपट्टीला जे उत्तर द्यायचे आहे, त्याचा मसूदा स्वामी तयार करत आहेत. म्हणजेच भाजपाच्या नेतृत्वानेच आपल्या मित्रात शत्रू शोधण्याचा जो उद्योग युती मोडण्यापासून सुरू केला, त्या शहा-णक्यनितीला आलेली ही कटू फ़ळे आहेत. एका मोठ्या विजयानंतर आपले बस्तान पक्के करण्याला प्राधान्य द्यायचे असते आणि शत्रू पुरता नामोहरम होऊन जाईपर्यंत मित्र जोपासायचे असतात. याचे भान सुटले मग प्रचंड विजयात विनाशाचीच बीजे पेरली जात असतात. लोकसभेतील यशानंतर भाजपाने या संकटांची बीजे पेरली आणि त्याचा आरंभ महाराष्ट्रातील दिर्घकालीन युतीला तिलांजली देण्यातून झाला होता. तेव्हाच त्याची लक्षणे दिसत होती, परिणाम समोर यायला काही काळ जावा लागतो. वर्षभर देखील अपुरा काळ असतो. पण भाजपाने तितकाही काळ पुरेसा असल्याचेच सिद्द केले म्हणायचे. जेटली-आझाद वाद अंगावर घेऊन वा आझाद याची पक्षातून हाकालपट्टी करून स्थिती अधिकच चिघळवली आहे. यालाच भाजपा चाणक्यनिती म्हणत असेल, पण जग त्याला विनाशकाले विपरीत बुद्धी असेच समजते.

3 comments:

  1. केवळ मर्मभेदी. बाण डायरेक्ट माश्याच्या कॅटरॅकट ला घेवून डोळ्याच्या बाहेर. माशाला घरी जायला परवानगी. फक्त डोळ्यात दोन दोन ड्राॅप भाऊंच्या पेनची शाई टाकायची १५दिवस. ! नक्की दृष्टी साफ होईल, गाढवांची !

    ReplyDelete
  2. भाऊ तोरसेकर यांचा अमित शहांवर भलताच राग दिसतो ! अमित शहांच्या काही चाली चुकल्या आहेत ! पण ते तितकेसे वाईट नाहीत आणि मूर्ख अजिबात नाहीत ! आणि कीर्ती आझाद यांना काढणे यात काय चूक आहे ? एखादा माणूस पक्षात राहून विरोधी बोलणार असेल तर इलाज नसतो दुसरा ! अर्थात भाऊंचा राजकारणाचा अभ्यास माझ्यापेक्षा शंभर पट आहे ! पण निलंबन अपरिहार्य नव्हते का भाऊ ?

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंचा कोणत्याही व्यक्तीवर राग आसेल अस वाटत नाहीये. ह्या लेखात तरी नक्कीच नाही. राजकारण म्हनुन जे काही आहे त्यात काय चुका करू नयेत ह्यांच हे एक सुंदर उदाहरण आहे हे.आता तुम्ही कसे घेता हे विचारसरणीवर आहे.

      Delete