आज पहाटे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जिहादी अतिरेक्यांनी हल्ला केला. पाचपैकी चार हल्लेखोर ठार झाले व त्या कारवाईत दोन भारतीय सैनिकही शहीद झाले. एक घातपाती जखमी अवस्थेत सापडला. असा हल्ला झाला, मग तात्काळ सुरक्षा वा गुप्तचरांच्या कामात ढिलाई झाल्याचा सरसकट आरोप सुरू होतो. आजही तसेच झाले तर नवल नाही. कारण जीभ उचलून टाळ्याला वा ओढांना लावली, मग विविध शब्द उच्चारले जात असतात. पण त्याचे नेमके अर्थ बोलणार्याला कळतातच असे नसते. मग अशा दिवट्यांना सुरक्षा वा गोपनीयता कशासाठी असते वा तिला कुठून कसा धोका असतो, त्याची अक्कल असायचे काही कारण नसते. पठाणकोट हल्ल्याच्या ज्या बातम्या ब्रेकिंग न्युज म्हणून झळकत होत्या, त्यात सातत्याने टेक्निकल क्षेत्राला धक्का लागलेला नाही, असे सांगितले जात होते. परंतु हे टेक्निकल क्षेत्र म्हणजे काय? तर जिथे लढावू विमाने उभी वा सज्ज करून ठेवलेली असतात, असे अतिशय सुरक्षित क्षेत्र असते. हल्लेखोर त्यालाच लक्ष्य करायला आले असणार, हे वेगळे सांगायला नको. पण प्रचंड विस्तार असलेल्या या तळावर हे सुरक्षित क्षेत्र नेमके कुठे आहे, त्याची माहिती हल्लेखोरांना होती, ही खरी बातमी आहे. अन्यथा आजवर अनेक पोलिस ठाणी वा लष्करी तळावर असे हल्ले झालेले आहेत. पठाणकोटचा हल्ला नेमके लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून झालेला होता. म्हणजेच त्या हल्ल्याची योजना आखणार्यांपाशी हवाई तळाचा बारीकसारीक तपशील उपलब्ध होता. म्हणूनच इतका लक्ष्यवेधी हल्ला होऊ शकला. सुदैवाने ठरल्या लक्ष्यापर्यंत जिहादी पोहोचू शकले नाहीत. पण ते सुदैव होते की तशी प्रतिकारक सज्जता होती, म्हणून तो हल्ला हाणून पाडण्यात यश आले? उहापोह त्याचा व्हायला हवा किंवा करायला हवा. नुसतेच हवेत बुडबुडे उडवण्याने मनोरंजन होईल. पण साध्य काहीच होणार नाही.
पठाणकोटच का? हल्लेखोरांनी हेच लक्ष्य कशाला निवडले, इथून उहापोह सुरू होतो. हल्ला करणार्यांना नेमकी माहिती असल्याशिवाय अशा जागी हल्ला करता येत नाही. म्हणजेच पंजाबमध्ये असलेल्या अनेक लष्करी वा हवाई तळांपैकी पठाणकोट निवडण्याचे कारण तिथली संगतवार माहिती हल्लेखोरांकडे होती. मग ती माहिती त्यांना कधी, कोणी व कशी पुरवली, ही खरी बित्तंबातमी असू शकते. पण नेमकी माहिती असूनही हल्ला फ़सला, म्हणजेच हल्ल्याची शक्यताही तितकीच गृहीत धरून सज्जता राखलेली असणार ना? तर त्याची सुरूवात दोन वर्षापुर्वी झालेली होती. सुशीलकुमार हे नाव आजच्या बातम्यांमध्ये कुठे कानी आले नाही. कोण हा सुशीलकुमार? पठाणकोटच्या याच हवाई तळावरचा एक कर्मचारी सुशीलकुमार याला तब्बल दोन वर्षापुर्वी एका महिलेने सोशल माध्यमातून गाठले. त्या माध्यमातून मैत्री करताना ही महिला त्याच्याशी खुप सलगीने बोलू लागली आणि नंतर त्याच्याकडून माहिती मिळवू लागली. याच तळावरील सायबर सेलची दक्षता सज्ज होती म्हणून सुशीलकुमार व त्या महिलेच्या सोशल माध्यमातील देवाणघेवाणीवर पाळत ठेवली गेली. तो परस्पर या मैत्रिणीला तळावरची गोपनीय माहिती देत असल्याचे उघडकीस आल्यावर स्थानिक पोलिसांना कल्पना देवून सुशीलकुमारला अटक करण्यात आली. कालपरवा असाच एक हवाई दल कर्मचारी रणजित याला अटक झाली होती. त्याला संरक्षण विषयक एका मासिकाची संपादिका म्हणून ब्रिटीश महिलेने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुशीलकुमारला असेच जाळ्यात ओढून माहिती काढली जात होती. या सुशीलकुमारने तिला पठाणकोट तळाची महत्वपुर्ण माहिती दिली होती. त्यानंतरच त्याला आत्काळ अटक करण्यात आलेली होती. जुलै २०१४ मध्ये त्याला पकडले आणि आज इतक्या महिन्यांनी तिथेच हल्ला झाला.
कुठल्याही लष्करी वा हवाई तळावर महत्वाच्या जागा गोपनीय असतात. आधुनिक काळात असे तळ हे एकप्रकारचे किल्लेच असतात. त्या किल्ल्यातल्या अतिशय मोक्याच्या जागा म्हणजे बालेकिल्ला असतो. तशा जागांवर हल्ला केला, मग त्या तळाची भेदकता व सुरक्षा संपुष्टात येत असते. म्हणूनच अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न शत्रू करतो. सुशीलकुमार वा रणजित या हवाई दल कर्मचार्यांकडून नेमकी तशीच माहिती मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यापैकी कुठली माहिती दिली गेली त्याचीही कल्पना भारतीय यंत्रणांना होती. म्हणून अशा जागी हल्ला होण्याची शक्यता गृहित धरलेली असते. किंबहूना दिली गेलेली माहिती वापरली जाऊ नये, म्हणून असलेल्या रचना व सज्जता यात निर्णायक फ़ेरबदल केले जात असतात. बाकी हल्ला टाळणे आपल्या हाती नसते. कारण हल्ल्याची वेळ व जागा शत्रू ठरवित असतो. पण त्यात कुठलेही मोठे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे आपल्या हाती असते. इथेही नेमकी तीच सज्जता असल्याचे दिसून आलेले आहे. आकस्मिक हल्ला करूनही पाचपैकी एकही हल्लेखोर महत्वाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही, किंवा कुठलेही मोठे नुकसान यात होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. याला गुप्तचर खात्याचे अपयश म्हणता येणार नाही. तर पुरेपुर सज्जता म्हणता येणार नाही. दोन दिवस आधी गुरदासपूर येथील पोलिस अधिकार्याचे अपहरण करण्याचे नाट्य रंगलेले होते. अशा काही किरकोळ घटना गेले काही दिवस सातत्याने घडत आहेत आणि त्याची तुलना मोदींच्या लाहोर भेटीशी करता येणार नाही. मुत्सद्देगिरी आणि गुप्तचरांनी परस्परांना शह देण्याच्या कारवाया यात सांगड घालणे अशक्य कोटीतली गोष्ट असते. मात्र ज्या गतीने पठाणकोटचा हल्ला झालेला आहे, त्यातून पाक गुप्तचरांच्या हवालदिल होण्याचे संकेत नक्की मिळतात.
सुशीलकुमार वा रणजितला पकडल्यामुळे त्यांना माहिती देणारे नेटवर्क उध्वस्त होत असते. पण त्याच कालखंडात पाकिस्त्तानात अकस्मात भारताच्या पंतप्रधानांनी भेट देण्याची घटना निर्णायक काटशह आहे. पाकचे सेनाप्रमुखच नव्हेत तर गुप्तचर खातेही मोदींच्या लाहोर भेटीविषयी गाफ़ील राहिले. किंबहूना आपल्याला संपुर्ण गाफ़ील ठेवून नवाज शरीफ़ यांनी मोदींना पाकिस्तानात येऊ देतात, याचा पाक गुप्तचर व सेनादलाला धक्का बसलेला आहे. ते नुसते पंतप्रधान मोदींचे धाडस नाही किंवा भारत-पाक संबंधातील महत्वाचे पाऊल नव्हे. भारतीय मुत्सद्देगिरीने आणि गुप्तचर खात्याने पाक सुरक्षा व्यवस्थेला व घातपाती डावपेचांना दिलेला मोठा शह आहे. त्यानंतर पाक गुप्तचर वा भारतद्वेषी सेनाधिकारी मंडळींनी निमूट पराभव मान्य करण्याची अपेक्षा कोणी बाळगू शकत नाही. आजही आपण भारताला शत्रूच मानतो आणि शरीफ़शी दोस्ती केल्याने घातपात थांबणार नाहीत, असे कोणी शब्दात सांगणार नाही. किंबहूना पंतप्रधान शरीफ़ म्हणजे पाकिस्तान नव्हे. त्यांच्याशी संगनमत केल्याने पाकिस्तान निमूट बसेल अशा समजूतीत राहू नका, असे सांगण्याचा हा मार्ग आहे. पाकिस्तान शरीफ़ चालवत नाहीत तर तिथली सेना व गुप्तचर विभाग यांची हुकूमत चालते, हा पठाणकोट हल्यातला खरा संदेश आहे. हा सावल्यांचा खेळ समजून घेता आला तर अकस्मात मोदी लाहोरला कशाला गेले आणि त्यातून काय साधले गेले, त्याला अर्थ लागू शकेल. पण तेवढे करायला आजच्या ब्रेकिंगन्युज पत्रकारितेला वेळ वा संयम आहेच कुठे? ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही. दोन देशात कुठला डाव वा जीवघेणा खेळ चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही. त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही. (अपुर्ण)
आज देशाला देशभक्ती जागरूक कराणारी पत्रकारितेची गरज आहे तीच भाऊ आपल्या लेखनितुनच मिळते.
ReplyDeleteम्हणून आपले लेख परत परत वाचतो.
आजच्या ब्रेकिंगन्युज पत्रकारितेला वेळ वा संयम आहेच कुठे? हे १००% खरे आहे.TRPच्या साठी कोणत्या खालच्या थरला माध्यम गेलेली आहेत ते पाहून वाईट वाटते.
उद्या पाहट होईल या आशेवर....
जय श्रीराम
भाऊ ............पठाणकोट घटनेचे अतिशय उत्तम ' विवरण '.......................... तुमच्या ' ब्लोग ' ची मी रोज उत्सुकतेने वाट बघत असतो. ..................कौतुक अशासाठी करावेसे वाटते कि खरा ' पत्रकार ' हा प्रवाह ज्या दिशेला जातो आहे त्या दिशेला बघतो कि ' प्रवाहाच्या ' विरुद्ध ' दिशेला बघतो. हेच या विवरण मधून सिद्ध होते. आज असे पत्रकार बघायला मिळतच नाहीत.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteआदरणीय भाऊ ,
ReplyDeleteमी तुमचा नियमित वाचक आहे,खर म्हणजे तुमचे लिखाण वास्तववादी आणि सत्यता लक्षात आणून देणारे आहे..त्तुमचा प्रत्येक लेख मला वास्तवाशी एकरूप होण्यास मदत करीत असतो . मी स्वतः पत्रकार आहे ,त्यामुळे पत्रकारितेतील माझ्या लिखाणाला तुमच्यामुळे योग्य दिशा मिळतेय.म्हणूनच तुमचा "जगता पहारा" मी माझ्या फेसबुक पेजवर शेअर करत असतो...... तुमच्यातील आदर्श पत्रकाराला नमन
...............विनोद आ.काळे ,जालना
Respected Bhau ,your blogs are very realistic and thus it gives an idea of tables which are turning in today's national and international politics.........very impressive
ReplyDeleteकेंद्र सरकार को जितने आतंकवादी मारे जाएं उनके शव दफनाने की बजाय जलाना शुरू कर दें।
ReplyDeleteयह उपाय आतंकवाद मे कमी आने का उपाय साबित हो सकता है।
क्योंकि पहली बात आतंकवाद का कोइ धर्म नहीं होता।
इसलिए क्या फर्क पडता है उसे जलाया या दफनाया जाए ?
यह आजमाया जाना चाहिए प्रायोगिक तौर पर यदि कोइ विरोध करे तो बडे आराम से आतंकवाद का धर्म पता लग जाएगा।
Tumchi lekhani vastavvadi aahe bhau, madhyamanchya ya gardeetahi ase vichar rusavnara sampadak aahe yachi janeev aaple lekh karun detat
Delete