Saturday, January 30, 2016

रोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’


 Sudhakar Suradkar Mr. Toraskar,
Cant you find the reason for suicide rather than misguiding the gravity of action. You are intellectual pl dot miss guide common people. Let us look at situation and suggest the worthy solutions.....which is expected from you..

हैद्राबाद विद्यापीठाचा एक प्रतिभावान विद्यार्थी रोहित वेमुला याने केलेल्या आत्महत्येच्या निमीत्ताने मी ब्लॉगवर टाकलेल्या (पुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान) लेखाच्या संदर्भातली ही प्रतिक्रिया आहे. सर्वसामान्य कोणी वाचकाने अशी प्रतिक्रिया दिली असती, तर त्याकडे काणाडोळा करणे शक्य होते. पण सुधाकर सुराडकर हे एक वरीष्ठ अनुभवी पोलिस अधिकारी आहेत. विशेषत: दोन दशकापुर्वी गाजलेल्या अनेक प्रकरणात त्यांचे नाव प्रथम नजरेस आलेले आहे. विरार येथील आमदार हितेंद्र ठाकूर यांना टाडा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले, त्यावेळी सुराडकर हे गाजलेले नाव आहे. हे लक्षात रहाण्याचेही एक खास कारणही आहे. त्या काळात खलीस्तानी दहशतवादाने इतका उच्छाद मांडला होता, की अशा हिंसेला आळा घालण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘टाडा’ नामक खास कायदाच केलेला होता. एखाद्या व्यक्तीला वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याने टाडा लावला, मग किमान वर्षभर तरी त्याविषयी कोर्टातही दाद मागण्याला बंदी होती. असा कायदा हिंतेंद्र ठाकूर यांना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लावला गेला होता. तसे हजारोंनी कैदी देशात विनाखटला गजाआड जाऊन पडलेले होते. जामिन मिळणेही अशक्य होते. त्याला आव्हान देण्याचेही अनेक प्रयास झाले. पण टाडातून जामिन मिळवणारा पहिला कैदी हितेंद्र ठाकूर ठरला. किंबहूना त्याच निकालानंतर टाडाखाली खितपत पडलेल्या कैद्यांच्या प्रकरणांचा फ़ेरविचारही सुरू झाला. त्यातले एक नामवंत अधिकारी सुराडकर होते. आज ते निवृत्त आहेत आहेत आणि वाहिन्यांवरील अनेक विषयांच्या चर्चेत त्यांना जाणते म्हणून आमंत्रण दिले जाते. अशा व्यक्तीने माझ्या लेखावर प्रतिक्रिया दिल्यावर तिकडे काणाडोळा करणे म्हणूनच शक्य नव्हते. रोहित वेमुला प्रकरणावर लिहीताना, कारण न बघता मी वाचकाची दिशाभूल करतोय, असा आरोप म्हणूनच नजरेआड करता येत नाही.

अर्थात माझा संपुर्ण लेख सुराडकरांनी वाचला असेल असे गृहीत धरावे लागते. त्यात फ़क्त रोहितच्या आत्महत्येचा विषय नसून अलिकडल्या काळात जे अनेक नामवंत सुपारी दिल्यासारखे हकनाक मारले गेलेत, त्यांचाही संदर्भ आलेला आहे. अशा अनेक प्रकरणात मृताविषयी कुठलीही आत्मियता बाळगण्यापेक्षा त्यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करणे, हा माझ्या लिखाणाचा विषय आणि आशय आहे. मुद्दा इतकाच, की माझा विषय वा आशय सुराडकरांना कितपत कळला असा आहे? अशा विषयात लिहीताना त्यावरचे उपाय मी बुद्धीमंत असल्याने सुचवावेत, असा त्यांचा आग्रह आहे. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की मी एक सामान्य पत्रकार असून घडणार्‍या घटना व त्यांचे संदर्भ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. कुठल्याही पत्रकाराला वा लेखकाला आजकाल बुद्धीमंत म्हणून पेश करण्याची जी सरसकट दिशाभूल केली जाते, त्याला सुराडकर बळी पडलेले दिसतात. अन्यथा त्यांनी मला बुद्धीमंत ठरवून पुढे दिशाभूल करण्याचा आरोप ठेवला नसता. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते, की सुराडकर उमेदीचा सर्व काळ पोलिस खात्यात राहिले, तरी त्यांना गुन्हेतपासाचे मूळ सुत्र लक्षात घ्यावेसे वाटलेले नाही. रोहित वेमुलाने आत्महत्या केली आणि तसे करणे हा गुन्हा आहे. पण तो हयात नाही. म्हणूनच त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. ज्याला सुराडकर सिच्युएशन असे नाव देतात. रोहितने मरणापुर्वी लिखीत स्वरूपात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. ज्या विचारांच्या तो आहारी गेला होता, त्यातून आलेले नैराश्य आणि कृतीशीलतेतली हतबलता, त्याला सतावत होती. यातल्या काही कारणे लिहील्यावर खोडून टाकण्याचाही त्याने प्रयास केलेला आहे. तेव्हा तपासात त्याही गोष्टी गंभीरपणे विचारात घ्याव्या लागतात. हे सुराडकरांच्या कसे लक्षात येत नाही? कुठल्याही चळवळ्याच्या भाषेत सुराडकर प्रतिक्रिया देतात, ही खरेच चकीत करणारी बाब आहे.

कायद्याचे अंमलदार म्हणून दिर्घकाळ काम करताना सुराडकर यांनी कारणमिमांसा केलेली होती, की कायद्याच्या कलमाचे अर्थ लावून गुन्हेतपास केला होता? मिमांसा हा अंमलदाराचा विषय नसतो. रोहितची आत्महत्या ही विविध नैराश्याच परिपाक आहे. त्यात जितके उजव्या राजकारणाचे संदर्भ आहेत, तितकेच पुरोगामी राजकारणाचेही संदर्भ आहेत. म्हणूनच प्रसंग म्हणजे सिच्युएशन विचारात घ्यायची, तर कोवळ्या संस्कारक्षम वयात राजकारणाचे अवास्तव डोस या मुलांना देण्याचा गुन्हा घडलेला आहे. ज्या सामान्य परिस्थितीतून रोहित इथपर्यंत पोहोचला होता, त्या वर्गातल्या मुलांना आशावादी बनवणे व जीवनाविषयी त्यांच्यात आस्था जोपासून त्यांना संकटाशी झुंज द्यायला तयार करणे, हेच शिक्षणाचे वास्तव उद्दीष्ट असते. त्याऐवजी ह्या होतकरू मुलाला निराशेच्या गर्तेत ढकलण्याचे काम झालेले आहे. आपल्यातील गुण व प्रतिभेचा उपयोग करून पात्रता व क्षमता वाढवणे आणि त्यायोगे आपल्या समाजाला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी सज्ज करण्याला प्राधान्य असायला हवे. ते बाजूला ठेवून राजकारणाचे अवास्तव धडे देण्यातून रोहितला आत्महत्येच्या मार्गावर ढकलले गेले आहे. त्याला विद्यापिठातील राजकीय आक्रमण कारणीभूत झाले आहे. म्हणूनच ती व्यवस्था किंवा तशी अवस्था आणणारे त्यातले खरे गुन्हेगार आहेत. मिमांसा अशी होऊ शकते. कारण खुद्द रोहितनेच डाव्या व पुरोगामी चलवळींच्या नाकर्तेपणावर आपल्या मृत्यूपुर्व पत्रात बोट ठेवलेले आहे. पण तेवढा भाग लपवून त्याचे पत्र पेश करणार्‍यांच्या ‘राजकीय भांडवल’ करण्याच्या गुन्हेगारी हेतूचा सुराडकर यांच्यासारख्या ‘जाणत्याला’ बोध होत नसेल काय? मग प्रशासनाची अवस्थाही रोहितच्या मनस्थितीसारखी झाल्याची साक्ष मिळते. म्हणूनच मी रोहितसह दाभोळकर, पानसरे इत्यादिंच्या हत्येचे राजकीय भांडवल करणार्‍या प्रवृत्तीचा वेध माझ्या लेखातून घेतला होता.

सुराडकर त्यालाच दिशाभूल म्हणतात किंवा तसे समजतात. यातून आजचे प्रशासन किती भरकटले आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येचे गुढ कशाला उकलले जाऊ शकलेले नाही, याचे रहस्य सुराडकरांच्या प्रतिक्रियेतून उलगडते. अनुभवी पोलिस अधिकारी असूनही ते अशा गुन्ह्यातील हेतू व लाभार्थींकडे बघू शकत नाहीत. बघू इच्छित नाहीत. गुन्हा कुठला वा घटना कोणती, यापेक्षा त्यात कोणाला गोवता येईल, अशी एक मानसिकता त्यामागे दिसते. दाभोळकर अथवा पानसरे यांच्या हत्येनंतर मारेकरी शोधण्यापेक्षा हिंदूत्ववाद्यांना त्यात गुंतवण्याचाच आग्रह सातत्याने चालू होता. कुठल्याही तपासाला मदत करण्यापेक्षा सनातनच्या कुणा व्यक्ती वा साधकाला पकडण्याचा अट्टाहास चालू होता. पण गुन्ह्याचे घटनास्थळी मिळालेले पुरावे किंवा परिस्थितीजन्य पुरावे, यांचा शोध घेतला जाऊ नये यासाठी जणू राजकीय आटापिटा चालू होता. अशा घटना घडतात, तेव्हा विनाविलंब नाकाबंदी करणे किंवा अशा हत्येने स्वार्थ कुणाचे साधले जाऊ शकतात, त्याचा शोध आवश्यक असतो. त्या दिशेने कितीशी वाटचाल होऊ शकली? सुराडकरांनी हा प्रश्न कधी कुठे विचारला आहे काय? आपल्या कारकिर्दीत डझनावारी हत्याकांडाचा तपास सुराडकरांनी केला असेल वा त्यासाठी मार्गदर्शन केले असेल. तेव्हाही ते मिमांसाच करीत बसले होते काय? आत्महत्या वा हत्येमागचे हेतू त्यांनी कधीच तपासले नव्हते काय? की मिमांसा करून सिच्युएशन बघून कायदा राबवला होता? मरगळल्या डाव्या चळवळीला ज्या हत्याकांडाने उभारी येते, तेव्हा त्यामागचा स्वार्थ उलगडून कथन करायला हवा काय? जीवंत असताना रोहितकडे दुर्लक्ष करणार्‍यांना त्याच्या आत्महत्येनंतर आलेले उमाळे त्यामागचा हेतू सांगत नाहीत काय? सुराडकरांच्या अनुभवाला त्यातली दिशाभूल कशी जाणवत नाही? की त्यांनीच जाणिवपुर्वक दिशाभूल करून घेतली आहे? अमिरखानचा ‘पिपली लाईव्ह’ बघा सुराडकर!

त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. गुन्हा कुठला, ही बाब दुय्यम आणि कोणी केला याला जेव्हा प्राधान्य मिळते, तेव्हा गुन्हेगारीला पायबंद घालने अशक्य होऊन जाते. माझ्याही लिखाणातून वा मिमांसा विश्लेषणातून उजव्या किंवा हिंदूत्ववादी लोकांवर आरोपांची बरसात व्हावी, अशी सुराडकरांची अपेक्षा आहे. तसेच बुद्धीमंताने केले पाहिजे, अशी त्यामागची गाढ श्रद्धा आहे. अमूक एका विचारसरणीचा अनुयायी हा गुन्हेगारच असतो, अशी समजूत करून घेतली, मग विवेकाचा बळी जात असतो आणि तर्कबुद्धी निकामी होऊन जात असते. तारतम्य रहात नाही, की चिकित्सक भूमिकाही रसातळाला जाते. आजकाल डाव्या पुरोगाम्यांचे तेच झाले आहे. म्हणुन तर रोहितला नैराश्यातून बाहेर काढण्याचा विचारही त्यापैकी कोणाच्या मनाला शिवला नाही. पण त्याने आत्महत्या केल्यावर त्याचे राजकीय भांडवल करायची स्पर्धा चालली आहे. ज्याला सुराडकर बुद्धीवाद समजून बसले आहेत. उलट प्रसंग-घटना यांचा कार्यकारणभाव तपासण्याला ते दिशाभूल समजत आहेत. जेव्हा असे पोलिस अधिकारी मोक्याच्या जागी जाऊन कायद्याची अंमलबजावणी होत असते, तेव्हा गुन्हेगारीला पायबंद घातला जाणे दूरची गोष्ट होते. गुन्हेगारच वैचारिक मुखवटे लावून कायद्याची कवचकुंडले परिधान करू लागतात. जे आजकाल आपण उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल किंवा अलिकडे दोन महिन्यात बिहारमध्ये बघत आहोत. मग मालद्याचे पोलिस ठाणे जाळले जाऊनही शांतता जाणवते आणि दादरीतली एकाकी घटना भीषण भासू लागते. मालदाविषयी अवाक्षर बोलले जात नाही आणि दादरीसाठी देशव्यापी गदारोळ होतो. त्याला बुद्धीमत्तेचे तेज म्हणतात. असे तेज फ़ाकते, तेव्हा पानसरे दाभोळकरांचे मारेकरी निश्चींत मनाने गुन्हे करू शकतात. कारण पुरोगामीत्वाची झापडे लावून कार्यरत आलेल्या प्रशासनाला घाबरण्याची गरज उरलेली नसते.

==========================
२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत!
-भाऊ तोरसेकर

http://bhautorsekar.in/

22 comments:

  1. इंग्रजानी बनवले कायदे हे त्याकाळी आपल्यावर राज्य म्हणजे गुलामाची पिळवणुक करण्यासाठीचे कायदे आणि काळानुसार काहीप्रमाणात कायद्यात बद्दल केला गेला पण इंग्रजानी आपला जसा हेतु साध्य करण्यासाठी कायदे बनवले तसेच आपल्या राजकिय पुढार्‍यानी त्याचा हेतु साध्य होण्यापुरता बद्दल केला.
    हिच वस्तुस्थिती आहे.
    म्हणून एक माणूस राक्षस होतो आणि अवघ्या समाजाच्या सदभावनेवरच बलात्कार करतो.आणि कायदा त्याला जुमानत नाही ज्या देशात सावकराना बापुच्या हत्येत पसवण्याचा पर्यत करत होता तोच कायदा आज सनातन साधकाना फसविण्यासाठी वापरला जात आहे गमत वाटते आपल्या देशाच्या कायदाची काय तरी द्या आणि हवा तसा कायदा वाकवा.गरीबासाठी वेगळा आणि या कायद्यात काम करण्यामानुष्याकडुन वेगळी अपेक्षा काय करायची.
    भाई मी आपल्या मताशी सहमत आहे आणि नेहमी आपल्या पाठिशी कभी उभा असेन.
    एक सामान्य मनुष्य
    श्री संजय पांडुरंग इंदलकर

    ReplyDelete
  2. अत्यंत तडाखेबाज षट्कार.सुराडकरांना ह्याचा प्रतिवादी करावाच लागेल.

    ReplyDelete
  3. what a marmik reply!Bhau, you are gerat, greater,greatest.Journalist like you are "Maharashtra Gaurav"

    ReplyDelete
  4. भाऊ एकदम चपखल जबाब दिला कदाचित निखील वागळे आणि कंपु यातील सुरडकर एक नियमित सदस्य जे नेहमी ठरवुन IBN Lokmat वर समाजातील एका घटकाला गुन्हेगार ठरवायचे. लाखो लोकांची दिशाभूल करायचे. पण लोक निरबूधद नाहीत हे मागील निवडणुकीत दाखवून दिले. अनेक शासकीय अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या साटेलोटे करून पूढे गेले. व रिटायर झाल्यावर त्या सत्ताधारयाचे पाठीराखे होवून लोकांची दिशाभूल करीत देशातील लोकशाहीला एकपकशीय घराणेशाही करायला साथ दिली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपन दिलेली प्रतीक्रीया ही आजची वास्तविकता आहे• भारतीय नागरिकांचा आर्थिक,वैचारिक व जातीधर्म निहाय दर्जा सुधारणे जरुळी आहे•

      Delete
    2. धन्यवाद भाऊ!

      Delete
  5. भाऊ आपण सर्व मुद्दे अत्यंत मुद्देसूद पणे मांडलेले आहेत. त्या त्या वेळी श्रीयुत सुधाकर सुराडकर ह्यांची मनस्थिती काय असू शकेल वा असावी ह्याबाबत ही सुस्पष्ट दिग्दर्शन केलेले आहे. आता श्रीयुत सुधाकर सुराडकरांनी प्रामाणिकपणे त्या त्या वेळची त्यांची विचार सरणी इथेच थोड्याशा विस्तृत पणाने मांडलीत तर त्यावरून एखाद्या अनुभवी पोलीस अधिकार्‍याच्या विचाराची दिशा आम्हा सामान्य वाचकांना समजून येईल

    ReplyDelete
  6. भाऊ या लोकांचे हे मगरीचे अश्रु आहेत हा पपु (रागा)उपोषण करतोय पण पठाणकोट मधील शहीद दिसत नाहीत

    ReplyDelete
  7. नेमके विश्लेषण केलात भाऊ .👍

    ReplyDelete
  8. भाऊ, रोहित वेमुलाच्या बाबतीत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घाणेरडा प्रकार बघवत नाही.... याच विषयावरील माझा ब्लॉग लेख (इंग्लिश) इथे लिंक करत आहे. http://makaranddesai.blogspot.com/2016/01/rohith-vemulas-suicide-six-points-which.html

    ReplyDelete
  9. वेबसाईट चालू केल्याबद्दल अभिनंदन...
    आपली तंत्रज्ञानाभिमुखता वाखाणण्याजोगी आहे !

    ReplyDelete
  10. भाऊ उत्तर दिलेत हे बरे केले.
    पण ही मंडळी विचाराने rigid झालेली! प्रत्युत्तर पचवण्याचा लवचिकपणा यांच्याकडे नाही. पण ठिक आहे,बाकी लोकांसाठी अॅनेक्ष्चर म्हणुन !!

    ReplyDelete
  11. भाऊराव,

    लेखातली ही वाक्ये अतिशय महत्वाची आहेत.

    >> अनुभवी पोलिस अधिकारी असूनही ते अशा गुन्ह्यातील हेतू व लाभार्थींकडे
    >> बघू शकत नाहीत. बघू इच्छित नाहीत.

    श्रीयुत सुधाकर सुराडकर कुणाच्या तरी उपकाराखाली असल्यासारखे वावरत आहेत. या निमित्ताने त्यांना एकंच सांगावंसं वाटतं. त्यांना खरोखरीच न्यायाची चाड असेल तर त्यांनी श्री. कृष्णप्रकाश या पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनाबद्दल जाहीर नापसंती व्यक्त करावी. या अधिकाऱ्याने महाराष्ट्राला वंदनीय असलेल्या संभाजी भिड्यांवर अमानुष लाठीमार केला होता. त्यावेळेस भिडे गुरुजी सांगलीत सनदशीर मार्गाने जोधा-अकबर चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करत होते. नंतर सांगलीत दुसऱ्या एका प्रकरणात मुस्लिमांनी दंगा केला तेव्हा शहीद बेपारी नावाच्या धर्मांधाने पोलिसांच्या जीपवर थयथया नाचत पाकिस्तानी झेंडाही रोवला होता. तेव्हा कृष्णप्रकाश काय करीत होते? यानंतर २०१२ मध्ये मुंबईत आझाद मैदानात रझा अकादमीची कुप्रसिद्ध दंगल झाली. तिच्या अगोदर जमलेल्या मुस्लिमांच्या सभेस हाच कृष्णप्रकाश चक्क व्यासपीठावर उपस्थित होता.

    काय म्हणावं या माणसाला? याने केलेल्या 'सेवाकार्या'मुळे त्याला राष्ट्रपती पदकही मिळाले आहे. सुधाकर सुराडकरांनी यावर यथोचित भाष्य करावे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मते ऐकावयास आम्ही आतुर आहोत.

    आ.न.,
    -गा.पै.

    ReplyDelete
    Replies
    1. दादा हीच स्तिथी सगळीकडे दिसते आपला कायदा ठराविक समाजाच्या बाजूने झुकल्या सारखा वाटतो...

      Delete
    2. कुनाच्यातरी विचार किव्हा दावनीला बांधलेले नक्कीच असतात• महाराष्ट्रात मोठी सरकारी अधिकार्याची दावन कुणाची आहे भारतभर प्रसिद्ध आहे• भारतीय वायुसेनेच्या विमानातुन दाऊद भारताबाहेर जातो म्हणजे हे अधिकारी दावनीला बांधलेले असतात राजकीय नेते लोकांनसमोर फक्त अवडंबर करत असतात• हे ओलखायची कुवत आता भारतीय नागरिकांन मध्ये वाढत आहे त्यामुळे अशा राजकीय नेत्यांची पोल खुलत आहे•

      Delete
  12. भाऊ सुंदर विश्लेषण...अतिशय तर्कशुद्ध मांडणी त्या विषयाची अजुन खोलवर माहिती करुन देते.भाऊ तुमचे मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  13. रोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’ ..............शीर्षकच खूप सूचक आहे. सध्या पंतप्रधान मोदी यांच्या बदनामीसाठी ' दुर्घटना ' घडत नसतील तर ' घडविल्या ' जातात असे जाणवते. रोहित वेमुला चे वडील आक्रोश करतात कि तो ' दलित ' न्हवता........पण ऐकतंय कोण.................चेनेल वाल्यांना ' दळण ' दळण्यासाठी रोख रक्कम मिळाली कि बसा दिवसभर दळत. वस्तुतिथि अशी आहे कि लोक आताशा चेनेल वरच्या बातम्या अथवा चर्चा अजिबात बघतच नाहीत. त्यामुळे त्यानुसार ' मत ' बनविण्याचा प्रश्नच नाही.

    ReplyDelete
  14. Aplya lekhanatun Rajkiya netyanchi tasech nivrutt adhikari vargachi labadi ubhye Maharashtrala samajte ahe.Pudhemage aplyala trasdayak tharu shakte.

    ReplyDelete
  15. सध्या तर्काला धाब्यावर बसवून आपली पोळी भाजुन घेण्याची अहमहिका लागली आहे हे दुर्दैव । त्यात सुरडकरासारक्खे। सामील झाले आहेत हे त्याहुन दुर्दैव । राजकार्यण गलिछ असते हेच खरे ।

    ReplyDelete
  16. Bhau jabardastha..sadetod uttar !! tamasha chalu ahe sagala ch

    ReplyDelete
  17. "गुन्हा कुठला, ही बाब दुय्यम आणि कोणी केला याला जेव्हा प्राधान्य मिळते, तेव्हा गुन्हेगारीला पायबंद घालने अशक्य होऊन जाते." perfect...!

    ReplyDelete