गेल्या दोनतीन वर्षात जगाचे रंगरूप बदलते आहे. ज्यांना त्याचा अर्थ उमगत नाही, त्यांना इतिहासजमा होणे भाग आहे. चार वर्षापुर्वी पश्चिम आशियात अरब उठाव सुरू झाला. इवल्या ट्युनिशियात त्याची सुरूवात झाली आणि बघता बघता अनेक अरबी देशात त्याचे लोण पसरत गेले. त्याला सामोरे जाण्यात एकटा इजिप्त यशस्वी ठरला आणि म्हणून अजूनही तिथे राजकीय स्थैर्य कायम राहिले आहे. ज्यांना तितकी समयसूचकता राखता आलेली नाही, त्यांनी अराजकाला आमंत्रण दिले असे म्हणता येईल. त्यात फ़क्त पश्चिम आशियातील अरबी मुस्लिम देश भरडले गेले असे नाही, तर युरोपलाही त्याचे चटके बसलेले आहेत. दुसर्या महायुद्धापासून सज्ज असलेली अमेरिकाप्रणित नाटो सैन्य आघाडी मोडकळीस येऊ लागली आहे आणि तीन दशकापासून चालू असलेला युरोपियन महासंघही डळमळू लागला आहे. अमेरिकेची हुकूमत सैल होऊ लागली आहे आणि उध्वस्त झालेला रशिया नव्याने आपले वर्चस्व निर्माण करू लागला आहे. यातली एक महत्वाची बाब म्हणजे मुस्लिम अरबी देशातील लष्करी हुकूमशाहीचा अस्त होय. गडाफ़ी, सद्दाम वा मुबारक यांच्यासारखे हुकूमशहा उध्वस्त होऊन गेलेत आणि सिरीयाचा बशर अल असद पांगळा होऊन पडला आहे. इस्त्रायल विरोधातली इस्लामिक आघाडी मोडून पडली आहे. एकूणच जागतिक समिकरणे बदलत आहेत. भारताने त्याची दखल घेऊन आपले डावपेच बदलले आहेत. चीनलाही बदलावे लागते आहे. पण शेजारी पाकिस्तान मात्र इतिहासापासून शिकायच्या मनस्थितीत दिसत नाही. किंबहूना मुस्लिम लष्करशाही असलेला बहुधा तोच शेवटचा देश आता शिल्लक उरला आहे. किती दिवस उरेल हे सांगणे अवघड आहे. कारण पाच दशकापुर्वीच्या मनस्थितीतून पाक राजकारणी बाहेर पडायला तयार असले, तरी तिथले लष्करशहा मात्र त्याला राजी दिसत नाहीत.
अरब उठावानंतर इजिप्त, इराक, लिबिया इथली लष्करी हुकूमत कोसळून पडली. आजही तशी इजिप्तमध्ये लष्कराचीच सत्ता आहे. पण हुकूमशहा होस्ने मुबारकला बाजूला करून आपले अस्तित्व टिकवण्यापर्यंत इजिप्तच्या सेनेने माघार घेतली. नागरी नेतृत्वाला सन्मान देण्याचा शहाणपणा दाखवला. तितकी लवचिकता लिबियाच्या गडाफ़ीला दाखवता आली नाही आणि त्याला मरावे लागले. शेजारच्या सिरीयातला असद अराजकात फ़सला आहे आणि इराक अजून अराजकातून बाहेर पडू शकलेला नाही. एक एक करून इस्लामी लष्करी देशांचा इतिहास बदलत गेला आहे. त्यातला शेवटचा देश पाकिस्तान आहे. तिथेही मागल्या दहा वर्षात क्रमाक्रमाने लष्कराचा पगडा कमी होतो आहे. एका बाजूला नागरी समाज आपले स्वातंत्र्य मागू लागला आहे आणि दुसरीकडे लष्करानेच पोसलेला जिहादी भस्मासूर उधळला उलटला आहे. मध्यंतरी माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ़ यांनीच त्याची ग्वाही दिली. तालिबान, मुजाहिदीन व जिहादी आम्हीच निर्माण केले. पण आज तेच आमच्यावर उलटले आहेत, अशी कबुली मुशर्रफ़ यांनीच दिलेली होती. ती वस्तुस्थिती आहे. कारण व्याप्त काश्मिरसह बलुचिस्तान येथे आता जिहादी धुमाकुळ घालत आहेत आणि आपणच उभे केलेल्या त्या भूताचा बंदोबस्त करताना पाक सेनेच्या नाकी दम आलेला आहे. अवघ्या चारपाच वर्षात घातपात, लष्करी कारवाई वा जिहाद यातून लाखभर माणसे मारली गेली आहेत. पण तो उच्छाद आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. मध्यंतरी व्याप्त काश्मिरमध्ये भारताचा झिंदाबाद करत हजारो लोक रस्त्यावर आले. त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठीही पाक लष्कराला बंदुका उचलाव्या लागल्या होत्या. बलुचिस्तान तर अखंड लष्कराच्या पोलादी टाचेखाली भरडून काढावा लागतो आहे. कराचीसारख्या महानगरातही नेहमी घातपाती घटना चालू आहेत. थोडक्यात पाकिस्तान जवळपास विस्कटून गेला आहे.
पाकिस्तानच्या अशा अवस्थेला तिथले धर्मांध राजकारण जबाबदार आहे, तितकाच तिथल्या लष्कराचा राजकीय हुकूमतीचा हव्यास कारण झालेला आहे. आरंभापासून राजकीय नेत्यांच्या हत्या करून लष्करी अधिकार्यांनी राजकीय सत्ता उपभोगली आणि राजकीय व्यवस्थाच निर्माण होऊ दिली नाही. आत्मविश्वास असलेले राजकीय नेतृत्व तयार होऊ नये, याची सतत काळजी घेतली गेली. जेव्हा कोणी असा नेता उभा रहायची हिंमत करताना दिसला तेव्हा त्याला ठार मारून लष्कराने राजकीय सत्ता आपल्या हाती घेतलेली आहे. आपल्या या राजलालसेला जनतेचे समर्थन मिळावे म्हणून मग भारताशी कायमचे शत्रूत्व जोपासणे पाक सेनेला भाग आहे. पण सैनिकी बळावर भारताला पराभूत करणे शक्य नसल्याने धर्माचा आधार घेऊन छुपे अघोषित युद्ध खेळत रहाणे पाकिस्तानला भाग झालेले आहे. त्यासाठी जनरल झियाउल हक यांच्यासारख्यांनी जुनी राज्यघटना मोडीत काढून इस्लामिक देश, अशी नवी घटना प्रस्थापित केली. परिणामी सैन्यातही धर्माचे अवडंबर माजले आणि सैन्याला पुरक अशा घातपाती संघटनांना खतपाणी घातले गेले. अफ़गाण जिहाद आणि काश्मिरात उच्छाद माजवायला त्याचा उपयोग झाला, तरी हळुहळू त्याचा फ़ैलाव संपुर्ण समाजात व लोकसंख्येत होत गेला. हिंसेचाच आश्रय घेतला मग दहशतवाद समाजात रुजत जातो आणि आता पाकिस्तानच दहशतवादाचा बळी झालेला आहे. आरंभी त्याची मौज तिथल्याही शहाण्यांना वाटली होती. पण जसजसे त्याचे चटके बसू लागले, तसा हा सुखवस्तु सुशिक्षित पुढारलेला पाक समाज अराजकाला कंटाळलेला आहे. पण जो सापळा उभा राहिला आहे, त्यातून सुटण्याचा मार्गच त्याच्याकडे उरलेला नाही. पंतप्रधान नवाज शरीफ़ त्याचेच प्रतिनिधी आहेत. खरे तर तेही अशा लष्करी दहशतीतून तावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत. म्हणूनच भारताशी मैत्री व शांतता म्हणजे काय ते त्यांना चांगले कळते.
१९९९ सालात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी हस्तांदोलन करणारे नवाज शरीफ़ आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हात मिळवणारे शरीफ़ यातला हा मोठा फ़रक आहे. तेव्हा दिल्ली-लाहोर सुरू झालेली बस व त्यातून लाहोरला गेलेले वाजपेयी आणि कालपरवा थेट लाहोर विमानतळावर उतरलेले मोदी; यातला फ़रक म्हणूनच मोठा व लक्षणिय आहे. तेव्हाचे शरीफ़ जितके सत्ताधारी म्हणून गुर्मीने वागत होते, तितका आत्मविश्वास आज त्यांच्यापाशी नाही. कारण तेव्हा मुशर्रफ़नी दिलेला दगा आणि नंतर देशोधडीला लागण्याचा अनुभव गाठीशी आहे. म्हणूनच पाकसेनेच्या छायेतून बाहेर पडायला प्रयत्नशील असलेले शरीफ़ आणि पोखरणला उत्तर म्हणून पाक अणूस्फ़ोटाला संमती देणारे शरीफ़, यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. आज शरीफ़ यांना भारत शत्रू वाटण्यापेक्षा पाकसेनेच्या गुलामीतून बाहेर काढू शकणारा मित्र म्हणून ते मोदींकडे बघत आहेत. आपल्याच सेनेपेक्षा त्यांना भारताच्या मैत्रीचा आधार अधिक वाटत असला तर नवल नाही. पण नुसताच भारताचा आधार आपल्याला लोकशाहीतील संपुर्ण अधिकाराचा सत्ताधीश करील, असा शरीफ़ यांना भ्रमही नाही. तर जगातील राजकीय समिकरणेही बदलल्याचा त्यांना अंदाज आहे. नागरी समाजाने उचल खाल्ली तर लष्करी सत्ता उध्वस्त होऊ शकते, हे त्यांनी मागल्या तीन वर्षात बघितले आहे. गडाफ़ी, सद्दाम वा मुबारक यांची गच्छंती त्यांच्या समोर झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी मोदींशी हातमिळवणी केलेली असेल, तर त्यामुळे पाक सेनापतींना घाम फ़ुटणे स्वाभाविक आहे. जिहादी हिंसाचाराने कंटाळलेला पाकचा नागरी समाज, हातातून सुटलेले जिहादी भस्मासूर व त्यातच शरीफ़ परस्पर निर्णय घेताना दिसले, तर पाकचे लष्करी अधिकारी हताश निराश होणे सहाजिक आहे. तेच मग अतिरेकी साहसाचे कारण बनू शकते. पण तोच आत्मघातही ठरू शकतो.
पठाणकोटचा हल्ला त्यातूनच झालेला आहे. तो जुन्या धोरण वा रणनितीचा भाग आहे. पण बदलत्या काळाला उपयुक्त ठरणारा नाही. आज बलुचिस्तान पोखरलेला आहे. व्याप्त काश्मिरात शांतता नाही. कराचीपासून अनेक भागात बंडखोरी सतावते आहे आणि तिला आवर घालण्यात पाक लष्कराला यश मिळू शकलेले नाही. म्हणून भारताच्या कुरापती करणे पुर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. त्यातच पाकचा पंतप्रधान व राजकीय नेतृत्व लष्कराला साथ देणार नसेल, तर इजिप्तसारखी अवस्था होऊ शकते. इजिप्तच्या तहरीर चौकात विद्यार्थी व तरूणांनी ठाण मांडले आणि लष्कराची हुकूमत झुगारण्याचा पवित्रा घेतला. लोकशाहीची मागणी घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर रणगाडे घालण्याचा जुनाच पवित्रा घेतला गेला. पण रणगाड्यांना व बंदुकीला घाबरून लोक माघार घेईनात, तेव्हा लष्करशहा मुबारक यांचे आदेशच सैनिकांनी झुगारल्याची घटना चार वर्षापुर्वीची आहे. उलट लष्करानेच आपल्या प्रमुखाला बंदी बनवून लोकांना मुजरा केलेला होता. पाकिस्तानची अवस्था त्यापेक्षा चांगली नाही. आज तिथला नागरी समाज लष्कराच्या दडपशाहीला झुगारायला रस्त्यावर उतरला, तर कुणाकुणाला गोळ्या घालून सत्ता टिकवणे पाकसेनेला शक्य आहे? तसे घडल्यास गल्लीबोळात छपून बसलेले त्यांचेच जिहादी भस्मासूर लोकलढा म्हणून हत्यारे पाजळीत धिंगाणा घालू लागतील. जसे मुबारकने दडपून टाकलेल्या मुस्लिम ब्रदरहुडच्या अनुयायांनी इजिप्तमध्ये केले. त्या बंडाला आवरणे मग सेनाधिकार्यांना शक्य होणार नाही. कारण सामान्य सैनिकही सामान्य जनतेतून आलेला सामान्य नागरिक असतो. ती स्थिती पकिस्तानला भेडसावते आहे. कारण जगातला लष्करी हुकूमत गाजवणरा पाकिस्तान हा अखेरचा इस्लामी देश शिल्लक आहे. त्यापासून त्याला मुक्त करायचे शरीफ़ यांनी ठरवले असले तर?
लाहोरभेट हा मोदींनी जीवावर पत्करलेला धोका होता. पण त्यातून त्यांची शरीफ़ यांच्याशी असलेली जवळीक स्पष्ट होते. अशा पार्श्वभूमीवर पठाणकोटची घटना बोलकी आहे. शरीफ़ मोदी भेटीने पाक सेनाधिकारी का विचलीत झालेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. त्याच बोलणी व विश्वासाला तडा जावा म्हणून लष्कराने जिहादींच्या मदतीने ताजी घटना घडवलेली आहे. तिच्या तीव्र प्रतिक्रिया उमटणार यात शंका नाही. लष्कराच्या मुसक्या बांधण्याइतकी शरीफ़ यांची हिंमत व शक्ती नाही. परंतु त्या हल्ल्याला भारताने उत्तर द्यायचे ठरवले तर पाक सरकार सेनेच्या बाजूने किती उभे राहिल, याची शंका आहे. कडेलोटावर उभ्या असलेल्या मुबारक वा गडाफ़ीने पत्करला तोच धोका यातून पाक सेनापतींनी पत्करला आहे. त्याविषयी बोलताना मोदी वा भारत सरकारने कुठेही पाकिस्तानचे नाव घेतलेले नाही, तर थेट पाकसेनेवर आरोप केला आहे. म्हणजेच घातपाती हल्ले पाकिस्तान सरकार वा शरीफ़ यांच्या प्रेरणेने होत नसून पाक सेनेची ही कुरापतखोरी आहे, असेच बोट दाखवण्यात आलेले आहे. शरीफ़ व पाक सेना यांच्यात भारत फ़रक करतो, असाच संकेत त्यातून दिलेला आहे. त्याचा सूचक अर्थ इतकाच आहे, की भारताची रणनिती पाक राजकारण व लष्करी प्रशासन यांच्यात भेद करण्याची आहे. शरीफ़ यांच्यावर भारत विश्वास ठेवू शकतो, पण पाक सेनेवर नाही, असा त्याचा ध्वनित अर्थ आहे. किंबहूना शरीफ़ही कोलंबोहून मोदींना फ़ोन करतात व कारवाईचे आश्वासन त्यानंतर देतात, त्यातून आपल्याच सेनेविषयी आत्मियता नसल्याचे सूचित करीत आहेत. मुंबई व पठाणकोट हल्ल्यातला हा फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणूनच पुढल्या काळातल्या पाकिस्तानातील घटना काळजीपुर्वक बघणे व समजून घेणे अगत्याचे असणार आहे. जगातला शेवटचा लष्करी हुकूमतीखालचा इस्लामी देश खरेच मुक्त होईल का?
(पूर्वप्रसिद्धी तरूण भारत नागपूर)
रविवार १०/१/२०१६
छान भाऊ मस्तच
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteखरच आहे सर ... तुम्ही म्हणता त्या प्रकारे पाकिस्तानचा Egypt होतो आहे ... अंतर्गत याद्वीच वाढत आहे त्यामुळे भारतीय सीमेवर पाकिस्तान तणाव निर्माण करणार नाही / त्याला तसे करता येणार नाही ... बलुचिस्तान प्रमाणे सिंध आणि पंजाब हे पेटत आहे त्यामुळे पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडले तर बराच होईल
ReplyDeletehttp://www.dawn.com/news/1232883/rangers-operation-in-punjab-on-the-cards
खरी समस्या वेगळीच आहे. तारीक फताह यांच्या विश्लेषणानुसार फॅसिझम आणि इस्लामोफॅसिझम मध्ये हा फरक आहे की पहील्याला जगावर राज्य करायचे असते तर दुस-याला स्वत:सकट जगाचा विध्वंस करून स्वर्गाची प्राप्ति करून घ्यायची आहे. गेल्या 1400 वर्षाचा इतिहास पहाता मुस्लिमांनी नागरी सत्तेखाली गुण्यागोविंदाने प्रगती केली आहे असे अपवादाने तरी दिसते की नाही कोणास ठाऊक? हा 1400 वर्षांचा इतिहास रक्तरंजीतच असेल तर नागरी सत्तेची स्वप्न कशी बघायची? यांना रक्तरंजीत संस्कृतीची इतकी सवय आहे की हे गैर मुस्लीम नाहीतर मुस्लिम (शिया सुन्नी) नाहीतर स्वत:च्या कबिल्यातले नाहीतर स्वत:च्या कुटुंबातले कुणाला ना कुणाला तरी हे मारणारच. इस्लामचा अर्थ शांतता कसा आहे कुणास ठाउक? माझ्या आठवणी प्रमाणे आपल्याच एका ब्लाॅग मध्ये "The Last Arab" नावाचे व्यंगचित्र होते. तीच वस्तुस्थिती आहे. जिवंत असेपर्यंत बघुयात काय काय होते ते.
ReplyDeleteइराकला त्या पंक्तीत बसविणे चूक आहे Iraq was the only secular country in this part of the world. सद्दाम हुसेनला हटवून कोणालाही काहीही साध्य करता आले नाही. अमेरिकेच्या शस्त्र उद्योगाला थोडा फायदा झाला इतकेच.
ReplyDeleteEgypt was also a (dictatorial) democracy under Hosni Mubarak but was secular. Arab spring was used to push forward the muslim brotherhood agenda but they finally failed. More important, the army never was in power in Egypt except when they took over when Mursi's policies brought the country on the verge of civil war.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10153408941016126&id=660891125
ReplyDelete