मायकेल मायर नावाचा एक अमेरिकन पत्रकार आहे. पंचवीस वर्षापुर्वी उमेदवारी करत असतानाचे धक्कादायक अनुभव त्याने एका पुस्तकात ग्रथित केलेले आहेत. ‘१९८९: ईयर दॅट चेंज्ड थ वर्ल्ड’ असे त्या पुस्तकाचे नाव आहे. माध्यमातून सामान्य माणसापर्यंत येणार्या बातम्या आणि प्रत्यक्षातले वास्तव, यात किती टोकाचा फ़रक असतो, त्याची गाथाच ह्या गृहस्थाने कथन केली आहे. १९८८ मध्ये तो युरोपमध्ये ‘न्युजविक’ या मान्यवर अमेरिकन साप्ताहिकाचा बातमीदार म्हणून काम करत होता. अकस्मात त्याला बर्लिन येथे ब्युरोचिफ़ म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला आणि त्याला नवल वाटले. कारण आधी त्या जागी एका ज्येष्ठ सहकार्याची नियुक्ती झाल्याचे त्याने ऐकले होते. पण तेव्हा बर्लिन हे युरोपला विभागणारे शहर होते आणि पुर्व युरोप सोवियत साम्राज्य म्हणून ओळखला जात होता. तिथे कम्युनिस्ट राजवट होती आणि अविष्कार स्वातंत्र्य वगैरे बोलणार्याला गजाआड जाऊन पडावे लागत असे. अशा जागी कुठलीही सरकारला दुखावणारी बातमीदारी करणे शक्य नव्हते, की खरीखुरी माहिती काढण्याचा गुन्हा करण्याची हिंमत कुठल्या पत्रकारामध्ये नसायची. म्हणजेच सरकारी वा सत्ताधारी नेत्यांकडून जी माहिती मिळेल, त्याची अळणी बेचव बातमी लेख खरडण्यापलिकडे तिथे आकर्षक काहीही नव्हते. म्हणूनच तिथे काही खळबळजनक घडत नव्हते. म्हणूनच त्या नीरस कामातून ज्येष्ठ सहकार्याने अंग काढून घेतले होते. परिणामी मायरला तिथे पाठवण्याचा निर्णय झाला होता. पण मायर खरा नशिबवान ठरला. कारण पुढल्या वर्षभरात त्याला जगातल्या सर्वात महत्वाच्या व इतिहास घडवणार्या घटनाक्रमाला व्यक्तीगत सामोरे जाण्याची अपुर्व संधी मिळाली. ही संधी इतकी अपुर्व होती, की त्याने बघितलेल्या घटना व पाठवलेल्या बातम्यांवर त्याचेच संपादकही विश्वास ठेवायला धजावत नव्हते. सहाजिकच मायर जे काही वृत्तांकन करत होता ते बाजूला ठेवून घटनाक्रमापासून मैलोगणती दूर असलेले त्याचे ज्येष्ठ व संपादक खोट्यानाट्या कपोलकल्पित गोष्टी पुर्व युरोपातील घटना म्हणून वाचकांच्या माथी मारत होते. अर्थात ही कहाणी एकट्या ‘न्युजविक’ साप्ताहिकापुरती मर्यादित नव्हती, तर बहुतेक माध्यमांसाठी लागू होती. त्याच्या पुस्तकातील शेकडो घटनांचा उल्लेख तेव्हाच्या वर्तमानपत्रातून आजही तपासून बघता येईल आणि माध्यमे सामान्य वाचकाच्या डोळ्यात किती व कशी धुळफ़ेक करतात, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. त्यातला एकच किस्सा इथे नमूद करायला हवा.
ब्रेझनेव्ह हा पोलादी टाचेखाली सोवियत साम्राज्य दाबून ठेवणारा नेता मरण पावला आणि सोवियत रशियातील म्हातार्या नेत्यांची पिढी संपत आलेली होती. त्यानंतरचे चेर्नेन्को आणि आंद्रापाव्ह असे दोन सर्वोच्च नेते सत्तेत आले आणि काही महिन्यातच मरण पावले. त्यामुळे एकदम नव्या पिढीतल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांची त्या सर्वोच्च पदासाठी निवड झाली. अर्धशतकापेक्षा अधिक झाकलेल्या सोवियत साम्राज्याचा पोलादी पडदा थोडा किलकिला करण्याचा धाडसी निर्णय या नव्या नेत्याने घेतला आणि अनेक जुलमी निर्बंधही ढिले करण्यास आरंभ केला. त्यामुळे रशियासह बहुतेक कम्युनिस्ट युरोपिय देशात स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली होती. त्यासाठी उतावळ्या झालेल्या जनतेने रस्त्यावर येऊन स्वातंत्र्याची मागणी सुरू केली होती. एकूण कम्युनिस्ट नंदनवनात अराजक पसरू लागले होते, तोच हा कालखंड! त्यातील प्रतिकात्मक घटना म्हणजे युरोप व जर्मनीला दुभागणारी बर्लिनची भिंत होय. या गडबडीत ती भिंत जमावाने आक्रमण करून उध्वस्त केली आणि क्रमाक्रमाने सोवियत साम्राज्य धुळीस मिळाले. त्या भिंतीच्या कोसळण्याच्या अनेक दंतकथा आहेत. गोर्बाचेव्ह यांचा उदय आणि रेगन यांची कारकिर्द संपण्याचा काळ समान होता. गोर्बाचेव्ह लोकशाही आणायला निघाले होते आणि त्याला रेगन यांनी प्रोत्साहनही दिलेले होते. अशाच एका संयुक्त समारंभात दोन्ही नेते एका व्यासपीठावर आलेले होते आणि त्यात रेगन यांनी ‘बर्लिनची भिंत पाडा’ मगच लोकशाही येऊ शकेल, असे आवाहन केलेले होते. योगायोग असा की त्यानंतर अल्पावधीतच ती भिंत पाडली गेली आणि रेगन यांचे तेच शब्द ऐतिहासिक ठरले होते. पण ते शब्द रेगन यांनी उत्स्फ़ुर्तपणे बोललेले नव्हते, की पुर्वतयारीने उच्चारलेले नव्हते. त्यांची भाषणे लिहीणार्या पथकाने त्या भाषणातले हे वाक्य असावे की नसावे, यावर काही तास उहापोह केला होता आणि अखेरीसच त्याचा भाषणात समावेश झाला होता. मात्र ते भविष्याची चाहुल वा सुचक इशारा देणारे वाक्य नव्हते. त्याचप्रमाणे त्या वाक्यामुळे वा अमेरिकेच्या कुठल्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात बर्लिनची भिंत पाडली गेली नाही. घटनाक्रम केवळ योगायोग होता.
बर्लिन विभागणार्या त्या भिंतीच्या अलिकडे पलिकडे जाण्याविषयी अनेक बंधने व व्यवस्था होत्या. एका शुक्रवारी त्या संबंधी काही निर्णय झाला आणि त्याची माहिती पुर्व जर्मन सरकारच्या प्रवक्त्याला देण्यात आली. त्यानेही संध्याकाळी नेहमीच्या खाक्याने त्याची पत्रकारांपुढे घोषणा करून टाकली. एका पत्रकाराने सहज प्रश्न केला, की भितीच्या आरपार जाण्यायेण्याची बंधने उठवली जाणार व सीमा खुली होणार, हे ठिक आहे. पण ते कधीपासून होणार? प्रवक्त्याकडे त्याचे उत्तर नव्हते. त्याने वरीष्ठांकडे त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी कोणी जागेवर नव्हता. म्हणून प्रवक्त्याने उत्तर दिले, विनाविलंब हा निर्णय लागू होणार आहे. पुर्व जर्मनीतील रेडीओवर ही बातमी अंधार पडताना प्रक्षेपित झाली आणि तासाभरातच बर्लिनच्या भिंतीकडे शेकड्यांनी लोकांचे जथ्थे येऊ लागले. शेकड्यांची संख्या हजारात होऊ लागली आणि त्या भिंतीपाशी सुरक्षेला तैनात असलेल्या सैनिकी तुकड्यांना काय करावे ते उमजेना. कारण शुक्रवारची रात्र होऊ लागली होती आणि सरकारसह बहुतेक वरीष्ठ अधिकारी साप्ताहिक सुट्टीवर रवाना झालेले होते. उशिरा हा जमाव आणि त्यातून होणारा गदारोळ इतका वाढला, की भिंतीच्या पलिकडे पश्चिम बर्लिन व जर्मनीतले लोकही भिंतीपाशी कुतूहलाने जमा होऊ लागले. मध्यरात्र होईपर्यंत लाखोचा जमाव भिंतीच्या दोन्ही बाजूंनी जमा झाला आणि धडका देऊ लागला. त्याला आवरणे तुटपुंज्या सैनिकी पथकांना शक्य नव्हते आणि वरीष्ठांशी संपर्कही होत नव्हता. तेव्हा वैतागून तिथे तैनात असलेल्या पुर्व जर्मन सेनाधिकार्याने भिंतीतले दरवाजे उघडण्याचे आदेश दिले. मोठा लोंढा त्यातून आरपार घुसला आणि त्याचे चित्रण व बातम्या पाश्चात्य देशातल्या वाहिन्या व रेडीओवर झळकू लागल्या. त्यात हस्तक्षेप करण्यापुर्वीच परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. दोन्हीकडले जर्मन नागरिक लाखोच्या संख्येने भिंतीला येऊन भिडले होते, त्यावर चढले होते, झेंडे फ़डकावून आनंदोत्सव चालू झाला होता. त्याचे पर्यवसान लौकरच भिंतीला धडका देण्यामध्ये झाला. भलीथोरली जाडजुड कॉन्क्रीटची भिंत सामान्य नागरिक हाताने आघात करून तोडायच्या कामाला लागले होते.
रेगन यांच्या त्या ऐतिहासिक वाक्याने कम्युनिस्ट युरोपात क्रांती झाली नव्हती की बर्लिनची भिंत पाडण्यास प्रेरणा मिळालेली नव्हती. घडला तो निव्वळ एक योगायोग होता, शुक्रवारी कोणी वरीष्ठ अधिकारी भिंतीच्या रक्षकांना आदेश द्यायला जागेवर नव्हता आणि अर्धवट बातमी झळकल्याने लाखोच्या संख्येने तिथे जमलेल्या नागरिकांना रोखणे कुठल्या सैनिकी पथकाला शक्य नव्हते. त्याचे पर्यवसान ती ऐतिहासिक भिंत जमिनदोस्त होण्यात झाले. पण जगातल्या तात्कालीन सर्व बातम्या तपासून बघा. त्यामागे रेगन यांचे ऐतिहासिक वाक्य चिकटलेले दिसेल. मायकेल मायर त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. पण त्याच्या संपादक वरीष्ठांचा त्याच्या कथनावर विश्वास बसला नाही. ही पुढारलेल्या व विचारवंत पत्रकारीतेची शोकांतिका असते. मायकेलने आपल्या पुस्तकात कथन केलेला हाच एक किस्सा नाही, असे डझनावारी घटनाक्रम आढळतील, की त्याने प्रत्यक्ष अनुभवले आणि लिहीले, तरी त्याला त्याच्याच साप्ताहिकाचे अमेरिकेत बसलेले संपादक प्रसिद्धी देत नव्हते. कारण त्या घटना वा त्याची कारणे त्यांना पटत नव्हती. त्यांच्या समजुती वा भ्रमातील ( आयडिया ऑफ़ सोवियत स्टेट) सोवियत युनियनमध्ये असे काही घडू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अर्धशतकाहून अधिक काळ सोवियत कम्युनिस्ट जगताची जी प्रतिमा व कल्पना त्यांच्या डोक्यात भरवली गेली होती, त्याच्याशी मायकेलचे वार्तांकन जुळत नव्हते. म्हणून त्याकडे पाठ फ़िरवली जात होती. आपल्या समजूती कल्पना व भ्रम यातून बाहेर पडून वास्तवाला सामोर जाण्याची हिंमत अशा बुद्धीमान लोकांमध्ये नसते. राजकीय, आर्थिक वा सामाजिक, सांस्कृतिक विश्लेषण करताना त्यामागे काही ठरलेला कार्यकारणभाव असतो, असे जे ग्रंथप्रामाण्य डोक्यात जाऊन बसलेले असते, ते वास्तव अनुभवाला झुगारत असते. हे जगभर तमाम वैचारिक व बौद्धिक क्षेत्रामध्ये घडत असते. कुठल्याही सामान्य पापभिरू श्रद्धाळू माणसापेक्षा बुद्धीमान माणसे भिन्न नसतात. प्रत्येकजण आपल्या समजूतीच्या कवचबंद पिंजर्यातली सुरक्षा भेदली जाण्याच्या भयाने घाबरलेला असतो. तेच तेव्हा मायकेलच्या संपादक वरीष्ठांकडून चाललेले होते आणि आज जगभर, भारतात माध्यमातले विचारवंत तसेच समजूतीला चिकटलेले आपण बघत असतो. सामान्य माणसाला जे दिसते व उमजते, तेच अशा शहाण्यांना कशाला लक्षात येत नाही, याचे आपल्याला नवल त्यामुळेच वाटत असते. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. (अपुर्ण)
छान भाऊ
ReplyDeleteछान
ReplyDelete