Thursday, February 25, 2016

स्मृतीजी, राहुलचे आभार माना!

राजकारणाची खरी शक्ती जनमानसातील प्रतिमांमध्ये सामावलेली असते. सामान्य माणसाच्या मनात ज्या प्रतिमा किंवा समजुती ठसवलेल्या असतात, त्यावर काही लोक आपले हेतू साध्य करून घेतात, त्याला राजकारण म्हणतात. म्हणूनच आपल्या विरोधकाला खलनायक म्हणून पेश करायचे व त्याचाशी झुंजणारा म्हणून आपण नायक असल्याचे लोकांना पटवायचे, म्हणजे राजकारण होय. हे लक्षात घेतले तर बुधवारी संसदेत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी काय बाजी मारली, ती लक्षात येऊ शकेल. किंबहूना त्यांना तशी संधी देण्यातला विरोधकांचा मुर्खपणा लक्षात येऊ शकेल. वीस महिन्यांपुर्वी सत्तांतर होऊन मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यात पहिल्या दिवसापासून विरोधक व टिकाकारांचे लक्ष्य झालेला एकच मंत्री होता, त्याचे नाव स्मृती इराणी! देशातील शिक्षण व बुद्धीमत्तेचा विकास करण्याचे काम ज्याच्या हाती आहे, त्याचे स्वत:चे शिक्षण किती, लायकी काय, असे प्रश्न विचारले गेले. इराणी यांचे शिक्षण त्यातली पात्रता किंवा प्रमाणपत्रे यांचीही छाननी करण्यात आली. एकूणच कोणा बुद्दू व्यक्तीला महत्वाचे खाते दिले गेले आणि देशातील शिक्षणाचा बोर्‍या मोदींनी वाजवला, असा ओरडा सुरू झाला होता. त्यात अनेक मोदी समर्थकही सहभागी होते. सहाजिकच विरोधकांच्या हाती कोलित मिळाले होते आणि स्मृती इराणींना बदनाम करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. अधिक त्यांनी खुलासा करायचा प्रयत्न केल्यास त्याचा विपर्यास करून त्यांची प्रतिमा अधिकच मलिन करण्याचा सपाटा लावला गेला होता. गेल्या महिनाभरात त्यावर कडी झाली. स्मृती इराणी संघाचा अजेंडा राबवत आहेत आणि प्रत्येक शिक्षण संस्थेला भगवे बनवण्याचा घाट घातला गेला आहे. तिथे अल्पसंख्यांक, मागास जातीजमातींवर घोर अन्याय सुरू झाला आहे. त्यासाठी चांगल्या शिक्षक, अधिकार्‍यांना हटवून हिंदूत्वाचे हस्तक आणले जात आहेत, असा घोषा लावला गेला होता. मात्र इराणींना त्याचा खुलासा वा इन्कारही धडपणे करता येत नव्हता, तशी संधीही दिली जात नव्हती.
प्रत्येकवेळी अभिनय सोडून नेता झालेली अभिनेत्री, असा त्यांचा हेटाळणीयुक्त उल्लेख माध्यमातून जाणिवपुर्वक चालला होता. सोनिया गांधी राजकारणात येण्यापुर्वी गृहीणी होत्या आणि पुर्वायुष्यात बारगर्ल म्हणून त्यांनी काम केलेले होते. पण त्यांचा तसा उल्लेख कधी झाला नाही. मात्र स्मृतीच्या बाबतीत अभिनेत्री ही बिरूदावली कायम होती. त्याचे कारण नामोहरम करणे हेच होते. त्यातच नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणा व त्यापुर्वी हैद्राबाद विद्यापीठातील आत्महत्येचा विषय आलेला होता. सहाजिकच त्याचेही खापर स्मृती व मोदी सरकार यांच्यावर फ़ोडण्याची अपुर्व संधी साधली गेली. त्याचा एक व्यापक परिणाम झालेला होता. कारण या आरोपात तथ्य किती व कोणते त्याची कुठलीही तपासणी नाकारली गेली होती. आरोप म्हणजेच पुरावा, असे चित्र होते. म्हणूनच राहुल गांधी नित्यनेमाने संघाचा अजेंडा विद्यापीठात लादला जातोय, अशी शेरेबाजी राजरोस करत होते. पण त्यासाठी कुठला पुरावा दिला गेला नाही, तपशील समोर आणला गेला नाही. स्मृती इराणी व मोदी सरकार खुलासे देऊ शकत होते. पण त्याला प्रसिद्धीच द्यायची नाही, असा सेक्युलर माध्यमांचा संकेत होता. म्हणून हे आरोप खरेही वाटू लागले होते. थोडक्यात स्मृती वा मोदी सरकार यांना बदनाम करण्यात विरोधक यशस्वी झालेले होते. कारण जनमानसात मोदी सरकारची प्रतिमा काहीशी डागाळलेली होती. त्यातला महत्वाचा डावपेच सरकारी बाजू जनतेपासून पुर्णपणे झाकून, लपवून ठेवण्याचा होता. सत्य लोकांसमोर आल्यास हेच आरोप टिकणारे नाहीत, हे विरोधकांना माहिती असायला हवे होते. म्हणूनच व्यापक पातळीवर संसदीय चर्चेतून व थेट प्रक्षेपणातून स्मृती इराणींनी सत्य जगापुढे मांडण्यात विरोधकांचे नुकसान ठरलेले होते. सहाजिकच संसदेबाहेरचा हा तमाशा, संसदेत खेळला जायला नको होता. तो विरोधकांना हानिकारक होता. सरकारची कोंडी करण्यासाठी अन्य बरेच विषय होते. पण त्याचे तारतम्य विरोधकांना राहिले नाही आणि आपल्यावरचे सर्व आरोप धुवून काढण्याची अपुर्व संधी स्मृती इराणी यांना बहाल करण्यात आली.
आपल्या समर्थनासाठी मोदी सरकार वा स्मृती इराणी इतके प्रदिर्घ खुलासेवार उत्तर संसदेत देऊ शकल्या नसत्या. पण त्यांच्याच खात्यासंबंधी विस्तृत चर्चा झाली, मग तिला उत्तर देतांनाच त्यांना सविस्तर बोलण्याची संधी मिळणार होती. ती नाकारणे ही विरोधकांची रणनिती असायला हवी होती. जेणे करून धादांत खोट्या आरोपांनी केलेल्या बदनामीतून सरकार व स्मृती इराणींना सुटका मिळू नये. पण संसदेच्या पहिल्याच बैठकीत विद्यापीठाच्या विषयावर चर्चेचा आग्रह धरला गेला आणि स्मृती इराणींना वीस महिन्यांचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी बहाल करण्यात आली. आपल्यावरचे किंवा सरकारवर झालेले सर्व आरोप नुसते बिनबुडाचे नाहीत, तर ते आधीच्या कॉग्रेस सरकारचीच पापे असल्याचे पितळ उघडे पाडण्याची ही संधी स्मृतीनी पुरेपुर साधली आणि कॉग्रेसला सभागृहातून पळ काढण्याची वेळ आली. सतत मोदींना सवाल करणारे व जबाब मागणारे राहुल गांधी व कॉग्रेसला आपलीच पापे ऐकून घेण्याचे त्राण राहिले नाही आणि स्वत: चर्चा मागितलेली असूनही सभात्यागाची पळवाट शोधायला लागली. तिथेही पळणार्‍या प्रतिस्पर्ध्यावर वार करायला स्मृती थांबल्या नाहीत. ‘पळा, पळा, नाहीतरी तुम्हाला चर्चा हवीच कुठे होती? नुसता गोंधळ घालायचेच तुमचे काम’, अशी शेरेबाजी त्यांनी लोकसभेत केली. त्याचेही उत्तर कॉग्रेसपाशी नव्हते. कारण स्मृती एकामागून एक प्रत्येक आरोपाचे खंडन करताना ते मुळातच कॉग्रेसचेच पाप असल्याचे कागदोपत्री पुरावेच संसद व देशासमोर मांडत होत्या. त्या भडीमाराला सामोरे जाण्याचीही हिंमत विरोधकात राहिली नव्हती. ज्या अन्याय अत्याचारासाठी भाजपावर संघावर आरोप झाले, ते करणारे अधिकारी, कुलगुरू कॉग्रेसच्याच राजवटीत नेमलेले आहेत आणि कित्येक घटना तर युपीए कॉग्रेसची सत्ता असतानाच झालेल्या आहेत, त्याची जंत्री स्मृतीनी पेश केली. आपल्या पापांचा चेहरा बघून कॉग्रेस व युपीए पक्षांना सभागृहात बसणेही अशक्य होऊन गेले. वीस महिन्यात कधी नव्हे इतका सत्ताधारी पक्ष आक्रमक झालेला दिसला. पण मॅन ऑफ़ द मॅच स्मृती इराणी हे मान्यच करावे लागेल.
ह्या चर्चेचा आग्रह विरोधकांनी धरला नसता, तर हे सगळे तपशील व कॉग्रेस युपीएची पापे भाजपाच्या नावावर खपून गेलेली होती. कोणी इतक्या बारकाव्यात गेलेले नव्हते. अशाच आत्महत्या व अन्याय विविध विद्यापीठात सातत्याने होत राहिले आणि त्यासाठी कॉग्रेसी नेत्यानीच कशा कठोर कारवायांच्या मागण्या केल्या होत्या, त्याचे बाड घेऊन स्मृती हजर होत्या. त्याचा इन्कार करणेही कॉग्रेसला शक्य नव्हते, की विरोधकांना उलटलेले आरोप खोडून काढता येत नव्हते. सहाजिकच त्या रणधुमाळीत महिनाभराचे आरोप तोंडघशी पडले आणि त्यामागचे आततायी राजकारणही चव्हाट्यावर आले. कुठल्याही पक्षाने राजकारणात संधी साधण्याला गैर मानता येणार नाही. पण चतुराई वा धुर्तपणाच्या आहारी गेले, मग आपल्यावर येऊ शकणार्‍या संकटाचेही भान रहात नाही. दुसर्‍यासाठी खड्डा खणताना आपण त्यात पडू नये, याचेही भान उरत नाही. संसदेत हा विषय अटीतटीचा बनवण्यात डाव उलटण्याचा धोका होता. त्याचे भान सुटले आणि हाती आलेली बाजी पुर्णपणे उलटली. जी चिखलफ़ेक माध्यमातून व कांगाव्यातून भाजपाच्या अंगाला चिकटलेली होती, तिची लक्तरे करण्याची संधी स्मृती इराणी यांना त्यातून बहाल करण्याचा मुर्खपणा झाला. कारण तपशीलवार माहिती व कागदपत्रे सादर करून कुठल्याही शिक्षणाचे भगवीकरण झालेले नाही आणि अगदी विविध अन्याय करणार्‍या विद्यापीठातले ‘अत्याचारी’ अधिकारीही कॉग्रेसनियुक्त असल्याचे सत्य समोर आले. जे सत्ताधारी भाजपाला लाभदायक व विरोधकांना अपायकारक ठरले आहे. उलट हा विषय संसदेत आणला व ताणला गेला नसता, तर हेच आरोप गुलदस्त्यात राहिले असते आणि त्याच पापात कॉग्रेसचे हात कसे बरबटलेले आहेत, त्यावरचेही पांघरूण कायम राहिले असते. स्मृती इराणी बारावी शिकलेली सामान्य महिला राहिली असती आणि तिच्या संसदपटू गुणांची ओळख देशाला झाली नसती. एक उतावळ्या घाईगर्दीने मोदी विरोधकांनी किती मोठा दारूण पराभव ओढवून घेतला, त्याची ही बुधवारकथा. खरे तर स्मृती इराणी यांनी राहुलसह तमाम विरोधकांचे मनापासून आभार मानायला हवेत.

10 comments:

  1. बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था राहुल गांधीनी कॉंग्रेसची करून टाकली आहे.

    ReplyDelete
  2. मस्त भाऊ पण भाषण खरच छान होते तसेच अभ्यासपूर्वक होते.बोलती बंद झाली.

    ReplyDelete
  3. भाऊ ............मस्त लेख !! खरतर मागील आठवड्यातील लेखात आपण लिहिले होते कि खान्ग्रेस व कम्युनिस्ट शहाणे असतील तर हा जे एन यु विषय राज्यसभेत उपस्थित करणार नाहीत. पण दोघेही ' बिनडोक ' निघाले. आपल्याच हातानी आपले कपडे फाडले या दोघांनी ........राहुल बाबाला तर याची अजून जाणीवही झालेली नाही. मोडी सरकारने आता लवकरात लवकर ' कीटक नाशक ' ( देशाद्रोह्यांसाठी ) फवारायला हवे.

    ReplyDelete
  4. भाऊ तो राहूल तर बोटं चोखत बसला होता, नखं कुडतरत बसला होता.

    ReplyDelete
  5. भाऊ, टोल ढळतयावर काय होते ते तर 25 तारखेस बघितले पण त्यावर कढी 26 तारखेस होती. स्मृती इराणींनी ते विवादास्पद पत्रक लोकसभेत / राज्यसभेत वाचून देशातील लोकांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांनी देशाची माफी मागावी असे सांगितले. हे मात्र अजबच ! पत्रक काढणारे कोठेच देशाचे दोषी नाहीत पण वाचणाऱ्याने मात्र माफी मागावी. हे जरा अजबच वाटते. हर राम !

    ReplyDelete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. अगदी मनातलं बोललात भाऊ तुम्ही ...

    ReplyDelete