गेले अनेक दिवस मित्र पुन्हा पुन्हा एक प्रश्न विचारत आहेत. मी वाहिन्यांवरील चर्चेत का दिसत नाही? मला मुद्दाम तिथे बोलवत नाहीत काय? त्याचे उत्तर यापुर्वी अनेकदा दिलेले आहे. पुर्वी मला कोणी बोलवत नसे, पण ब्लॉगच्या लोकप्रियतेमुळे मला अगत्याने अशा चर्चेची आमंत्रणे मिळू लागली. पण वर्षभर त्यात सहभागी झाल्यावर त्यातली निरर्थकता लक्षात आली. नुसता ओरडाआरडा किंवा गदारोळ यापलिकडे त्यातून काहीही साधले जात नाही. अधिक दोनतीन तास वाया जातात. आपल्या बोलण्यातून वा चर्चेतून प्रेक्षकाच्या ज्ञानात कुठली भर पडत नाही, हे लक्षात आले. अधिक काही प्रसंगी तर अशा चर्चेत सहभागी होऊन आपल्याही बुद्धीला गंज चढण्याची भिती वाटू लागल्याने, त्यातून अंग काढून घेण्याचा निर्णय मीच घेतला. त्यानंतरही अनेकदा आमंत्रणे मिळाली. पण मी निर्णयच घेतला असल्याने त्याला साफ़ नकार दिला. परिणामी वाहिन्यांवरच्या कार्यक्रमात मी दिसेनासा झालो. अलिकडे तर बहुतांश वृत्तवाहिन्यांच्या चर्चाही मी बघत नाही. कारण तितका गोंगाट सहन करण्याची क्षमता अंगात राहिलेली नाही. याचा अर्थ टिव्हीकडे पाठ फ़िरवली असा होत नाही. अधूनमधून हाती रिमोट घेऊन टिव्ही बघत असतो. त्यात बातम्यांच्या हेडलाईन्स ऐकणे वा एखाद्या बातमीचा पाठपुरावा करणारे काही बघणे होते. अन्यथा चर्चा इत्यादी अजिबात बघत नाही. अगदीच सोशल मीडियातून कुठली खास लिन्क मिळाली, तर युट्युबवर बघणे होते. अन्यथा वृत्तवाहिन्या बघणे सोडून दिले म्हणायला हरकत नाही. त्यापेक्षा हल्ली माझे लक्ष काही मालिकांनी वेधून घेतले आहे. मात्र त्या मालिका काल्पनिक नसून वास्तवात घडलेल्या घटनांशी संबंधित अशा आहेत. प्रामुख्याने गुन्हेगारी व तपास यांच्याशी संबंधित अशा या मालिका मला आवडू लागल्या आहेत. बातमीचा वेध कसा घ्यावा आणि पत्रकारितेतून प्रबोधन कसे साधावे, याचे काही उत्तम नमूने त्यात अनुभवायला मिळाले, म्हणून त्याचा उल्लेख इथे करायचा मोह आवरला नाही.
लाईफ़ ओके या वाहिनीवर सावधान इंडिया किंवा इन्व्हेस्टीगेशन डिस्कव्हरी वाहिनीवर शैतान आणि सोनी वाहिनीवर क्राईम पेट्रोल अशा या तीन मालिका आहेत. शिवाय सीआयडी नावाची एक हिंदी चित्रपटाला लाजवणारीही मालिका आहे. पण ती काल्पनिक व अतिरंजित असल्याने मी तिकडे बघत नाही. प्रामुख्याने माझे लक्ष सोनीच्या क्राईम पेट्रोल या मालिकेवर असते. याचे कारण ही मालिका सत्यघटनेवर आधारलेली असून, त्यात गुन्ह्याचे उदात्तीकरण नाही की भावनातिरेक करणारे नाट्य नाही. त्यापेक्षा गुन्हा घडण्याच्या क्रमाने त्याचा उलगडा प्रेक्षकांपुढे करण्याची शैली अप्रतिम आहे. एखादी घटना घडते आणि पोलिस वा वर्तमानपत्रातून आपल्यापर्यंत येते. तिथून ह्या मालिकेतील भागाची कथा सुरू होते. मग हे प्रकरण जसजसे पोलिस उलगडत जाते, तसेच त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. भयानकता, थरार वा भयकथा असल्याप्रमाणे मांडणी करण्याचा कुठलाही अट्टाहास त्यात आढळत नाही. त्यापेक्षा अशा सत्यकथेतून लोकांनी सतर्क व प्रबुद्ध व्हावे, असा प्रयत्न जाणवतो. म्हणूनच मी त्याकडे आकर्षित झालो. एक सामान्य वाटणारी घटना असते. म्हणजे कुणा तरूण मुलीचे वा बालकाचे अपहरण! या बातम्या आपण नित्यनेमाने ऐकत असतो. त्यानंतर माध्यमातून पोलिसांच्या नाकर्तेपणाचा रतीब घातला जातो. पण अशा कुठल्याही प्रकरणात पोलिस वा तपास अधिकारी किती धावपळ करतात, त्याचा मागमूस आपल्यापर्यंत येत नाही. एक साधी किरकोळ वाटणारी घटना समोर आल्यावर पोलिसांना तिचा वेध घेताना किती जंग जंग पछाडावे लागतात आणि एका धाग्याचा आधार घेऊन दुसर्या धाग्यापर्यंत कसे पोहोचावे लागते, त्यातली कसरत या मालिकेतून सुंदर उलगडलेली असते. त्यामुळे पोलिस तपास म्हणजे काय आणि तो योग्य मार्गाने जाण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात, ते सामान्य लोकांच्याही लक्षात यायला मदत होऊ शकते. म्हणून मला हे कार्यक्रम आवडतात.
आपापल्या कचेरीत बसून वा लेखण्या सरसावून पोलिसांना नाकर्ते ठरवण्याची स्पर्धा पत्रकार करतात, किंवा चळवळ चालवणार्यांसाठी सर्व गोष्टी सोप्या असतात. पण एक गुन्हा म्हणजे पोलिसांसाठी रहस्यमय कोडे असते. ते उलगडण्यासाठी कुठलाही धागादोरा नसतो. वरकरणी मिळालेले पुरावे किंवा साक्षी दिशाभूल सुद्धा असू शकते. त्यातून खोट्याला बाजूला करून सत्यापर्यंत पोहोचणे किती जटील काम आहे, त्याचा सुंदर उहापोह प्रामुख्याने सोनीच्या मालिकेतून होत असतो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला येत्या काही दिवसात एक वर्ष पुर्ण होईल. त्यानिमीत्ताने मला ही बाब मांडायचा मोह झाला. कारण गेल्या आठवड्यात सोनीने एक घटना कोल्हापुरचीच दाखवली. त्या शहरात सोनसाखळी पळवण्याच्या घटनांचा सपाटा चालू होता. त्याला आळा घालण्यासाठी साध्या वेशातले पोलिस सर्वत्र फ़िरून माग काढत होते. एका बाजारात फ़ेरीवाल्याला धमकावणारे दोन तरूण त्यांच्या हाती लागतात आणि त्यांच्या जबान्या घेताना एका भलत्या खुनाची चाहुल लागते. त्यात कोणाचा खुन केला ते मारेकर्याला माहिती नसते आणि तरीही त्याचा वेध घेत पोलिस सगळे धागेदोरे शोधून काढतात. एकातून दुसरा धागा पकडत घेतलेला हा शोध खरेच पोलिसांच्या चतूर बुद्धीचे अपुर्व उदाहरण आहे. असे पोलिस राज्यात व कोल्हापूरात असताना दाभोळकर पानसरे यांच्या हत्या गुढ होऊन रहातात, हे म्हणूनच सहजासहजी मान्य करता येत नाही. या मालिकांमधून जे तपास बघायला मिळतात, त्या सत्यघटना आहेत. मग तेच पोलिस गाजलेल्या हत्याकांडाविषयी अनुत्तरीत राहाणे अजिबात पटत नाही. त्यामागे काही वेगळाच हेतू जाणवतो. पोलिसांच्या कामात वरीष्ठांकडून काही हस्तक्षेप झाला असल्याखेरीज हे खुन रहस्य बनून रहाण्याचे काही कारण दिसत नाही. अर्थात तपासकाम नेमक्या दिशेने व लक्ष्य बाळगून झाले, तर कुठलाही गुन्हा कोडे बनून रहाण्याचे कारण नसते. इथे दाभोळकर पानसरे प्रकरणात तीच अडचण दिसते.
शक्य झाल्यास प्रत्येकाने या मालिका बघाव्यात. पोलिस कसे एक एक धागा शोधतात आणि सूतावरून स्वर्ग गाठायची कसरत करतात, त्याची जाण येऊ शकेल. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे अनेकदा पोलिसांना व तपासाला हुलकावणी देण्यासाठी कशा फ़सव्या गोष्टी पुरावे समोर आणले जातात, त्याचाही उलगडा यातून होतो. इतके चाणाक्ष व चतूर पोलिस आपल्या मुंबई महाराष्ट्रात आहेत. मग ह्या दोन खुनाचा शोध लागत नाही, यावर विश्वास ठेवणे अशक्य होऊन जाते. पण त्याचाही उलगडा होऊ शकतो. कोणीतरी ह्याचा उलगडा होऊ नये म्हणून पोलिस व तपासाची दिशाभूल करण्याचा आरंभापासूनच प्रयास केला असेही वाटू लागते. पोलिस तपासावर नजर ठेवून गुन्हेगार त्यात अलगद कसे हस्तक्षेप करतात, तेही यात बघता येते. खुनी वा गुन्हेगार पोलिसांच्या व बळी झालेल्यांच्याच अवतीभवती वावरत असतो. उजळमाथ्याने तपासाचा माग घेत असतो. पण रहस्य उलगडत जाते, तेव्हा त्याचा खरा चेहरा उघडा पडतो. आरंभी तर असे वाटते, की सत्य प्रस्थापित व्हायची घाई सर्वाधिक त्यालाच आहे. पण रहस्य उलगडत जाते, तेव्हा तोच खरा गुन्हेगार राजरोस तपासाला हुलकावणी देत असल्याचे स्पष्ट होते. अर्थात त्यासाठी चतुर पोलिस अधिकार्यांच्या कामात ढवळाढवळ होता कामा नये. त्यांना मुक्तपणे काम करू दिले पाहिजे. त्यांच्यावर कुठलेही दडपण आणले जायला नको असते. दाभोळकर पानसरे प्रकरणात नेमका त्याचाच अभाव होता. प्रत्येकाला गुन्हा उलगडला जाण्यापेक्षा आपापले राजकीय हेतू साध्य करण्यात रस होता व आहे. म्हणूनच जो गोंधळ होत असतो, त्यातून वाट काढण्यासाठी आपणही पोलिस तपासाचे तंत्र समजून घेतले पाहिजे. त्यासाठी उथळ बातमीदारी ऐकण्या बघण्यापेक्षा या मालिका बघाव्यात. पोलिस तपासाचे सुत्र समजून घ्यावे. त्यातचा प्रबोधनाचा प्रयास खुप महत्वाचा आहे. खळबळ माजवणारी कथा हाताशी असताना या मालिका प्रबोधनाची शैली हाताळतात, त्यामुळे मला आवडतात. टिव्ही बघतो त्यातला बहुतांश वेळ सध्या याच मालिकांवर खर्च होतो. खरे तर घटना, बातमी व त्यामागचा आशा समजून घ्यायला ह्या तपास मालिका खुप शिकवतात आणि मदत करतात. अगदी ज्याला आपण सामाजिक राजकीय घडामोडी समजतो, त्याचे माध्यमातील फ़सवे विश्लेषण ऐकण्यापेक्षा ह्या तपासकथा बघितल्या तर जग समजून घ्यायला खुप मदत होईल. कशी, ते पुढल्या भागात वाचू!
दाभोळकर पानसरे यांच्या खुनाचा सर्वात जास्त फायदा पुरोगामी मंडळीनाच होताना दिसतो.व यांच्या खुना मार्फ़त राजकीय फायदा लूटण्याचा प्रयास पुरोगामी मंडळी कडून होताना दिसते.याच्या उलटी परिस्थिती हिंदुत्ववादी मंडळीची दिसते यांच्या खुनाचे आरोप हिंदुत्व वाद्यांवर होताना दिसतात.यांच्या ह्त्या होणे हे हिंदुत्ववाद्यांचे नुकसान आहे असेच दिसते व यांच्या हत्येचा फायदा पुरोगम्याना होताना दिसतो ..म्हणजे पोलिसांनी फायद्यात् असणाऱ्या व्यक्तिचि चौकशी करायला हवी असेच वाटते ....
ReplyDeleteक्राईम पेट्रोल खरेच खूप छान मालिका आहे!
ReplyDeleteJNU प्रकरणाचा उत्तर प्रदेशातील एका बेजबाबदार नेत्याच्या (सपा) पाकिस्तानातील कार्यक्रमात केलेल्या देशविरोधी वक्तव्याशी संबंध जोडता येईल काय?
ReplyDeleteछान भाऊ
ReplyDeleteMast
ReplyDeleteआपण मांडलेले विचार योग्य आहेत.
ReplyDeleteविद्याधर(विजय) कुलकर्णी
crime patrol is really worth watching
ReplyDelete