Tuesday, February 16, 2016

‘जनेयु’तली खाप पंचायत



जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने खळबळ माजली आहे. पण त्यावर झालेल्या कारवाईने अनेकांचे मुखवटे टरटरा फ़ाटत चालले आहेत. जे कोणी या देशद्रोही कृत्याच्या समर्थनाला नेहमीच्या उत्साहात पुढे आलेत, त्यांचे आजवर चालून गेलेले नाटक दिवसेदिवस उघडे पडू लागले आहे. डाव्या चळवळ्यांची एक नेहमीची शैली असते, ती दिशाभूल करण्याची! म्हणजे जो मुद्दा किंवा विषय आहे त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ करायचा, ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. इथेही काही वेगळे घडले नव्हते. ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्यावर तात्काळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची बोंब ठोकली गेली. मग त्यात शिक्षक संघटनेनेही उडी घेतली. त्यातला खोटेपणा प्रत्येक टप्प्यावर उघडा पडला आहे. कारण पहिल्या दिवशी वाहिन्यांवर झळकलेला उमर खालीद हा विद्यार्थी नेता आता फ़रारी झाला आहे. शिक्षक संघटना म्हणून पुढे आलेल्यांची भूमिका आपल्याला मान्य नाही, असे सांगायला मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी पुढे आले आहेत. मग विद्यापीठात पोलिस आलेच कसे, हा नवा युक्तीवाद पुढे आला आहे. ही काय भानगड आहे? पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? भारतभूमीत जिथे कुठे घटनात्मक कायद्याच्या राज्याला आव्हान दिले जाईल वा कायद्याची पायमल्ली होईल, तिथे जाऊन त्याला रोखण्याचा अधिकार पोलिसांना आपोआपच मिळत असतो. त्यासाठी कोणाची परवानगी वा संमती घेण्याची गरज नसते. संसद, विधानसभा किंवा न्यायालये यांनाच त्यातून संरक्षण मिळालेले आहे, वा अपवाद केलेला आहे. नेहरू विद्यापीठ तशी संस्था नाही. म्हणूनच तिथे कुठलीही बेकायदा कृत्ये घडत असतील, तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पोलिसांना आपोआपच मिळालेला आहे. पण त्याला आक्षेप घेणार्‍या तथाकथित डाव्या पुरोगाम्यांना मात्र तो अधिक्षेप वाटतो. मग ते विद्यापीठ ही खाप पंचायत आहे काय?

आजवर अनेक विषयात खाप पंचायत हा शब्द आपण ऐकलेला आहे. विविध जातीच्या वा पंथाच्या पुर्वापार चालत आलेल्या खाप पंचायती आहेत. त्या त्या समाज वा जातीघटकांच्या अशा पंचायती आहेत. त्यात समुदायाच्या जाणत्या वडीलधारे वा प्रतिष्ठीतांचा समावेश होत असतो. आपल्या जनसमुदायाच्या बाबतीत काही प्रसंग आला वा वादविवाद झाल्यास, ही पंचायत त्यात हस्तक्षेप करते आणि काहीप्रसंगी न्यायनिवाडाही करते. त्याला देशाच्या घटनेची कायद्याची कुठलीही संमती नाही. पंचायतीचे निवाडे कुठल्याही निकषावर कायदेशीर म्हणता येत नाहीत. म्हणूनच खाप पंचायती नेहमी वादग्रस्त होत असतात. परंतु त्या पंचायतीच्या समर्थकांची बाजू ऐकली, तर आजच्या डाव्या युक्तीवादाशी त्याची तुलना होऊ शकते. खाप पंचायतवाले म्हणतात, देशाचा कायदा कुठलाही व कसाही असो, आमच्या समुदायाच्या बाबतीतला न्यायनिवाडा आम्ही आपसात बसून ठरवू. त्यात कायद्याने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. जेव्हा पंचायतीचे म्होरके असे बोलतात, तेव्हा हेच तमाम डावे पुरोगामी त्यावर कुठला आक्षेप घेतात? देशात घटना आहे आणि कायद्याचे राज्य आहे. म्हणूनच नागरिकाच्या बाबतीत पंचायतीला निवाडा करण्याचा अधिकार नाही. त्यांनी निमूटपणे कायद्याला शरण गेले पाहिजे. मग जो कायदा देशातल्या प्रत्येक संस्था व नागरिकाला लागू होतो, त्यापासून नेहरू विद्यापीठाचा अपवाद कसा होऊ शकतो? दिल्लीत कुठेही काही बेकायदा घडले, तर पोलिस तिथे जाऊ शकत असतील, तर नेहरू विद्यापीठात जाण्याला आक्षेप कसा असू शकतो? ती भाषा लोकशाहीवादी वा कायदा पाळणार्‍याची असू शकत नाही. विद्यापीठातला विषय असल्याने सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये, ही भाषा लोकशाहीची नव्हेतर खाप पंचायतीची झाली ना? वाहिन्यांवरच्या चर्चेत खाप पंचायतीच्या मनमानीला आव्हान देणार्‍यात प्रामुख्याने जे बुद्धीमंत सहभागी होतात, त्यातले बहुतांश त्याचे नेहरू विद्यापीठाचे शहाणे असतात. मात्र तोच कायदा त्यांच्या पंचायतीत हस्तक्षेप करायला पुढे आला, तेव्हा नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत.

विद्यापिठात पोलिस आलेच कसे? नेहरू विद्यापीठात पोलिस पाठवलेच कोणी? बोलावलेच कोणी? ही भाषा खाप पंचायतीची आहे आणि ती बोलणारे तमाम शहाणे डावे, पुरोगामी व त्याच नेहरू विद्यापीठातले असावेत का? जे लोक कायम भाजपा वा हिंदूत्ववाद्यांवर ब्राह्मणधर्म लादण्याचे आरोप करण्यात धन्यता मानतात, त्यांची ही भाषा कुठली आहे? आम्ही जगासाठी नियम व नैतिकता तयार करतो, मात्र तीच आम्हाला लागू होत नाही, असला पुरोहिती मौलवी सादृष अहंकार, त्यातून डोकावत नाही काय? की जनेयु म्हणजे नेहरू विद्यापीठाचा इंग्रजी शॉर्टकट नसुन, तो हिंदी ‘जनेयु’ शब्द म्हणून योजला आहे? मराठीत ज्याला जानवे म्हणतात, त्यालाच हिंदीत जनेयु म्हणतात. योगायोग बघा, नेहरू विद्यापीठातील डाव्या म्होरक्यांची भाषा तद्दन कर्मठ ब्राह्मणी अहंकाराचा अविष्कार आहे. गळ्यात जानवे आहे, म्हणून त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी अवघा हिंदू समाज ओलिस ठेवला होता. त्याला झुगारून देण्य़ाचे आवाहन डावे व पुरोगामी सातत्याने करीत असतात. पण आज त्यांच्या ‘जनेयु’ला धक्का बसायची वेळ आली, तेव्हा त्यांनीच निषिद्ध मानलेला ब्राह्मणी चेहरा, पुरोगामी मुखवटा फ़ाडून समोर आलेला आहे. विद्यापीठात पोलिस आलेच कसे, हा युक्तीवाद खाप पंचायतीचा खरा चेहरा आहे. पुर्वी ब्राह्मणवाद म्हणायचे आज खाप पंचायत म्हणतात, ती प्रवृत्ती आता डावे पुरोगामी म्हणून कशी फ़ुशारली आहे, त्याचे प्रदर्शन या निमीत्ताने राजरोस पुढे आले आहे. साबरीमला मंदिरात वा  शनि शिंगणापुरात महिलाना प्रवेश द्यावा किंवा नाही, याचा निर्णय तिथल्या ट्रस्टींना घेता येणार नाही, तो कायद्याने व प्रसंगी पोलिसांनी तिथे घुसून केला पाहिजे. आणि विषय ‘जनेयु’ म्हणजे नेहरू विद्यापीठाचा आला, मग हे पुरोगामी ब्राह्मण सव्यापसव्य करीत होमहवन करायला पुढे सरसावले आहेत. संघावर सनातनवर ब्राह्मणवादाचे आरोप करायचे आणि आपले कृत्य मात्र त्यापेक्षाही प्रतिगामी लफ़ंगे असायचे, असा भंपक प्रकार राजरोस चालू आहे. माध्यमापासून राजकारणात सर्वत्र ही तोतयेगिरी बोकाळली आहे. पण आता सामान्य माणसे त्याला फ़सेनाशी झाली आहेत.

नेहरू विद्यापीठात पोलिस आलेच कसे, हा प्रतिप्रश्न म्हणूनच भंपक व दिशाभूल करणारा आहे. किती सहजगत्या लोकांची दिशाभूल डावे पुरोगामी नित्यनेमाने करीत असतात, त्याचा हा सज्जड पुरावा आहे. आज ज्यांनी पोलिस कसे आले असा सवाल केला आहे, तेच महिन्यापुर्वी शिंगणापुरात पोलिस कशाला घुसत नाहीत, असा सवाल करत होते ना? मग आज त्यांचा युक्तीवाद निव्वळ मर्कटलिला किंवा कोलांटी उडीच नाही काय? जेव्हा आपल्या सोयीचे असेल, तेव्हा त्यांना आंबेडकरांची राज्यघटना आठवते. जेव्हा तीच घटना गैरसोयीची होईल, तेव्हा त्यांना खाप पंचायतीचे अनुकरण करायला लाज वाटत नाही. पुरोगाम्यांच्या बोकाळण्याने बुद्धीवादी क्षेत्रात किती कमालीचा निलाजरेपणा शिरजोर झाला आहे, त्याचीच ही साक्ष आहे. तसे नसते आणि थोडी जरी विवेकबुद्धी या पुरोगाम्यांकडे शिल्लक असती, तर त्यांनी तितक्याच आवेशात पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले असते्. शनि शिंगणापुरच्या काळात पोपटपंची करणार्‍या प्रत्येक बुद्धीमंताने नेहरू विद्यापीठात पोलिस कशाला, असा सवाल करणार्‍याचे थोबाड फ़ोडायला पुढाकार घेतला असता. पण त्यासाठी लाजलज्जा असावी लागते. निव्वळ बेशरमपणाचे भांडवल घेऊन पुरोगामीत्वाचा धंदा करणार्‍यांना कसली आहे सत्याची चाड किंवा लाजलज्जा? सामान्य माणसाची स्मरणशक्ती दुबळी असते यावर अगाध श्रद्धा असलेल्यांनी हे थोतांड आता आवरलेले बरे. कारण सामान्य माणुस त्यांना वाटतो, तितका विसरभोळा राहिलेला नाही, की बुद्दू उरलेला नाही. त्याला तारतम्य उमजू लागले आहे. म्हणूनच पुरोगामीत्व आणि खाप पंचायतीतले साम्य लक्षात येऊ शकते. आजवरची बदमाशी त्यालाही उमजलेली आहे. म्हणून तर लोकसभा निवडणूकीत पुरोगामीत्वाला मतदाराने धुळ चारली. पण तरीही कट्टर अंधश्रद्ध भक्तासारखे पुरोगामी डावे आपल्या कालबाह्य समजूतीच्या भ्रमात जगत असतात. म्हणुनच खाप पंचायतीला शिव्या घालून व ब्राह्मणांच्या जनेयुला शिव्या घालत, आपल्या ‘जनेयु’च्या पावित्र्याला विटाळ झाल्याचा शंखही करीत असतात. पण आता लोकांनी असल्या भंपकपणाला फ़सायचे दिवस संपलेत कॉम्रेड हो!

6 comments:

  1. जेएनयु प्रकरण योगायोग नाही. पिक विमा योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत अभियान व मेक इन इंडिया अभियान सर्वांसाठी घरे अभियान इ. लोकप्रिय होत आहेत. कार्यक्रमांचे यश किंवा अपयश दीर्घ कालावधी नंतरच मोजता येईल, परंतू, भारतीयांची मनोबल वाढविणारे हे उपक्रम आहेत. जीएसटी बिलासारखी या कार्यक्रमाना खीळ बसावी असा सत्ते नसलेल्यांचा हा डाव या मागे दिसून येतो.

    ReplyDelete
  2. बरोबर भारत हा षंढांचा देश झालाआहे कारण अशी भाषा षंढांचे तोंडात शोभते

    ReplyDelete
  3. अधिवेशन जवळ आल की असे उद्योग चालु होतात

    ReplyDelete
  4. भाऊ अत्यंत खरमरीत लेख..
    या मागे अत्यंत गुप्त कारस्थान वाटते नाहि आहेच. जे एन यू हा एक दादरी प्रमाणे केवळ एक प्रसंग आहे जो निषेधार्थ आहे आणि केवळ भडक हिंसात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी चिथावणी आहे मिडियाला हे माहिती आहे कि या प्रसंगावरती भाजपाचे अतिउत्साही कार्यकर्ते सत्तेत असल्यामुळे भडक प्रतिक्रिया देतील किंवा देण्यासाठीच हे केले जात आहे. त्यामुळे मूळ विषय बाजूला राहून अशा प्रतिक्रियेवर चर्चा करून प्रसिद्भि देऊन पक्षाला बदनाम करण्याचा डाव आहे आणि पक्ष व कार्यकर्ते वारंवार बळी पडत आहेत.बहुसंख्य मिडिया चे मालक जरी विदेशी आहेत त्याना भारतात शांतता व प्रगती नको आहे. कारण मग ते कर्ज व तंत्रज्ञान कोणाला देणार व त्या वर इन्टरेस्ट व तंत्रज्ञान वर नफा कसा कमवणार? मजबुत भारत त्याना विदेशाना भारी पडणारी शकती नको आहे. परंतु ह्यात आपलेच लोक सामिल आहेत. हे शतकानुशतके चालु आहे व एका समृध्द परंतू शापित भुमीवर हेच चालू रहाणार का व आपण सगळे त्याच्याच एक भाग रहाणार का.
    भाऊ आपली जन जागृती एक आशेचा किरण आहे ह्यातून एखादा राम कृष्ण शिवाजी जन्माला यायची वाट पहात रहाणार आपला समाज?
    अमुलभाऊ अत्यंत खरमरीत लेख..
    या मागे अत्यंत गुप्त कारस्थान वाटते नाहि आहेच. जे एन यू हा एक दादरी प्रमाणे केवळ एक प्रसंग आहे जो निषेधार्थ आहे आणि केवळ भडक हिंसात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी चिथावणी आहे मिडियाला हे माहिती आहे कि या प्रसंगावरती भाजपाचे अतिउत्साही कार्यकर्ते सत्तेत असल्यामुळे भडक प्रतिक्रिया देतील किंवा देण्यासाठीच हे केले जात आहे. त्यामुळे मूळ विषय बाजूला राहून अशा प्रतिक्रियेवर चर्चा करून प्रसिद्भि देऊन पक्षाला बदनाम करण्याचा डाव आहे आणि पक्ष व कार्यकर्ते वारंवार बळी पडत आहेत.बहुसंख्य मिडिया चे मालक जरी विदेशी आहेत त्याना भारतात शांतता व प्रगती नको आहे. कारण मग ते कर्ज व तंत्रज्ञान कोणाला देणार व त्या वर इन्टरेस्ट व तंत्रज्ञान वर नफा कसा कमवणार? मजबुत भारत त्याना विदेशाना भारी पडणारी शकती नको आहे. परंतु ह्यात आपलेच लोक सामिल आहेत. हे शतकानुशतके चालु आहे व एका समृध्द परंतू शापित भुमीवर हेच चालू रहाणार का व आपण सगळे त्याच्याच एक भाग रहाणार का? आपले लेख एक आशेचा किरण आहे. आपला समाज यातुन परिवर्तन करणार का परत एकदा राम कृष्ण शिवाजी यायची वाट पहाणार हा प्रश्न आहे. का बोकडा प्रमाणे बळी जात असताना पहात राहणार?
    Amool Shetye

    ReplyDelete
  5. भाऊ मी मागे एकदा मत मांडले होते या देशद्रोहा वर एक उपाय आहे सदन सफाई Germany मध्ये हिटलरने केली होती

    ReplyDelete
  6. मागे वाचनात आले होते की मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना इशारा दिला होता की मिडीयाशी जास्त जवळीक न करता आपापले काम करत रहा. आणि मिडीयाला ही मिरची खुपच जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे सनसनाटी बातमीच्या आधारे भाजपा नेत्यांना ऊकसवण्याचे प्रयत्न मिडीया करत रहाणार. त्यांना बातमीशी मतलब आहे सरकार कुठलेही असो. सरकारच्या अंतर्गत बातम्यांचा दरवाजा बंद झाला तरी ऊतावीळ लोकांची काही कमी नसते हे त्यांना ठाऊक आहे. मोदी यांना पुरेपूर ओळखून आहेत.

    ReplyDelete