Wednesday, March 9, 2016

मनुस्मृती: फ़ोडणीतला कडीपत्ता

जाणता राजा शरद पवार यांचे निकटवर्ति व त्यांच्या पक्षाचे ओबीसी नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना अलिकडे काही काम उरलेले नाही. वास्तविक मध्यंतरी इशरत जहान प्रकरण उफ़ाळून आले, तेव्हा त्यांनी काही हातपाय हलवावेत अशी अपेक्षा होती. कारण गेली काही वर्षे त्यांनी इशरतला शहीद बनवण्यात पुढाकार घेतलेला होता. ती किती निरागस व निष्पाप तरूणी होती आणि हकनाक तिचा गुजरातच्या पोलिसांनी बळी घेतला, ते पटवून देण्यात ते आघाडीवर होते. पण अमेरिकेच्या तुरूंगात बसलेल्या डेव्हीड कोलमन हेडली यानेच इशरतला तोयबाची घातपाती ठरवल्यावर आव्हाडांची बोलती बंद झाली होती. गेला महिनाभर तरी इशरत प्रकरण गाजते आहे. पण आव्हाडांनी त्याविषयी बोलायची हिंमत केली नाही. जितक्या हिरीरीने इशरतचे स्मारक करायला पुढे आले होते, त्याचा अल्पांशही त्यांनी इशरतवरचे आरोप फ़ेटाळून लावण्यासाठी दाखवला नाही. पण ते प्रकरण आटोपण्याची चिन्हे नाहीत आणि आव्हाडांना तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून आता ते मनुच्या आश्रयाला गेले आहेत. अकस्मात त्यांना नवा शोध लागला आहे, की मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर झाले असून, तिची धडाक्यात विक्री चालू आहे. अशी विक्री करणार्‍या बुकस्टॉलवर हल्ले करून ते फ़ोडण्याची शांततापुर्ण धमकी त्यांनी दिली आहे. अर्थातच त्यासाठी त्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आधार घेतला आहे. बाबासाहेबांनी जाळून टाकलेली मनुस्मृती पुन्हा पुस्तक स्वरूपात विकली जात आहे, यामुळे आव्हाड खवळलेले आहेत. दहा वर्षापुर्वी त्यावर बंदी घातलेली होती आणि असे असूनही हे पुस्तक विकले जाते म्हणून आव्हाड चिडलेले आहेत. त्यांचा राग रास्त आहे. बंदी असलेल्या गोष्टी चालू असण्याचा राग गैर मानता येणार नाही. पण अशा कित्येक गोष्टी बंदी असतानाही राजरोस चालतात, त्याविषयी आव्हाडांनी सहसा आपले मत व्यक्त केलेले नाही.
उदाहरणार्थ दहा वर्षापुर्वी किंवा त्यांच्याच मनुविरोधी पक्षाची सत्ता असताना महाराष्ट्रात गुटखा वा डान्सबारना बंदी घातलेली होती आणि तरीही ठाण्यातही अनेक जागी राजरोस त्या गोष्टी चालूच होत्या. गुटखा विकला जात होता आणि डान्सबारही मस्तपैकी चालू होते. पण तेव्हा कधी आव्हाडांनी गुटख्याची दुकाने वा डान्सबार हॉटेले फ़ोडून टाकण्याचा इशारा दिल्याचे स्मरत नाही. फ़ार कशाला महाराष्ट्रात अनधिकृत बांधकामांना बंदी आहे. अनेक परवानग्या घेऊनच इमारतीचे बांधकाम करावे लागते. पण ठाण्यात व आव्हाडांच्या मतदारसंघातच हजारो बेकायदा इमारती उभ्या आहेत आणि तिथे वसलेल्या लक्षावधी नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. त्याविषयी काय करायचे? अशा बंदी असलेल्या बांधकामांना रोखण्यासाठी वा ती मोडूनतोडून टाकण्यासाठी आव्हाडांनी काही केल्याचे कोणाला ठाऊक आहे काय? किंबहूना हजारोंनी अशा इमारती बंदी धाब्यावर बसवून उभ्या राहिल्या, त्याला कोणाचे आशीर्वाद होते, त्याचीही माहिती आव्हाडांनी जगासमोर आणायला हवी. जेव्हा सरकारी यंत्रणा आणि पोलिस अशा बंदीला झुगारणार्‍या बेकायदा इमारती पाडायला गेले, तेव्हा आडवा कोण आला होता? कायदेशीर बंदी असलेल्या पुस्तकाची विक्री होण्याविषयी इतके जागृत असलेल्या आव्हाडांना मृत्यूचे सापळे झालेल्या बंदीकृत इमारतीत जीव मुठीत धरून जगणार्‍यांचा कधी कळवळा आला आहे काय? एका बंदीवरून गदारोळ करायचा व दुसर्‍या बंदीविषयी मूग गिळून गप्प बसायचे, ह्याला पुरोगामीत्व म्हणतात काय? की जाणत्या राजाची शिकवण म्हणतात? मनुस्मृतीमध्ये नेमके काय आक्षेपार्ह आहे ते तरी कधी आव्हाडांनी वाचले आहे काय? बाबासाहेबांनी प्रतिकात्मक म्हणून ते पुस्तक जाळले. हल्लागुल्ला करण्यासाठी जाळपोळ केलेली नव्हती. त्यासाठी बुकस्टॉल फ़ोडण्याच्या धमक्या दिल्या नाहीत, की दंगल माजवली नव्हती.
बाबासाहेबांचे नाव घ्यायचे तर निदान अभ्यास करायला हवा आणि त्यांचे अनुकरण करायला हवे. बाबासाहेबांनी देशाची घटना लिहीली आणि कुठल्याही कायद्याला कधी धाब्यावर बसवण्याची भाषा केलेली नव्हती. म्हणून आव्हाडांनी आपल्या इच्छेनुसार जरूर जगावे आणि वागावे. पण बाबासाहेबांच्या नावाचा आधार घेऊन आपल्याच दंगेखोरीला पुण्यकर्म ठरवण्य़ाचा अश्लाघ्य प्रकार करू नये. त्यांनी मनुस्मृतीच कशाला, कुठल्याही पुस्तकाची होळी करावी, कुठलेही स्टॉल फ़ोडावेत. बेकायदा इमारती तोडायला येणार्‍या सरकारी पथकाला धमक्या द्याव्यात. त्याविषयी कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण आपल्या कृत्याला पावित्र्य चिकटवण्यासाठी बाबासाहेबांचे नाव घेऊ नये. ज्या मनुस्मृतीला आव्हाड जाळायला निघालेत, त्याच मनुॠषीचे एक स्मारक याच देशातल्या एका हायकोर्टाच्या मुख्यद्वारापाशी उभे आहे, याची तरी माहिती आव्हाडांना आहे काय? त्या हायकोर्टाच्या वकील संघटनेने मनुचा भव्य पुतळा बनवून तिथे उभा केला आहे आणि त्याविषयीचा वाद अजून मिटलेला नाही. त्या पुतळ्याची उभारणी झाली आणि त्यावरून असेच वादळ उठले होते. पण न्यायाधीशांच्या पुर्वपरवानगीने पुतळा उभारला असल्याने त्याला अनधिकृत म्हणता येत नाही. पण आक्षेप आल्यावर खास खंडपीठापुढे त्याची सुनावणी चालू आहे. पण असल्या गोष्टी आव्हाडांना कशाला ठाऊक असणार? त्यांना प्रसिद्धीचा सोस अधिक! म्हणून ते सोयीनुसार शांततावादी गांधीवादी असतात आणि गैरसोयीचे झाले मग हिंसाचाराचाही आधार घ्यायला पुढे सरसावतात. कधी ते अण्णा हजारेंना गोडसेवादी ठरवून त्यांचे पुतळे जाळायला जातात, तर कधी घातपाती जिहादी इशरतला शहीद म्हणून गौरवतात. कधी फ़ुले शाहू आंबेडकरांचा गुणगौरव करायचे नाटक रंगवतात, तर कधी उंच दहिहंड्या लावून आपल्या हिंदू असण्याचे प्रदर्शन मांडतात.
मनुस्मृती नावाचे पुस्तक बंदी घालून विकले जात असेल, तर त्यावर विचार करणारे काही लोक हयात आहेत. मात्र त्याची आजची उपयुक्तता कितीशी आहे? आव्हाड यांना असे प्रश्न पडत नाहीत. त्यांना धुमाकुळ घालून सोपी व स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्यात स्वारस्य असते. म्हणून ते विधानसभेत बोलण्यापेक्षा चिक्की वाटून किंवा विकून प्रसिद्धी मिळवतात. आणि बोललेच तर असे काही बोलतात, की त्यांचेच ज्येष्ठ भुजबळ अडचणीत येतात. थोडक्यात राजकीय उथळपणा कसा करावा आणि प्रसिद्धीच्या झोतात कुठे रहावे, याचे तंत्र आव्हाडांनी विकसित केलेले आहे. मनुस्मृती विकणार्‍या स्टॉलची तोडफ़ोड तसाच नवा तमाशा आहे. असे काहीही होणार नाही, याविषयी सर्वांनी निश्चींत रहावे. कारण असे काहीही आव्हाड करणार नाहीत. पण अशी नुसती धमकी दिली, म्हणजे शिवसेना किंवा सनातन यासारखे काहीजण चिडून प्रतिक्रीया देतील, ही त्यांची खरी अपेक्षा आहे. मग त्यावर विविध वाहिन्यांवर चर्चा केल्या जातील आणि आपोआपच त्यात आव्हाडांना आमंत्रण मिळेल. यापेक्षा मनुस्मृती या पुस्तकातला वर्णवर्चस्ववाद किंवा जातियता याविषयी आव्हाडांनी व्याख्याने देवून जनजागृती केल्यास समाजाचे अधिक प्रबोधन होईल. पण समाजप्रबोधन मते मिळवून देत नाही. समाज शहाणा व विचारी होईल. पण त्यामुळे मतांची संख्या वाढत नाही. मात्र असे काही चित्तवेधक तमाशे केले, म्हणजे मते मिळणे सोपे होऊन जाते. मनुवाद हा अशा पुरोगाम्यांसाठी कडीपत्ता बनला आहे. पदार्थाला स्वाद येण्यासाठी चरचरीत फ़ोडणीत मनु भाजून काढायचा आणि सत्तेच्या पंगतीत जेवायला बसले, मग तीच करपलेली कडीपत्त्याची पाने ताटाच्या बाहेर असतात. इशरतच्या शिळ्या कढीला ऊत आणणे शक्य नसल्याने त्यांनी घरातल्याच शिळ्या भाताला मनुस्मृतीचे फ़ोडणी देवून नवा खमंग पदार्थ पेश करण्याचा पवित्रा घेतलेला आहे.

9 comments:

  1. भाऊ, फारच सुरेख. हा लेख आव्हाडांनी जरूर वाचावा हि तालमळीची इच्छा.

    ReplyDelete
  2. मनुस्मृती घेऊन केवळ अभ्यासासाठी म्हणून वाचल्याने काय आभाळ कोसळणार आहे??
    त्याची विक्री चालू आहे म्हणून काय लगेच देशात मनुवाद पसरणार नाही,लोक सूज्ञ आहेत लोकांचा घटनेवर विश्वास आहे.
    यानिमित्ताने आव्हाड निव्वळ चमकोगिरी करत आहेत.

    ReplyDelete
  3. आंबेडकरांचे नाव घेवून राजकारण करत आहेत,दुसरं काय?
    हे सरकार फॅसिस्ट आहे हे दाखवण्यासाठी निरर्थक प्रयत्न चालू आहेत.

    ReplyDelete
  4. भाऊ लेख मस्त !!................हा बोलबच्चन ' आवाड '...........चित्रवाणी चेनेल वर अश्या पद्धतीने बोलत असतो कि ' आव्हाड 'वाक्यं प्रमाणं ...बाकी सगळे येडे. ...............या जगात फक्त आणि फक्त ' जाणता राजा ' च लई शाना.एक नंबर चा ' दलाल ' आहे हा

    ReplyDelete
  5. मनुस्म्रुती आज ब्राह्मणच नाकारतील.कारण ज्याच्या दुपारच्या भोजनाची भ्रांत आहे,तोच सर्वश्रेष्ठ ब्राह्मण. अशी मनूची व्याख्या आहे.जो संग्रह करून राहतो,तो नीच प्रतीचा ब्राह्मण,असे खुद्द मनू म्हणतो.मगा आजचा ब्राह्मण हे मान्य करूे शकेल?ठीक आहे,मनूची रचना हजारो वर्षांपूर्वीची आहे,ती कालसुसंगत न राहिल्याने त्याज्य ठरली.म्हणून काहीही अभ्यास न करता जितेंद्र आव्हाडांसारखे स'माज'वादी कोल्हेकुई करतात.बंदी असलेले पुस्तक, तेही मराठी,कोण घ्यायला जाणार आहे? मराठी माणूस दिवाळी अंकही सर्क्युलेटिंग लायब्ररी मधून वाचतो.कायदेभंगाची आवड असेल तर आव्हाडांनी अनधिकृत इमारतींचा प्रश्न हाती घ्यावा.

    ReplyDelete
  6. भाऊ आपण पक्षपाती आहात जनाब आव्हाडांचे बरोबर आहे कारण आधे कधी चुकत नाहीत हे सरकार बाद आहे

    ReplyDelete
  7. भाऊराव,

    जितेंद्र आव्हाड राजकारणी आहेत. त्यांनी मनुस्मृतीविरोधात शंख केला तर एकवेळ समजू शकतो. पण महाराष्ट्र टाईम्ससारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मनुस्मृतीविषयी विपर्यस्त माहिती छापली आहे. याचं सखेद आश्चर्य वाटतं. मनुस्मृतीवर कसलीही बंदी नाही. महाराष्ट्र टाईम्सने कुठून ही बातमी पैदा केली देव जाणे.

    आघाडीची वृत्तपत्रे आता राजकारण्यांच्या पातळीला उतरू लागलीत. हे भयावह वास्तव समजावं का?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  8. शिवरायांच्या बदनामी ची केंद्रे साठी दुकाने का फोडली नाही

    ReplyDelete