इशरत वा अन्य प्रकरणात कॉग्रेसने युपीए सत्तेच्या काळात केलेली पापे चव्हाट्यावर येत आहेत. म्हणूनच त्यांच्याविषयी जनमानसात शंकेची पाल चुकचुकली, तर नवल नाही. पण म्हणून कॉग्रेसचे नेते वा विविध प्रवक्त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे डावलता येणारे नाहीत. त्यातला सर्वात मोठा मुद्दा आहे, दोन वर्षे सत्ता हाती असूनही मोदी सरकार याविषयी गप्प कशाला आहे? कोणाही भाजपा प्रवक्त्याने वा सरकारी प्रवक्त्याने त्याचे उत्तर दिलेले नाही. कारण सरळ आहे. मोदी सरकारने हा खुलासा वा गौप्यस्फ़ोट केलेला नाही. तर दोनतीन वाहिन्यांनी ह्या भानगडी चव्हाट्यावर आणल्या आहेत. भाजपा किंवा मोदी सरकारचे प्रतिनिधी त्यावर आपले मतप्रदर्शन करतात, असे भासवले जात आहे. पण मग आणखी एक प्रश्न तयार होतो, की ह्या वाहिन्या व शोधपत्रकारांनी तरी दोन वा इतकी वर्षे गप्प बसण्याचे कारण काय? चिदंबरम यांनी इशरत प्रकरणात आधीचे प्रतिज्ञापत्र बदलले आणि नंतरच्या प्रतिज्ञापत्रात महत्वाचे तपशील गाळले, असा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे मालेगाव स्फ़ोटाच्या प्रकरणात चिदंबरम यांच्याच हस्तक्षेपामुळे अतिशय महत्वाचे पुरावेही कोर्टासमोर जाण्यापासून रोखले गेले. मुद्दा असा की अकस्मात ही माहिती त्या पत्रकारांना कुठून मिळाली? ती सरकारने आपण होऊन दिलेली नाही. या पत्रकारांनी माहिती अधिकाराचा अर्ज करून मिळवली, असा दावा आहे. मग त्याच पत्रकारांनी युपीए सरकार सत्तेत असताना, तसे अर्ज कशाला केले नाहीत? ही माहिती तेव्हा मिळू शकणार नाही, अशी त्यांना खात्री होती काय? की तेव्हा चिदंबरमसह कॉग्रेसी पुरोगामी ज्या थापा मारत होते, त्यावर डोळे झाकून या वाहिन्यांनी विश्वास ठेवला होता? त्यांना आज ज्या शंका सतावत आहेत, त्या दोनचार वर्षापुर्वी कशाला सतावत नव्हत्या? की तेव्हा त्यांनाही युपीए सरकारने दडपेगिरी करून सत्य विचारण्यापासून परावृत्त केले होते?
अनेक प्रश्न आहेत आणि आधी पत्रकार व संबंधित वाहिन्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. अर्णब गोस्वामी किंवा त्याच्यासह अन्य गर्जणार्या पत्रकारांना इशरत मारली गेल्यापासून पुढे आलेली माहिती शंकास्पद कशाला वाटली नव्हती? इशरतची गोष्ट घ्या. ही इतकी निरागस मुलगी होती, की नित्यनेमाने वेळेवर कॉलेजला जात होती आणि तेव्हाच ती अनेक जागी कामधंदाही करीत होती. वडील नसल्याने कुटुंबाची जबाबदारी घेतलेली इशरत विणकाम वा शिकवण्या करून चार पैसे मिळवत होती. त्यावर कुटुंबाची गुजराण व्हायची. अधिक ती जावेद शेख उर्फ़ प्रणेश पिल्लई याच्यासोबत कुठेही काही दिवस कामधंद्यासाठी जात असे. मग प्रश्न असा येतो, की काही दिवस घरातून ‘कामधंद्यासाठी’ बेपत्ता असणारी इशरत कॉलेजच्या वर्गात नित्यनेमाने कशी हजर राहू शकत होती? काही दिवस परगावी जाऊन तिला कॉलेजात रोज जायला वेळ कसा मिळत होता? चारपाच दिवस बेपत्ता असलेल्या इशरतच्या हरवण्याची साधी तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलिसात कशाला नोंदवली नव्हती? अहमदाबाद येथे चकमकीत मारली जाण्याची हे कुटुंबिय प्रतिक्षा कशाला करत बसले होते? यासारखे शेकडो प्रश्न इतक्या बुद्धीमान चिकित्सक शोधपत्रकारांना २००४ पासून २०१६ पर्यंत कशाला पडले नाहीत? पडले असतील, तर त्यांनी एकदाही त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता काय? त्यासाठी माहितीचा अर्ज सरकारकडे पाठवला होता काय? दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून युपीए सरकार अफ़रातफ़र करत असल्याचे आरोप तेव्हाही अनेकांनी केलेले होते. त्यावेळी कुठल्या पत्रकाराने त्याचा खरेखोटपणा शोधण्याचा प्रयत्न केला होता काय? तीस्ता सेटलवाड ज्या थापा बेछूटपणे मारत होती, त्याचे प्रक्षेपण व बातम्या रंगवण्यात हेच पत्रकार सामील नव्हते काय? कॉग्रेसचे नेते वा प्रवक्ते यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यापुर्वी या शोधपत्रकारांनी आपल्या दहा वर्षाच्या मठ्ठपणाचाही खुलासा द्यायला नको काय?
अर्णब गोस्वामी आज कॉग्रेस व युपीएसह चिदंबरम यांच्यावर तुटून पडला आहे. पण मालेगाव प्रकरणानंतर कर्नल पुरोहित व साध्वी यांचे समर्थक हेच प्रश्न विचारत होते, त्यांना दाद देऊन शंका निरसन करायला किती पत्रकार उभे राहिले होते? चिदंबरमपासून शिंदे, तीस्ता, राहुल वा अन्य कोणीही कसल्याही थापा माराव्यात; त्या अगत्यपुर्वक प्रसारीत करण्यात अर्णब गोस्वामीही पुढेच नव्हता काय? अकस्मात मालेगावच्या स्फ़ोटातले आधी जमा केलेले पुरावे आणि केलेला तपास गुंडाळून त्यात पुरोहित, साध्वी यांना गोवण्यात आल्यावर, आधीच्या तपासाचे व पुराव्यांचे काय झाले, हा सवाल यापैकी कुणाही पत्रकाराने युपीए सरकारला तेव्हा का विचारला नाही? तेच प्रश्न ज्यांनी उपस्थित केले, त्यांना कुठेही प्रसिद्धी देण्यातही कंजुषी झालेली नाही काय? मग जे काही आरोप आज कॉग्रेस युपीए वा तथाकथित पुरोगाम्यांवर होत आहेत, त्यामध्ये पत्रकार व माध्यमे तितकीच भागिदार नाहीत काय? आज त्यांना अकस्मात साक्षात्कार झाल्यासारखे झोपेतून उठून घसा कोरडा करण्याचे कारण काय आहे? आज अनेकजण कर्नल पुरोहित यांच्या कोर्टमार्शलचा हवाला देत आहेत. पण ते कोर्टमार्शल झाले, तेव्हाही त्याचा तपशील मागता आला असता. पण तितका चौकसपणा कुठल्या पत्रकाराला सुचला होता का? नसेल तर कशाला सुचलेला नव्हता? कॉग्रेस व युपीएला पापी ठरवताना पत्रकारांनीही आपला चेहरा आरशात बघायला हरकत नाही. अर्णबला आज अक्कल आली असेल. पण मग बाकीच्यांचे काय? अजून सरसकट पत्रकार व माध्यमे याविषयी खुलेपणाने प्रश्न विचारण्याचे धाडस करीत नाहीत. उलट इतकी पापे चव्हाट्यावर आली असतानाही त्याबद्दल मौन धारण करून बसण्यातच धन्यता कशाला मानत आहेत? म्हणूनच सवाल राजकारण्यांपेक्षा पत्रकारितेचे बुरखे पांघरून बसलेल्यांच्या दुटप्पीपणाचाही आहे. अर्णबसारखे काहीजण त्यातले माफ़ीचे साक्षिदार व्हायला धडपडत आहेत काय?
म्हणूनच कॉग्रेस कितीही पापी असो, ह्या भानगडी आज काढणार्यांच्या हेतूवर कॉग्रेसने व्यक्त केलेली शंका-संशय अग्राह्य मानता येणार नाही. अकस्मात शोधपत्रकारांना अशा विषयातली माहिती मागायची इच्छा होणे व त्यात मोठा काही गौप्यस्फ़ोट केल्याचा आव आणणे, प्रामाणिकपणाचे लक्षण अजिबात नाही. कॉग्रेस युपीएने पाप केले असेल, तर त्याला वेळच्या वेळी शंका व प्रश्न विचारण्याची जबाबदारी माध्यमांची होती. ज्यात टाईम्स नाऊ किंवा न्युज एक्स अशा वाहिन्यांचा समावेश होतो. त्यांनी ह्या घडामोडी प्रत्यक्ष घडत असताना पाळलेले मौन वा तिकडे फ़िरवलेली पाठ; क्षम्य असू शकते काय? असेल तर त्याचीही कारणमिमांसा व्हायला हवी. त्यासाठी आज जी चिकित्सक बुद्धी जागृत झाली आहे, त्यामागची प्रेरणा व बोलविता धनीही या महान पत्रकारांनी लोकांसमोर सांगितला पाहिजे. सुत्रांकडून काही माहिती मिळते व काही कागदपत्रे सरकारकडे अर्ज करून मिळतात, हे मान्य! पण ती कागदपत्रे मिळवण्याची गरज अकस्मात कशाला वाटली? अमिताभ वा शाहरुखने भूमिका रंगवणे एक गोष्ट आहे आणि आपणच वास्तवात त्या भूमिकेचे सर्वेसर्वा असल्याचा दावा करणे यात फ़रक आहे. कुठल्या वाहिनी वा पत्रकाराने या गौप्यस्फ़ोटाचे श्रेय उकळणे म्हणूना गैरलागू आहे. अर्थात तसे न केल्यास त्यांना या पटकथेचा लेखक समोर आणावा लागेल. तो यायला उत्सुक असण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणूनच सुत्रांकडून बातम्या येत असतात, दिल्या जात असतात. आपल्या काळात कॉग्रेस युपीएच्या गोटातूनही हेच झालेले आहे. म्हणून पुरोहित साध्वी यांना विनाचौकशी थेट हिंदू दहशतवादी ठरवण्याची पत्रकारिता चालली होती. पण बोलविता धनी कोणी समोर आणला नाही. आज त्याच प्रचाराच्या विरोधातला तपशील समोर आणतानाही, खरा पटकथा लेखक व पटकथा कधी व कोणी लिहीली, त्याबद्दल सार्वत्रिक मौन पाळले जात आहे. पण हे सर्व पटकथेनुसार चालले आहे यात शंका नाही. ही मोदी सरकारने लिहीलेली पटकथा आहे काय?
चिदंबरमचा बळी जाणार हे नक्कीच.
ReplyDeleteइंद्राय स्वा:, तक्षकाय स्वा:। असे होणार नाहींच.
तक्षकाला वाचवायचे सगळे प्रयत्न होणार.
बरोबर भाऊ मस्त लेख
ReplyDelete