Tuesday, June 21, 2016

कॉग्रेससाठी शीलाजित?



दोन वर्षापुर्वी सर्व राजकीय पंडितांना थक्क करून सोडत नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाजपाला बहूमत मिळवून दिले, तेव्हा त्याला राजकारणातला विजय मानायला कोणी अभ्यासक वा मुरब्बी राजकारणी तयार नव्हता. तो तर बाजारी जाहिरातबाजीचा विजय असल्याची नाके मुरडली जात होती. अगदी राजकीय विश्लेषकांपासून विविध चाचण्या घेऊन विजय पराजयाची भाकिते करणार्‍यांनाही त्या लोकसभा निकालांनी चकवले होते. म्हणूनच मग जाहिरातबाजी वा मार्केटींग म्हणून नावे ठेवली जात होती. पण आज काय अवस्था आहे? परवाच्या पाच विधानसभा निवडणूकीत कोणी अभ्यासक वा चाचणीकर्ता भाकिते करायला धजावला नाही. कारण नरेंद्र मोदींना ज्याने सत्ता मिळवून देण्यात यश संपादन केले होते, तो रणनितीकार प्रशांत किशोर नंतर केजरीवाल व नितीश-लालूंच्या बाजूने उभा राहिला व त्याने भाजपाला धुळ चारून दाखवली होती. आता त्यालाच कॉग्रेसने हाताशी धरले असून, उत्तरप्रदेश विधानसभा जिंकण्याची महत्वाकांक्षा कॉग्रेस बाळगून आहे. मात्र ज्याला रणनितीकार म्हणून नेमले आहे, त्याच्या सर्व अटी मान्य करायची कॉग्रेसची तयारी दिसत नाही. प्रशांत किशोरने दिडदोन महिन्यात उत्तरप्रदेशच्या विविध कॉग्रेस नेत्यांच्या बैठका घेऊन काही निष्कर्ष काढले आहेत आणि पुन्हा तिथे कॉग्रेसला विजयी करण्यासाठी निकष मांडले आहेत. त्यावर कॉग्रेस कितपत काम करू शकेल, याची शंकाच आहे. कारण पहिला निकष नेतृत्वाचा आहे. नेत्याचा चेहरा व व्यक्तीमत्व बहूमत मिळवून देते, असा किशोरचा फ़ंडा आहे. पण त्याने सुचवलेला नेता मुख्यमंत्री पदासाठी देण्यातच कॉग्रेसने माघार घेतली आहे. त्याऐवजी शीला दिक्षित यांना पुढे केले जात आहे. त्यामुळे कॉग्रेसपेक्षा रणनितीकार म्हणून प्रशांत किशोरचीच कसोटी लागणार आहे. कारण शीला दिक्षित कितपत यश मिळवू शकतील, हा गहन प्रश्न आहे.

प्रशांत किशोर याचा निकष योग्यच आहे. गेल्या दशकभरात देशातल्या बहुतेक निवडणूकांनी व्यक्तीगत मत देण्याचा कल सातत्याने दाखवला आहे. जसा तो मोदींसाठी दिसला तसाच तो मायावती, जयललिता, ममता, नविन पटनाईक व केजरीवाल अशा विधानसभांच्या यशातही समोर आला आहे. पक्ष वा श्रेष्ठी नंतर मुख्यमंत्री निवडतील, ही बाब आता इतिहासजमा झालेली आहे. म्हणूनच दिल्ली वा बिहारमध्ये नाव आधी जाहिर न करून भाजपा फ़सला. दिल्लीत त्यांनी अखेरच्या क्षणी किरण बेदी यांना पक्षात आणून भावी मुख्यमंत्री म्हणून पेश केले होते. पण तुलनेत बेदी यांच्यापेक्षा केजरीवाल यांचे पारडे जड झाले आणि भाजपाला जोरदार दणका बसला. त्याचा अर्थ नुसता चेहरा असलेला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पुढे करून चालत नाही. ज्याच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव जनमानसावर पडेल आणि जो खरोखरीच पक्षाचा नेता म्हणून लोकांची मान्यता मिळवू शकेल, अशाच चेहर्‍याची गरज असते. किरण बेदी तिथे तोकड्या पडल्या आणि नितीश तिथेच भाजपाला भारी पडले होते. अर्थात नुसता चेहरा आकर्षक असून भागत नाही. त्या नेत्याच्या मागे भक्कम उभा राहू शकेल, असा पक्ष म्हणजे संघटनाही असावी लागते. संघटनेचे विणलेले जाळे आवश्यक आहे. भाजपाकडे दिल्ली बिहारमध्ये दोन्ही गोष्टी होत्या. पण नेतृत्वाच्या स्पर्धेत भाजपा तोकडा पडला. कॉग्रेसला उत्तरप्रदेशात बाजी मारण्यासाठी नुसता रणनितीकार पुरेसा नाही. त्याच्या तालावर नाचणार्‍या व खेळणार्‍या संघटनात्मक जाळ्याचीही गरज आहे. ते जाळे प्रशांत किशोर उभे करू शकणार नाही. म्हणून तेच काम गुलाम नबी आझाद या ज्येष्ठ नेत्यावर सोपवलेले आहे. अधिक प्रचारातील हुकमी पत्ता म्हणून प्रियंका गांधी यांना उतरवण्याची तयारी कॉग्रेसने चालविली आहे. पण खरोखर प्रियंका हा हुकूमाचा पत्ता असू शकतो काय?

प्रियंका किंवा राहुल यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करावे, ही प्रशांतची रणनिती फ़ेटाळली गेलेली दिसते. त्यातून मग पर्याय म्हणून शीला दिक्षित यांना तिथे कॉग्रेसी मुख्यमंत्री म्हणून पेश केले जाणार असल्याच्या बातम्या आहेत. अकस्मात त्यांनी राहुल व सोनियांची भेट घेतल्याने त्या बातमीला वजन आले आहे. उमाशंकर दिक्षित हे कॉग्रेसचे उत्तरप्रदेशातील जुने नाव आहे. त्यांची सुन म्हणून शीला दिक्षित त्या राज्यात आल्या आणि पुढल्या काळात तिथून लोकसभेत निवडूनही गेलेल्या होत्या. मात्र मागल्या दोनतीन दशकात त्यांचा उत्तरप्रदेशशी कुठलाही संबंध राहिलेला नाही. दिल्लीत वास्तव्य केल्याने तिथल्या मतदार व नंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पंधरा वर्षे दिल्लीत राज्यही केले आहे. तिनदा कॉग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पराक्रमही त्यांच्याच नेतॄत्वाखाली साजरा झाला. पण अडीच वर्षापुर्वी त्याच दिल्लीत कॉग्रेसच्या दारूण पराभवालाही शीला दिक्षितच कारणीभूत झाल्याचे मानले जाते. राजकारणात नवख्या केजरीवाल यांनी दिक्षित यांचा बालेकिल्ल्यातच दारूण पराभव केला होता. तेव्हापासून शीलाजी जवळपास निवृत्तीचे जीवन जगत होत्या. आता अकस्मात त्यांना उत्तरप्रदेशात आणून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून सादर करणे कितपत लाभदायक ठरेल, याची शंका आहे. कारण त्या ७८ वर्षाच्या असून मुलायम व मायावती अशा दिग्गजांपुढे त्यांना किल्ला लढवायचा आहे. त्या दोघांनी गेल्या दहा वर्षात आलटून पालटून बहूमताने सत्ता मिळवण्याचा पराक्रम केला आहे. दोन वर्षापुर्वी मोदींनी आपली जादू चालवून लोकसभेसाठी उत्तरप्रदेश पादाक्रांत केला होता. अशा तीन तुल्यबळ पक्षांसमोर कॉग्रेस अगदीच दुबळा पक्ष आहे. कारण रायबरेली व अमेठीतल्या दोन जागा सोडता कॉग्रेसला आपला प्रभाव कुठेच दाखवता आला नव्हता. अशा स्थितीत बहूमत सोडा, यशस्वी टक्कर देण्यात शीला दिक्षित यांचा चेहरा कितपत कामी येऊ शकेल?

प्रशांत किशोर याच्यासारखा रणनितीकार आपली सर्व शक्ती पणाला लावणार हे कोणी नाकारू शकत नाही. कारण हे आव्हान पत्करल्यावर त्याचीही प्रतिष्ठा त्या राज्यात पणाला लागली आहे. पण चेहरा आणि पाठीशी लागणारी फ़ौज, अशा दोन्ही बाबतीत पांगळेपण असेल तर, त्यालाही आपल्या आजवरच्या यशाचा वेग कायम राखणे अवघड होणार आहे. त्याचे पहिले कारण शीला दिक्षित यांना सून म्हणून पेश करणे शक्य असले, तरी दिर्घकाळ दिल्लीच्य मुख्यमंत्री म्हणून त्या परक्याच ठरू शकतील. प्रियंका गांधी प्रचाराची धुरा संभाळतील असे म्हणणे सोपे आहे. पण त्यांनी मागल्या विधानसभेतही तेच काम अमेठी रायबरेली येथे पार पाडले होते. तिथले निकाल काय लागले? तिथल्या दहापैकी अवघ्या दोन जागा कॉग्रेसला मिळू शकल्या होत्या. म्हणजेच लोकसभेत गांधी घराण्याला मते देणारे लोक विधानसभेत त्यांच्या हस्तकाला मते देतातच असे नाही. हा जुनाच अनुभव आहे. त्यानंतर प्रियंकाने कोणते राजकीय यश संपादन केले आहे? लोकसभेच्या वेळी प्रियंका अमेठीत तळ ठोकून बसलेली होती. तरी स्मृती इराणी यांनी महिन्याभराच्या प्रचारात राहुलच्या विजयाचा फ़रक किमान करून टाकला. त्यातून प्रियंका कितपत हुकूमाचा पत्ता आहे, त्याची थोडीफ़ार कल्पना येऊ शकते. उत्तरप्रदेशातून कॉग्रेस जवळपास नष्ट झाली आहे आणि समोर तीन दिग्गज पक्ष मैदानात आहेत. अशा अवस्थेत कॉग्रेसला संजीवनी देण्याचे प्रशांत किशोरने पत्करलेले आव्हान, त्याच्या दोन वर्षात मिळवलेल्या प्रतिष्ठेला घातक ठरणार अशीच चिन्हे आहेत. प्रशांत किशोर रणनितीकार होता हे सत्य. पण अमित शहांनी त्याच लोकसभा निवडणूकीत बुथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते, हे विसरून चालणार नाही. रणनिती उसने अवसान आणून देणारे शीलाजित असू शकते. पण ते टॉनिक पचवणारा देह सुदृढ असायला हवा ना?

2 comments: