Friday, August 19, 2016

इंदिराजींचा निषेध कधी करणार?



रावळपिंडी : जम्मू व काश्मिर राज्यात सीमेलगतच्या भारतीय राज्यातून प्रशिक्षित हिंदू गुंडांना मुद्दाम काश्मिरमध्ये धाडले जाते. तिथे त्यांनी धुडगुस घालून काश्मिरी मुस्लिमांना हैराण करून सोडायचे, एवढेच त्यांचे काम आहे. या हिंदू गुंडांना भारतातील जातियवादी हिंदू संघटनांनी प्रशिक्षित केलेले असून त्यांच्या मुख्यालयातून येणार्‍या अदेशानुसार हे गुंड भारतव्याप्त काश्मिरात हिंसाचार माजवत असतात. त्यामध्ये हिंदू मंदिरातून मुर्त्यांची विटंबना करण्यापासून अनेक गोष्टींचा समावेश आहे, अशी बातमी हाती आलेली आहे. अशा हिंदू गुंड बांडगुळांनी धुडगुस घातला, मग भारतीय पोलिसांना स्थानिक जनतेवर कायद्याचा बडगा उगारण्याचे निमीत्त मिळत असते. मग जे काश्मिरी मुस्लिम आपल्या जन्मसिद्ध स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीशी संबंधित आहेत, त्यांना पोलिस अत्याचाराचे लक्ष्य बनवले जाते. भारतीय जिल्हा असलेल्या गुरूदासपूर व जम्मूच्या अन्य भागातील दोन गुंडांच्या टोळ्य़ांना अटक झाल्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पकडलेल्या गुंडांच्या तपासातून एक गोष्ट निष्पन्न झाली, की राजकीय योजनेनुसार हे हिंदू मुर्त्यांच्या विटंबनेचे खेळ चालू आहेत. आणखी एक बातमी अशी, की या गुंडांच्या धरपकडीनंतर काश्मिरातील गुंडगिरी व समाजविघातक कृत्यांना वेग आला आहे. अशा गुंडगिरीला बळी पडणार्‍यांमध्ये बहुतांश काश्मिरी मुस्लिमांचा भरणा असून, त्यांनी कंटाळून पाकच्या ताब्यात असलेल्या आझाद काश्मिरात पळून जावे, असा यामागचा राजकीय हेतू आहे.

हा मजकुर आजच्या कुठल्या सेक्युलर भारतीय वर्तमानपत्रातला नाही, किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेत्याने केलेला आरोप नाही. बारकाईने बघितले तर आरंभीच या बातमीचे स्थान रावळपिंडी असल्याचे लक्षात येईल. सहाजिकच ही बातमी पाकिस्तानी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली असल्याचेही लक्षात यायला हरकत नाही. फ़क्त गडबड इतकीच आहे, की ही बातमी कुठे आणि कधी प्रसिद्ध झाली? बुधवारी भारतीय संसदेच्या ज्येष्ठ सभागृहात याच विषयावर चर्चा झाली. कारण गेले महिनाभर काश्मिर खोरे धुमसते आहे. बुर्‍हान वाणी नावाच्या जिहादीला चकमकीत पोलिसांनी ठार मारल्यापासून काश्मिरात जवळपास संचारबंदी लावण्यात आली आहे. तिथे इतक्या प्रचंड संख्येने लोक लोक वाणीच्या समर्थनासाठी रस्त्यावर येऊन दंगल माजवू लागले, की पोलिस व लष्कराला कठोर कारवाई करावी लागली. त्यात पॅलेट गनचा वापर झाला आणि शेकड्यांनी लोक जखमी झाले. इतकी मोठी घटना होती, की पाकिस्तानने काळा दिवस पाळण्याची घोषणा केली. बुर्‍हान वाणीच्या छायाचित्रांची एक रेलगाडी देशभर फ़िरवली. भारतीय संसदेलाही काश्मिरच्या घटनेवर चर्चा करावी लागली आहे. त्यात मोदी सरकारचे विरोधक म्हणूनच ओळख असलेल्या विरोधी पक्षांनी दंगलखोरांवर दोषारोप करण्यापेक्षा भारतीय सेना व लष्करावर आरोप करण्यात धन्यता मानलेली आहे. सहाजिकच उपरोक्त बातमी त्याच संदर्भातली असल्याचा समज झाला तर नवल नाही. पण ही बातमी त्या संदर्भातली नाही किंवा आजची, कालपरवाची नाही, तब्बल अर्धशतकापुर्वीची आहे. सुदैवाने ती कुठल्या भारतीय वर्तमानपत्रातली नाही, तर पाकिस्तानी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली आहे. गमतीशीर गोष्ट इतकीच, की तेव्हा जे आरोप पाकिस्तानी वृत्तपत्रे व तिथले राज्यकर्ते करीत होते, तीच भाषा व आरोप आता भारतातच आपले सेक्युलर नेते व पत्रकार करू लागले आहेत. मात्र वस्तुस्थिती इतकी चमत्कारीक आहे, की भारतातल्या काश्मिरात आता कधीही आणि केव्हाही हिंदू मंदिरात हल्ले होतात. तिथे मुठभर मोजण्याइतकेही हिंदू शिल्लक उरलेले नाहीत. भारतातून कुणी हिंदू काश्मिरात सहलीला जायलाही बिचकत असतात. गुंड सोडा, भारतीय सेनादल आणि पोलिसांनाही काश्मिरात खुलेपणाने वावरणे अशक्य झाले आहे. मात्र दरम्यान इथले बुद्धीमंत पाकिस्तानी भाषेत बोलू लागले आहेत. किती विचित्र बाब आहे ना?

पाकिस्तानचे सर्वात जुने इंग्रजी मान्यवर वर्तमानपत्र ‘द डॉन’ म्हणून आहे. त्याच्या वेबसाईटवर पन्नास वर्षापुर्वीच्या बातम्यांपैकी काही निवडक बातम्यांची झलक दिली जात असते. त्यापैकीच ही एक बातमी आहे. पन्नास वर्षापुर्वी म्हणजे १९६६ साली भारतात भाजपा नावाचा पक्ष अस्तित्वात नव्हता आणि त्याचा पुर्वज मानल्या जाणार्‍या भारतीय जनसंघ नावाच्या पक्षाला सत्तेत येण्याचे स्वप्नही पडत नव्हते. देशात कॉग्रेस पक्षाची सर्वांगिण शत-प्रतिशत सत्ता होती. केंद्रात व बहुतांश राज्यात कारभार कॉग्रेसच एकहाती चालवित होती. आज ज्यांना सेक्युलर म्हणून मिरवणे आवडते, अशा पक्षांचा व विचारसरणीचा जमाना होता. हिंदूत्ववादी म्हणवून घेणार्‍यांना भारतात कोणी धुप घालत नव्हते. ज्यांना रोज उठून संघाच्या नावाने दुगाण्या झाडल्याखेरीज चैन पडत नाही, अशा राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांना चुकूनही संघाच्या नावाने शिमगा करायची गरज भासत नव्हती. तो फ़क्त तात्कालीन समाजवादी मंडळींचा मक्ता होता. अशा काळात पाकिस्तानी वृत्तपत्र म्हणते, की भारत सरकार हिंदू जातियवादी संघटनांना हाताशी धरून हिंदू गुंडांना प्रशिक्षित करीत आहे आणि काश्मिर खोर्‍यातून मुस्लिमांना व्याप्त काश्मिरात पळवून लावण्याचे कारस्थान राबवले जात आहे. किती मजेशीर गोष्ट आहे ना? कधीकाळी अयुबखान वा तत्सम पाकिस्तानी नेते जो आरोप इंदिरा गांधी यांच्यावर करीत होते, तोच आरोप जसाच्या तसा आज भारतातले पुरोगामी पक्ष व नेते विचारवंत नरेंद्र मोदी व भाजपावर करीत आहेत. त्यातही आणखी मजेची गोष्ट म्हणजे निदान तेव्हाचे पाक नेते पत्रकार अधिक सभ्य होते. कारण त्यांनी गुंड असा उल्लेख केला आहे. आजचे भारतीय पुरोगामी भारतीय सैन्याला व पोलिसांनाच अत्याचारी ठरवित आहेत. काळ आणि जग किती बदलले आहे ना?

देश किती बदलला आहे ना? आज देशात राष्ट्रवाद कोणी कोणाला शिकवू नये, याला पुरोगामीत्व म्हणतात. भारत तेरे टुकडे होंगे अशी घोषणा करण्यासाठी विद्यार्थी वर्गाला अनुदान देऊन भारत सरकारच पोसत असते. त्यांनी अभ्यास करण्यापेक्षा आपल्याच देश व सरकारची निंदानालस्ती करण्याला स्वातंत्र्याचा अविष्कार मानले जात असते. भारतीय पोलिस वा लष्कराच्या अंगावर बॉम्ब फ़ेकणे वा दगडफ़ेक करून हिंसाचार माजवणे; हा असंतोष असतो आणि त्याचा बंदोबस्त करायला पोलिस वा लष्कराने हत्यार उचलले, तर तोच अत्याचार असतो. कन्हैया नावाचा लाडका पुरोगामी विद्यार्थी नेता अगत्याने सांगतो, की काश्मिरात भारतीय सेनेचे जवान बलात्कार करतात. आपल्या देशातला पुरोगामी विचार किती पाकिस्तानी दिशेने वहात गेला आहे ना? पन्नास वर्षापुर्वीची पाकिस्तानी भाषा आता भारतातली पुरोगामीत्वाची बोली झाली आहे. काश्मिरात दंगल हा अधिकार असतो. अयुबखान किंवा तात्कालीन पाकिस्तानी काय वेगळे सांगत होते? बिचारे काश्मिरी मुस्लिम न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर आले, मग त्यांच्यावर बंदुका रोखल्या जातात आणि अत्याचार केले जातात. आज भारतीय संसदेत तसाच आरोप गुलाम नबी आझाद यांच्यापासून कुठल्याही पुरोगामी पक्षाचे नेते प्रतिष्ठीतपणे करतात. मग इंदिराजींचा निषेध कोणी करायचा? कारण तेव्हा ज्या गुंडांना काश्मिरात धुडगुस घालायला पाठवले जाते, असा आरोप होता, तो भारत सरकारवर होता. पर्यायाने तो इंदिराजींवरचाच आरोप होता. मग त्याच राज्यसभेत वा लोकसभेत सोनिया, राहुल वा गुलाम नबी आझाद इंदिराजींचा इतिहास उकरून तेव्हापासूनच्या आझादीच्या लढाईचे गुणगान करीत इंदिराजी वा अन्य कॉग्रेसी नेत्यांची निंदा कशाला करीत नाहीत? काश्मिरी मुस्लिमांचे तथाकथित हाल आजचे नाहीत वा मोदी सरकारने केलेले नाहीत. त्याला खुप जुना इतिहास आहे, जो राहुल सोनियांसह कॉग्रेसच्या पुर्वजांशी जोडलेला आहे.

4 comments:

  1. खांग्रेस व चमचे pok त हाकलले पाहिजेत मग कळेल हिन्दुस्तान ची किंमत यांना gas chambers मध्ये घालुन मारले पाहिजे

    ReplyDelete
  2. उत्तम पत्रकारिता

    ReplyDelete
  3. Bhai very good write-up. A solid punch. Any Congressman will not answer this. बिनतोड!

    ReplyDelete
  4. भाऊ विषयाचे विविध पैलू कसे अभ्यासावे हे तुमच्याकडून शिकावे !

    ReplyDelete