Wednesday, August 3, 2016

सरकार नव्हे, आपत्ती व्यवस्थापन



रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथील एक जुना पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मंगळवारी रात्री दोन बसेस व काही गाड्या पुराच्या पाण्यात सापडून बेपत्ता झाल्या आहेत. कित्येक तास उलटून गेल्यावरही त्यांचा पत्ता लागला नव्हता. आपत्ती व्यवस्थापन व नौदलालाही पाचारण करण्यात आले. पुरात जुना पुल वाहून गेला, असे त्याचे कारण दिले जात आहे. पण पुल कशासाठी असतो, त्याचा खुलासा कोणालाच करावासा वाटलेला नाही. हीच खरी समस्या आहे. नदी ओढ्यावर पुल कशाला बांधलेले असतात? तिथून माणसाला पलिकडे जाणे अशक्य आहे, म्हणून पुल उभारले जातात ना? ब्रिटीशांच्या कारकिर्दीत हा पुल बांधला गेला आणि आता तो खुप जुना झाला होता. सहाजिकच मोठ्या पुराच्या लोंढ्यासमोर तो टिकला नाही. पण सवाल पुराचा नसून, पुल नावाच्या संकल्पनेचा आहे. पुर नसता म्हणून जुना पुल किती काळ टिकणार होता? त्याची कुवत तरी किती होती? महामार्गावरून धावणार्‍या वहानांचे ओझे उचलण्याची क्षमता त्यात होती काय? ब्रिटीशांनी कधीकाळी त्याची उभारणी केली, तेव्हा आजच्यासारखी हजारो वाहने त्यावरून पळतील अशी अपेक्षा तरी केली होती काय? प्रतिदिन त्यावरून पाचदहा हजार वहाने पळतील आणि त्यात अवजड कित्येक टन माल वाहून नेणारी किमान हजार दिड हजार वहाने असतील, असा आंदाज ब्रिटिशांनी बांधला होता काय? नसेल तर अशा पुलावरून तशी वाहतुक चालू ठेवणे किंवा होऊ देणे, हाच गुन्हा होत नाही काय? कोणी असे प्रश्न कशाला विचारत नाही? पुर कधी आला? किती अतिवृष्टी झाली? पुल किती जुना होता? असे प्रश्नच फ़सवे असतात. कारण ते वास्तविक समस्येला झाकून ठेवणारे असतात. दिशाभूल करणारे असतात. हा पुल साध्या वाहतुकीला नालायक असताना त्यावरूनच महामार्गाची अवजड वाहतुक चालू देणे हाच गुन्हा आहे.

ब्रिटीश कालखंडात सत्तर वर्षापुर्वी हा पुल उभारला गेला, तेव्हा देशातली वहाने किती होती आणि हमरस्त्यावरून येजा करणार्‍या वहानांचे एकूण वजन किती होते? अशा पुलावरून किती वहाने जाऊ शकतील व त्याला किती ओझे पेलवू शकेल, याचे काही गणित मांडूनच त्याची उभारणी होत असते. किंबहूना पुल वा इमारत उभी केली जाते, तेव्हा तिच्या रचनेला किती वजन पेलवू शकेल याचे गणित मांडले जाते. त्यातच किती वजनाखाली ती इमारत कोसळू शकेल, त्याचेही समिकरण मांडलेले असते. त्याचप्रमाणे अमूक एक रचना बांधकाम उभारल्यापासून तिचे आयुष्य किती, त्याचाही काही अंदाज केलेला असतो. इथे जुना पुल हा शब्द किती फ़सवा ठरतो ते लक्षात येऊ शकेल. तो नुसता जुना पुल नव्हता, तर सर्वार्थाने कालबाह्य झालेला पुल होता. त्यावरून कुठलीही वाहतुक करणेच गैरलागू होते. असा पुल महामार्गावरच्या अवजड वर्दळीसाठी वापरणे म्हणूनच जाणिवपुर्वक अपघाताला आमंत्रण देणेच होते. किंबहूना अपघाताच्या प्रतिक्षेत तिथून वाहतुक चालू ठेवली गेली, असेच म्हणणे अतिशय योग्य आहे. म्हणूनच महाड पोलादपूर येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून घडलेली दुर्घटना हा अपघात नाही, तर घातपात मानला पाहिजे. कारण ज्या कुवतीचा पुल बांधला गेला होता, त्याच्या कित्येकपट वजनाची वहाने त्यावरून आज पळत होती आणि अपेक्षेच्या अनेकपटीने जास्त संख्येने वहाने त्यावरून हाकली जात होती. इंग्रजी भाषेत उंटाच्या पाठीवर काडी असे म्हणतात. उंटावर इतके सामान लादलेले असते, की एका क्षणी त्याच्या पाठीवर नुसती काडी ठेवली तरी त्याला वजन पेलवत नाही आणि तो बसतो. या पुलाची कहा्णी अजिबात वेगळी नाही. तो मोडकळीस आला होता आणि तरी त्याला उसंतही दिली जात नव्हती. किंबहूना तो वजनाखाली कधी कोसळून पडतो, याची प्रतिक्षा केली जात असावी.

ब्रिटीशकालीन असे शेकडो पुल महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपर्‍यात आजही वाहतुकीसाठी खुले असलेले दिसतील. त्यावरून दोन मोठी वहाने म्हणजे बसेस किंवा मालवाहू ट्रक आले, तर परस्परांना पार करून जाऊ शकत नाहीत. मग एका बाजूची वाहतुक थांबवून दोघांना पुल ओलांडावा लागतो. हे मध्यम आकाराचे ट्रक किंवा बस असतात. पण मालवाहतुक करणारी शेकड्यांनी मोठी अवजड वहाने आज महामार्गावरून पळत असतात. त्यात शेकडो टन वजनाचा माल भरलेला असतो. अशा वहानाचे ओझे कुठल्या पुलाला सोसू शकते आणि कुठल्या पुलावरून असे ओझे जाऊ शकत नाही, इतकेही रस्तेवाहतुक विभागातल्या जाणकारांना माहित नसेल काय? साध्या दगडी बांधकामाच्या कमानी उभारून तेव्हाच्या गरजेनुसार केलेल्या सुविधांचा आज किती वा कसा वापर करायचा, याचा काही अभ्यास व्हायला नको का? मुंबई गोवा मार्गावर वर्दळ व वाहने वाढली, म्हणून याच जागी नवा पुल काही वर्षापुर्वी बांधण्यात आला आहे. मग दोन पुलावरून एकतर्फ़ी वाहतुक सुरू झाली. पण जुना पुल आणि नवा पुल यांची कुवत सारखीच आहे काय? नवा पुल बांधताना त्यावरून किती अवजड वहाने एका दिवसात जातील वगैरे गणित मांडलेले असेलच. पण पुढल्या दहाबारा वर्षात वाहनांची संख्या किती वाढू शकते, त्याचेही समिकरण बांधलेले असणारच. तशी स्थिती हा दगडी पुल सत्तर वर्षापुर्वी बांधला तेव्हा नव्हती. आज जी वाहने उपयोगात आणली जातात, तशा अवजड राक्षसी आकार, वजनांच्या वाहनांचा विचारही त्या काळात कोणी केलेला नव्हता. मग त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल असा पुल बांधला जाणेच अशक्य होते. पण आज त्या पुलांचा वापर तशा अत्याधुनिक वहानांसाठी करणे, म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे आहे. इतकीही अक्कल विद्यमान रस्तेवाहतुक विभागामध्ये उरलेली नाही काय? असती तर नवा पुल बांधताना जुन्या पुलाचा वापरच करायची गरज उरू नये, अशी योजना झाली असती ना?

म्हणूनच जी घटना घडली तिला अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती संबोधणे, हीच मुळात दिशाभूल आहे. मुंबई गोवा मार्ग खुला होऊन आता पन्नास वर्षे होत आली. त्याला महामार्ग ठरवणार्‍यांनी महामार्गासाठी आवश्यक अशा सुविधा तिथे उभारण्याची काळजी घेतली नसेल, तर वाहनचालक वा प्रवाश्यांची दिशाभूल केली असाच अर्थ होत नाही काय? कालबाह्य झालेला पुल महामार्गावरच्या वर्दळीगत धावणार्‍या वाहतुकीसाठी वापरात ठेवणे, ही बाब म्हणूनच गंभीर आहे. तिच्याकडे अपघात म्हणून बघणे गैरलागू आहे. त्यात ज्यांना हकनाक मृत्यूमुखी पडावे लागले, ते अपघाती मरण नसून घातपाती मरण मानले गेले पाहिजे. होणारा खर्च भरून काढण्यासाठी टोलवसुली केली जाते, तर अशा चुकांसाठीही संबंधित खात्याचे अधिकारी व योजनांचे संयोजक यांना जबाबदार धरले गेले पाहिजे. नदीवरचा पुल हा भरधाव वाहणार्‍या पाण्याच्या लोंढ्यासमोर ठामपणे उभा राहिला पाहिजे, अशीच अपेक्षा असते ना? तो पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला असेल, तर त्याला पुल संबोधून वापराला खुला ठेवणारा गुन्हेगार आहे. चर्चा कधीच अशा  नेमक्या दुखण्यावर बोट ठेवणार्‍या होत नाहीत. म्हणून एका आपत्तीनंतर दुसरी आपत्ती ही नित्याची बाब झाली आहे. सार्वजनिक जीवन त्यातून धोक्यात आलेले आहे. एका आपत्तीतून वा अपघातातून यंत्रणा शहाणी होत नसेल, तर तिला जबाबदार धरले गेले पाहिजे. तेच होणार नसेल, तर अपघात ही शक्यता होऊन जाते आणि सुरक्षितता ही लॉटरी बनते. दुर्दैवाने आज आपण तितकेच सुरक्षित आहोत. मृत्यूचे सापळे ही व्यवस्था बनली आहे. त्यावर आपत्ती व्यवस्थापन हा उपाय नाही, तर अशा आपत्ती टाळण्यासाठी योजलेले उपाय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. हे उत्तराखंडातील त्सुनामीनंतर जो देश शिकू शकला नाही, तिथे आपत्ती व्यवस्थापन हा युद्धपातळीवरचे मदत कार्य करणारा विभाग बनून गेला तर नवल कुठले?

1 comment:

  1. भाऊ काही ठिकाणी बरोबर आहात काही ठिकाणी चूक आहात.नविन रोड जे १० टन ते १५ टनासाठी असतात तेथे system कृपेने ४० टनांची वाहतुक होते.इंग्रजांनी मुंबईला जोड़नेसाठी व war साठी अवजड वाहतुकी साठी (रनगाडे etc )हे रोड ww1 व ww2 काळात तयार केले होते.

    ReplyDelete