रविवारी काश्मिरच्या उरी येथील सैनिकी मुख्यालयावर पाक जिहादींनी अकस्मात हल्ला चढवला आणि त्यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले. या वर्षाच्या आरंभी पठाणकोट येथील भारतीय हवाई तळावर असाच हल्ला झाला होता. त्याच्याही पुर्वी असे घातपाती हल्ले महत्वाच्या जागी व तळांवर झालेले आहेत. पण पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा यापुर्वी कधी झाली नाही. रविवारी मात्र सरकारी गोटातून तशी प्रतिक्रीया प्रथमच उमटली आहे. नेहमी अशा बाबतीत पाकिस्तानवर आरोप झाले वा पाकला जाब विचारला गेला. मग पाक राजदूताला बोलावून समज दिली जायची. पण यावेळी तसे काहीही झालेले नाही. उलट पाकला याची किंमत मोजावी लागेल, अशी सरकारी प्रतिक्रीया आहे. त्याला आणखी एक संदर्भ जोडावा लागेल. विविध वाहिन्यांवरून दिवसभर त्याचीच चर्चा चालू होती आणि तिथे जाणकार म्हणून येणार्या प्रत्येक माजी सेनाधिकार्याने ठामपणे पाकला याचा जबाब दिला पाहिजे अशीच भूमिका मांडली. केवळ लष्करी मार्गाने वा राजनैतिक मार्गानेच नाही, तर शक्य त्या सर्व मार्गांनी पाकिस्तानची पुरती कोंडी करावी; अशी भूमिका मांडली जात होती. पण माजी सेनाधिकार्यांनी पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलतानाच, पाकची रणनितीच त्याच्या विरोधात वापरण्याची कल्पना प्रथमच बोलली आहे. दुपारी एका वाहिनीवर माजी लष्करप्रमुख जनरल रॉयचौधरी यांनी हा विषय प्रथम छेडला. जिहादी पाकिस्तानी असले तरी त्यांचा पाक सरकारची वा सेनेशी काहीही संबंध नाही, हा पाकिस्तानचा नेहमीचा पवित्रा आहे. तोच पवित्रा आपणही घेऊ शकतो आणि पाकिस्तानात असेच अनधिकृत हल्लेखोर पाठवू शकतो, असे रॉयचौधरी यांनी खुलेआम सांगून टाकले. चर्चेत सहभागी झालेल्या अनेकांनाही त्याचा धक्का बसला. खरेच असे होऊ शकते का? आपणही पाकिस्तानात घातपाती पाठवू शकतो का?
ऐकायला चमत्कारीक वाटेल. कारण सतत पाकिस्तानवर दहशतवादी राष्ट्र किंवा जिहादींचे पिक काढणारा देश, म्हणून टिका होत राहिली आहे. उलट भारताने सातत्याने सर्व नियम कायदे पाळून सभ्यतेच्या मर्यादेत राहून भूमिका घेतल्या आहेत. पाकिस्तानातील विविध असंतुष्ट गटांना वा समाजांना हाताशी धरून याचप्रकारे पाकमध्ये उचापती करणे भारताला अशक्य नव्हते. भारताने नुसते चुचकारताच मोहाजीर, बलुची किंवा सिंधी, पख्तुनी असंतुष्टांनी मोदींचा जयजयकार सुरू केला आहे. या गटांना हाताशी धरून भारतही पाकिस्तानात हिंसेचे थैमान घडवू शकला असता. पण शांतता व सभ्यतेच्या आहारी गेलेल्या भारताने तसा विचारच कधी केला नाही. मात्र भारत हे करूच शकत नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. १९७१ चे बांगला युद्ध भारताने जिंकले आणि पाकिस्तानचे तुकडे पाडले, याचे कौतुक आपल्याकडे खुप चालते. त्याचे श्रेय प्रामुख्याने इंदिराजी व भारतीय सेनेला दिले जाते. पण त्यातली मोठी किमया भारतीय छुप्या सैनिकांनी घडवलेली होती. पुर्व पाकिस्तानात जी धरपकड पाक सेनेने सुरू केली व अत्याचार आरंभले, तेव्हा त्यांच्याशी दोन हात करायला उभे राहिले, त्या लोकांना मुक्तीबाहिनी म्हणून ओळखले जाते. त्यात बांगला रायफ़ल्स नामक पाक सेनेतील मुठभर तुकड्या होत्या. पण त्यांचे नेतृत्व नारायणन नावाचा भारतीय गुप्तचर अधिकारी करत होता. अनेक भारतीय कनिष्ठ सेनाधिकारी त्यात सहभागी झाले होते आणि त्यांना लागणारी रसद भारतानेच पुरवली होती. बाहेरून भारतीय सेना युद्धात उतरली होती आणि आतल्या पाक (बांगला) असंतुष्टांचा लढा भारतीय गनिम लढवत होते. अशा दुहेरी कैचीत पाकसेनेला दाती तृण धरण्याचे पाळी अल्पावधीतच आणली गेली. गेल्या तीन दशकात पाकने तीच रणनिती भारताच्या विरोधात काश्मिरमध्ये वापरली आहे काश्मिरी असंतुष्ट वा हुर्रीयत नावाचे हस्तक आतून व बाहेरून जिहादी गनिम यांना भारतावर सोडले आहे.
मात्र त्याचा बांगला पद्धतीने प्रतिकार करण्याचा विचारही भारताने केला नाही. आज आपल्याला जी काश्मिरमध्ये विखुरलेली स्थिती दिसते, त्यापेक्षा संपुर्ण पाकिस्तानी स्थिती भिन्न नाही. प्रत्येक प्रांतात व विभागात असंतोष खदखदतो आहे. पण त्या आगीशी खेळण्याचा धोरण म्हणून विचार भारताने कधीच केला नाही. किंबहूना तसा प्रयास भारतीय गुप्तचर किरकोळ हेरगिरीसाठी करीत होते, त्यालाही विश्वनाथप्रताप सिंग व गुजराल अशा पंतप्रधानांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पुढल्या काळात भारतीय गुप्तचरांना व सेनादलाला तशा कुठल्याही कारवायाही करण्याची साधने राहिली नाहीत. दिड वर्षापुर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याचा ओझरता उल्लेख केला, तर आपल्याच बुद्धीजिवींनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते. पण ती साधने म्हणजे तसे पाकमधले असंतुष्ट पूर्वीपासून हाताशी धरले असते, तर पाकला कायम अस्थीर ठेवले गेले असते आणि आज त्याची इतकी मजल गेली नसती. तथाकथित शांतीवादी पुरोगामी नेत्यांनी भारतीय गुप्तचर व सेनेला इतके विकलांग करून टाकले, की कुत्र्याइतकीही हिंमत नसलेला पाकिस्तान, आज आपल्याच हद्दीत येऊन भारतीय सेनातळावर हल्ले करू लागला आहे. सुदैवाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यांनी अजित डोवाल यांना सुरक्षा सल्लागार म्हणून नेमले. तिथून नव्याने पाकिस्तानातील अशी ‘स्फ़ोटक साधने’ जमवण्याचे काम सुरू झाले. आज जसे भारतात अनेक पत्रकार, बुद्धिजिवी, समाजसेवी, चळवळ्ये पाकिस्तानचे हस्तक म्हणून काम करतात, तितके खुलेपणाने नाही. पण काही प्रमाणात आज आपल्याकडेही पाकमध्ये काही हस्तक तयार झाले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात पाकच्याच ‘भाषेत’ त्यांना हल्ल्याचे उत्तर देणे अशक्य राहिलेले नाही. जितक्या मोठ्या प्रमाणात पाक इथे हिंसा करतो व हात झटकतो, तितके मोठे नसले तरी लक्षणिय हल्ले आपण पाकिस्तानात करण्याइतकी सज्जता झालेली असणार.
किंबहूना ती सज्जता झाली, म्हणूनच पंतप्रधानांनी लालकिल्ला येथील भाषणात बलुची विषय छेडून पाकला डिवचलेले होते. मात्र त्याची जाहिर वाच्यता कोणीही करणार नाही. पाकिस्तानही काश्मिरी लढ्याला सहानुभूती असल्याचे म्हणतो, पण कुठल्याही हिंसेची हल्ल्याची जबाबदारी घेत नाही. हळुहळू तसेच काही सीमेपलिकडे होताना दिसले, तर भारत सरकारही त्याची जबाबदारी घेणार नाही. नवाज शरीफ़ यांच्याप्रमाणेच मोदी, पर्रीकर वा राजनाथ हात झटकून मोकळे होताना आपल्याला बघावेच लागणार आहे. अन्यथा जनरल रॉयचौधरी यांनी इतक्या सहजपणे त्या रणनितीचा उल्लेख केला नसता. फ़रक मात्र मोठा असेल. पाकिस्तान ही रणनिती दिर्घकाळ वापरत आला आहे. पण त्याला पुरक अशी भारतीय सीमेपार घुसून लढाई करण्याचे धाडस पाकला नाही. भारताची गोष्ट तिथेच वेगळी आहे. एकदा अशा भारतप्रणित फ़िदायिनांनी दिडदोन वर्षात पाकिस्तानात उच्छाद मांडला, मग तिथले अनेक गट एकत्र येऊन पर्यायी सरकार स्थापन करू शकतात. जसे मुजीबूर रहमान यांच्या अवामी लिगमधील सहकार्यांनी केले होते. त्यांना तात्काळ स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन भारताने आपले सैन्य त्यांच्या मदतीला पुर्व पाकिस्तानात धाडले होते. तेच बलुची वा सिंधी मोहाजिरांच्याही बाबतीत होऊ शकते. त्याला अजून दिडदोन वर्षाचा काळ जावा लागेल. त्यासाठी आधी भारतप्रणित फ़िदायिन सज्ज करून पाकमध्ये सोडावे लागतील. आरंभ तिथून होऊ शकतो आणि तेच काम येत्या दोनतीन आठवड्यात सुरू झालेले असेल. म्हणूनच येत्या काही दिवसात पाकिस्तानात घडणार्या विविध घटना घातपात यावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. कारण चोख उत्तर त्यातूनच दिले जाऊ शकणार आहे. मात्र त्याची जबाबदारी कुणीही भारतीय नेता घेणार नाही. जनरल रॉयचौधरी यांच्या सांगण्याचा इतका सोपा अर्थ लागू शकतो.
छानच भाऊ
ReplyDelete