Thursday, September 29, 2016

काट्याने काटा काढला

india crossed LOC के लिए चित्र परिणाम

वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. भारताने संरक्षणमंत्री म्हणून राष्ट्रीय राजकारणात दाखल झालेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकामागून एक वादग्रस्त विधाने केलेली होती. खरी तर ती वादग्रस्त विधाने नव्हती. ते आपल्या कामाच्या संदर्भात व धोरणाच्या संदर्भात बोलले होते. पण ज्यांना कुठूनही वाद उकरून काढायचा असतो, त्यांनी त्या वक्तव्यांना वादग्रस्त बनवण्याचा आटापिटा केलेला होता. सुदैवाने पर्रीकर हा माणूस आपल्या शब्दावर विश्वास ठेवणारा असल्याने, त्यांनी कधीही शब्दात हेराफ़ेरी केली नाही, की उगाच वाचाळता करून मुर्खांना खुलासे देण्यात वेळ दवडला नाही. हा माणूस कार्यरत राहिला आणि आज आपल्या कर्तृत्वाने देशाची मान त्याने उंचावली आहे. कारण तीस वर्षे जुन्या दुखण्यावर त्याने उपाय केला आहे. भारताला सतावणारा जिहाद हा काश्मिर प्रश्नातून आला आहे आणि काश्मिर किंवा दहशतवादाचा विषय संपवायचा असेल, तर काट्याने काटा काढावा लागेल, इतक्या स्पष्ट शब्दात पर्रीकर बोलले होते. इंडियाटुडे या वृत्तसमुहाच्या परिसंवादात भाग घेताना त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले होते आणि त्यांनी आपली मते बेधडक मांडलेली होती. त्यात दहशतवाद कसा संपवता येईल, त्याचे उत्तर देताना पर्रीकर म्हणाले होते, ‘आमच्या मराठीत काट्याने काटा काढावा अशी उक्ती आहे’. आज सीमापार कारवाई भारतीय सेनेने केली, तेच वर्षभरापुर्वी पर्रीकरांनी सांगितले होते. पण शब्दाचे अर्थही विसरून गेलेल्या शहाण्यांना त्याचा अर्थ उमजला नव्हता. पाकशी बोलणी करून विषय निकाली निघणार नाही. पाकला वाटाघाटीने प्रश्न सोडवायचाच नाही. तर हिंसा व घातपातानेच पुढे जायचे आहे. तेव्हा त्यांना समजणारी भाषा युद्धाची किंवा घातपाताचीच असू शकते, असेच पर्रीकर यांना म्हणायचे होते. त्यांनी केलही नेमके तसेच. गाफ़ील पाकसेना व तिचे हस्तक जिहादी यांना गाफ़ील पकडून संपवले आहे.

दोनच दिवसांपुर्वी अमेरिकेच्या वॉल स्ट्री्ट जर्नल या दैनिकाने एक लेख प्रसिद्ध केला होता. तो लेख हा अमेरिकेने पाकला दिलेला इशारा होता. अमेरिकेतील काही वृत्तपत्रे अमेरिकेन सरकारच्या भूमिकांचे संकेत देणारी मानली जातात. त्या लेखाचे शिर्षकच सुचक होते. ‘मोदी हा धोका पत्करणारा नेता आहे.’ याचा अर्थ असा होता, की ही कारवाई होऊ शकते, अशी अमेरिकन सरकारला आधीपासून दिलेली कल्पना होती. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांना कानपिचक्या दिलेल्या होत्या आणि आपल्या भूमीतून जिहादींना दिलेला आश्रय काढून घेण्याचा इशारा दिलेला होता. मग गुरूवारी सकाळी एक बातमी भल्या सकाळी भारतीय वाहिन्यांवर ब्रेकिंग न्युज म्हणून झळकू लागली. अमेरिकन सुरक्षा सल्लागारांनी मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फ़ोनवरून वार्तालाप केला. त्यातही पाकला इशारा दिल्याचे कथन केले हाते होते. पुढल्या दोन तासात भारतीय सेनादलाचे कारवाई प्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन भारताने आठ जिहादी छावण्या उध्वस्त केल्यासी घोषणा करून टाकली. या घटनाक्रमाकडे बारकाईने बघितले, तर ही आकस्मिक झालेली कृती नसल्याचे लक्षात येते. पण ती करण्याला उरीच्या हल्ल्यानंतर दहाबारा दिवस लागले आहेत. पण त्याची तयारी खुप आधी सुरू झालेली होती. अगदीच स्पष्ट शब्दात सांगायचे, तर जानेवारी महिन्यातल्या पठाणकोट हल्ल्यानंतरच त्याची सज्जता सुरू झालेली होती. यापुढे पाकने हल्ला केला तर त्याला त्याच्याच भाषेत चोख उत्तर देण्याची सज्जता केलेली होती. फ़क्त तशी वेळ आल्यावर पोषक वातावरण तयार करण्याची गरज होती आणि त्यासाठी गेले दहाबारा दिवस खर्ची पडले. हे समजून घेता आले तर काय घडले, त्याचा अंदाज येऊ शकतो.

भारतीय सेना कधीही कुठेही जाऊन शत्रूला धडा शिकवण्यासाठी कायम सज्ज असते. पण पाकसेनेप्रमाणे तिला मनमानी करता येत नाही. पाकिस्तानात सेनेच्या इच्छेने राज्य चालते आणि कृती झाल्यानंतर सरकारला माहिती दिली जाते. भारतात नागरी सरकारच्या मर्जीनुसार सेनेला चालावे लागते. म्हणूनच आजवर कितीही कुरापती काढल्या गेल्या तरी थेट जबाब देण्य़ाची मुभा भारतीय लष्कराला नव्हती. प्रत्येकवेळी तसा प्रसंग आला, मग युद्ध नको म्हणणार्‍यांनी सेनेच्या मुसक्या बांधून ठेवल्या होत्या. राजकीय नेतृत्वही दुबळे होते. म्हणूनच कितीही सज्जता असली तरी भारतीय सेनेला चोख उत्तर देता येत नव्हते. यावेळी असा धोका पत्करणारा नेता भारताचा पंतप्रधान आहे, हा इशारा म्हणूनच पाकने गंभीरपणे घ्यायला हवा होता. अण्वस्त्र वापरण्याच्या पोकळ धमक्यांना दाद देणारा नेता आज भारताचे नेतृत्व करीत नाही आणि काट्याने काटा काढण्याची भाषा बोलणारा संरक्षणमंत्री भारताला लाभलेला आहे. त्याचा अर्थ भारतातल्या अर्धवट शहाण्यांना उमजणारा नसला, तरी जगातल्या त्या विषयातील अभ्यासकांना त्याचे पुर्णपणे भान होते. मोदी पर्रीकर यांच्या जोडीला तितकाच धाडसी म्हणून ख्यातनाम असलेला सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पाकिस्तानसाठी घातक मिश्रण होते. म्हणून अमेरिकेसह जगातले मोठमोठे देश पाकिस्तानला संयमाचा सल्ला देत होते. पण पाकिस्तान त्या सल्ल्यापेक्षा भारतातल्या त्याच्या हस्तक बुद्धीमंतांवर अधिक विसंबून राहिला. युद्ध नको ही भूमिका भारताच्या नेतृत्वावर लादणार्‍या अशा बुद्धीमंतांपासून मोदी मैलोगणती दूर असल्यामुळेच उरीची कुरापत महाग पडणारे हे उघड होते. पण त्याला चोख उत्तर देण्यापुर्वी पाकसेनेप्रमाणेच भारताल्या पाक हस्तकांनाही पुरते गाफ़ील ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी मग विविध राजनैतिक व मुत्सद्दी पर्यायांवर विचार करण्याचा देखावा उभा करावा लागला होता.

१७ सप्टेंबरला उरीचा हल्ला झाला आणि लगेच चोख उत्तराची भाषा मोदी बोलले. मात्र त्यापुढे त्यांनी या विषयावर मौन पाळले. ते मौनच गंभीर होते. मग पाकची नाकेबंदी करण्याच्या विविध पर्यायांचा विचार सुरू झाला आणि लष्करी कारवाईचा पर्याय भारताने गुंडाळून टाकल्याची चर्चा सुरू झाली. पाकला तेच ऐकायचे होते आणि भारतीय माध्यमातील पाक हस्तकांनी तेच बोलावे, अशी व्यवस्था केली गेली होती. मात्र पडद्याआड लष्करी कारवाईसाठी योजना आखण्यापासून सज्जता करण्यापर्यंत कामे सुरू होती. ती किती गोपनीय असावी? प्रत्यक्ष हल्ल्यानंतर आठ तास उलटून गेले, तरी भारतीय माध्यमांना त्याचा सुगावा लागू शकला नाही. भारतीय सेनेच्या व परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने थेट पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तेव्हा पकिस्तानच नव्हेतर भारतीय पत्रकारांनाही थक्क होण्याची पाळी आली. कारण भारत अशी काही कारवाई करील, हे कोणी स्वप्नातही अपेक्षिलेले नव्हते. ह्या कारवाईतले सेनेचे जितके कर्तृत्व आहे तितकेच मोठे श्रेय त्याविषयी गोपनीयता राखणार्‍या प्रत्येक अधिकारी व प्रशासनाचेही कौतुक आहे. आज पाकिस्तानची इतकी लाजिरवाणी स्थिती झाली आहे, की भारत त्यांच्या हद्दीत घुसल्याचे सांगतो आहे आणि तसे काहीच झालेले नाही, असे पाकला सांगावे लागते आहे. ओसामालाही अबोटाबाद येथे मारल्याचे पाकिस्तानने कुठे आधी कबुल केले होते? अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वत: सोळा तासानंतर जाहिर केले; तेव्हा पाकला आपली नामुष्की मान्य करावी लागली होती. आज भारताचा दावा मान्य केला तर आपल्याच जनतेसमोर पाक नेत्यांना शरमेने मान खाली घालावी लागेल ना? भारताने हल्ला केला तर तुम्ही काय केले? असा सवाल सामान्य पाक नागरिक विचारणार ना? मोदी, पर्रीकर, डोवाल हे काय मिश्रण आहे; ते हळूहळू अनेक शहाण्यांना कळू शकेल.

8 comments:

  1. आजकी तारीख 29-09-2016

    29+9+2+0+16= *56*

    *देख लो आज 56 इंच का सीना....*आता मोजा

    ReplyDelete
  2. mastch Bhau...
    tumhi pan great anyalist aahat

    ReplyDelete
  3. मोदिनी परिस्थिती किती बदलून टाकली पाहा', आजपर्यंत भारत म्हणायचा " भारत कि शांती कि सोच को भारत कि कमजोरी न समझना " आज पाकिस्तान तसे म्हणतोय .परंतु मोदीजीचे एक चुकले च त्यांनी गिरिष कुबेरांना विचारायला हवं होतं .

    ReplyDelete
  4. भाऊ,छान. आता इम्रान खान जे बोलला ते पाहता पाक क्रिकेटर व कलाकार यावर एक अग्रलेख लिहा.

    ReplyDelete