Friday, September 30, 2016

घरभेद्यांचे नाक कापले

ghulam ali kejriwal के लिए चित्र परिणाम

बुधवारी रात्री पाक हद्दीत जाऊन भारतीय सैनिक कमांडोंनी केलेल्या कारवाईचे कोडकौतुक खुपच चालले आहे. ते होणारच आहे. कारण सतत किरकोळ कुणा जिहादी भुरट्यांकडून अपमानित होण्यातच धन्यता मानण्याची सवय जडलेल्यांना हा इवला विजय पराक्रम वाटल्यास नवल नाही. मग याचे श्रेय कोणाचे याविषयी सध्यातरी फ़ारसे दुमत नाही. अगदी विरोधकांनीही मोदी सरकारचे त्यासाठी अभिनंदन करून तसे श्रेय दिलेले आहे. पण काही लोक उपजतच कद्रु असतात. त्यामुळे त्यांना मोकळ्या मनाने जगता येत नाही, की मनमोकळे वागताही येत नाही. म्हणून आपली कुशाग्रबुद्धी दाखवण्यासाठी त्यांनी भारतीय सेनादलाचे कौतुक करीत सरकारला श्रेय देण्याचे नाकारले आहे. जणू भारत सरकार वा अंतिम निर्णय घेणार्‍या पंतप्रधान मोदींचा अशा कारवाईशी काडीचा संबंध नाही, असेच त्यांना सुचवायचे आहे. पण नकटीने नाक मुरडण्यापलिकडे त्याला महत्व नाही. मोदींनी तरी त्यांच्याकडून पाठ थोपटली जावी, अशी अपेक्षा कधीच केलेली नाही. किंबहूना असे दळभद्री उद्योग होणार हे ठाऊक असल्याने मोदी याविषयी जाहिरपणे विधान करायलाही पुढे आले नाहीत. त्यांनी ते काम आपल्या सहकार्‍यांवर सोपवले आहे. पण कालपर्यंत मोदींची टिंगल करण्यात धन्यता मानणार्‍यांची नंतरची तारांबळ मात्र लोकांसमोर आलीच. राहुल गांधी यांनी भारतीय सेनेचे कौतुक केले आहे. पण सरकारला श्रेय देण्याचा विचारही या माणसाच्या मनाला शिवलेला नाही. राहुलच्या कॉग्रेसची सत्ता असतानाही हीच भारतीय सेना होती. पण तेव्हा तिला असा पराक्रम दाखवता आला नाही, की अभिमानाने पाकला धडा शिकवण्याचे धाडस सांगता आले नाही. मग याचवेळी इतके धाडस कुठून आले? त्याचाही खुलासा तात्कालीन सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनीच केला आहे. तोच खुप बोलका आहे.

उरीच्या हल्ल्यानंतर सैनिकांचे बलिदान भारत वाया जाऊ देणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. भारताचे लष्करी कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनीही तशी ग्वाही दिलेली होती. त्यानंतर वाहिन्यांच्या चर्चेत कुठली कारवाई, याचा सलग उहापोह होत राहिला. त्यात सहभागी झालेल्या प्रत्येक निवृत्त लष्करी अधिकार्‍याने भारतापाशी चोख उत्तर देण्याची क्षमता असल्याचीच ग्वाही दिलेली होती. पण मुत्सद्दी व राजकीय नेतृत्वाने साथ द्यायला हवी असेच, हे सर्व जुने जनरल मार्शल सांगत होते. त्याचा अर्थ असा, की राहुल ज्या सेनादलाची पाठ थोपटत आहेत, त्यालाच कॉग्रेसच्या कारकिर्दीत राजकीय पाठींबा नाकारला गेला होता. म्हणूनच पाकिस्तानी जिहादी बेगुमान कुठेही हल्ले करीत होते आणि भारतीय सेनेला लाचार होऊन ते सहन करावे लागत होते. अर्थात तेव्हाही भारतीय सेनेने अनेकदा पाकसेनेला व जिहादींना चोख उत्तरे दिलेली आहेत. पण आपल्या कुवतीनुसार ठोस उत्तर देण्याइतके स्वातंत्र आधीच्या सरकारांनी सेनादलाला दिलेले नव्हते. युपीएच्या काळातील सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग त्याचीच साक्ष देत होते. यावेळी लष्करी कारवाई होऊ शकते आणि आपल्याकडे तितकी कुवत आहे, असे स्पष्ट सांगताना त्यांनी केलेला एक खुलासा मोलाचा होता. किंबहूना त्यांचा खुलासा राहुलसारख्यांना थप्पड मारणारा होता. यावेळी भारताचे राजकीय नेतृत्व सकारात्मक भूमिकेत सेनेच्या मागे उभे आहे आणि म्हणूनच ठोस कारवाई होऊ शकते व पाकला धडा शिकवला जाऊ शकतो, असे विक्रमसिंग म्हणाले. त्याचा अर्थ त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अशी कारवाई करण्याची मुभा मिळालेली नव्हती आणि ती नाकारणारे सरकार मनमोहन वा राहुल गांधीचे होते ना? मग राहुल आज कोणा़चे कशाला कौतुक करीत आहेत? अर्थात असा प्रश्न त्यांना विचारण्यात अर्थ नाही.

दुसरे दिवटे आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल! दोनच दिवस आधी या माणसाने ट्वीट करून भारताची हेटाळणी केलेली होती आणि आज तोच माणुस सेनेचे कौतुक करतो आहे. सुनंदा पुष्कर प्रकरणात नावारुपाला आलेली पकिस्तानी पत्रकार मेहर तर्रार आठवते? तिने उरीनंतर पाकिस्तान एकाकी पडण्यासंबंधाने एक लेख लिहीला आहे. त्यात पाक नव्हेतर भारतच जगामध्ये एकाकी पडल्याचा युक्तीवाद केला आहे. त्याचे केजरीवाल यांनी ट्वीटवरून कौतुक केले आणि पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवली होती. असा माणूस आज सेनेचे तरी कौतुक कशाला करतो आहे? मोदींची खिल्ली उडवून पाकिस्तानी पत्रकाराच्या लेखाची पाठ थोपणाटर्‍याला आज भारतीय सेनेचा विजय कशामुळे झाला असे वाटते? असे दिवटे ज्या देशात आहेत, त्या देशातील सेना वा सुरक्षा दलांना समोरच्या शत्रूपेक्षा जवळचे लोक दगा देत असतात. धोका शत्रूपेक्षा आपल्याच परिवाराचा वाटू लागतो. कन्हैयाच्या समर्थनाला जाणारे राहुल व केजरीवाल, आज कुठल्या सेनेचे कौतुक करीत आहेत? ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप करून बदनामी करण्यात सहभागी झाले, तीच ही भारतीय सेना आहे ना? बुधवारची लष्करी कारवाई झाल्यापासून ‘अमन की आशा’ नावाचे नाटक रंगवणारे तमाम शांतीदूत बेपत्ता आहेत. मनसेने पाक कलाकारांना बंदी घालण्याची मागणी केल्यावर ज्यांना कलेचा उमाळा आलेला होता, त्यांचाही कुठे ठावठिकाणा नाही. तिकडे पाकिस्तानातून तोयबाचा अनौरस बाप सईद हाफ़ीज बेपत्ता झालाय आणि इकडे त्याचेच चुलत-मावस भाऊ म्हणावेत, असे तमाम शांतीदूत कुठल्या कुठे गायब झालेत. बुर्‍हान वाणीसाठी मातम करणार्‍या रुदाल्या दिसेनाशा झाल्या आहेत. ही अशी माणसे ज्या समाजात असतात, त्या समाजाच्या सेनेला लढणे अवघड होऊन जाते. कारण त्यांचा बंदोबस्त सेना करू शकत नाही, तो सामान्य जनतेने व नागरिकांनी बहि्ष्कारातून करायचा असतो.

बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत भारतीय सेनेचे कमांडो यशस्वी होऊ शकले, त्याचे सर्वात मोठे श्रेय अशा तमाम शांतीदूत पाकप्रेमींच्या मुर्खपणालाही द्यावे लागेल. सोमवारपासून रोजच्या चर्चेत बरखा दत्त किंवा तत्सम पत्रकार सतत एक प्रश्न विचारत होते. त्याचे उत्तर खोदून काढायला धडपडत होते. सिंधूखोरे, लाडका देश दर्जा वा मुत्सद्दी कोंडी, अशाच पर्यायांचा भारत विचार करीत असल्याचा देखावा निर्माण झाला होता. त्यामुळे भारत लष्करी पर्याय वापरणार नाही, याची बरखा सारख्यांना खातरजमा करून घ्यायची होती. तीन दिवस ती सतत प्रत्येक पाहुण्याला तोच प्रश्न विचारून खात्री करून घेत होती. जणू पाकिस्तानवर लष्करी कारवाई होणार, अशा चिंतेने तिला ग्रासलेले होते. आणि अशा कारवाईची शक्यता नाही, म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडत होता. किंबहूना तिच्यासारख्यांचा जीव भांड्यात पडणे, हीच एक रणनिती होती. जितके हे असे पाकप्रेमी लोक निश्चींत, तितके पाक सेनादल निश्चींत होणार, हे उघड होते. तेच झाले आणि पाकचा घात झाला. चीनपासून अमेरिका सावध रहा आणि जिहादींना आवरा, असे इशारे देत असतानाही पाकिस्तान बेफ़िकीर राहिला. तो बरखासारख्या मित्रांच्या विश्वासावर. कारण भारत लष्करी कारवाई करत नाही अशी हमीच हे पाकप्रेमी देत होते. म्हणूनच गुरूवारी कारवाई यशस्वी झाल्याची बातमी आली आणि सुतकी चेहरे झाले, ते अशाच लोकांचे होते. असले लोक ज्या देशात उजळमाथ्याने वावरतात, तिथली सेना कितीही सुसज्ज असली तरी शत्रूला चोख उत्तर देऊ शकत नसते. पण तिथे मोदीसारखा पंतप्रधान आला, तर ही कारवाई शक्य होते. कारण दोन वर्षातला तोच मोठा फ़रक एकमेव आहे. राजदीप, बरखा वा तत्सम खबर्‍या पत्रकारांना केंद्र सरकारच्या कार्यालये व मंत्र्यांच्या घराच्या आसपास फ़िरकू दिलेले नाही. पाकला दणका देण्यातली मोदींची सर्वात मोठी रणनिती, अशा लोकांना दूर ठेवण्याचीच राहिली आहे.

3 comments:

  1. भाऊ हे लोक सत्तेत होते तेव्हा देशाची वाट तर लागलीच पण अब्रुही गेली कुणीही यावे आणि ...... अशी आवस्था होती गेल्या २ दिवसांत रस्त्यावरून फिरताना फरक जाणवतोय लोक आनंदित दिसतायत एक समाधान दिसतय काही लोकतर १५ लाख जमा झाल्याच सांगतायत.

    ReplyDelete