Sunday, September 25, 2016

पाणवठ्यावरची रडवेली बाई

sharif manmohan के लिए चित्र परिणाम

सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेची बैठक चालू आहे. या वार्षिक बैठकीत विविध देशांचे परराष्ट्रमंत्री वा राष्ट्रप्रमुख आपल्या भूमिका मांडत असतात. सहसा पाकिस्तान तिथे काश्मिरचे रडगाणे गातो, हा आता पायंडा झाला आहे. भारत ती भूमिका खोडून काढतो, हाही एक उपचार बनुन गेला होता. पण यावर्षी काही गोष्टी आमुलाग्र बदलून गेल्या आहेत. भारताने महिनाभर आधी पाकच्या काश्मिरी भूमिकेला शह देणारी बलुचिस्तानच्या मानवी हक्काची भूमिका जाहिरपणे मांडली आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले तर नवल नाही. कारण काश्मिरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली हा विषय जुना झाला असून, त्यात तथ्य नसल्याचे जगाच्याही लक्षात आलेले आहे. पण पाकिस्तानचा मोठा प्रांत असलेल्या बलुची प्रदेशात मागली काही वर्षे पाकसेनेने बलुची लोकांची कत्तल चालवलेली आहे. त्यांची नुसती गळचेपी चालू नसून, अक्षरश: नरसंहार चालला आहे. हजारो बलुचींनी परागंदा होऊन विविध देशात आश्रय घेतला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विषयाला हात घालताच जगभर पसरलेल्या त्याच बलुचींना चेव आला आहे. मोठ्या हिंमतीने त्यांनी रस्त्यावर येऊन जगभर निदर्शने केली. आता त्यांच्याच समर्थनाची भूमिका भारत राष्ट्रसंघाच्या वार्षिक बैठकीत मांडणार हे उघड होते. त्याचा उच्चार आधीच राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार बैठकीत झाला. तेच जगाच्या व्यासपीठावर मांडले जात असल्याने पाकिस्तानची बोबडी वळली आहे. पाकिस्तान एकाकी पडला आणि त्यामुळेच माथे फ़िरल्यासारखे हल्ले व घातपात सुरू झाले आहेत. पण यावेळी हा नुसता भारताचा मुत्सद्देगिरीचा विजय नसून, मोदींनी आपल्या आधीच्या पंतप्रधानांच्या अपमानाचा घेतलेला बदलाही म्हणता येऊ शकतो. त्याचे स्मरण कोणलाही अजून झालेले नाही.

२०१३ मध्ये अशीच राष्ट्रसंघाची आमसभा चालू होती आणि तिथे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग गेलेले होते. त्यापुर्वी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक वटहुकूमाचा मसूदा अंमत करून घेतला होता. तो सहीसाठी राष्ट्रपटी भवनाकडे पाठवून मनमोहन सिंग न्युयॉर्कला रवाना झाले होते. दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या कुणाही लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करण्याचा कोर्टाचा निकाल होता. त्याला रोखून त्यात बाद होणार्‍या लालूप्रसाद यादव यांना वाचवण्यासाठीच हा वटहुकूम जारी व्हायचा होता. त्यावरून वादळ उठले होते. सरकार कॉग्रेसचे होते आणि पक्ष त्याचे समर्थन करत होता. त्यासाठी दिल्लीत पक्षाचे प्रमुख प्रवक्ते अजय माकन यांचे निवेदन चालू असताना अकस्मात तिथे राहुल गांधी आले. त्यांनी सदरहू वटहुकूम हा निव्वळ मुर्खपणा असल्याचे प्रमाणपत्र मनमोहन सिंग यांना देऊन टाकले होते. ही बातमी ब्रेकिंग न्युज झाली आणि तिकडे अमेरिकेत भारतीय पंतप्रधानाला तोंड लपवायला जागा उरलेली नव्हती. सिंग यांनी नाराज होऊन सोनिया गांधींना फ़ोन केला आणि सोनियांनीही राहुलना समज दिलेली होती. पण आमसभेच्या मुहूर्तावर मनमोहन सिंग यांची इतकी नाचक्की झाली, की पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनीही भारतीय पंतप्रधानाची खिल्ली उडवली होती. काही पत्रकारांना चहापानाला शरीफ़ यांनी आमंत्रित केले होते. तिथे शरीफ़ म्हणाले ‘गावठी महिला पाणवठ्यावर रडगाणे गाते तसे भारतीय पंतप्रधान कुरबुरत आहेत.’ मग त्याचा आधार घेऊन पाकिस्तानी वाहिन्यांवर भारताची यथेच्छ कुचेष्टा चालू होती. सुदैवाने कुणा भारतीय वाहिनीने त्याची बातमी दिली नाही, की त्याचा गवगवा होऊ दिला नाही. म्हणून मायदेशी मनमोहन सिंग यांची अब्रु राखली गेली होती. मात्र फ़ारकाळ त्यावर पडदा राहू शकला नाही. ते सत्य चव्हाट्यावर आलेच.

काही महिन्यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या सभा सुरू झाल्या आणि आपल्या एका सभेत नरेंद्र मोदी यांनी त्याच प्रसंगाचा उल्लेख केला. भारताच्या पंतप्रधानाची पाकच्या पंतप्रधानाने पत्रकारांच्या चहापानामध्ये खिल्ली उडवली. तिथे भारतीय पत्रकारही हजर होते. पण त्यांनी स्वाभिमान दाखवून उठून जाण्याचेही औचित्य दाखवले नाही. असे विधान मोदींनी केल्यावर भारतीय वाहिन्यांवर गदारोळ सुरू झाला. कोण पत्रकार शरीफ़ यांच्या चहापानाला गेला होता आणि कोण तसे ऐकूनही तिथेच थांबला, हा वादाचा विषय झाला. तमाम वाहिन्यांवर मोदींचा हा गौप्यस्फ़ोट गाजत असताना एनडीटीव्ही या वाहिनीवर मात्र त्याचा मागमूस नव्हता. उलट गडबडीने कॅमेरासमोर हजेरी लावून बरखा दत्त हिने त्या गौप्यस्फ़ोटाला आव्हान दिले. वास्तविक मोदींनी कुणाही पत्रकाराचे नाव घेतलेले नव्हते. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात, त्याच न्यायाने बरखाला शांत बसवले नाही. आपण त्या चहापानाला गेलो होतो, पण शरीफ़ यांनी मनमोहन यांची खिल्ली उडवली तेव्हा आपण तिथे नव्हतो; असा केविलवाणा खुलासा बरखा आपल्या वाहिनीवर करीत होती. यातून भारतातले पाकप्रेमी व भारतद्वेषी पत्रकार कोण व कसे उजळमाथ्याने वावरत असतात, त्याचा अंदाज येऊ शकतो. तर ती मस्ती कोणी दाखवली होती? मोदींनी बरखाला उघडे पाडण्य़ासाठी हा किस्सा कथन केलेला नव्हता. आपल्या देशाचा पंतप्रधान कुठल्याही पक्षाचा असेना, जगात त्याचा अवमान होत असेल तर स्वाभिमान दाखवून त्याच्या समर्थनाला उभे राहिले पाहिजे; अशी भूमिका मोदींनी घेतली होती. त्यासाठीच शरीफ़ यांच्या असभ्यपणावर आघात केला होता. आज स्थिती किती बदलली आहे ना? भारताचे पंतप्रधान न्युयॉर्कला गेलेले नाहीत. पण पाकचे शरीफ़ पुन्हा तिथे आहेत आणि जगाच्या प्रत्येक कॅमेरापासून तोंड लपवून त्यांना हिंडावे फ़िरावे लागते आहे.

आज कुठली मोठी आक्रमक भूमिका शरीफ़ जगाच्या व्यासपीठावर मांडू शकले आहेत? कोणी त्यांचे रडगाणे ऐकायला तयार नाही आणि आपल्या लष्करप्रमुखांच्या हुकूमानुसार हा केविलवाणा पाक पंतप्रधान काश्मिरचे रडगाणे गात अमेरिकेत फ़िरतो आहे. कुठल्याही खेड्यातल्या पिडीत महिलेपेक्षा शरीफ़ यांची स्थिती वेगळी आहे काय? जे वर्णन त्यांनी तीन वर्षापुर्वी भारतीय पंतप्रधानासाठी केलेले होते, ते जसेच्या तसे आज त्यालाच लागू होत नाही काय? न्युयॉर्कमध्ये असताना इस्लामाबाद येथून पाकचा सेनाप्रमुख राहिल शरीफ़ पंतप्रधानाला आमसभेत काश्मिरचेच रडगाणे गायची धमकी देतो. नवाज शरीफ़ निमूटपणे रडगाणे गातोय. इतका पाकचा कुठलाही दीनवाणा पंतप्रधान जगाने बघितला नसेल. कुठला देश साथ देत नाही. जिथे रडायला जावे तिथे शिव्याशाप ऐकावे लागत आहेत. निर्बंध वा प्रतिबंधाचे इशारे मिळत आहेत. दहशतवाद थांबवा, जिहादचे सम्रर्थन सोडून द्या; असे उलट बोल ऐकावे लागत आहेत. अमेरिकन कॉग्रेसमध्ये पाकला दहशतवादी देश घोषित करावे म्हणून विधेयक सादर होते आहे. यापेक्षा राष्ट्रप्रमुखाच्या नशिबी कुठला अवमान येऊ शकतो? जे शब्द आपण दुसर्‍याची हेटाळणी करण्यासाठी वापरले, तेच आपल्या वाट्याला आल्याचे दु:ख किती भयंकर असेल ना? पण आज तशी पाळी नवाज शरीफ़ यांच्यावर आली आहे आणि ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणली आहे. जे राजकारण व परदेशी संबंध मोदींनी मागल्या दोन वर्षाच्या परिश्रमातून साध्य केले, त्याचे हे फ़ळ आहे. एकप्रकारे कॉग्रेस युपीएच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अपमानाचा बदलाच मोदींनी घेतला, असे म्हणायला कोणाची हरकत आहे काय? राष्ट्रीय सन्मानाचा विषय येतो तेव्हा पक्षाची संकुचित भूमिका सोडून विचार करण्याची क्षमता असेल, त्यालाच याचा अर्थ उमजू शकतो. हाच २०१३ आणि २०१६ च्या भारत देशाच्या जागतिक प्रतिष्ठेत पडलेला फ़रक आहे.

5 comments:

  1. भाऊ जुन्या एका हिंदी मूव्हीमधील जितेंद्र आठवतोय जो खलनायकाचा बदला घेतो तसाच हा बदला आहे खरोखर मोदीजी"हिंम्मतवाला" आहे

    ReplyDelete
  2. भाऊ , छान लेख !! अजून एक गोष्ट अशी की ' बरखा दत्त ' जेन्व्हा ती स्वतः ( नवाज शरीफ बोलले तेन्व्हा तिथे ) उपस्थित नव्हती इसे येथे सान्गत होती त्याचवेळी पाकिस्तानी ' जियो ' टी.व्ही वर त्या वाहिनीचा सम्पादक ' हमीद मीर ' हा त्याच्या वाहिनीवर छातीठोकपणे सान्गत होता की। ' बरखा दत्त ' त्या मुलाखती दरम्यान तेथेच उपस्थित होती ( जेन्व्हा शरीफ मनमोहन सिग यान्ची टर उडवत होते ) सान्गायचा उद्देश असा बरखा दत्त ' धादान्त ' खोटे बोलत होती.

    ReplyDelete
  3. फार छान लेख आहे. आताचा घडामोडी विसरून गेलेली घटना पुन्हा लोकांना समोर आणलीत

    ReplyDelete
  4. व्वा, मोदीजी खरेच ग्रेट आहेत!

    ReplyDelete
  5. Bhau ! aajchya 26/09/2016 chya samana news papermadhla agralekh kahitari veglech sangtoy. tumche tya baddal mat kay aahe?

    ReplyDelete