Friday, September 16, 2016

शेतकरी आत्महत्या कोणाच्या?

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा  (४)



गेल्या दशकभरात देशाच्या कानाकोपर्‍यातून शेती डबघाईला गेल्याचे कारण सांगत आत्महत्यांचा आकडा फ़ुगत गेला आहे. त्याचे राजकारण खुप झाले. अर्थकारणातून त्याचा अभ्यास खुप झाला. पण कुणीतरी त्याच्या जातनिहाय अभ्यास केला आहे काय? इतके शेकडा किंवा अमूक हजार आत्महत्या झाल्याचे आकडे रंगवून सांगितले गेले आहेत. पण त्याचा जातनिहाय अभ्यास व वर्गवारी केल्यास त्यात मराठा कुणबी शेतकर्‍यांचीच संख्या अधिक नव्हेतर बहुतांश असल्याचे सिद्ध झाल्यास नवल नाही. कारण कालबाह्य झालेल्या या व्यव़सायावर मातीला चिकटून बसलेल्या शेतक‍र्‍याच्या जीवनाची पुरती धुळधाण उडालेली आहे. त्यात किती मराठा कुणबी आहेत, हा विषय कधी पटावर आला नाही. जेम्स लेन किंवा आरक्षणाच्या निमीत्ताने खुप वादविवाद झाले. शिवरायांचे खरे गुरू कोण याचाही खोदून अभ्यास झाला. परंतु त्याच शिवरायांचा वारसा सांगणार्‍या कुणाला आज आत्महत्या करणार्‍यात शिवरायांच्या मराठा ज्ञातीचे प्रमाण किती त्याकडे ढुंकून बघावेसे वाटलेले नाही. यालाच खरे राजकारण म्हणतात. एका बाजूला असे जातीय राजकारण रंगलेले होते आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांवरून आरोप प्रत्यारोपाचे फ़ड रंगवले गेले. पण त्यात भरडला जाणारा ज्ञातीसमुह कुठला, त्याची कुठेही वाच्याता झाली नाही. आवाज उठला नाही. कुळकायद्याने वा पुर्वापार शेतीत गुंतलेल्या या समाजाचे जगणेच मातीशी निगडीत राहिले. किंबहूना जमिनदार बागायतदार म्हणून त्यांच्याकडे बघितले गेले. पण पैशात लोळणारा बागायतदार शेत्तकरी, सहकाराच्या मार्गाने श्रीमंत झालेला जमिनदार शेतकरी आणि मातीत खपणारा शेतकरी यांच्यातली तफ़ावत शोधली गेली काय? त्यात होरपळून निघालेला मराठा किती संख्येने आहे, त्याचा ताळेबंद कधी मांडला गेला आहे काय? मराठा मोर्चाकडे जातीचा आवाज म्हणून बघणार्‍यांनी अशा सर्व अंगाने कधी विचार केला आहे काय?

आज कोपर्डीच्या घटनेने मराठा चवताळला असे म्हटले जाते. किंवा त्यामुळे मराठा एकवटू लागला असेही सांगितले जात आहे. पण तशी घटना एक ठिणगी असू शकते. ठिणगीने भडका उडतो, हे अर्धसत्य आहे. भडका उडण्यासाठी मुळातच स्फ़ोटक साहित्य समोर असावे लागते. तसे नसेल तर कितीही ठिणग्या किंवा ज्वाला जवळ आणल्या, म्हणून भडका उडू शकत नाही. स्फ़ोटक स्थिती सज्ज असेल तरच ठिणगी आपले काम करू शकते. मराठा मानल्या जाणार्‍या लोकसंख्येत अशी स्फ़ोटक स्थिती कधीपासून आली आणि कशामुळे आली, त्याची चर्चा आजही होताना दिसत नाही की ऐकू येत नाही. मराठा मागली कित्येक वर्ष वा दशके सत्तेतच आहेत असेही सांगितले जाते. पण असे सरसकट विधान व्यवहारात दिशाभूल करणारे असते. मायावती दिर्घकाळ उत्तरप्रदेशात सत्तेच्या जवळ आहेत किंवा सत्तेवरही बसल्या आहेत. म्हणून त्या प्रदेशातील दलित पिडीत सत्ताधारी जमात झाले, असा कुणी दावा कधीही केलेला नाही. आजही त्या प्रदेशातील दलितांची अवस्था फ़ारशी सुधारलेली नाही, तर सुखवस्तु सत्ताधारी म्हणायचा प्रश्नही येत नाही. कारण नेतृत्व कुठल्या जातीच्या व्यक्तीपाशी आहे, त्यावरून त्या समाजघटकाला सत्ताधारी म्हणता आले, तरी वास्तवात ती जमात सत्ताधारी नसते. दिल्लीच्या बादशहापासून निजामापर्यंत अनेक मुस्लिम सत्तेत होते, म्हणून सामान्य मुस्लिम सत्तेत होता, असे संबोधले जाते. व्यवहारात तसे अजिबात नसते. आजही खेड्यापाड्यापासून शहरातही दरिद्री भुकेकंगाल मुस्लिम मोठ्या संख्येने दिसतात. मग त्यांची सत्ता कोणी हिरावून घेतली आहे काय? जे मुस्लिम वा दलितांविषयी खरे आहे, तेच महाराष्ट्रातल्या मराठा कुणब्यांविषयी म्हणता येईल. त्यांचा कोणी ज्ञातीबांधव सत्ताधारी म्हणून पदांवर दिर्घकाळ असल्याने, मराठे सत्ताधारी असल्याचा दावा मुळातच गैरलागू आहे दिशाभूल करणारा आहे.

मात्र असे सतत म्हटले गेले वा बोलले गेले. त्याचा दुहेरी परिणाम असतो. अशा ज्ञातीच्या सामान्य माणसाला काहीही पदरात पडत नसले तरी ‘आपला’ कोणी सत्तेवर बसला आहे, म्हणून फ़ुकाचा अभिमान वाटत असतो. त्या पोकळ अभिमानाने आपल्या दुखर्‍या गरीबीवर दुर्दशेवर फ़ुंकर घातली जात असते. पण त्याचा लाभ उठवून तोच सत्तेतला ज्ञातीबांधव किंवा ने्ते आपली मजा मारून घेत असतात. लालू दिर्घकाळ बिहारमध्ये आणि मुलायम उत्तप्रदेशात सत्तेची मजा मारीत आहेत. त्यामुळे सुखावलेले यादव त्यांनाच भरभरून मतेही देत असतात. म्हणून उत्तर भारतातले तमाम यादव सत्तेने सुखवस्तु झाले आहेत काय? तशीच काहीशी फ़सगत इथल्या मराठा समाजाची झाली आहे. त्यांच्या वाट्याला सत्ता सोडा, विकासाची फ़ारशी फ़ळे आली नाहीत. पण त्यांच्याच नावावर बिले फ़ाडत मोजक्या घराण्यांनी चैन मौज केलेली आहे. त्यातच जातीचा अभिमान बाळगताना मराठे म्हणजे सुखवस्तु वा जमिनदार; अशी एक समजूत तयार झाली. त्यात फ़ुकाचा अभिमान बाळगण्याची चुक मराठा लोकसंख्येकडून झाली, हे नाकारता येणार नाही. मराठा मुख्यमंत्री झाल्याचा अभिमान बाळगता आला. पण तो मराठा मुख्यमंत्री आपल्याच ज्ञातीबांधवांसाठी काय करू शकला, त्याचा ताळेबंद कोणी कधी विचारला नाही. ती मराठ्यांची सामुहिक चुक नक्कीच मानता येईल. कालपरवा छगन भुजबळ यांना काही आरोपाखाली अटक झाली, तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तावातावाने काय उद्गारल्या होत्या? ‘कोणालाही, कितीही लोकांना अटक करा. आम्ही मराठे घाबरत नाही.’ कोणाला तेव्हा सुप्रियाताई कुणाचा मराठा म्हणून उल्लेख करतात, त्याची मिमांसा कोणीच का केली नाही? सुप्रियाताई कुणाला मराठा ठरवून जातीवाचक आव्हान देत होत्या? कर्जामुळे दिवाळे वाजलेला कर्जबाजारी म्हणून आत्महत्येकडे वळलेल्या शेतकर्‍याचा अभिमान त्या सांगत होत्या काय?

राज्यात सत्तांतर झाल्यावर ज्या घोटाळ्यांचे आरोप आधीपासून होते आणि ज्यांची चौकशी सुरू झालेली होती, त्यातच भुजबळ यांना अटक झालेली आहे. त्यात राज्य सरकारचा कुठलाही हात नाही. जी चौकशी आधीच झालेली होती, त्यावर सरकार कारवाई करीत नव्हते, म्हणून कोर्टात याचिका गेली. त्यावर कोर्टानेच निर्णय दिला आणि भुजबळांना तुरूंगात जावे लागले. पण सुप्रियाताई त्या गुन्ह्याची पाठराखण करीत मराठा जातीचा अभिमान जागवू बघत होत्या. भुजबळांना मराठा म्हणून कोणी अटक केलेली नव्हती, की जातीविषयक गुन्हा नव्हता. मात्र अशा विधानातून सत्तेत असलेल्या मराठ्यांनी कुठलाही गुन्हा केला, तरी त्यांच्या पाठीशी जातीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहनच सुप्रियाताई करीत होत्या ना? कर्जबाजारी होऊन अब्रु गेली म्हणून विष खावून वा गळफ़ास लावून मरणाला कवटाळणार्‍या शेतकरी मराठ्याचे स्मरण सुप्रियाताईंना कधी झाले नाही. पण त्यांच्या पिताश्रींच्या नेतृत्वाखाली मंत्रीपद भोगणार्‍या भुजबळांच्या गुन्ह्याला पाठीशी घालताना सुप्रियाताईंचा जाती अभिमान उफ़ाळून आला. त्यात मराठा लोकांसाठी कुठली अभिमानास्पद गोष्ट होती? कशासाठी मराठ्यांनी न घाबरता अटकेला सिद्ध व्हावे, अशी ताईंची अपेक्षा होती? किंबहूना त्याच्याशी मराठ्यांचा एक समाजघटक म्हणून काय संबंध होता? कसलाही संबंध नसताना मराठे म्हणजे सत्तेत असताना भ्रष्टाचार करणारे, असेच त्यातून सुप्रियाताई बोलून दाखवत नव्हत्या काय? पण त्याचा परिणाम जनमानसावर असा होतो, की सत्तेत मराठे होते आणि बिनदिक्कत मनमानी करीत होते. दिसणारे चार चेहरे जरूर मराठा असतील. पण वास्तवातले लक्षावधी मराठे सामान्य जनतेसारखेच हलाखीचे जीवन कंठत होते. त्यांचा या भ्रष्टाचाराशी संबंध नाही की ते त्यातले लाभार्थी सुद्धा नाहीत. पण असली फ़सवी भाषा व प्रचारामुळे मागल्या अर्धशतकात मराठा समाजघटक बदनाम मात्र होऊन गेला. (अपुर्ण)

2 comments:

  1. छानच भाऊ,ज्या दिवशी मराठा समाजाच्या ही गोष्ट डोक्यात 'घुसेल' त्या दिवशी हे नेते कायमचे घुसतील (अपूर्ण)

    ReplyDelete