Thursday, September 22, 2016

शहाण्यांपासून सावध रहा


kureel cartoon on secularism के लिए चित्र परिणाम
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले पाहिजे. किंवा काय केल्यास त्यांचा अस्त होईल; असे सांगणार्‍या अनेक जाणकारांचे सध्या भरपूर पीक आलेले आहे. सुदैवाने मोदी अशा कोणाचेही काही ऐकत नाहीत, की त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. पण मोदी समर्थकांची गोची आहे. त्यांना अशा जाणकारांना शिकवण्याची व समजावण्याची मोठी खाज आहे. त्यातून अनेक वादविवाद निर्माण होतात. एक साधी गोष्ट लक्षात घेतली तर त्यांना चिंता करण्याचे काही कारण शिल्लक उरणार नाही. उदाहरणार्थ आजची गोष्ट वा परिस्थिती बाजूला ठेवा आणि तीन वर्षे मागे चला. तेव्हा यातले बहुतंश जाणकार अभ्यासक जे काही सल्ले मोदींना वा त्याही आधी भाजपाला देत होते, त्याचे पालन झाले असते तर? या प्रश्नाचे उत्तर शोधा. म्हणजे असे, की भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करू नये, असाच या तमाम जाणकारांचा सल्ला होता. तसे केल्यास भाजपाला उरलेसुरले स्थानही गमावण्याची पाळी येईल. म्हणून भाजपाने तसा धोका पत्करू नये, हाच सल्ला दिला जात होता ना? भाजपाने तो मानला नाही आणि आज त्यांच्या हाती देशाची पुर्ण बहूमताने सत्ता आलेली आहे. दुसरे नरेंद्र मोदी घ्या. त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी प्रचाराची मोहिम सुरू केली. त्यानंतर काय झाले? हळुहळू मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर जातात असे दिसल्यावर त्याच जाणत्यांनी मोदींनी मुस्लिमांची माफ़ी मागावी, मुस्लिम टोपी घालावी; इत्यादी सल्ले दिलेच होते. अन्यथा अवघा मुस्लिम मतदार विरोधात जाऊन मोदींसह भाजपा मार खाईल, असाच इशारा होता ना? काय झाले? मोदींनी तिकडे वळून बघितले नाही आणि आज मोदी सत्तेवर आरुढ झालेत. आता तेच कालचे शहाणे आज पुन्हा मोदींनी काय केले पाहिजे, याचे सल्ले देतच आहेत. आपले सुदैव इतकेच, की मोदी त्याकडे आजही ढुंकून बघत नाहीत.

तेव्हा किंवा त्याच्याही आधीपासून अशा लोकांचा शहाणपणा स्विकारून लालकृष्ण अडवाणी वागत गेले आणि आज त्यांच्या हयातीत त्यांना त्यांच्याही पक्षात स्थान राहिलेले नाही. म्हणूनच अशा सल्लागारांची किंमत किती ती ओळखली पाहिजे. त्यांना आपले शहाणपण सांगितल्याखेरीज चैन पडत नाही आणि शहाणपणा सिद्ध करण्यासाठी शक्य तितका मोठा मुर्खपणा केल्याशिवाय घास गिळवत नाही. त्यांना त्यांच्याच नशिबावर सोडून आपण आपला विचार करू शकलो तरी खुप झाले. फ़ार दुर जाण्याची गरज नाही. गेल्या दोन वर्षात मोदी सतत परदेशी असतात वा फ़िरायला जातात; म्हणून त्यांची हेटाळणी करण्यात हेच शहाणे पुढे होते ना? मोदींना अनिवासी भारतीय ठरवण्यात त्यांनी धन्यता मानली. पण परदेशी जाऊन हा पंतप्रधान नेमके काय उद्योग करतो, याची चाचपणी करण्याची त्यांना गरज वाटली नाही. कारण त्यांना समजूतीच्या विश्वात रममाण होण्यात आनंद आहे. तर त्यांना मोदी तिथे राहू देतात आणि आपणही त्यांच्या तशा स्वर्गसुखात व्यत्यय आणण्याचे कारण नाही. उलट ज्या दिवशी मोदी अशा शहाण्या व जाणकार लोकांचा सल्ला मनावर घेऊ लागतील, त्या दिवशी आपण चिंताक्रांत व्हायची पाळी आली असे समजावे. आज तरी सुदैवाने तशी वेळ आलेली नाही. म्हणून आपण निश्चींतपणे पंतप्रधान योग्य निर्णय घेतील, इतका विश्वास बाळगून शांत राहिलो, तरी मोठे काम होईल. कारण युद्ध वा परराष्ट्रनिती ह्या गावगप्पा नसतात. चव्हाट्यावर, चावडीवर किंवा वाहिन्यांच्या स्टुडिओत चकाट्या पिटाव्यात; इतक्या सोप्या गोष्टी नसतात. हजारो संदर्भांना लक्षात घेऊन त्यातून वाट काढायची असते. ट्वीट करण्याइतके ते सोपे काम नाही. म्हणूनच शांत राहून काय चालले आहे, त्याचा आढावा घेणे खरा शहाणपणा असतो. गेल्या चार दिवसात काय घडले, त्याचा साकल्याने कोणी सुसंगत विचार केला आहे काय?

पहिली बाब म्हणजे आरंभीची प्रतिक्रीया देऊन पंतप्रधान शांत बसले आहेत. त्यांनी पाक पंतप्रधानांशी संपर्क साधला नाही, की जागतिक नेत्यांची मदत मागायला धावाधाव केलेली नाही. उलट जगातूनच भारताला सहानुभूती व पाठींब्याचे संदेश येत आहेत. ही दोन वर्षातल्या परदेश वार्‍यांची कमाई आहे. दुसरी गोष्ट बहुतेक माजी सेनाधिकारी यावेळी सरकार सकारात्मक संदेश देत असल्याचे सांगतात. विक्रमसिंग हे दोन वर्षापुर्वीपर्यंत सेनाप्रमुख होते आणि त्यांनीच तशी ग्वाही दिलेली आहे. पुर्वी कधी नव्हे इतके यावेळचे सरकार प्रतिकाराच्या मानसिकतेमध्ये असल्याचे सांगत आहेत. तिकडे पाकिस्तानात थेट अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि युद्धाला तयार असल्याच्या गमजा चाललेल्या आहेत. भारताने युद्धाची भाषा केलेली नाही, की पाकिस्तानला संपवण्याची धमकी दिलेली नाही. मग पाक सरकार व सेनेला इतका उतावळेपणा करण्याचे कारण काय? हे भयभीत झाल्याचे लक्षण आहे. चोख उत्तर देऊ इतके बोलून गप्प होणारा मोदी काय करील, याच्या भितीने पाक नेते गडबडले आहेत. मंगळवारी पाकसेनेने तमाम सुट्टीवरच्या सैनिक व अधिकार्‍यांना तात्काळ आपल्या जागी हजर होण्याचे आदेश दिले. हे कशाचे लक्षण आहे? यातून युद्धाची भिती कोणाला आहे, त्याची कल्पना येऊ शकते. पाकिस्तान कशाला घाबरतो, ह्याची जाणिव असल्याखेरीज मोदी असे गप्प बसलेले नाहीत. त्यांनी स्वत:पुरते मौन घेतलेले नाही. पण पाकविषयात अन्य कुणा मंत्र्याने बोलू नये, असाही फ़तवा काढलेला आहे. भारताचे हे मौन पाकिस्तानला चिंतेत टाकणारे ठरले आहे. अमेरिका व अन्य देशांच्या नेत्यांना भेटून नवाज शरीफ़ कसली रदबदली करीत आहेत? ज्यांच्यापाशी अण्वस्त्रांचा रामबाण उपाय सज्ज आहे आणि वापरण्याची धमक आहे, त्यांना इतकी पळापळ करावी लागत असते काय?

आजवर पाकने सतत अण्वस्त्र वापरण्याचा धाक दाखवून भारताला हुलकावणी दिलेली आहे. पण यावेळी ती धमकी कामाची नाही, याची पुर्ण कल्पना असल्यानेच त्याची तारांबळ उडालेली आहे. चोख उत्तर म्हणजे युद्ध असे गृहीत धरून पाकिस्तान युद्ध टाळण्यासाठी धावपळ करतो आहे. कारण युद्धात आपण भारतासमोर टिकू शकत नाही, हे पाकिस्तान पुर्णपणे ओळखून आहे. पण त्याच्याही पुढे पाकची अण्वस्त्रांची धमकीही पोकळ असल्याचे आता जगानेही ओळखले आहे. म्हणूनच दरवेळी अशी स्थिती आल्यावर संघर्ष टाळा, असा सल्ला देणारे अन्य मोठे देशही तशा सल्ल्यापासून अलिप्त राहिले आहेत. तणाव कमी करा असेही अमेरिका, ब्रिटन, फ़्रान्स वा रशियाने भारताला वा पाकला समजावण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. पाक अण्वस्त्राचा वापर करण्याची भिती असती, तर तर या मोठ्या देशांनी त्यात हस्तक्षेप केला असता. पण तसे कोणी करीत नाही. कारण पाकची धमकी पोकळ असल्याचे जगातल्या मुत्सद्दी लोकांनी जाणले आहे आणि त्या धमकीच्या बळावर चाललेला जिहादी खेळ भारत संपवणार असेल तर जगालाही हवा आहे. तो करताना अणुयुद्ध पेटणार नसल्याची जगाला वाटणारी खात्रीच, या अलिप्ततेचे खरे कारण आहे. पाकिस्तान त्या अलिप्ततेनेच भयभीत झाला आहे. कारण अण्वस्त्रांना भारत घाबरणार नसेल, तर त्याला रोखणे आवाक्याबाहेरचे आहे याची पाकला पुर्ण कल्पना आहे. किंबहूना मोदी म्हणजे भारतीय शहाण्यांच्या मुठीतला पंतप्रधान नाही, हेच त्या भितीचे कारण आहे. आपले भारतातील बुद्धीमान हस्तक मोदींना युद्धापासून परावृत्त करू शकत नसल्यानेच पाक घाबरला आहे. मग ज्यांच्यावर आता पाकिस्तानचाही विश्वास उरलेला नाही, त्यांच्या शहाणपणावर आपण किती विश्वास ठेवणार आहोत? अशांसाठी आपला वेळ आणि उर्जा खर्च करणे सोडले, तरी मोठे राष्ट्रकार्य होऊ शकेल.

2 comments:

  1. छानच सुंदर भाऊ,मोदींची परिपक्वता व योग्यता दिसुन येत आहे तसेच मदरासाछाप पाकडे व त्यांचे सडकछाप भारतातील हस्तक अंधी केचू केजू थापाडे रद्दी वाले यांची लायकी कळते, कीव येते,एक सड़कछाप नेता जो राजघराण्यातील असावा तो म्हणाला होता की,"जर राहुल गांधी प्रधानमंत्री असते तर उरी घटना घडलीच नसती"ही बातमी एका रद्दीवाल्याने नेटवर हायलाईट करताना स्वतःचे मत असल्यासारखी टाकली होती हा मूर्खपणाचा कळस आहे

    ReplyDelete
  2. Solid Sir !!!! Hope one day all such people will understand....

    ReplyDelete