Wednesday, October 5, 2016

पाक हस्तक कसे काम करतात?



भारतातले घातपाती फ़क्त तोयबा किंवा मुजाहिदीन आहेत, ही आपली समजूत आहे. त्या स्फ़ोट घडवणार्‍या जिहादींपेक्षाही भयंकर मोठे नुकसान करणारे प्रतिष्ठीत घातपाती, आपल्या आसपास उजळमाथ्याने वावरत आहेत. मागल्या दहा वर्षात त्यांचा मस्तवालपणा किती बोकाळला होता, त्याची चर्चा होत नाही. म्हणून आजसुद्धा असे लोक प्रतिष्ठीत चेहर्‍याने समा्जात वावरत आहेत. मात्र त्यांच्या कारवाया कायद्याच्या चौकटीतल्या असल्याने, त्यांना सरकार हात लावू शकत नाही. तीनचार वर्षापुर्वी देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफ़वा पाकिस्तानने फ़ैलावलेली नव्हती. भारतातल्याच एका प्रतिष्ठीत इंग्रजी वृत्तपत्राने तसे वृत्त दिलेले होते. शेखर गुप्ता नावाचे संपादक त्यामागे होते. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारतीय राजधानी दिल्ली कब्जात घेऊन भारतात लष्करी राजवट लादण्याचे कारस्थान शिजवले गेलेले होते. त्यानुसार दिल्लीपासून नजिक असलेल्या दोन छावण्यातून सैन्याच्या तुकड्याही दिल्लीकडे निघालेल्या होत्या. पण कुठून तरी बातमी राज्यकर्त्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना रोखले गेले; अशी ही बातमी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात छापून आली. मग त्यावर सर्वच वाहिन्यांनी गदारोळ सुरू केला होता. त्यासाठी तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्यावर गरळ ओकण्याचा धंदा सुरू झाला होता कारण सिंग आणि सरकार यांच्यात तेव्हा विवाद माजलेला होता. आपल्या जन्म प्रमाणपत्रातली दुरूस्ती सरकारने मान्य करावी, म्हणून सिंग कोर्टात गेले होते आणि त्यासाठीच त्यांना बदनाम करण्याचा हा राजकीय डाव खेळला गेला होता. सरकारशी वाद झाले म्हणून सिंग लष्करी बंड करण्याच्या तयारीत असल्याची ही अफ़वा देशाच्या सुरक्षेशी पोरखेळ करणारी होती. पण त्याचे भान राखले गेले नाही. ते पत्रकारांनी ठेवले नाही की तात्कालीन राज्यकर्त्यांनी ठेवले नाही. पण यामागची प्रेरणा कुठली होती? हेतू काय होता?

लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना त्यानंतर दिर्घकाळ माध्यमातून लक्ष्य करण्यात आले. सिंग यांच्या कालावधीमध्ये काश्मिरात लष्कराने मोठे यश मिळवलेले होते आणि अनेक जिहादी दहशतवादी, उचापती सोडून मुख्यप्रवाहात येण्य़ाची प्रक्रिया सुरू झालेली होती. तिलाच शह देण्यासाठी ह्या अफ़वा पिकवण्यात आल्या होत्या. दहशतवादाला वेसण घालणारी सिंग यांची मोहिम हाणून पाडण्यासाठीचे हे काहूर पद्धतशीरपणे माजवण्यात आलेले होते. सिंग यांच्या कोर्टात जाण्याचा विषय महत्वाचा नव्हता. त्यापेक्षा त्यांना चहुकडून घेरण्यासाठी जी गोपनीय माहिती समोर आणली गेली, ती घातक होती. त्यावर अधिक गाजावाजा होऊ नये म्हणून मग सिंग यांनी राबवलेली योजना गुंडाळावी लागली होती. त्याला लष्करी भाषेत ‘टीएसडी’ असे संबोधले जाते. सिंग यांच्यानंतर प्रमुखपदी आलेल्य विक्रमसिंग यांनी तो विभाग गुंडाळून टाकला. टीएसडी ही काय भानगड होती? ही नुसती इंग्रजी अक्षरे आहेत. त्याचा अर्थ टेक्निकल सपोर्ट डिव्हीजन. भारतीय लष्कराच्या ज्या काश्मिरात कारवाया चालू होत्या, त्यामध्ये हा विभाग अतिशय मोलाचे व पायाभूत काम करत होता. दहशतवाद व जिहादच्या आहारी गेलेल्या तरूणांना विश्वासात घेऊन मुख्यप्रवाहात आणणे आणि शक्य होईल तिथे त्यांनाच विविध जिहादी टोळ्यांच्या विरोधात लढायला उभे करणे, असे काम टीएसडी या विभागाकडून चाललेले होते. अशा कामात खर्च होणारा पैसा संरक्षण खात्याचा कुठल्या हिशोबात दाखवता येत नसतो. थोडक्यात हा विभाग व त्यावरचा खर्च, त्याची कृत्ये हा सर्व गोपनीय भाग होता. त्याचा कुठलाही बोभाटा करणे घातक होते किंवा सुरक्षेला बाधा आणणारे होते. ते काम कोणी केले? पाकच्या कुणा हेराने केले नाही, तर भारतीय पत्रकार व माध्यमांनीच ही देशद्रोही कारवाई पार पाडली. कशी तेही लक्षात घेण्यासारखे आहे.

काश्मिरची समस्या सोडवायची असेल, तर तिथल्या लोकांना विश्वासात घ्यायला हवे. विश्वासात घेतल्यावर त्यांच्याकडून आपल्याला हव्या तशा कारवाया करून घेणे शक्य होते. काश्मिरी प्रदेशात घुसलेले जिहादी व पाक हस्तकांचा शोध घेण्य़ाचे काम सोपे नाही. त्यात अनेक सैनिक मारले जातात. तेच काम त्यांच्यातच आजवर वावरलेल्या तरूणांकडून करून घेण्याची योजना, म्हणजे टीएसडी होय. त्यात अशा तरूणांना विविध आमिषे दाखवणे, त्यांना मदत करणे, अशा अनेक गोष्टी येतात. त्याचा हिशोब खात्यामध्ये दाखवता येत नाही. म्हणून एका गुप्त खात्यामधून ह्या पैशाचे व्यवहार चालत होते. त्याच मार्गाने अनेक हुर्रीयतनेते वा राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही वेसण घालण्याच्या हालचाली टीएसडी मार्फ़त चालू होत्या. त्याचा सर्वात मोठा फ़टका पाकिस्तानला बसणा्र हे उघड होते. कारण त्यांनी पढवलेले, प्रशिक्षित केलेले जिहादीच भारतीय लष्कराच्या कामाला लागलेले होते. त्यातून काश्मिरातील असंतोष कमी होऊन फ़ुटीरवादी कारवायाला लगाम लावला जात होता. अशी प्रभावी टीएसडी योजना किंवा तो विभाग, पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होता. पण पाकिस्तान त्यावर काहीही करू शकत नव्हता. पण हे सर्व भारतीय कायद्याच्या चाकोरीत बसणारे नव्हते. म्हणूनच त्याचा जाहिर बोभाटा केल्यास तसा प्रश्न संसदेत विचारला जाणार आणि तो विभाग बंद पाडणे, भारतीय सेनादलाला भाग पडणार; ही उघड गोष्ट होती. तेच काम यातून साधले गेले. ज्याने भारतीय सुरक्षा दलाला काश्मिरात फ़टका बसला आणि पाकच्या जिहादी कारवायातील अडथळा दूर झाला. मात्र ती कामगिरी भारतालल्या माध्यमांनी पार पाडलेली आहे. भारतीय सेनादलाच्या छुप्या कारवायांना चव्हाट्यावर आणून, याच भारतीय माध्यमांनी पाकिस्तानला किती मोलाची मदत केली, त्याचा हिशोब वेगळा मांडावा लागेल.

अर्थात त्याला कायदेशीर भाषेत गद्दारी कोणी म्हणू शकत नाहीत. भारतातले कायदे प्रत्येकाला अधिकार देतात आणि त्या मर्यादा ओलांडण्याला गुन्हा मानलेले आहे. त्यामुळेच त्याच चौकटीत राहून संबंधित पत्रकार व माध्यमांनी गैरकारभार उघडकीस आणला होता. पण त्यातून नुकसान भारतीय सुरक्षेचे झाले आणि लाभ पाकलाच झालेला होता. ज्यांनी हे गैरकारभार उजेडात आणले, त्या पत्रकार वा माध्यमांनी कायद्याच्या पावित्र्याची तळी उचलून धरलेली होती. पण त्याच कारवायामुळे काश्मिरातील सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या यशाचा हिशोब कुठे मांडलेला नव्हता. भारतीय सेनादलही त्याचे श्रेय घेण्यासाठी खुलेपणाने अशा कारवायांची जबाबदारी घ्यायला पुढे येऊ शकत नव्हते. त्याचाच पत्रकारी लाभ घेत या हस्तकांनी पाकिस्तानला प्रचंड मदत केली. त्यामुळे काश्मिरात जिहादला जो पायबंद घातला गेला होता, त्याला पुन्हा मोकाट रान मिळाले. कारण काश्मिरी जनतेत मिसळून वा त्यातले काही लोक हाताशी धरून, जी गोपनीय माहिती लष्कराला मिळत होती, ती बंद झाली होती. मग असे पत्रकार पावित्र्याच्या कितीही गमजा करीत असले, तरी व्यवहारात ते पाकिस्तानला पुरक काम करीत होते, हीच वस्तुस्थिती असते. पाक हस्तक कसे काम करतात, त्याचा हा एक नमूना आहे. याखेरीज अनेक किस्से सांगता येतील. पण टीएसडी हा गंभीर मामला आहे. कारण त्यामुळे काश्मिरात आटोक्यात आलेला जिहाद व दहशतवादाला पुन्हा जोर चढला. आज संपुर्ण काश्मिरात दिर्घकाळ संचारबंदी लावण्याची वेळ आली, त्याची ही अशी पार्श्वभूमी आहे. ह्या पाक हस्तकांना कायद्याच्या चाकोरीत वागणारे असल्याने भारत सरकार वा कायदे काही करू शकत नाहीत. आपण सामान्य माणसाने त्यांना बहिष्कृत केले, तरच त्यांन लगाम लावला जाऊ शकेल. आपण अशा लोकांना बहिष्कृत करू शकतो काय?

1 comment:

  1. Presstitute कांगी आपिये सपीये केचू के तुकडे होंगे इनशाल्लाह इनशाल्लाह

    ReplyDelete