Sunday, October 9, 2016

झेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा?

rahul kanhaiya के लिए चित्र परिणाम

एक वर्षापुर्वी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर एका परिसंवादच्या निमीत्ताने पाकिस्तानला एक अजेंडा दिलेला होता. त्यातून प्रचंड वादविवाद निर्माण झाला होता. ‘दुनिया’ नावाच्या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर भारत-पाक संबंध आणि खुंटलेली बोलणी, याविषयी परिसंवाद योजलेला होता. त्यात दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी बोलणी कशी आवश्यक आहेत, त्याचा उहापोह चालू होता. त्यात सहभागी होताना मणिशंकर अय्यर यांनी पाकला स्पष्ट शब्दात बजावले होते, की तुम्हाला चार वर्षे प्रतिक्षा करावी लागेल. जोवर भारताची सत्तासुत्रे मोदींच्या हाती आहेत, तोपर्यंत दोन देशात बोलणी होऊ शकत नाहीत. तुम्ही चार वर्षे प्रतिक्षा करा किंवा दुसरा मार्ग म्हणजे मोदींना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी आम्हाला मदत करा. इतक्या स्पष्टपणे अय्यर यांनी मोदीविरोधात पाकिस्तानशी आपण हातमिळवणी करायला तयार असल्याचे सांगितले होते. आता त्यांचीच भूमिका पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीज मांडत आहेत. मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत पाकिस्तानला बोलणी करणे अशक्य आहे, असे त्यांनी नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे मोदी विरोध हा कॉग्रेस वा पुरोगामी भारतीयांचा अजेंडा आता पाकिस्ताननेही स्विकारला, असेच म्हणायची वेळ आली आहे. की हा पाकिस्तानचाच अजेंडा असुन त्यासाठी मागली चौदा वर्षे भारतात मोदी विरोधातले राजकारण पद्धतशीरपणे राबवले गेलेले होते? कारण हळुहळू त्यातले धागेदोरे स्पष्ट होत आहेत. गुजरात दंगलीपासून सुरू झालेली ही एका राज्यातली मोहिम, मग देशव्यापी करण्यात आली होती आणि आता तर जागतिक वा आंतरराष्ट्रीय पातळीवर ती मोहिम जाऊन पोहोचली आहे. त्याचा पाकिस्तानातला आरंभ वर्षभरापुर्वी मणिशंकर आय्यर यांनी केला होता. आता पाक संसद व सरकारने तो अजेंडा पत्करला आहे. हे उलगडत जाईल तसा इथे पाकिस्तानी झेंडे कशाला फ़डकतात, त्याचेही उत्तर मिळू शकेल.

गुजरात दंगल असो किंवा इशरत जहान चकमक असो, त्यात मोदींना गोवण्याचा आटापिटा करण्यात आला होता. त्यासाठी भारतीय गुप्तचर खात्याच्या अधिकार्‍यांना देखील तुरूंगात डांबण्याचे कारस्थान कॉग्रेसी गृहमंत्री चिदंबरम यांनी केल्याचे धागेदोरे मध्यंतरी उघडकीस आलेले आहेत. प्रत्येक बाबतीत युपीए सरकार पाकिस्तानला पुरक ठरणारे निर्णय घेत होतेच. मुंबईचा भीषण हल्ला झाल्यानंतरही पाकिस्तानाला धडा शिकवण्याची कुठलीही कारवाई झाली नाही. पण त्याच संदर्भातील ‘हु किल्ड करकरे’ या पुस्तकाचे प्रकाशन कॉग्रेसी नेते दिग्वीजयसिंग यांच्या हस्ते झालेले होते. त्या पुस्तकात मुंबई हल्ला हा भारतीय गुप्तचर खात्याने करकरेंना मारण्यासाठीच घडवून आणल्याचा बेताल आरोप करण्यात आला होता. नंतरच्या काळात त्या पुस्तकाच्या विविध भाषेत प्रति काढून चर्चेचे कार्यक्रम आयोजित करण्यात पुरोगाम्यांनी पुढाकार घेतला होताच. अशा रितीने भारतीय सेनादल, पोलिस व गुप्तचर यंत्रणांना खच्ची करण्यापासून पाकच्या प्रत्येक पापावर पांघरूण घालण्याचे उद्योग राजरोस चालत राहिले. नंतर चिदंबरम यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री झाले आणि त्यांनी जिहादी व पाकिस्तानी हस्तकांच्या घातपाती गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी थेट संघाच्या शाखांवर दहशतवादी प्रशिक्षण दिले जात असल्याच भन्नाट आरोप केलेला होता. ती बातमी प्रसिद्ध होताच लष्करे तोयबाचा म्होरक्या सई्द हाफ़ीज याने शिंदे यांचे दिलखुलास स्वागत केलेले होते. मोदी विरोधात भारतातली पुरोगामी जमात आणि कॉग्रेस पक्ष कोणता अजेंडा राबवत होते, त्याचा सर्व तपशील इथे देण्याची गरज नाही. शेकड्यांनी असे पुरावे कुठल्याही वर्तमानपत्रात उपलब्ध आहेत. फ़क्त ते संगतवार मांडण्याची गरज आहे. त्यातून एक स्पष्ट होते की भारत नावाचा देश आणि पाकिस्तान यांच्यातली भिंत म्हणूनच मोदींकडे बघितले जात होते.

भारताला खच्ची करून संपवणे आणि जिहादी घातपाताच्या मार्गाने या देशाचा विनाश घडवून आणण्याची संपुर्ण योजनाच आखली व राबवली जात होती. त्यामध्ये एकच अडथळा होता, तो नरेंद्र मोदी! सत्ता कॉग्रेसच्या हाती असल्याने भारतीय सेना किंवा गुप्तचर खात्याला पाकिस्तानने घाबरण्याचे कुठलेही कारण नव्हते. देशाला वाचवण्याच्या यापैकी कुणाच्याही प्रयत्नांना खुद्द कॉग्रेसी युपीए सरकारच लगाम लावणार, याविषयी पाकिस्तान नि:शंक होता. पण कायमची सत्ता कॉग्रेसपाशी रहाणार नव्हती. निवडणूकीने सत्ता बदलली जाऊ शकत होती. ती हिरावून घेण्याची कुवत लालकृष्ण अडवाणी यांच्यापाशी नव्हती. अडवाणींना लगाम लावून रोखण्यासाठी त्यांच्या गोटात आधीपासून एक हस्तक पेरलेला होता. त्याच्याच सल्ल्याने वागणार्‍या अडवाणींना पाकने कधीच नेस्तनाबुत करून टाकलेले होते. म्हणूनच सत्ताबदलाची भितीही पाकिस्तानला नव्हती. भिती एकच होती, की मोदी व संघ मिळून भारताची सत्ता काबीज करतील आणि सर्व बेत उधळला जाईल. त्याच कारणास्तव मोदींच्या विरोधात सातत्याने कारस्थाने रचली गेली आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या सापळ्यात पकडण्याचा खेळ चालू राहिला. मात्र त्यामुळेच सामान्य माणसाला नरेंद्र मोदी हाच पाकिस्तानचा शत्रू आणि म्हणूनच भारतासाठी एकमात्र तारणहार असल्याची खात्री पटत गेली. पुरोगामी म्हणून जे राष्ट्रद्रोही नाटक मागली दहाबारा वर्षे चालले होते, तो प्रत्यक्षात पाकिस्तानचाच अजेंडा होता. आता तोही उघडा पडला आहे. कारण मोदी सत्तेत येऊन बसले आहेत आणि कॉग्रेससह तमाम पुरोगाम्यांचा पाकिस्तानी अजेंडा नामोहरम होऊन गेला आहे. थोडक्यात आता पुरोगाम्यांचा बोलविता धनी स्वत:च मैदानात आला आहे. येच्युरी बोलण्याचा हट्ट कशाला धरतात? मणिशंकर मोदी हटवण्यासाठी पाकची मदत कशाला मागतात? अशा प्रश्नांची उत्तरे सरताज अझीज यांनी मोजक्या शब्दात दिली आहेत.

नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरच्या प्रतिक्रीयाही बोलक्या आहेत. पाकिस्तान म्हणतो, असा कुठलाही हल्ला झालाच नाही. कॉग्रेसी नेतेही त्याचाच पुनरुच्चार करीत समोर आलेले आहेत. आठवते, तो कन्हैया काय म्हणाला होता? भारत तेरे टुकडे होगे. त्याची कोर्टात वकिली करायला कॉग्रेसचे माजीमंत्री कपील सिब्बल आणि सलमान खुर्शीदच पोहोचले होते ना? आज राहुल सेनादलाचे कौतुक सांगतात. पण कन्हैयाने भारतीय सेनेचे जवान काश्मिरात बलात्कार करतात, असा आरोप केल्यावर त्याची पाठ थोपटायला कोण सर्वप्रथम नेहरू विद्यापिठात पोहोचला होता? राहुल गांधीच होते ना? काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हजारो भारतीय जवानांनी आजवर आपले प्राण वेचले आहेत. त्याची राहुलनी काय किंमत केली होती? बलात्कारी जवान अशीच किंमत होती ना? कन्हैयाच्या विधानाचे समर्थन म्हणजे प्रत्यक्षात भारतीय जवानांच्या हौतात्म्याची विटंबना होती. आज तीच भंपक माणसे मोदींना श्रेय कसले घेता म्हणून जाब विचारत आहेत. सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना जवानांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला नेता, अशीच मोदींची ओळख आहे. म्हणूनच पाकिस्तानची तीच डोकेदुखी आहे. त्यांना भारतीय लष्कराच्या शौर्याची खात्री आहे. पण कॉग्रेसी वा पुरोगामी सत्ता असली तर भारतीय सेना काहीही करू शकत नाही, याचीही खात्री आहे. म्हणूनच पाकला भिती भारताच्या मोदी नेतृत्वाची आहे. मोदी ही पाकची खरी समस्या आहे. तीच कॉग्रेसची समस्या आहे. तीच भारतीय पुरोगाम्यांना भेडसावणारी समस्या आहे. त्या सर्वांचा अजेंडा समान आहे, फ़क्त झेंडा वेगवेगळा आहे. आता पुरोगामी म्हणजे पाकिस्तानवादी हे समिकरण चव्हाट्यावर आलेले आहे. सरताज अझीज यांनी त्याची जाहिर घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे भारतीयांना कोण देशद्रोही व कोण देशप्रेमी हे ओळखणे सोपे झाले आहे.

3 comments:

  1. ह्या देशद्रोही कारवाईची या राजकीय पक्षांना लाजही वाटत नाही. म्हणूनच जनतेने या गद्दारांना कायमच लक्षात ठेवावे व तशी ट्रीटमेंट त्यांना देवून त्यांचा शेवट करावा.

    ReplyDelete
  2. भाऊ अतिशय छान आणि तार्किक विवेचन.

    ReplyDelete