Tuesday, November 1, 2016

नशिबवान सिमीवाले

khwaja yunus के लिए चित्र परिणाम

भोपाळच्या घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रीया व बातम्या आपण किती बारकाई्ने तपासून बघतो? सोमवारी सकाळी ही बातमी आली, तेव्हा फ़टाफ़ट मध्यप्रदेशच्या सरकारची निंदा करण्याची शर्यत सुरू झाली. तिथे प्रशासन वा तुरूंग व्यवस्था कशी ढिसाळ आहे; याचा जाब विचारला जाऊ लागला. सिमीचे अतिरेकी कसे चलाख आणि सरकार कसे नालायक, हे सांगताना प्रत्येकाची तर्कबुद्धी दुथडी भरून वहात होती. पण काही तासातच ते सर्व अतिरेकी भोपाळ नजीकच्या एका गावात आढळले आणि चकमकीत मारले गेले. अशी बातमी आली आणि एकूणच माध्यमांचा नूर बदलला. त्यांना खोट्या चकमकीत मारल्यापासून, मुळातच पळून जायलाही सरकारनेच मदत केल्याचाही आरोप सुरू झाला. अर्थात असे आरोप करणारे आता नवे अनोळखी चेहरे राहिलेले नाहीत. वाहिन्यांवर झळकणारा किंवा माध्यमातून पुढे आणला जाणारा, असा एक ठराविक घोळका आता सामान्य माणसाच्याही चांगलाच परिचित झाला आहे. जोपर्यंत अतिरेकी पळाल्याची बातमी झळकत होती, तोपर्यंत अशा शंकासुरांपैकी कोणाचेही वाहिन्यांवर दर्शन घडले नाही. पण आठही अतिरेकी मारले गेल्याची बातमी आली आणि त्याच घोळक्यातले ठराविक चेहरे बहुतेक वाहिन्यांवर दिसू लागले. मग दोनतीन मोबाईल चित्रणेही समोर आली आणि खोट्या चकमकीत या सिमी जिहादींना हकनाक मारल्याचा आरोप सुरू झाला आहे. अर्थात त्यातही आता काही नवे राहिलेले नाही. असे आरोप आणि गदारोळ इशरतच्या चकमकीपासून नित्याचे झाले आहेत. विविध शंका उपस्थित करून लोकांच्या मनामध्ये गोंधळ उडवून द्यायचा आणि मग त्यासाठी पुरक ठरतील असे काही अस्पष्ट पुरावेही समोर आणायचे; ही अशा लोकांची मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. त्यामुळेच भोपाळच्या घटनेत नवे असे काही नाही, नवे असेल तर त्यांचे नशिब नवे वा वेगळे आहे.

आठ सिमी जिहादींना मारण्यात आले ती माणसे होती आणि नि:शस्त्र असताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. असे म्हणून जे हळहळत आहेत, त्यांना रमाशंकर यादव नावाचा तुरूंगातला शिपाई सुद्धा मारला गेला, हे ठाऊक नाही काय? की यादव नावाचा तुरूंगातला शिपाई मानव नसतो, असे ह्या मानवतावाद्यांना म्हणायचे आहे? त्यांना सिमीचे किंवा कोणी दहशतवादी तेवढीच माणसे आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मरणाचा उमाळा येतो व बाकी त्यांच्या हिंसेत मारले जातात, त्यांच्याविषयी काहीच कसे वाटत नाही? कधी या लोकांनी अशा दहशतवादी तत्वज्ञान मांडणार्‍या वा त्याचे समर्थन करणार्‍यांना, हकनाक मारल्या जाणार्‍या सामान्य नागरिकांच्या मृत्यूसाठी जाब विचारला आहे काय? की नागरिक माणसे नसतात, अशी त्यांची मानवतेची व्याख्या आहे? यातला फ़रक समजून घेण्यासारखा आहे. अन्यथा आपला असा गैरसमज होईल, की हे लोक फ़क्त मुस्लिमांसाठीच चिंता करतात वा मुस्लिमधार्जिणे आहेत. तसेही नाही. अशा मानवतावाद्यांना मुस्लिमांविषयी सुद्धा कुठलीही आस्था नाही. कारण काश्मिरात नित्यनेमाने मारले जाणारे मुस्लिमच आहेत आणि त्यांना मारणारेही जिहादीच आहेत. पण कुणा मानवतावाद्याने कधी काश्मिरातील जिहादी हिंसेचा मुस्लिम मृत्यूसाठी निषेध केलेला आपल्याला बघायला मिळणार नाही. मुंबई हल्ल्यातही कसाब टोळीकडून अनेक मुस्लिम मारले गेलेत. पण त्याविषयी अशा कुणा मानवतावाद्याने अश्रू ढाळलेले नाहीत. कारण त्यांना मुस्लिमाविषयीही कुठली आपुलकी नाही. त्यांना नरसंहाराविषयी आस्था आहे आणि म्हणूनच जे कोणी असा नरसंहार करतील, त्यांच्याविषयी मानवाधिकार जपणार्‍यांना कमालीची आपुलकी असते. त्यांना जिहादी दहशतवादी मारेकर्‍यांविषयी आस्था असल्याचे दिसून येते. पण त्याचेही एक कारण आहे. त्यांना भारताविषयी कमालीची घृणा आहे. त्यातून हे जिहादी प्रेम उफ़ाळून आलेले आहे.

इशरत वा याकुब मेमन यांच्यासाठी अशा लोकांना प्रेमाचा उमाळा येतो. पण त्यांनी कधी ख्वाजा युनूसबद्दल दु:ख केल्याचे तुम्ही ऐकले आहे काय? इशरत वा याकुब यांच्याइतका ख्वाजा युनूस नशिबवान नव्हता. दुर्दैवी होता बिचारा! त्यालाही सिमीचाच अनुयायी म्हणून संशयित वागणूकीसाठी अटक झाली होती. मुबईत घाटकोपर मुलुंड असे किरकोळ स्फ़ोट झाले, त्यातला आरोपी म्हणून ख्वाजा काही महिने पोलिस कोठडीत होता. त्याच्याच समवेत डॉ. मतीनही पकडला गेला होता. पण त्यांना पकडून तपास करणारे वा त्यांना छळणारे पोलिस सेक्युलर होते. कारण तेव्हा महाराष्ट्रात सेक्युलर पक्षांचे सरकार होते. कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते आणि त्याच काळात एकेदिवशी नेमकी अशीच चकमक नगर जिल्ह्यात घडली होती. मुंबईहून ख्वाजा युनूसला तपासासाठी औरंगाबादला नेण्यात आले. पण नगरच्या रस्त्यावर कुठेतरी पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात युनूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटल्याची तक्रार नोंदवली गेली. तो युनूस अजून सापडलेला नाही. त्याचे काय झाले ते कोणीच शोधून काढू शकलेला नाही. ख्वाजा युनूस बेपत्ता झाला आणि पोलिसांच्या कब्जात असताना बेपत्ता झाला, म्हणून त्याला हजर करण्यासाठी अखेर त्याच्या कुटुंबाने हायकोर्टात धाव घेतली होती. पण यापैकी एकही मानवतावादी त्या कुटुंबाच्या मदतीला धावला नाही. त्यांना ती कायदेशीर लढाई एकाकी लढावी लागली. इशरतसाठी धावलेली तीस्ता सेटलवाड किंवा अन्य कोणीही पुरोगामी, ख्वाजाच्या कुटुंबाला मदत देण्यास पुढे आला नाही. मात्र त्यांनी एकाकी लढवलेल्या त्या खटल्यात अखेर ख्वाजाला पोलिसांनीच मारून गायब केल्याचे मान्य झाले आणि राज्य सरकारने त्याच्या कुटुंबाला मोठ्या रकमेची भरपाई द्यावी, असा निर्णयही आला होता. किती दुर्दैवी होताना ख्वाजा? त्याचा तर मृतदेहही मिळाला नाही.

पण त्याबद्दल एकही सेक्युलर बोलणार नाही. आज भोपाळच्या चकमकीसाठी प्रश्नचिन्ह घेऊन फ़िरणार्‍या एकानेही कधी ख्वाजा युनूसच्या मृतदेहासाठी आवाज उठवला नाही. तोही मुस्लिम होता. तोही सिमीचाच अनुयायी होता. तोही चकमकीतच मारला गेला होता. मग त्याच्याविषयी या लोकांना इतकी अनास्था कशाला? कारण सोपे सरळ आहे. ख्वाजा युनूसला सेक्युलर सरकारच्या पोलिसांनी चकमकीत मारले आणि गायब करून टाकले. त्याच्या आप्तस्वकीयांना त्याच्यावर अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. त्याच्या तुलनेत इशरत नशिबवान होती ना? मोदींच्या हिंदूत्ववादी गुजरात पोलिसांनी इशरतची चकमक घडवली. तिला मारली आणि अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला. उलट ख्वाजा युनूसला सेक्युलर सरकारच्या पोलिसांनी मारले आणि मृतदेहही गायब केला. तरी कोणाला फ़िकीर नाही. कारण सेक्युलर पोलिसांनी मुस्लिमाला खोट्या चकमकीत मारले, मग त्याला मोक्ष मिळतो असे सेक्युलर पुराण सांगत असावे. त्याच्या उलट बिगरसेक्युलर वा तथाकथित हिंदूत्ववादी सरकारच्या पोलिसांकडून चकमकीत मुस्लिम जिहादी मारला गेला, तर त्याला जन्नतची दारे बंद होतात, असेही पुरोगामी धर्मशास्त्रात नमूद केलेले असावे. अन्यथा आज ज्यांनी आठ सिमीवाल्यांसाठी आक्रोश चालविला आहे, त्यांना ख्वाजा युनूससाठी गदारोळ करायची बुद्धी नक्कीच झाली असती. पण त्या आठ जिहादी सिमी अनुयायांसारखा ख्वाजा नशीबवान नव्हता. त्याची चकमक सेक्युलर राज्यात झाली आणि त्याचा मृतदेहही बेपत्ता झाला. सेक्युलर पुराणात सदेह जन्नतीत जायची सोय केलेली असावी. अन्यथा आज भोपाळच्या चकमकीसाठी मातम करणारे ख्वाजा युनूसच्या वेळी कशाला गप्प नसले असते? त्यांचा आक्रोश सिमी वा मुस्लिमांसाठी नाही. मारणारे पोलिस हिंदूत्ववादी सरकारच्या अखत्यारीतले आहेत. म्हणून मातम चालू आहे.

2 comments:

  1. छान भाऊ,या ८ जणांना मारण्या पेक्षा ४ सेक्युलर मारले असते तर जास्त आनंद झाला असता

    ReplyDelete
  2. Each article gives something new information... Thank you about article... All the best...

    ReplyDelete