उत्तरप्रदेशच्या राजकारणाला आता वेग येऊ लागला आहे. येत्या मार्च महिन्यात तिथे विधानसभेसाठी मतदान व्हायचे असून सत्ताधारी समाजवादी पक्षातच फ़ाटाफ़ुट झाली आहे. अजून उघडपणे पक्षाचे तुकडे पडले नसून, दोन गट एकमेकांची कुवत आजमावून बघत आहेत. अशावेळी अकस्मात दोन नव्या खेळी पुढे आल्या. पुत्रालाच वेसण घालण्यात अपेशी ठरल्यावर मुलायमनी आता तथाकथित पुरोगामी पक्षांची व्यापक आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला आहे. पण त्याच्या अशा पुरोगामी पक्षांच्या आघाडीत मायावतींचा बहुजन समाज पक्ष बसू शकत नाही. म्हणजेच भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळण्याच्या रणनितील फ़ारसा अर्थ नाही. पण चौरंगी लढती होण्यापेक्षा तिरंगी झाल्या, तर चुरशीचा सामना होऊ शकतो. म्हणजे असे, की चौथ्या क्रमांकाच्या पक्षाने स्वबळावर लढण्यापेक्षा अन्य तिघांपैकी एकाशी जुळते घेऊन अन्य दोघांना आव्हान द्यायचे. तसे करायचे झाल्यास कॉग्रेस सर्वात दुर्बळ पक्ष आहे आणि त्याने मुलायम वा मायावतींशी जुळवून घेतल्यास भाजपासमोर खरेखुरे आव्हान उभे राहू शकते. तसे मायावती करणे शक्य नाही. कारण त्या मतदानपुर्व युतीवर विश्वास ठेवत नाहीत. म्हणजेच मुलायम व कॉग्रेसला एकत्र येण्यासाठी प्रयत्न करता येतात. पण मागल्या सात वर्षापासून कॉग्रेसला राहुल हाच देशातील सर्वात लोकप्रिय नेता असल्याच्या भ्रमातून बाहेर पडणे शक्य झालेले नसल्याने, तशी कुठली हालचाल होऊ शकलेली नव्हती. सहा वर्षापुर्वी राहुलनी उत्तरप्रदेश स्वबळावर जिंकण्यासाठी तिथे कित्येक महिने मुक्काम ठोकला आणि मोठे अपयश पदरात घेतले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. मोदींचा लोकसभेतील रणनितीकार प्रशांत किशोरला हवे तितके पैसे देऊन सहा महिन्यांपुर्वी कॉग्रेसने उत्तरप्रदेशात मुलूखगिरी सुरू केली. पण राहुलनी त्याचा दोन आठवड्यात बोर्या वाजवून दिला. त्यामुळे आता रणनिती बदलते आहे.
दोनच दिवसांपुर्वी कॉग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मुलायमची भेट घेऊन चर्चा केली. मुलायम सध्या घरातल्या बेबंदशाहीने ग्रासलेले आहेत. राज्यातली सत्ता टिकवणे आणि पक्षातले आपले नेतृत्व टिकवणे, असे दुहेरी आव्हान सध्या मुलायमसमोर आहे. त्यामुळे स्वबळावर समाजवादी पक्षाला बहुमतात आणणे मुलायमना शक्य वाटेनासे झाले आहे. म्हणूनच त्यांनी लहानसहान पक्ष व पुर्वाश्रमीचे लोहियावादी यांना हाताशी धरण्याचा नवा खेळ सुरू केला आहे. एका बाजूला २०१९ च्या लोकसभेतली मोदीविरोधी आघाडी उभी करण्याची भाषा आहे आणि मनोमन पुत्रालाही विधानसभेत धडा शिकवण्याचा मनसुबा आहे. मुलायम असे द्विधा मनस्थितीत असल्याचा फ़ायदा घेऊन कॉग्रेसने त्यांना साथ देण्याचा पवित्रा घेतलेला असू शकतो. कारण स्वबळावर आणि राहुलच्या भरवश्यावर उत्तरप्रदेशात मुठभर जागाही कॉग्रेस मिळवू शकत नाही, हे त्याही पक्षाला उमजले आहे. नुकत्याच आलेल्या पहिल्या मतचाचणीत कॉग्रेस ४०३ पैकी दहा जागाही मिळवू शकणार नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच जी तुटपुंजी मते आहेत, ती आघाडीच्या पारड्यात टाकून अधिकाधिक किंमत वसुल करण्यात शहाणपणा आहे. कारण यापुर्वीची व चाचणीतील कॉग्रेस व मुलायम यांच्या मतांची बेरीज, भाजपा व मायावतींशी तुल्यबळ ठरू शकणारी आहेत. मात्र त्यात एकच अडचण आहे, ती समाजवादी पक्षाची मिळू शकणारी मते एकत्र असणे. तिथेच सर्व गोची आहे. मुलायमचा पक्ष उभा दुभंगण्याच्या कडेलोटावर उभा आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या लाडक्या पुत्रानेच समाजवादी पक्षात आपलाच शब्द अंतिम ठरावा, असा पेच ऐन मतदानाच्या पुर्वसंध्येला टाकलेला असल्याने मुलायमची स्थिती दयनीय झाली आहे. त्यावरून लक्ष उडवण्यासाठीच मग बिहारच्या पद्धतीचे महागठबंधन उभारण्याच्या कल्पनेला मुलायमनी चालना दिलेली आहे.
त्यात पुन्हा अडचण आहेच. मुलायमपुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी कुठल्याही आघाडीविषयी बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाशी बोलायचे झाल्यास अंतिम अधिकारी कोण, तेच समजेनासे झाले आहे. या निवडणूका होईपर्यंत आपल्याला किंमत आहे. निवडणूका संपल्यावर आपल्याला घरात कुटुंबात वा पित्याच्या गोटात कोणी दाद देणार नाही, याची अखिलेशला खात्री आहे. म्हणूनच राज्यातील सत्ता जाणे व समाजवादी पक्षाचा पराभव, इतक्याच गोष्टींनी पित्याला शरणागत करणे शक्य आहे, हे अखिलेश ओळखून आहे. त्यामुळेच पक्ष बुडाला तरी बेहत्तर, पण पक्षात आपलाच शब्द चालला पाहिजे, असा हट्ट करून तो बसला आहे. त्याला समाजवणे पित्याच्याही हाती राहिलेले नाही. मग ज्याला पुत्राला वठणीवर आणता येत नाही, तो अखिल भारतीय आघाडीचे नेतृत्व कसले संभाळणार? मुलायम यांची अशी तारांबळ पुत्रानेच करून टाकली आहे. ही पित्याची कसरतच त्याच्यावर विसंबून असणार्यांना खच्ची करू शकते, याची अखिलेशला खात्री आहे. म्हणूनच त्याने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. भले या निवडणूकीत सत्ता जाईल. पण पक्षावर कायमची आपली हुकूमत प्रस्थापित होईल, असा त्याचा आडाखा आहे. मुलायमसाठी वेळ उरलेला नाही, पण पुत्रासाठी वय त्याच्या बाजूने आहे. अशी उत्तरप्रदेशच्या राजकारणाची खिचडी होऊन बसली आहे. इतक्या अटीतटीच्या लढतीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावणाराच लढू शकत असतो. उलट आपल्या हाती असलेले वाचवायची कसरती करणारा लढायलाही नालायक असतो. आपली ही आक्रमक प्रतिमाच अखिलेश पक्षाच्या पुढल्या पिढीसमोर पेश करतो आहे. किंबहूना मुलायम मायावती यांचा जमाना संपला असल्याचाही सिग्नल हा तरूण नेता देतो आहे. त्यामुळेच महागठबंधन करण्याच्या मुलायमच्या मनसुब्यावरही पाणी पडताना दिसते आहे.
खरेतर लोकसभेतील अपयशानंतर जनता परिवाराच्या पुनरूज्जीवनाचा प्रयास झाला होता. नितीश, लालू, अजितसिंग वा देवेगौडा असे तमाम जुने समाजवादी एकत्र आले होते आणि त्यांनी ज्येष्ठ म्हणून अंतिम निर्णय मुलायमकडे सोपवला होता. पण मुलायमनी वेळकाढूपणा करून तसे कुठले पाऊल उचलले नाही आणि आपल्याच राजकीय परिवारातली त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. आता घरकुटुंबातली विश्वासार्हता संपल्यावर मुलायमना राजकीय परिवार आठवला आहे. पण वेळ गेलेली आहे. त्यामुळेच महागठबंधन करण्यात राजकीय अगतिकताच समोर येते. पण ही किती विचित्र विरोधाभास आहे ना? एका पक्षात राहुल गांधी यांच्या हाती पक्षाची सर्व पुण्याई आहे आणि अधिकारसुत्रेही आहेत. पण त्यांनी आपल्या कर्मानेच सर्व धुळीस मिळवले आहे. दुसरीकडे अखिलेश यादव आहे. ज्याला पित्याने साडेचार वर्षापुर्वी संधी दिली आणि त्याने टप्पेटोणपे खात, राजकारणाचे असे धडे गिरवले, की आज पित्यालाच आव्हान देऊन पक्षालाच आपल्या मूठीत आणायची झुंज देतो आहे. ज्याला राजकारणात कर्तृत्व गाजवायचे असते, त्याला त्यामध्ये झोकून देण्याची हिंमत करता आली पाहिजे. परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. या घटनाक्रमाने स्वपक्षात दुफ़ळी झाली आणि निवडणूकीत पराभव झाला, तर सत्ताही गमवावी लागणार आहे. तसे होताना पित्याचे छत्रही डोक्यावरून जाणार आहे. आपलेच आप्तस्वकीय विरुद्ध जाणार आहेत. इतका मोठा धोका अखिलेश एकटा पत्करतो आहे. उलट राहुल प्रत्येक पावलावर आपले अपयश व नाकर्तेपणा दुसर्यांच्या माथी मारून कातडी बचावताना दिसला आहे. उत्तरप्रदेशची विधानसभा कोणाला सत्ता मिळवून देईल, हा विषय नंतरचा आहे. पण आज आपण बघत आहोत, तो उत्तरप्रदेशच्या राजकारणात एका नव्या पिढीचा उदय होतो आहे. मुलायम-मायावतीचा जमाना संपत असल्याचे ते संकेत आहेत.
सुंदर भाऊ
ReplyDelete